सेगवागड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : १२१० फुट

श्रेणी : मध्यम

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. दक्षिण कोकणात रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हे येतात तर उत्तर कोकणात ठाणे पालघर जिल्हे येतात. पालघर जिल्ह्यातुन मुंबई-अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गाला लागुनच डहाणु तालुक्यात गर्द झाडीने वेढलेला सेगवागड उभा आहे. मुंबईहुन स्वतःच्या वाहनाने सेगवा व बल्लाळगड या दुर्गजोडीची भ्रमंती एका दिवसात सहजपणे करता येते. सेगवागडास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ट्रेनने डहाणु स्थानक गाठावे लागते. करंजवीरा हे गडाच्या पायथ्याशी असलेले गाव डहाणु रेल्वे स्थानकापासून ३२ कि.मी.अंतरावर तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर चारोटी नाक्यापासून १६ कि.मी. अंतरावर आहे. करंजवीरा गाव महामार्गापासुन आतील बाजुस असुन मुंबईहुन अहमदाबादकडे जाताना चारोटीपासुन १५ कि.मी अंतरावर महामार्गाच्या उजवीकडे करंजवीरा गावात जाणारा फाटा आहे. ... हा फाटा ओळखण्याची खुण म्हणजे या ठिकाणी महामार्गाच्या डाव्या बाजुस आहुरा-आराम हि मोठी हॉटेल आहेत किंबहुना एका रांगेत बरीच हॉटेल आहेत. या फाट्यापासुन खाजगी वहानाने १ कि.मी.आत आल्यावर वीटभट्टीजवळ उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने गावातील शाळेपर्यंत जाता येते. करंजविरा गावात आल्यावर गावामागे असलेल्या सेगवा किल्ल्याचे दर्शन होते. याशिवाय करंजवीरा गावापुढे असलेल्या शिसने गावातुन देखील किल्ल्यावर जाणारी वाट आहे पण या वाटेने किल्ल्यावर जाणे म्हणजे उलटा घास घेण्यासारखे आहे. गावाच्या टोकाशी असलेल्या अदीवासी पाड्यातुन गडावर जाणारी वाट गडाच्या डोंगराच्या डाव्या बाजुने गडावर चढते. गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावातुन पाणी भरून घेऊनच गड चढण्यास सुरवात करावी. गडावर जाणारी वाट मळलेली असली तरी दोन ठिकाणी फसवी वळणे असल्याने वाट गावातुन निट समजुन घ्यावी. गडावर जाणाऱ्या वाटेवर काही प्रमाणात झाडी असली तरी येथील दमट वातावरणाने गड चढताना चांगलीच दमछाक होते. शिसने गावातुन येणारी वाट देखील याच वाटेला येऊन मिळते. या मळलेल्या वाटेने गावातुन साधारण १ तासात आपण गडाच्या माचीखालील भागात येऊन पोहोचतो. येथुन सोपे प्रस्तरारोहण करून उध्वस्त तटबंदीवरून आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. सेगवागडाची समुद्रसपाटीपासुन उंची १०८० फुट असुन गड माची व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागलेला आहे. संपुर्ण गडाचा परीसर साधारण ३ एकर असुन गडाची माची व बालेकिल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. आपण माचीवर प्रवेश केलेल्या ठिकाणी उजव्या बाजुला माचीचा लहानसा भाग असुन माचीच्या या टोकावरील भागात तटबंदी व गोलाकार आकाराचा बुरुजाचा पाया दिसुन येतो. माचीच्या या टोकावरून मुंबई- अहमदाबाद महामार्ग तसेच महालक्ष्मीचा सुळका पहाता येतो. माचीचा हा भाग पाहुन मागे फिरल्यावर डाव्या बाजुने गड पहाण्यास सुरवात करावी. वाटेच्या सुरवातीला एका चौथऱ्यावर सिमेंटमध्ये बांधलेली घुमटी असुन त्यात अलीकडील काळातील मारूतीची मुर्ती ठेवली आहे. घुमटी समोर काही अंतरावर पत्र्याने चारही बाजु बंदिस्त केलेला निवारा दिसतो. हा निवारा म्हणजे महादेवाचे मंदिर असुन त्यात शिवपिंडी, नंदी, कासव व पाणी भरून ठेवलेली दगडी ढोणी पहायला मिळते. स्वच्छ सारवलेल्या या मंदिरात पावसाळा सोडुन ७-८ जण राहू शकतात. मंदिर पाहुन पुढे आल्यावर आपल्याला बालेकिल्ला व माची यामध्ये असलेली लहान घळ पहायला मिळते. माचीवरून हि घळ ओलांडुन पायऱ्या चढत बालेकिल्ल्याचा उध्वस्त दरवाजा व तटबंदी पार करून आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो. पश्चिमाभिमुख असलेल्या या दरवाजा शेजारी असलेल्या बुरुजाचे केवळ तळखडे पहायला मिळतात. येथुन उजवीकडील वाटेने पुढे जाताना वाटेच्या उजव्या बाजुस तटबंदीचे अवशेष असुन वाटेच्या पुढील भागात दरीच्या तोंडावर असलेला गडाचा उत्तराभिमुख मुख्य दरवाजा दिसतो. दोन बुरुजामध्ये बांधलेला हा दरवाजा आज पुर्णपणे उध्वस्त झाला असुन केवळ तळातील भाग शिल्लक आहे. या दरीत मोठया प्रमाणात दरवाजा व तटबंदीचे कोसळलेले घडीव दगड दिसुन येतात. दरवाजा पाहुन पुढे आल्यावर बालेकिल्ल्याच्या उतारावर खडकात खोदलेली दोन टाकी पहायला मिळतात. हि दोन्ही टाकी कोरडी पडलेली असुन त्यात मोठमोठी झाडे उगवली आहेत. या टाक्यांच्या वरील भागात अजुन एक सुकलेले टाके असुन या टाक्यातही झाड उगवले आहे. वाटेच्या पुढील वळणावर अजुन दोन टाकी असुन यातील एक टाके जोडटाके आहे. या दोन्ही टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. वाटेच्या पुढील भागात अजुन तीन टाकी असुन एक टाके मातीने भरलेले तर उर्वरित दोन टाक्यात पाणी असले तरी पिण्यायोग्य नाही. गडावर एकुण आठ टाकी असली तरीही पिण्यायोग्य पाणी मात्र एकही टाक्यात नाही. शेवटचे टाके पाहुन आपण बालेकिल्ल्याच्या दक्षिण टोकावर पोहोचतो. येथुन मागे फिरून वर जाणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्याच्या माथ्यावर यावे. बालेकिल्ल्याचा माथा चार बुरुज आणि तटबंदीने बंदीस्त केलेला आहे. तटबंदीच्या पश्चिम भागात आत शिरण्यासाठी असलेला दरवाजा व कमान पुर्णपणे उध्वस्त झाली असुन दरवाजाखाली शिल्लक असलेल्या पायऱ्या पहायला मिळतात. तटबंदीच्या आतील भागात काही वास्तुंचे चौथरे असुन त्यातील एका चौथऱ्यावर शिवलिंग व शेजारी फुटकी दगडी ढोणी ठेवलेली आहे. या वास्तु पाहुन उजवीकडील पायवाटेने आपण प्रवेश केला त्या बालेकिल्ला व माची यामध्ये असलेल्या दरवाजाकडे निघावे. बालेकिल्ल्याच्या उंचवट्यावरून दरवाजाकडे जाताना दोन्ही बाजुस उतारावर उध्वस्त तटबंदी पहायला मिळते. किल्ल्याचा परीसर छोटा असल्याने माची व किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. ऎतिहासिक कागदपत्रात सेगवा किल्ल्याचा उल्लेख सेगवाह या नावाने येतो. महिकावतीच्या बखरीतील नोंदीप्रमाणे प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासुन वाळकेश्वरपर्यंत आपले राज्य स्थापन करुन राजधानी म्हणून महिकावती म्हणजेच आजच्या केळवे माहीमची निवड केली. याच काळात सेगवा किल्ला बांधण्यात आला असावा. १४ व्या शतकात हा किल्ला व परीसर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेला. त्यानंतरच्या काळात या भागावर मोगलांचा मांडलिक असलेल्या रामनगरच्या कोळी राजांचे राज्य होते. इ.स. १६७२ ते १६७७ याकाळात रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला हा प्रांत स्वराज्याला जोडला गेला व सेगवा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. या काळात किल्ल्यावर काही प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात आली. संभाजी महाराजांच्या काळात इ.स.१६८८ मध्ये रामनगरकरांनी मोगलांच्या वतीने हा किल्ला परत जिंकुन घेतला. पुढील ६१ वर्ष हा किल्ला पोर्तुगिज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजीअप्पानी काढलेल्या मराठयांच्या वसई मोहिमेत इ.स.१७३९ च्या ऑगस्ट महिन्यात कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिकुन घेतला. यानंतर इ.स. १७५४ मधे हा किल्ला परत रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ च्या तहानुसार हा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स.१८१७ मधे इंग्रज अधिकारी गोगार्डच्या सैन्याने सेगवागड जिंकला व मुख्य दरवाजाची नासधुस केली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!