सोलापुर

प्रकार : भुईकोट

जिल्हा : सोलापुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्राच्य दक्षिण टोकाला असलेला शेवटचा जिल्हा म्हणजे सोलापुर. तेलुगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा, पंढरपूर तीर्थक्षेत्रामुळे संतांचा जिल्हा अशी या जिल्ह्याची बहुआयामी ओळख आहे. आपल्यासारख्या दुर्गप्रेमीना मात्र सोलापुरची ओळख आहे ती येथे असलेल्या बलदंड भुइकोटामुळे. मराठवाड्यातील इतर बुलुंद भुइकोटाप्रमाणे हा भुईकोट देखील पुर्णपणे दुहेरी तटबंदीने वेढलेला असुन किल्ल्याच्या तीन बाजुस खोल खंदक व एका बाजुस सिध्देश्वर तलाव आहे. कधीकाळी शहराच्या एका टोकास असणारा हा किल्ला वाढत्या लोकवस्तीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात आला आहे. सोलापुर किल्ला सोलापुर रेल्वे स्थानकापासून २ कि.मी.अंतरावर असुन रिक्षाने अथवा चालत अर्ध्या तासात किल्ल्याजवळ पोहोचता येते. किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने किल्ल्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी ९ ते ५ अशी असुन किल्ल्यात जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाते. किल्ला पुर्णपणे पहाण्यासाठी ४-५ तासाचा अवधी लागत असल्याने व किल्ल्यात पिण्यायोग्य पाणी नसल्याने पुरेसे पाणी सोबत घेऊनच किल्ल्यात प्रवेश करावा. खंदक वगळता किल्ल्याचा संपुर्ण परीसर साधारण २० एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या बाहेरील परकोटाच्या तटबंदीत २७ बुरुज तर आतील तटबंदीस देखील लहानमोठे २७ बुरुज आहेत. ... किल्ल्याबाहेरील खंदकाच्या काही भागात सोलापुर नगरपालिकेने बाग बनवलेली असुन कधीकाळी हा खंदक पाण्याने भरण्यासाठी सिद्धेश्वर तलावातील पाणी वापरले जात असे. पर्यटकांच्या सोयीसाठी किल्ल्याची पश्चिमेकडील तटबंदी तोडुन त्यातुन किल्ल्यात जाण्याचा नवीन मार्ग बनविण्यात आला आहे. संपुर्ण किल्ला फिरायचा असल्यास आपली भटकंती तीन टप्प्यात करावी. किल्ल्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम किल्ल्याची आतील तटबंदी व परीसर पहावा. त्यानंतर किल्ल्याच्या दरवाजाचा परीसर व परकोट पाहुन सर्वात शेवटी खंदकातून किल्ल्यास फेरी मारावी. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर चौथऱ्यावर दोन ब्रिटीशकालीन तोफा मांडलेल्या असुन या तोफांवर इंग्लंडचे राजचिन्ह व १८०७ हे वर्ष कोरलेले आहे. आपण प्रवेश केलेल्या तटबंदीच्या उजवीकडे तटावर तोफा चढविण्यासाठी उतार बांधलेला असुन त्याला लागुनच तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. येथे तटबंदीला लागुन काही बिटीशकालीन वास्तु असुन त्यातील एक वास्तु म्हणजे कधीकाळी किल्ल्याचे दारुगोळा कोठार असावे असे वाटते. पायऱ्यांनी वर चढुन डाव्या बाजूने आपल्या गडफेरीस सुरवात करावी. किल्ल्याबाहेरील खंदकाची रुंदी ५० ते ७० फुटापर्यंत कमीजास्त असुन बाहेरील तटाची उंची साधारण ३० फुट तर आतील तटाची उंची साधारण ४० फुट आहे. परकोटाची बाहेरील भिंत व किल्ल्याची आतील भिंत यातील अंतर ३० ते ६० फुटापर्यंत कमीजास्त प्रमाणात आहे. तटावर प्रवेश केल्यावर खालील परकोटाच्या तटबंदीत गोलाकार बुरुज व त्यावरील तोफ ठेवण्याचा गोलाकार कट्टा पहायला मिळतो. येथुन पुढे आल्यावर किल्ल्याचा आतील तटबंदीतील कोपऱ्यावर असलेला मोठा गोलाकार व दुमजली बुरुज पहायला मिळतो. या बुरुजावरून किल्ल्याची दूरवर गेलेली तटबंदी व त्यात ओवलेली बुरुजांची माळ फारच सुंदर दिसते. तटावरून सरळ पुढे आल्यावर पहिल्या बुरूजाशेजारी डाव्या बाजुस तटाला लागुन तोफा चढविण्यासाठी उतार बनवलेला असुन त्याला लागुनच एक दगडी इमारत आहे. तटाला लागुन असलेल्या या ब्रिटीशकालीन वास्तु म्हणजे सैनीकांच्या बराकी असाव्यात. टोकावरील बुरुजापासून तीन बुरुज पार केल्यावर आपण चौथ्या बुरुजाजवळ पोहोचतो. किल्ल्यातील हा सर्वात उंच बुरुज असल्याने साहजिकच टेहेळणीच्या दृष्टीने देखील महत्वाचा असावा. या बुरुजावर ध्वजस्तंभाची जागा असल्याने हा बुरुज निशाण बुरुज नावाने ओळखला जातो तर काही ठिकाणी याच उल्लेख हनुमान बुरुज असा येतो. पुरातत्व खात्याने या बुरुजाची अलीकडील काळात डागडुजी केली असुन बुरुजाच्या पायऱ्या चढताना बुरुजाच्या दर्शनी भागात एक व्यालशिल्प पहायला मिळते. या बुरुजावर मंदीराची भग्न शिल्पे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. या बुरुजावरून संपुर्ण सिद्धेश्वर तलाव व त्यातील सिद्धेश्वर मंदिर पुर्णपणे नजरेस पडते. आतील तटावरून फेरी मारताना बाहेरील तटबंदीत असलेले तोफांचे झरोके,बंदुकीच्या जंग्या, शौचकुप तसेच पहारेकरयासाठी असलेल्या ओवऱ्या अगदी सहजपणे नजरेस पडतात. हनुमान बुरुज पाहुन पुढे आल्यावर तटबंदीच्या आतील बाजुस कोपऱ्यावर एक मोठी विहीर पहायला मिळते. आतील तसेच बाहेरील तटबंदीमध्ये ठिकठिकाणी सैनिकांना रहाण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. येथुन पुढे आल्यावर परकोटात बाहेरील तटबंदीला लागुन एक मोठा तलाव बांधलेला असुन या तलावाच्या काठावर कमानीयुक्त वास्तु उभारलेली आहे. या वास्तुच्या आत तलावात उतरण्यासाठी दरवाजा तसेच पायऱ्या आहेत. तलावापुढील बुरुजात बाहेरील परकोटात जाण्याचा मार्ग असुन सध्या तो जाळीने बंद केलेला आहे. या बुरुजाच्या वरील भागात तोफेचा गोल कट्टा असुन या कट्टयावर तोफ फिरवण्यासाठी असलेला खळगा आजही सुस्थितीत आहे. या बुरुजाबाहेर परकोटात असणारा बुरुज बाळंतीण बुरुज म्हणुन ओळखला जातो. येथील तटबंदीचा भाग काही प्रमाणात ढासळलेला असल्याने खाली उतरून पुढील तटबंदीवर चढावे लागते. तटबंदीच्या कोपऱ्यावरील भागात आतील बाजुस आयताकृती आकाराचे पाण्याचे बांधीव टाके असुन या टाक्यात उतरण्यासाठी भुमिगत पायऱ्या आहेत. या टोकाला दुसरा उंच बुरुज असुन या बुरुजाच्या बांधकामात देखील मोठ्या प्रमाणात मंदीराची शिल्प पहायला मिळतात. या बुरुजावर इ.स.१६८० सालचा मोडी लिपीतील शिलालेख असुन या शिलालेखात येथील तटबंदी दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असुन वरील बाजुस तोफ ठेवण्याची सोय केलेली आहे. बुरुजाच्या वरील भागातुन संपुर्ण किल्ला, सिध्देश्वर तलाव तसेच खुप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. या बुरुजाबाहेरील परकोटाचा भाग थेट तलावाकाठी असल्याने बाहेरील बुरुजावर हवा खाण्यासाठी सज्जा बांधलेला आहे. तटबंदीचा हा भाग पाहुन झाल्यावर खाली उतरून किल्ल्याचा आतील परीसर पाहुन घ्यावा. तटबंदीच्या उजव्या बाजुस बाहेरील परकोटात जाण्यासाठी दुसरा दरवाजा असुन हा मार्ग देखील काटेरी झाडे टाकून बंद करण्यात आला आहे. तटाजजवळील पाण्याचे टाके पाहुन झाल्यावर काही अंतरावर ३२ खांबावर तोललेली एक वास्तु पहायला मिळते. हि वास्तु म्हणजे ३२ नक्षीदार खांबावर तोललेला मंदिराचा सभामंडप असावा पण या वास्तुच्या टोकाशी असलेले गर्भगृह मात्र नष्ट झालेले आहे. या वास्तुकडून आपण प्रदक्षिणा करून आलो त्या तटाकडे पाहिले असता वाटेच्या पुढील भागात तटाला लागुन जमिनीच्या पातळीखाली असलेले भुमिगत मंदिर पहायला मिळते. इ.स.१८१९ साली इंग्रजानी केलेल्या उत्खननात हे मंदिर सापडलेले असुन शैवपंथीयांचे हे मंदीर मल्लिकार्जुन मंदिर म्हणुन ओळखले जाते. हे मंदीर शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी बांधल्याचा उल्लेख कवि राघवांक यांनी केलेला असुन या मंदिराला देवगिरीचे यादव व इतर सावकार यांच्याकडून इनामे मिळाल्याचे उल्लेख आहेत. मंदिराच्या उत्खननात सापडलेले दोन कन्नड शिलालेख व व्दारपाल यांच्या मुर्ती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयात तर देवीची मूर्ती चंदीगडच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे. हे मंदिर एका उंच चौथऱ्यावर उभारण्यात आले असुन या चौथऱ्यावर मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केलेले आहे. नक्षीकाम वगळता यात व्यालशिल्पे, नागशिल्पे तसेच कामशिल्पे देखील पहायला मिळतात. मंदीराचे केवळ काही खांब येथे शिल्लक असुन उर्वरीत खांबांचा वापर शहरातील दुसरे मंदिर बांधण्यासाठी केलेला आहे. या मंदिराच्या डावीकडे किल्ल्यात प्रवेश करण्याचा दरवाजा आहे पण आपण बाहेर न जाता तटावर चढुन आतील उर्वरीत तटबंदी पाहुन घ्यावी. या तटाखाली काही कोठारे व दालने पहायला मिळतात. तटबंदीवर फारसे अवशेष नसुन सोलापुर नगरपालिकेने खंदकात बाग केल्याने आतील अवशेष झाकुन गेले आहे. तटावरून फेरी मारत आपण किल्ल्यात प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. येथे पायऱ्यांनी खाली उतरून दरवाजाकडे जाताना आतील उर्वरीत अवशेष पाहुन घ्यावे. किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस प्रशस्त देवड्या असुन दरवाजाच्या वरील भागात ब्रिटीशकाळात बांधलेल्या खोल्या आहेत. डावीकडील परकोटात फारसे अवशेष नसल्याने दरवाजातून बाहेर पडल्यावर सर्वप्रथम या परकोटातुन चक्कर टाकुन यावे. या परकोटाच्या टोकाशी असलेल्या बुरुजावर मंदिराचा गजथर तसेच तटाच्या भिंतीत अनेक शिल्प पहायला मिळतात. परकोट पाहुन झाल्यावर दरवाजाकडे यावे व उर्वरीत दोन दरवाजे पार करून किल्ल्याबाहेर पडुन तेथुन सुरवातीपासुन किल्ला पहाण्यास सुरवात करावी. किल्ल्याबाहेरील खंदक पार करून गेल्यावर साखळी लटकलेले दगडी बांधणीतील दोन भक्कम मिनार पहायला मिळतात. हे मिनार पुर्वी खंदकावर काढता- घालता येणाऱ्या लाकडी पुलाचे साक्षीदार आहेत. या पुलासाठी असलेल्या लोखंडी कड्या आजही तेथे असुन स्थानिकांनी त्याला शेंदूर फासलेला आहे. या कड्याशेजारी शेंदुर फासलेली विरगळ आहे. खंदकावर नव्याने बांधलेल्या सिमेंटच्या पुलावरून जाताना डावीकडे खंदकात नागबावडी नावाची भक्कम बांधणीची दगडी बारव पहायला मिळते. यात आजही पाणी असुन वापर नसल्याने ते शेवाळलेले आहे. किल्ल्याचा पहिला दरवाजा पुर्वाभिमुख असुन तो बुरुजाच्या आडोशाने बांधला असल्याने बाहेरून दिसत नाही. हा दरवाजा बाबा खादर/हत्ती दरवाजा या नावाने ओळखला जातो. या दरवाजाची लाकडे दारे आजही शिल्लक असुन त्यावर लोखंडी जाड पट्ट्या तसेच लोखंडी टोकदार कमळे ठोकलेली आहेत. दारांच्या वरील भागात दोन्ही बाजुस लोखंडातच शरभ छापलेले आहे. पुर्वी या दरवाजावर पितळी शिलालेख असुन त्यावर हा दरवाजा इ.स.१८१० साली किल्लेदार आबाजी बल्लाळ यांनी दुसरे बाजीराव पेशवे यांच्या आज्ञेनुसार दुरुस्त केल्याचा उल्लेख होता. दरवाजाच्या वरील बाजुस मारा करण्यासाठी तसेच खंदकाच्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी झरोके बांधलेले आहेत. मुख्य दरवाजा बंद असताना किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी डावीकडील बुरुजात लहानसा दरवाजा असुन आता याच दरवाजाने आपला किल्ल्यात प्रवेश होतो. या लहान दरवाजाचे लाकडी दार अजूनही शिल्लक आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर आसपासच्या तटबंदीत सैनिकांना रहाण्यासाठी दालने तसेच घोड्याच्या पागा पहायला मिळतात.या दरवाजासमोर काही अंतरावर दोन बुरुजात बांधलेला दुसरा शहर दरवाजा असुन या दोन्ही दरवाजात बऱ्यापैकी अंतर आहे. या दरवाजाच्या डावीकडील भिंतीवर झीज झालेला देवनागरी लिपिमधील शिलालेख दिसतो. दरवाजाच्या वरील भागात दगडी सज्जा असुन त्याच्या वरील भागात दोन मिनार आहेत. या सज्जाला तीन खिडक्या असुन त्यावर मध्यभागी एक पर्शियन शिलालेख व शेजारी दोन शरभ कोरलेले आहेत. या शिलालेखात विजापूरचा आदिलशहा व त्याच्या अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. दरवाजाचे लाकडी दार आजही शिल्लक असुन त्यात दिंडी दरवाजा आहे. या दरवाजाच्या आत सैनिकांसाठी प्रशस्त दालने असुन त्या शेजारी दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी वर सज्जात आले असता बाहेरून दिसणाऱ्या शरभाच्या आतील बाजुस शरभ तसेच हरीण कोरल्याचे दिसुन येते. या भागात मोठ्या प्रमाणात दालने तसेच कोठार यांचे बांधकाम दिसुन येते. येथुन सरळ पुढे आल्यावर आपण किल्यात प्रवेश करणाऱ्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा दोन षटकोनी बुरुजात बांधलेला असुन दरवाजाच्या वरील बाजुस दोन उंच मिनार आहेत. दरवाजाच्या कमानीवरील भागात दोन शरभ कोरलेले असुन त्याच्या मध्यभागी पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख हिजरी ९८६ म्हणजे इ.स.१५७८-७९ मध्ये कोरलेला असुन त्यात सोलापुरचा उल्लेख संदलपूर आलेला आहे. यात अली आदिलशाह पहिला व त्याचा अधिकारी जाबीदखान याने किल्ल्यात मशीद, बाजारपेठ, बाग, हौद या वास्तु बांधल्याचा उल्लेख आहे. या दरवाजाच्या उजवीकडील बुरुज महांकाळ नावाने ओळखला जातो. या बुरुजातील देवडीत मुंजोबा व शनीचे देवस्थान आहे. हा बुरुज बांधकाम करताना सतत ढासळत असल्याने तेथे मुंजा मुलाचा ( मुंज झालेला पण लग्न न झालेला ब्राम्हण ) बळी देण्यात आला. या ठिकाणी त्या मुलाचे वंशज आजही त्या मुंजाची वार्षिक पूजा करतात. या मंदिराशेजारी एक विरगळ, गजशिल्प,द्वारपाल तसेच जयविजय सोबत असलेले विष्णुचे शिल्प ठेवलेले आहे. येथे एक मराठी शिलालेख असुन त्यात किल्ल्यातील विहीर बांधल्याचा उल्लेख आहे. किल्ल्याचा हा दरवाजा पाहुन झाल्यावर डावीकडील परकोटात शिरावे. परकोटात शिरल्यावर कोपऱ्यावरील आतील तटबंदीच्या बुरुजात आरपार जाणारा लहानसा मार्ग असुन याचे नेमके प्रयोजन कळत नाही. या बुरुजासमोर बाहेरील तटबंदीत उध्वस्त सज्जा आहे. येथुन पुढे आल्यावर उजवीकडील तटबंदीत एक धेनुगळ असुन त्याखाली कन्नड शिलालेख कोरलेला आहे. येथुन पुढे आल्यावर आपण बाळंतीण बुरुजावर पोहोचतो. बाहेरील तटबंदीत असलेला हा बुरुज चांगलाच मोठा असुन त्यावर तोफ ठेवण्यासाठी गोलाकार कट्टा आहे. हा बुरुज बांधताना बुरुजाच्या पायात दर्गोपाटील घराण्यातील बाळंतीणीचा बळी देण्यात आल्याने तिच्या स्मृतीप्रित्यर्थ हा बुरुज बाळंतीण बुरुज म्हणुन ओळखला जातो. या समर्पणासाठी दर्गोपाटील घराण्याला सोलापुरची पाटीलकी देण्यात आली. या बुरुजावर नव्याने बांधलेले पद्मावती देवीचे मंदिर आहे. येथुन पुढील बुरुजात किल्ल्याच्या आत जाण्यासाठी मार्ग असुन सध्या तो जाळी लावुन बंद करण्यात आला आहे. या बुरुजावर एक पर्शियन शिलालेख असुन त्यात सुलातानासाठी सुखकारक, नयनरम्य महाल बांधल्याचा उल्लेख आहे. परकोटाच्या पुढील भागात पाण्यावर लालसर छटा असलेला तलाव असुन हा तलाव बाळंतीण विहीर म्हणुन ओळखला जातो. या तलावाच्या काठावर हवा खाण्यासाठी सज्जा असुन त्यातुन तलावात उतरण्यासाठी दरवाजा व पायऱ्या आहेत. येथुन पुढील बुरुजावर एक हवेशीर दालन असुन या दालनातील खांबावर शके १४६६ म्हणजे इ.स.१५४४ सालचा मराठी शिलालेख असुन येथे शहराचा उल्लेख सोनलपुर असुन हा बुरुज बांधण्यासाठी दोन महिने कालावधी लागल्याचा उल्लेख आहे. पुढील बुरुजावर मंदीराचे स्तंभ पहायला मिळतात. येथुन सरळ गेल्यावर आपण परकोटाच्या टोकावर म्हणजे किल्ल्यात जेथुन प्रवेश केला त्या ठिकाणी पोहोचतो. येथे आपली किल्ल्याची आतील गडफेरी पुर्ण होते. हि गडफेरी करण्यास साधारण चार तास लागतात. आपण किल्ल्यावर प्रवेश केलेल्या ठिकाणाच्या अलीकडे खंदकात जाण्याची वाट असुन येथुन डावीकडे आखाड्याच्या दिशेने खंदकात उतरल्यावर तटबंदीवर अनेक शिल्पे पहायला मिळतात. या तटबंदीत आतील बाजूने खंदकात उतरण्यासाठी एक लहान दरवाजा असुन या दरवाजाचे आतील तटबंदीत असलेले तोंड माती पडुन बंद झालेले आहे. तटबंदीतील दुसऱ्या बुरुजावर व्याल व हत्ती यांची दोन मोठी शिल्प असुन त्यावर मराठी मोठ्या अक्षरातील शिलालेख आहे. हि तटबंदी पाहुन मागे फिरावे व बाग असलेल्या उजवीकडील खंदकात उतरावे. खंदकातून तटबंदीभोवती फेरी मारताना या तटबंदीत मोठ्या प्रमाणात कोरीव शिल्प पहायला मिळतात. येथुन तटबंदीला फेरी मारत आपण किल्ल्याच्या मूळ दरवाजापर्यंत पोहोचतो. या तटबंदीत खंदकाच्या दिशेला देखील काही सज्जे बांधलेले आहेत. खंदकातील बागेत किल्ल्यातील दोन तोफा ठेवलेल्या असुन यातील एक तोफ लांब व एक तोफ आखूड आहे. खंदक वेगवेगळ्या भागात विभागलेला असल्याने सलगपणे फेरी मारता येत नाही. उर्वरीत तटबंदीला फेरी मारण्यासाठी खाऊ गल्लीच्या दिशेने तसेच सिद्धेश्वर तलावाच्या दिशेने जावे लागते. खंदक फिरून प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते. संपुर्ण तटबंदीला बाहेरून फेरी मारण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो. सोलापुर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असुन सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे व ब्रिटिश या सर्व सत्ताधीशांच्या खुणा या शहरावर उमटल्या आहेत. सोळा पूर म्हणजे सोळा गाव असलेले नगर म्हणजे सोलापुर अशी या शहराच्या नावाची उत्पत्ती असल्याचे मानले जाते पण ते खरे नाही. १२ व्या शतकातील शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या सिद्धेश्वर मंदिरातीत शिलालेखात या शहराचा उल्लेख सोन्नलगे असा येतो. यादवकाळात सोन्नलगेचा अपभ्रंश सोन्नलगी असा झाला. मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखात सोलापूरचा उल्लेख सोनलपूर असा येतो. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावरील पर्शियन शिलालेखात सोलापूरचा उल्लेख संदलपूर नावाने येतो तर परकोटातील देवनागरी शिलालेखात याचा उल्लेख सोनलपुर असा येतो. ब्रिटिश काळात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलापूर नाव प्रचलित झाले असावे. मध्ययुगीन काळात दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावरील सोलापुर हे महत्वाचे ठाणे असल्याने या किल्ल्याला भौगोलिक महत्व प्राप्त झाले. सोलापुर किल्ला नेमका कोणी बांधला हे जरी आज ज्ञात नसले तरी इतिहासकारांच्या मते मुळ सोलापुर किल्ला हा हिंदु राजवटीत बांधला गेला व त्याच बाहेरील तट इ.स. १३१३ मध्ये हसन गंगु बहमनी याने बांधला. काहींच्या मते सोलापुर किल्ला व परांडा किल्ला यांच्यात असलेली समानता पहाता हे दोन्ही किल्ले एकाच काळात एकाच व्यक्तीने बांधले असावेत. परांडा किल्ला बहमनी सुलतान मुहमदशहा (इ.स. १३५८-१३७५) याचा वजीर महंमद गवान याने बांधल्याने सोलापुर किल्ला बांधण्याचे श्रेय देखील त्याच्याकडे जाते. सोलापुर किल्ल्याच्या दरवाजावर असलेले शिलालेख पहाता हे दरवाजे व आतील काही वास्तु आदिलशाही काळात बांधल्या अथवा दुरुस्त केल्या गेल्या असाव्यात असे वाटते. किल्ला बांधताना अनेक जैन व हिंदु मंदिराच्या दगडांचा वापर केला गेला. बहमनी सत्ता नष्ट झाल्यावर या किल्ल्याचे निजामशाही-आदिलशाही असे सत्तांतर होत राहिले. निजामशाही व आदिलशाही हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत.इ.स.१५२३ मध्ये विजापुरचा सुलतान इस्माईल आदिलशहा याच्या मुलीचे लग्न निजामशाही सुलतान बुऱ्हाण निजामशहा याच्या बरोबर सोलापुरच्या किल्ल्यात झाले. या लग्नात आदिलशहाने आपल्या जावयाला म्हणजे निजामशहाला हा किल्ला भेट म्हणुन देण्याचे ठरले पण प्रत्यक्षात किल्ल्याचा ताबा न दिल्याने त्यांच्यात पुन्हा युद्धाला तोंड फुटले. यानंतर इ.स. १५५२ मध्ये या किल्ल्याचा पुन्हा एकदा हुंडा म्हणुन वापर झाला. यावेळी अहमदनगरची राजकन्या चांदबीबी हिचा विवाह विजापूर सुलतान आली आदिलशहा या बरोबर करण्यात आला तर आदिलशहा याची बहीण हादिया सुलताना हिचा विवाह निजामशाही राजपुत्र मुर्तजा बरोबर करण्यात आला. यावेळी निजामशहाच्या ताब्यात असलेला सोलापुर किल्ला त्याने आदिलशहाला हुंडा म्हणुन दिला. शरीरसंबंध जोडुन हुंडा म्हणुन होणारी किल्ल्याची अदलाबदल यावरूनच या किल्ल्याचे महत्व लक्षात येते. भागानगरच्या(हैदराबाद) कुतुबशाहीवर लक्ष ठेवण्याचे महत्वाचे काम सोलापुर किल्ला बजावत होता. इ.स.१६६८ मध्ये औरंगजेब व विजापुरचा आदिलशहा यांच्यात तह होऊन हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. औरंगजेब मराठा राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत उतरला असता त्याचा बहुतांशी मुक्काम सोलापुर व त्याच्या आसपासच्या परिसरात असल्याने या किल्ल्याचे महत्व अजुन वाढले. या मोहीमेच्या काळात सोलापुर किल्ला मोगलांचे शस्त्रागार व धान्यकोठार होते. १६८३ च्या मे महिन्यात औरंगजेबने मनोहरदास गौड याचा मुलगा किशोरदास गौड याची सोलापुरचा किल्लेदार म्हणुन नेमणुक केली. सोलापुरचा किल्लेदार मरण पावल्याने मार्च १६८६ मध्ये औरंगजेबने सय्यद जैनुलाबुद्दीन याची सोलापुरचा किल्लेदार म्हणुन नेमणुक केली. दक्षिणेतील मोहीमेत इ.स.१६८६ साली विजापुरवर हल्ला करताना औरंगजेबने सोलापुर किल्ल्याचा वापर केला. त्यावेळी त्याचा मुक्काम सोलापुर किल्ल्यात होता. १६८५-८६ या काळात औरंगजेबने या किल्ल्याच्या टांकसाळीतून निर्माण केलेली चांदीची नाणी आजही कलकत्ता संग्रहालयात पहायला मिळतात. १३ फेब्रुवारी १६९६ रोजी औरंगजेबने त्याचा अधिकारी ख्वाजा याकुत याला १००० रुपये देऊन नागबावडी विहिरीची स्वच्छता करून घेतली. तसेच २२ मार्च १६९६ रोजी औरंगजेबच्या हुकुमावरून सोलापुरचा किल्लेदार मिहदीखान याने किल्ल्याच्या खंदकाची दुरुस्ती केली. सोलापुर भागात शुत्तरखाना (उंटदळ) उपयोगाचे नसल्याने औरंगजेबने २३ मार्च १६९६ रोजी किल्लेदार मिहदीखान यांस हा शुत्तरखाना त्याच्या सामानासकट बीडचा फौजदार मामुरखान याच्याकडे सोपवण्यास सांगितले. हा शुत्तरखाना औरंगाबादच्या वाटेवर मुजमर गावाजवळ असताना २८ मार्च १६९६ रोजी मराठ्यांनी त्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात मुघलांचा मुरादबेग नावाचा सैनिक मारला गेला. ४ एप्रिल १६९६ साली औरंगजेबने त्याचा तोफखान्याचा अधिकारी तर्बियतखान याला सोलापुर किल्ल्यातील तोफखान्याची पाहणी करण्याचा हुकुम दिला. ९ जुलै १६९९ रोजी उमर अफगाण या कैद्याने सोलापुर किल्ल्यातुन पळ काढला. २६ नोव्हेंबर १७०० साली औरंगजेबने सोलापुर किल्ल्यातुन बंदुकीच्या दारूसाठी लागणारी ५०० मण सरब व ४०० मण दारू मिरज येते नेण्यासाठी मुहम्मद माह याची नेमणुक केली. २७ नोव्हेंबर १६९९ साली औरंगजेबने सोलापुरच्या किल्लेदाराला परांडा किल्ल्यासाठी रसद पाठविण्याचा आदेश दिला. यावरून सोलापुर किल्ल्यात मोगलांचा मोठा तोफखाना असावा असे वाटते. इ.स.१७२३ मध्ये हा किल्ला निजामाच्या ताब्यात आला. त्यानंतर ६ जुलै १७५८ मध्ये निजामाचा किल्लेदार खलीकुदिरखान यांस २५००० रुपयांची लाच देऊन मराठ्यांनी तो ताब्यात घेतला. इ.स.१७८५-८६ दरम्यान टिपू- मराठा संघर्षात सोलापुरचा किल्लेदार रामचंद्र शिवाजी याने पेशव्यांच्या आज्ञेनुसार किल्ल्यातील दोन तोफा दारूगोळ्यासाहित निजामाच्या ताब्यातील परांडा किल्ल्याच्या संरक्षणासाठी पाठविल्या. काम झाल्यावर या तोफा परत घेण्याचा हुकुम होता. इ.स.१८१८ पर्यंत किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत मराठ्यांचे सोलापुर किल्ल्यावर एकुण सात किल्लेदार झाले. या खेरीज किल्ल्यावर घडलेली अजुन एक महत्वाची घटना म्हणजे नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत तुळोजी आंग्रे यांचा मुलगा संभाजी आंग्रे हा सोलापुर किल्ल्यात काही काळ कैदेत होता. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले जिंकल्यावर ब्रिगेडियर जनरल प्रीझलर व कर्नाटकातील किल्ले जिंकुन ब्रिगेडियर जनरल मन्रो यांचे एकत्रित सैन्य सोलापुर किल्ल्याजवळ आले. इंग्रजांनी चैनसिंग नावाच्या दूताकरवी पाठवलेली बिनशर्त शरणागतीची अट किल्ल्यावरील सैन्याने धुडकावली व पाठवलेल्या दुताला किल्ल्याबाहेरच ठार मारले. यानंतर झालेल्या लढाईत मराठ्यांचे तोफखान्याचे सरदार गणपतराव पानसे सोबत पायदळाचा पोर्तुगीज अधिकारी डी पिंटो धारातीर्थी पडले व १४ मे १८१८ रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!