सुरजागड

प्रकार : भुईकोट

जिल्हा : गडचिरोली

उंची : 0 फुट

श्रेणी : सोपी

गडचिरोली नाव ऐकले की नक्षलवादाने ग्रासलेला एक आदिवासी व अविकसित जिल्हा असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे रहाते येते आणि त्यामुळेच या भागात पर्यटनासाठी असंख्य गोष्टी असुन देखील पर्यटक या भागाकडे वळत नाही. इतकेच नव्हे तर इतिहास अभ्यासकांची पाउले देखील या भागात अभावानेच पडत असल्याने या भागाचा इतिहास देखील अबोल राहीला आहे. पण अलीकडील काळात या भागातील विकास जोमाने सुरु झाल्याने हे चित्र पालटत आहे हि समाधानाची गोष्ट आहे. पर्यटकांची व अभ्यासकांची पाउले येथे पडु लागल्याने अनेक गोष्टी नव्याने प्रकाशात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड हे एक छोटेसे गांव आहे. याच नावाचा एक गिरीदुर्ग गावाच्या कुशीत वसलेला आहे. निसर्ग सौंदर्य, हिरवी गर्द झाडी, वनसृष्टीने नटलेले पण नक्षलवादाचे गालबोट या गावाला लागले होते. आता नक्षलवाद जरी येथुन संपला असला तरी त्याची भीती आजही काही प्रमाणात स्थानिकांच्या मनात आहे. मागील दोन वेळा गडचिरोली जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना स्थानिकांनी किल्ल्यावर येण्यास नकार दिल्याने आम्हाला किल्ल्यावर जाता आले नव्हते. ... पण त्यावेळी कोणीतरी महाशिवरात्रीच्या दिवशी स्थानिक लोक गडावर जातात त्यावेळी गडावर जाता येईल अशी माहिती दिली होती. त्यामुळे यावेळेस (२०२४) मध्ये महाशिवरात्रीचा हा मुहूर्त साधुन आम्ही सुरजागड येथे आलो पण यावेळेस देखील आमच्या पदरी निराशा आली. कारण गावात पोहोचलो तेव्हा स्थानिकांनी सांगीतले की गावात दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ५ व ६ तारखेला हा वार्षिक उत्सव असतो. गडचिरोली जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा हा प्रमुख उत्सव आहे. या उत्सवास सुरजागडची यात्रा किंवा ठाकुरदेवाची यात्रा म्हणतात. या यात्रेचे फक्त दोन दिवस स्थानिक गडावर जातात. इतर कोणत्याही दिवशी ते गडावर जात नाहीत. त्यामुळे यावेळेस देखील आम्हाला सुरजागडाचा माथा गाठता येणार नव्हता. सुरजागड हा किल्ला गडचिरोली जिल्यातील एटापल्ली तालुक्यात महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात आहे. गडावर जायचे असल्यास आपल्याला गडाच्या पायथ्याशी असलेल्या सुरजागड गावात एक दिवस आधी मुक्कामी येणे भाग आहे. गडचिरोली ते सुरजागड गाव हे अंतर १२३ कि.मी. असुन तालुक्याचे ठिकाण असलेले एटापल्ली गाव ते सुरजागड गाव हे अंतर २६ कि.मी.आहे. एटापल्ली येथे सरकारी विश्रामगृह वगळता राहण्याची व जेवणाची कोठेही सोय नाही. तसेच या भागात सार्वजनिक वाहनव्यवस्था देखील फारशी सोयीची नसल्याने शक्यतो खाजगी वाहनाने दिवसा प्रवास करावा. एटापल्ली ते हेडरी या भागात तुरळक मानवी वस्ती असली तरी हेडरी ते सुरजागड गाव या भागात कोणतीही वस्ती नाही. सुरजागड गावाच्या थोडे अलीकडे रस्त्याच्या डाव्या बाजूस ठाकुरदेवाचे मंदीर असुन तेथेच वार्षिक जत्रा भरते. किल्ल्यावर आमच्या सोबत येण्यास कोणीही तयार न झाल्याने आल्यासारखे निदान ठाकुरदेवाचे दर्शन घ्यावे यासाठी आम्ही ठाकुरदेवाच्या मंदीरात आलो. मंदीर फारसे मोठ्र नसुन या मंदिरात घोड्यावर स्वार झालेली ठाकुरदेवाची मुर्ती आहे. या मंदिराच्या मागील बाजुने गडावर जाण्यासाठी वाट असल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. पण या वाटेवरील दाट जंगल पाहुन आम्ही वाटाड्या शिवाय गडावर जाण्याचा निर्णय रद्द केला पण मंदिरापर्यंत जाण्याचे आमचे श्रम वाया गेले नाहीत. मंदिराच्या समोरील बाजुस एक टेकडीवजा उंचवटा आहे. हा उंचवटा साधारण एक एकर असुन या संपुर्ण उंचवट्याला तटबंदी आहे. या ढासळलेल्या तटबंदीत लहानमोठे सहा बुरुज असुन त्यातील एका बुरुजावर नव्याने सिमेंट चौथरा बांधुन त्यावर हिरवी चादर अंथरलेली आहे. या तटबंदीच्या आत प्रवेश करण्यासाठी केवळ एक दरवाजा असुन तो पूर्णपणे ढासळलेला आहे. ढासळलेल्या तटबंदीचा ५-६ फुट उंच दगडांचा ढिगारा पाहुन हि तटबंदी बऱ्यापैकी उंच असल्याचे जाणवते. तटबंदीच्या आतील भागात एक उध्वस्त वास्तु अवशेष वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. या वास्तूची एकुण रचना व आकारमान पहाता हि वास्तु म्हणजे एखादी गढी अथवा भुईकोट असावा असे खात्रीने सांगता येते. हि संपुर्ण वास्तु पाहण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. येथुन सुरजागड या डोंगरावरी किल्ल्याचा माथा गाठण्यास ३-४ तास लागतात असे स्थानिकांनी आम्हाला सांगीतले. विदर्भाची जीवनदायिनी मानल्या गेलेल्या वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर गडचिरोली वसले आहे. चाणक्याच्या कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथात उल्लेख असलेल्या हि-याच्या खाणी आणि हत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या वैरागड प्रांताचा गडचिरोली हा एक भाग होता. वैनगंगा नदीच्या पलीकडे असल्याने हा भाग पूर्वी दक्षिण कोसल म्हणजे छत्तीसगडच्या मौर्य, सातवाहन, कलचुरी, राष्ट्रकुट व नंतर काकतीय अश्या सत्तांच्या अधिपत्याखाली होता. या भागाच्या संपन्नतेचा व सुबत्तेचा पुरावा म्हणजे वैनगंगा नदीकिनारी कलचुरी शासकांनी बांधलेला मार्कंडा मंदिरसमूह होय. अकबर बादशहाच्या ऐन-ए-अकबरी या ग्रंथात या भागात हत्ती असल्याची नोंद आहे. तमिळनाडूचे चोल, विजापूरचे आदिलशहा, देवगिरीचे यादव यांनीसुद्धा या भागावर त्यासाठी आक्रमणे केली होती. त्यानंतर हा भाग नागवंशीय माना व नंतर चांद्याच्या गोंड राज्याच्या वैरागड प्रांताचा भाग होता. इ.स.१४४७ ते १४७२ या काळात राज्य करणारा गोंड राजा सुरजा बल्लाळ शाह याच्या ५२ परगण्यांच्या यादीत गडचिरोलीचे नाव येते. सुरजागड किल्ल्याचा निर्माण काळ निश्चित माहित नसला तरी हा किल्ला माना नरेश कुरुमप्रहोद यांच्यानंतर गादीवर आलेला राजा सुरजत बडवाईक याने बांधला असे मानले जाते आणि सदर किल्ला त्याच्याच कारकिर्दीत बांधून पूर्ण झाल्यामुळे त्याच्याच नावाने या किल्ल्याचे नामकरण सुरजागड असे करण्यात आले अशी माहिती स्थानिकांकडून मिळते. महाराष्ट्राच्या ह्या अतिपूर्व भागात असलेल्या चिरोली टेकड्यांवरून या भागाला गडचिरोली नाव प्राप्त झाले असे मानले जाते. कॅप्टन जे टी ब्लंट या इंग्रज अधिका-याकडे ओरिसा-छत्तीसगड-गोंडवाना ते दक्षिण भारत असा मार्ग रेखांकित करण्याचे काम होते. तेव्हा तो कांकेर (छत्तीसगड) येथून मुख्य शहर व पेठ असलेल्या वैरागडला आला व काही दिवस तेथे राहून पुढे गडचिरोली येथे २० एप्रिल १७९५ या दिवशी आला होता. तेव्हा त्याने या गावाचा मोठ्या खेड्याचे चिरोलीगड असे वर्णन करत तेथे थोडाफार व्यापार असल्याचा उल्लेख केला आहे. या चिरोलीगडच्या डावीकडे बस्तरपर्यंतचा भाग खूप धोकादायक असून तिथे मनुष्यबळी देणारे अतिमागास आदिवासी राहत आहेत असेही तो म्हणतो. मीठ आणि धान्य पुरवणारे वंजारी सोडून इतर कोणीही जीवाच्या भीतीने या भागात प्रवास करत नाही असे त्याने नमूद केले आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!