सुरजागड गिरीदुर्ग
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : गडचिरोली
उंची : २०१२ फुट
श्रेणी : अत्यंत कठीण
गडचिरोली नाव ऐकले की नक्षलवादाने ग्रासलेला एक आदिवासी व अविकसित जिल्हा असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे रहाते येते आणि त्यामुळेच या भागात पर्यटनासाठी असंख्य गोष्टी असुन देखील पर्यटक या भागाकडे वळत नाही. इतकेच नव्हे तर इतिहास अभ्यासकांची पाउले देखील या भागात अभावानेच पडत असल्याने या भागाचा इतिहास देखील अबोल राहीला आहे. पण अलीकडील काळात या भागातील विकास जोमाने सुरु झाल्याने हे चित्र पालटत आहे हि समाधानाची गोष्ट आहे. पर्यटकांची व अभ्यासकांची पाउले येथे पडु लागल्याने अनेक गोष्टी नव्याने प्रकाशात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड हे एक छोटेसे गांव आहे. याच नावाचा एक गिरीदुर्ग गावाच्या कुशीत वसलेला आहे. निसर्ग सौंदर्य, हिरवी गर्द झाडी, वनसृष्टीने नटलेले पण नक्षलवादाचे गालबोट या गावाला लागले होते. आता नक्षलवाद जरी येथुन संपला असला तरी त्याची भीती आजही काही प्रमाणात स्थानिकांच्या मनात आहे.
...
मागील दोन वेळा गडचिरोली जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना स्थानिकांनी किल्ल्यावर येण्यास नकार दिल्याने आम्हाला किल्ल्यावर जाता आले नव्हते. पण तिसऱ्या वेळेस चुकीच्या दिवशी येऊन देखील आम्हाला गडाच्या पायथ्यापर्यंत जाता आले व त्यावेळेस आम्ही सुरजागड डोंगराच्या पायथ्याशी असलेला भुईकोट पाहिला व त्यावरच समाधान मानले व मागे फिरलो. या भुइकोटाचे वर्णन मी या आधीच आपल्या संकेतस्थळावर केलेले आहे.मागील वेळेस स्थानिकांनी सांगीतले की गावात दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ५ व ६ तारखेला सुरजागड यात्रा हा वार्षिक उत्सव असतो. गडचिरोली जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा हा प्रमुख उत्सव आहे. या उत्सवास सुरजागडची यात्रा किंवा ठाकुरदेवाची यात्रा म्हणतात. या यात्रेचे फक्त दोन दिवस स्थानिक गडावर जातात. इतर कोणत्याही दिवशी ते गडावर जात नाहीत. त्यामुळे वाटाड्या सोबत नसला तरी लोकांबरोबर या दोन दिवशी गडावर जाता येईल. या दोन तारखा लक्षात ठेऊन ४ जानेवारी २०२५ साली आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. सुरजागड हा किल्ला गडचिरोली जिल्यातील एटापल्ली तालुक्यात महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात आहे. गडावर जायचे असल्यास आपल्याला गडाच्या पायथ्याशी असलेल्या सुरजागड गावात एक दिवस आधी मुक्कामी येणे भाग आहे. गडचिरोली ते सुरजागड गाव हे अंतर १२३ कि.मी. असुन तालुक्याचे ठिकाण असलेले एटापल्ली गाव ते सुरजागड गाव हे अंतर २६ कि.मी.आहे. एटापल्ली येथे सरकारी विश्रामगृह वगळता राहण्याची कोठेही सोय नाही. तसेच या भागात सार्वजनिक वाहनव्यवस्था देखील फारशी सोयीची नसल्याने शक्यतो खाजगी वाहनाने दिवसा प्रवास करावा. एटापल्ली ते हेडरी या भागात तुरळक मानवी वस्ती असली तरी हेडरी ते सुरजागड गाव या भागात कोणतीही वस्ती नाही. सुरजागड गावाच्या थोडे अलीकडे रस्त्याच्या डाव्या बाजूस ठाकुरदेवाचे मंदीर असुन तेथेच वार्षिक जत्रा भरते. या मंदीराच्या समोरील बाजुस सुरजागड भुईकोट आहे. या मंदिराच्या मागील बाजुने सुरजागडवर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. किल्ला पाहुन झाल्यावर दिसलेली एक गोष्ट मी आधीच येथे नमूद करू इच्छितो कि सुरजागड किल्ला हा केवळ एका डोंगराचा माथा नसुन हा किल्ला एकुण तीन डोंगरावर वसलेला आहे गडावर जाताना आपण क्रमाने त्याची नोंद घेणारच आहोत. मंदिराच्या मागून जाणाऱ्या पायवाटेने साधारण दोन कि.मी. अंतर पार करून आपण सुरजागड डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतो. दाट जंगलातुन जाणारी हि वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. येथुन डोंगर चढायला सुरवात केल्यावर साधारण १५ मिनिटांनी आपण डोंगर उतारावर रचलेल्या तटबंदीजवळ पोहोचतो व तेथील भग्न दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. आज दरवाजाचे कोणतेही अवशेष शिल्लक नसुन तेथे असलेला दगडांचा ढिगारा पाहुन येथे दरवाजा असावा असा केवळ अंदाज करावा लागतो. ओबडधोबड दगडांनी रचलेली हि तटबंदी ६-७ फुट उंच असुन डोंगराच्या कडेपर्यंत बांधत नेली आहे. काही लोक गडावर जाताना श्रद्धेने पायातील चप्पल अथवा बुट येथे काढतात पण ते काढणे बंधनकारक नाही कारण अनेक जण चप्पल बुटसहित गडाच्या माथ्यापर्यंत जातात. या दरवाजाने आत शिरल्यावर खऱ्या अर्थाने गड चढाईस सुरवात होते. या वाटेने पाउण तासाचा उभा चढ चढुन आपण दोन डोंगरामधील दरीत पोहोचतो व तेथुन डाव्या बाजुने पुन्हा १५ मिनिटांचा चढ चढुन दोन डोंगरामधील खिंडीत पोहोचतो. खिंडीचा हा संपुर्ण भाग रचीव दगडांच्या ५-७ फुट उंच तटबंदीने बंदिस्त केलेला असुन त्यात खालुन वर येताना व दुसरा किल्ल्यात प्रवेश करताना असे पडझड झालेले दोन दरवाजे आहेत. या भागात बऱ्यापैकी रचीव तटबंदी व बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात. येथे पुर्वी वर्दी देण्यासाठी दोन नगारे होते पण आता हे नगारे पायथ्याशी असलेल्या ठाकुरदेव मंदीराच्या आवारात पहायला मिळतात. या खिंडीतून पुढे गडावर जाणारी वाट अवघड नसली तरी सोपी देखील नाही पण स्थानिक बळी देण्यासाठी बकरा-कोंबडी सोबत घेऊनच या वाटेने गडावर चढतात. या खिंडीतून उजवीकडील डोंगरावर जाण्यासाठी वाट असुन या वाटेच्या डाव्या बाजूस दरीच्या काठावर बांधलेली तटबंदी तर उजवीकडे किल्ल्याचा डोंगर आहे. हा किल्ल्याचा दुसऱ्या डोंगरावरील भाग आहे. या आडव्या तिडव्या वाटेने किल्ल्याच्या माथ्याकडे जाताना वाटेवर एका ठिकाणी लहान बुरुज बांधलेला असुन या छोट्या बुरुजामधून हि वाट गड माथ्याकडे जाते. हि संपुर्ण वाट कातळावरून जात असल्याने काही ठिकाणी निसरडे कातळ आहेत व त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव येथे चप्पल काढण्याचा सल्ला स्थानीक लोक देतात पण बंधनकारक नाही. हा कातळमाथा चढुन आल्यावर समोर गडाचा तिसरा डोंगर व त्यावरील रचीव दोन बुरुज स्पष्ट दिसुन येतात. याला सुरजागडचा बालेकिल्ला म्हणता येईल. येथुन वर जाणारी वाट थोडी फार घसरणीची असुन सावधगिरीने वर चढावे लागते. या वाटेने १० मिनिटात दोन चौकोनी बुरुजामधील दरवाजाने आपण गडावर प्रवेश करतो. हि तटबंदी व दरवाजा उभ्या कड्यावर बांधलेला असुन दरवाजाची कमान नष्ट झाली असली तरी चौकट कायम आहे. या तटबंदीच्या डावीकडील टोकावर खालुन येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी गोलाकार बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावरून केवळ येणाऱ्या वाटेवरच नव्हे तर संपुर्ण परिसरावर लक्ष ठेवता येते. या तटबंदीला लागुनच किल्ल्याच्या येथील लाकडी दरवाजासाठी असलेल्या साखळी,कडीकोयंडे, बिजागरी,खिळे व इतर पत्रा सामान ठेवलेले आहे. येथुन पुन्हा गडचढाईस सुरवात केल्यावर आपण गडाच्या वरील भागात पोहोचतो. या ठिकाणी एक चौथरा असुन त्या चौथऱ्यावर एक लाकडी चौकट व त्यात ध्वजासाठी खांब रोवलेला आहे. या खांबाच्या शेवटी पांढरा ध्वज लावलेला आहे. चौथऱ्यावर काही अनगड देव मांडलेले असुन या देवांना नवस म्हणुन मातीचे घोडे व इतर काही वस्तु अर्पण केल्या जातात. हा गडाचा माथा नसला तरी येथे दाट झाडी असल्याने आसपास कोठेच जाण्यासाठी वाट नाही व आसपासचे काही दिसत देखील नाही. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची २०१२ फुट आहे. गडावर पाण्याची सोय कोठेच दिसत नाही पण स्थानिकांना विचारले असता ते बालेकिल्ल्याच्या तटबंदीतुन आत आल्यावर डावीकडे डोंगर उतारावर टाके असल्याचे सांगतात पण तेथे जाण्यासाठी आता वाट नसल्याचे सांगतात. पायथ्यापासुन गडाच्या या भागापर्यंत येण्यासाठी तीन तास पुरेसे होतात. येथे आपले दुर्गदर्शन पुर्ण होते व आपण परतीच्या मार्गाला लागतो.किल्ल्यावर जाऊन परत येण्यासाठी साधारण ६ तास लागतात. विदर्भाची जीवनदायिनी मानल्या गेलेल्या वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर गडचिरोली वसले आहे. चाणक्याच्या कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथात उल्लेख असलेल्या हि-याच्या खाणी आणि हत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या वैरागड प्रांताचा गडचिरोली हा एक भाग होता. वैनगंगा नदीच्या पलीकडे असल्याने हा भाग पूर्वी दक्षिण कोसल म्हणजे छत्तीसगडच्या मौर्य, सातवाहन, कलचुरी, राष्ट्रकुट व नंतर काकतीय अश्या सत्तांच्या अधिपत्याखाली होता. या भागाच्या संपन्नतेचा व सुबत्तेचा पुरावा म्हणजे वैनगंगा नदीकिनारी कलचुरी शासकांनी बांधलेला मार्कंडा मंदिरसमूह होय. अकबर बादशहाच्या ऐन-ए-अकबरी या ग्रंथात या भागात हत्ती असल्याची नोंद आहे. तमिळनाडूचे चोल, विजापूरचे आदिलशहा, देवगिरीचे यादव यांनीसुद्धा या भागावर त्यासाठी आक्रमणे केली होती. त्यानंतर हा भाग नागवंशीय माना व नंतर चांद्याच्या गोंड राज्याच्या वैरागड प्रांताचा भाग होता. इ.स.१४४७ ते १४७२ या काळात राज्य करणारा गोंड राजा सुरजा बल्लाळ शाह याच्या ५२ परगण्यांच्या यादीत गडचिरोलीचे नाव येते. सुरजागड किल्ल्याचा निर्माण काळ निश्चित माहित नसला तरी हा किल्ला माना नरेश कुरुमप्रहोद यांच्यानंतर गादीवर आलेला राजा सुरजत बडवाईक याने बांधला असे मानले जाते आणि सदर किल्ला त्याच्याच कारकिर्दीत बांधून पूर्ण झाल्यामुळे त्याच्याच नावाने या किल्ल्याचे नामकरण सुरजागड असे करण्यात आले अशी माहिती स्थानिकांकडून मिळते. महाराष्ट्राच्या ह्या अतिपूर्व भागात असलेल्या चिरोली टेकड्यांवरून या भागाला गडचिरोली नाव प्राप्त झाले असे मानले जाते. कॅप्टन जे टी ब्लंट या इंग्रज अधिका-याकडे ओरिसा-छत्तीसगड-गोंडवाना ते दक्षिण भारत असा मार्ग रेखांकित करण्याचे काम होते. तेव्हा तो कांकेर (छत्तीसगड) येथून मुख्य शहर व पेठ असलेल्या वैरागडला आला व काही दिवस तेथे राहून पुढे गडचिरोली येथे २० एप्रिल १७९५ या दिवशी आला होता. तेव्हा त्याने या गावाचा मोठ्या खेड्याचे चिरोलीगड असे वर्णन करत तेथे थोडाफार व्यापार असल्याचा उल्लेख केला आहे. या चिरोलीगडच्या डावीकडे बस्तरपर्यंतचा भाग खूप धोकादायक असून तिथे मनुष्यबळी देणारे अतिमागास आदिवासी राहत आहेत असेही तो म्हणतो. मीठ आणि धान्य पुरवणारे वंजारी सोडून इतर कोणीही जीवाच्या भीतीने या भागात प्रवास करत नाही असे त्याने नमूद केले आहे. या शिवाय १८ व्या शतकात विदर्भातील आद्य क्रांतिकारक क्रांतिवीर बाबुराव शेडमाके याने या गडावर काही काळ वास्तव्य केल्याचे स्थानीक सांगतात.
© Suresh Nimbalkar