सौंदत्ती

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : बेळगाव

उंची : २२७० फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध असलेले यल्लम्मा देवीचे ठिकाण बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात आहे. यल्लम्मा देवीचे मंदीर असलेल्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी दुरुस्त केलेला पारसगड किल्ला असुन डोंगराखाली वसलेल्या शहरात १८ व्या शतकात बांधलेला सौंदत्ती किल्ला आहे. स्वराज्यात असणारा हा प्रांत भाषावार प्रांतरचना करताना मात्र कर्नाटक राज्याला जोडला गेला. बेळगाव जिल्ह्यातील बहुतांशी किल्ले हे भुईकोट अथवा गढी प्रकारातील असुन एखादा दुसरा अपवाद वगळता उंच गिरीदुर्ग फारच कमी आहेत. गिरीदुर्ग म्हणता येतील असे किल्ले लहानशा उंचवट्यावर अथवा टेकडीवर आहेत. यातील काही गढीकिल्ले १८ व्या शतकात बांधलेले असुन त्यांच्यावर लढाईचा प्रसंग न आल्याने ते आपल्या मुळ स्थितीत कायम आहेत. असाच एक सुस्थितीतील किल्ला आपल्याला सौंदत्ती शहरात पहायला मिळतो. ... सौंदत्ती हे तालुक्याचे शहर बेळगावपासुन ८७ कि.मी. अंतरावर असुन शहरात प्रवेश करताना शहराच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवर सौंदत्ती किल्ला तर शहरामागील डोंगरावर पारसगड किल्ल्याचे बुरुज तटबंदी दिसायला सुरवात होते. हे दोन्ही किल्ले शहरात सौंदत्ती किल्ला म्हणुनच ओळखले जातात. किल्ला १८ व्या शतकात बांधला असला तरी किल्ल्याच्या बांधकामात दुर्गशास्त्राचा पुरेपुर वापर केलेला दिसुन येतो. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पुर्व बाजुला असुन येथुन तीन दरवाजे पार केल्यावरच किल्ल्यात प्रवेश होतो. यातील सुरवातीच्या दोन्ही दरवाजासमोर रणमंडळाची रचना केलेली आहे. मुख्य दरवाजा बाहेरील बाजुस दुय्यम तटबंदीने बंदीस्त केला असुन हि तटबंदी बुरुजापर्यंत बांधत आणली असुन येथे दुसरा दरवाजा बांधला आहे. बुरुजापासून या दरवाजाच्या दिशेने जाड भिंत घालुन या दुसऱ्या दरवाजापुढील मार्ग चिंचोळा करण्यात आला आहे. पहिल्या उत्तराभिमुख दरवाजाने गडात प्रवेश केल्यावर आपण पुर्वाभिमुख दरवाजासमोर असलेल्या या बंदीस्त रणमंडळात पोहोचतो. मुख्य किल्ल्याबाहेर असलेल्या या तटबंदीत पहारेकऱ्याच्या दोन देवड्या असुन असुन बाहेरील तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या संपुर्ण तटावर चर्या बांधलेल्या आहेत. तटाला फांजी असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. दरवाजाच्या वरील बाजुस कोरीव शिल्प असुन डाव्या बाजुस प्रसंगी गडात ये-जा करण्यासाठी लहान दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस तिसरा दरवाजा असुन या दोन दरवाजामध्ये दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या खोल्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर डावीकडे चौकोनी आकाराची मोठी विहीर आहे तर समोर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. विहीरीतील पाणी पिण्यायोग्य नसले तरी किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. पायऱ्यांनी वर चढुन आल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजात पोहोचतो. दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. तटबंदीला लागुन चारही बाजुस ओवऱ्या असुन हा संपुर्ण मंडप दगडी खांबावर तोललेला आहे. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी चौथऱ्यावर काळसिद्धेश्वराचे मंदिर आहे. बालेकिल्ल्यात हि एकमेव वास्तु आहे. दरवाजाच्या डाव्या बाजुस असलेल्या तटबंदीत तटावर जाण्यासाठी मार्ग आहे. बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या वरील भागातुन संपुर्ण किल्ला व सौंदत्ती शहर नजरेस पडते. शहराच्या मध्यभागी एक लहान टेकडीवर असलेला हा किल्ला अष्टकोनी आकाराचा असुन प्रत्येक कोनावर एक असे खणखणीत आठ बुरुज या किल्ल्याच्या तटबंदीत आहेत. दरवाजाच्या दिशेला असलेले दोन्ही बुरुज तटाकडील बाजूने बंदीस्त असुन यात जाण्यासाठी लहान दरवाजे आहेत. किल्ल्याचा परिसर फक्त चार एकर असुन या लहानशा किल्ल्याचे माची व बालेकिल्ला असे भाग पाडले आहेत. चौकोनी आकाराचा बालेकिल्ला १२०X ८० फुट आकाराचा असुन बालेकिल्ल्याच्या मागील तटबंदीत दोन बुरुज आहेत. मुख्य दरवाजाशिवाय बालेकिल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी अजुन एक लहान दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या पायऱ्या उतरताना डावीकडे एका लहानशा वास्तुत वेगळ्याच प्रकारचे नागशिल्प पहायला मिळते. पायऱ्या उतरून खाली आल्यावर विहिरीच्या दुसऱ्या बाजुस किल्ल्याची सदर व राजवाड्याचे अवशेष आहेत. येथुन सरळ वर चढत गेल्यावर डावीकडे गडावरून बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. दरवाजाच्या पुढील भागात तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटावर जाण्यासाठी ७-८ ठिकाणी अशा पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याची संपुर्ण तटबंदी सुस्थितीत असल्याने तटावरून संपुर्ण किल्ल्यास फेरी मारत दुर्गदर्शन करता येते. यात पुर्णपणे किल्ला पाहुन होतो. प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी गोलाकार चौथरे बांधलेले असुन मारा करण्यासाठी झरोके व जंग्या ठेवलेल्या आहेत. तटावरून फेरी मारताना तटाच्या खालील बाजुस दोन शौचकुप व एक कोठार पहायला मिळते. गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या बुरुजाबाहेर लंबवर्तुळाकार तटबंदीने बंदीस्त केलेला मोठा तलाव आहे पण तो सध्या कोरडा पडलेला आहे. किल्ल्याची पश्चिम बाजु फारशी उंच नसल्याने येथे खंदक खोदुन या बाजुला अतिरिक्त सरंक्षण दिलेले आहे. तटावरून फिरताना समोरील डोंगरावर असलेला पारसगड व सौंदत्ती शहर सतत नजरेत रहाते. किल्ला लहान असला तरी अतिशय सुंदर असल्याने गडफेरी करण्यासाठी एक तास लागतो. बेळगावमधील हुळी मागोमाग दुसरे प्राचीन शहर म्हणजे सौंदत्ती. सौंदत्ती शहरात इ.स.८७५ ते १२२९ या दरम्यानचे सहा शिलालेख सापडले आहेत. त्यांत या गांवाचा उल्लेख सुगंधवतीं, सबंधवट्टी, आणि सवधवट्टी असा केलेला आढळतो. त्यावेळीं हें प्रांताचे मुख्य ठिकाण होतें. येथील रट्ट राजे बेळगांवला स्थानांतरित होईपर्यंत म्हणजे इ.स.१२१० पर्यंत सौदंत्ती हे (इ.स.८५०-१२५०) त्यांच्या राजधानीचें शहर होतें. येथे सांपडलेल्या शिलालेखांवरून रट्ट राजे जैन धर्मीय असुन त्यांनी इ.स.८७६ आणि इ.स.९८१ मध्यें दोन जैन मंदिरें येथे बांधली असें दिसतें. येथें इ.स. १२३० च्या सुमारास मल्लिकार्जुनाचें एक शैव दैऊळ बांधलेलें आहे. बेळगाव किल्ल्यातील दोन खांबावर रट्ट राजा कार्तवीर्य चतुर्थ याने इ.स. ११९९ मध्ये कोरलेले दोन कन्नड शिलालेख आहेत. यात रट्ट राजा कृष्णा तिसरा याने रट्ट घराण्याचा वंशज पृथ्वीवीर याची सौंदतीवर नेमणुक केली. सौंदत्तीचे रट्ट स्वत:ला लाटेलुरू म्हणजे सध्याचे लातूर यांचे प्रतिनिधी म्हणवुन घेत असत. शिवकाळात आदिलशहाच्या अंमलाखाली असलेला हा भाग मराठयांच्या ताब्यात आला. इ.स. १७३० सालीं सावनूरच्या नबाबानें नवलगुंदच्या देसायास शिरसिंगी व सौदंत्ती गावाचे देसाईपण दिले. इ.स.१७३४ सालीं जयाप्पा देसायानें सौंदत्तीचा किल्ला बांधला तर काही इतिहासकारांच्या मते जयाप्पा देसायानें इ.स.१७४३ ते १७५१ दरम्यान हा किल्ला बांधला. म्हैसूरच्या हैदरअलीने हा किल्ला ताब्यात घेतल्यावर हे देसाई त्याला सामील झाले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!