सुरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ९७० फुट

श्रेणी : मध्यम

मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जात असताना रस्त्याच्या डाव्या बाजुने सह्याद्रीची डोंगररांग सतत आपल्याला सोबत करत असते. रायगड जिल्ह्यातुन जाताना या डोंगररांगेवर वसलेले कर्नाळा,सांकशी, मिरगड,सुरगड,सोनगड,चांभारगड यासारखे अनेक किल्ल्रे सहजपणे नजरेस पडतात. या सर्व किल्ल्यात अवशेष संपन्न असलेला एकमेव किल्ला म्हणजे किल्ले सुरगड. नागोठणे-कोलाड दरम्यान महामार्गावर नागोठण्याची सुकेळी खिंड पार केल्यावार डावीकडे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला दक्षिणोत्तर पसरलेला सुरगड किल्ला नजरेस पडतो. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असलेल्या या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासुन १०७ कि.मी.अंतरावरील खांब गाव गाठावे लागते. खांब गावापासुन २ कि.मी. आत वैजनाथ गाव असुन तेथुन १ कि.मी.अंतरावर घेरासुरगड हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. ... घेरा-सुरगड वाडीपर्यंत पक्का रस्ता असल्याने सोबत खाजगी वाहन असल्यास उत्तम अन्यथा हे ३ कि.मी.अंतर पायी पार करावे लागते. घेरासुरगड गावातील हनुमान मंदिराशेजारून गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. वाटेच्या सुरवातीस वाडीबाहेर एक विहीर असुन येथुन ५ मिनिटे पुढे चालत गेल्यावर ओढयाच्या पात्रात दुसरी विहीर आहे. हा ओढा पार केल्यावर विहिरीच्या उजव्या बाजूने गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. जंगलातुन जाणाऱ्या या वाटेने १५ मिनिटाचा चढ चढुन आपण किल्ल्याखालील पठारावर पोहोचतो. पठारावर आल्यावर समोर दोन टेकडावर वसलेल्या सुरगडचा माथा दिसण्यास सुरवात होते. या पठारावर मोठया प्रमाणात दगड पसरलेले असुन पठारावर आल्यावर वाट डावीकडे वळते. या वाटेने थोडे पुढे आल्यावर वाटेला उजवीकडे फाटा फुटलेला असुन सरळ जाणारी वाट अणसाई मंदिराकडे जाते तर उजवीकडील वाट डोंगरात असलेल्या घळीच्या दिशेने जाते. दुर्गवीर प्रतिष्ठाण हि संस्था या गडाच्या संवर्धनासाठी सतत कार्यरत असुन त्यांनी ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावलेले आहेत. या दोन्ही वाटांनी गडावर जाता येते. सरळ जाणारी वाट संपुर्ण डोंगराला वळसा घालून गडावर जाते तर उजवीकडील वाट घळीतील दरवाजाने थेट माथ्यावर जाते. हा गडाचा मुख्य प्रवेशमार्ग असुन या वाटेने जाऊन दुसऱ्या बाजुने उतरल्यास सोयीचे पडते शिवाय गडावरील व गडपायथ्याचे सर्व अवशेष पाहुन होतात. घळीच्या वाटेने सुरवात केल्यावर १० मिनिटात आपण घळीच्या पायथ्याशी असलेल्या एका लहान गुहेपाशी पोहोचतो. गडावर जाण्याचा हा मुख्य मार्ग असुन घळीच्या वरील बाजुस असलेला दरवाजा व इतर बांधकाम कोसळल्याने त्याचे दगड या घळीत विखुरलेले आहेत. येथुन एक लहानसा कातळटप्पा चढुन आपण घळीच्या वरच्या भागात येतो. येथे उजवीकडील बाजुला कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे पण ते वाटेवरून दिसत नाही. घळीतुन वर जाताना काही ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत तर काही ठिकाणी कातळात कोरल्या आहेत. घळीचा वरील भाग तटबंदीने बंदीस्त केला असुन त्यामध्ये असलेला उत्तराभिमुख दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. या दरवाजाखाली असलेल्या पायऱ्या मात्र आजही शिल्लक आहेत. या पायऱ्या चढुन आपला गडावर प्रवेश होतो. गावातुन इथवर येण्यास एक तास पुरेसा होतो. गडमाथा समुद्रसपाटीपासून ८६० फुट उंचावर असुन दोन टेकाडावर दक्षिणोत्तर साधारण १५ एकरवर पसरलेला आहे. यातील पश्चिम बाजुची टेकडी अतिशय लहान असुन तिच्या टोकावरील बुरुज,थोडीफार तटबंदी व पाण्याचे एक टाके वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुस असलेल्या टेकाडाच्या एका चौथऱ्यावर ठेवलेली हनुमानाची मुर्ती पहायला मिळते. पायाखाली पनवती,पिळदार मिशा व कमरेला खंजीर असलेली ही मूर्ती वेगळ्याच धाटणीची आहे. चौथऱ्याकडून थोडेसे पुढे गेल्यावर कातळात कोरलेले एक मध्यम आकाराचे शेवाळलेल्या पाण्याने भरलेले टाके आहे. येथुन वर चढत गेल्यास आपण या टेकाडाच्या टोकावर असलेल्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून घोसाळगड,अवचितगड,मिरगड, कुंडलिका नदी इतका दुरवरचा प्रदेश पहायला मिळतो. या टेकाडावर थोडेच अवशेष असल्याने येथुन पुन्हा दरवाजाकडे यावे व डाव्या बाजुने आपली पुढील गडफेरी सुरवात करावी. येथुन कातळात खोदलेल्या पायऱ्या चढुन जाताना घळीच्या दुसऱ्या बाजुस असलेली तटबंदी तसेच वरील बाजुस दरीच्या काठावर असलेले तटाचे अवशेष पहायला मिळतात. माथ्यावर उजव्या बाजुस काही घरांचे चौथरे आहेत. येथुन आपली वाटचाल गडाच्या उत्तर दिशेने सुरु होते. या वाटेवर घडीव दगडात बांधलेली एक छप्पर विरहित वास्तु पहायला मिळते. या वास्तुशेजारी थोडीफार भिंत उरलेली वास्तु असुन या वास्तुत एक शिवलिंग व भैरव-भवानी अशा दोन मुर्ती ठेवलेल्या आहेत. या भागात मोठया प्रमाणात घरांचे अवशेष पहायला मिळतात. वाटेत एका ठिकाणी मोठया प्रमाणात घडीव दगड पडलेले असुन कोणीतरी यातील काही दगड सिंहासनाप्रमाणे मांडले आहेत. यात दोन दिवा ठेवण्याच्या कोनाड्याचे दगड आहेत. येथुन पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजुस दरीच्या काठावर एकापुढे एक अशी कातळात कोरलेली दोन टाकी असुन बाहेरील बाजुस असलेल्या टाक्याच्या काठावर तटबंदी उभारली आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन पुढे आल्यावर सपाटीवर कातळात खोदलेली ५ पाण्याची टाकी आहेत. यातील दोन टाकी कोरडी असुन तीन टाक्यात हिरवेगार पाणी आहे. टाकी पाहुन पुढे आल्यावर डाव्या बाजुस घडीव दगडात बांधलेले प्रशस्त जोते दिसते. हि वास्तु बहुदा गडाची सदर असावी. सदरेच्या समोरील बाजुस गवतात लपलेला लहान चौथरा आहे. या चौथऱ्याच्या खालील बाजुस उतारावर तटाला लागुन कातळात कोरलेली ३ खांबटाकी आहेत. येथुन पुढे जाताना वाटेत अनेक पडीक चौथरे असुन यात डाव्या बाजुला कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. पुढे गडाला दोन भागात विभागणारी तटबंदी असुन या तटबंदीत डाव्या बाजुला चौथरा तर उजव्या बाजुस सुंदर बुरुज आहे. गडाचा पुढील भाग उताराचा असुन हा बुरुज गडाच्या दोन्ही अंतर्गत भागावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा. बुरुज पाहुन खाली उतरताना वाटेत आयताकृती दगडात कोरलेला शिलालेख पडलेला आहे. एखादया बांधकामात असलेला हा शिलालेख वास्तु कोसळल्याने वेगळा पडलेला आहे. शिलालेख पर्शियन व मराठी या दोन्ही भाषेत कोरला असुन यातील मजकुराप्रमाणे सिद्दीसाहेबांच्या हुकमावरून सूर्याजी याने हा किल्ला बांधला त्यावेळी तुकोजी हैबतराव गडाचे हवालदार होते. गडाच्या इतर भागातील बांधकामाशी तुलना करता आपण आता पाहिलेला बुरुज व गडाच्या या भागातील बांधकाम आजही चांगल्या स्थितीत आहेत. यावरून असे वाटते कि हे बांधकाम नंतरच्या काळातील असावे व हा शिलालेख याच बांधकामाबद्दल असावा. या तटबंदीत एक शौचकुप बांधलेले असुन तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटबंदीच्या शेवटी गडाच्या उत्तर टोकावर ढालकाठीचा बुरुज असुन त्यावर आजही भगवा ध्वज फडकत असतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन बुरुजाच्या तळाशी पाण्याचे एक टाके आहे. या बुरुजावरून समोरील बाजुस असलेल्या टेकडीवर एक समाधी पहायला मिळते. या तटबंदीवरून गडाबाहेर जाणारी वाट असुन या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. खाली उतरत जाणारी हि वाट गडाला वळसा घालुन पठारावरील अणसाई मंदिराकडे जाते. या वाटेने पुर्ण खाली न उतरत गडाचा डोंगर उतरून आल्यावर या डोंगराला लागुनच एक वाट पुढे जंगलात जाते. या वाटेने साधारण १५ मिनिटे चालत गेल्यावर गडावरून ढकलल्याने खाली दरीत पडलेली ८ फुट लांबीची तोफ पहायला मिळते. या तोफेकडून खाली उतरत आपण केवळ अवशेष रुपात शिल्लक असलेल्या अणसाई मंदिराकडे पोहोचतो. अणसाई देवीची मुर्ती व चौथरा एकाच कातळात कोरलेला असुन काही अंतरावर दुसरी कोरीव मुर्ती आहे. मंदीराच्या आवारात एक भग्न तोफ पडलेली आहे. येथुन पठारावर आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. गडमाथा ते अणसाई मंदीर हा परिसर पहाण्यास दीड तास पुरेसा होतो. गडाचा आकार जरी फारसा मोठा नसला तरी गडावर असलेल्या पाण्याच्या एकुण १४ टाक्या व मोठया प्रमाणातील वास्तु अवशेष पहाता गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. आज आपण पहात असलेला अवशेष संपन्न किल्ला हे मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या परिश्रमाचे फळ आहे. त्यांनी मोठया प्रमाणात गडसंवर्धन करून या सर्व वास्तु झाडी व मातीतुन मोकळ्या केल्या आहेत. गडावर येणाऱ्या वाटांची दुरुस्ती करून टाक्यांची स्वच्छता केली आहे. त्यांच्या या कार्याला मनपुर्वक धन्यवाद !!!! गडावर असलेली खांबटाकी पाहता सुरगड किल्ला शिवपुर्व काळापासुनच अस्तित्वात असावा. शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये केलेल्या कोकण मोहिमेत तळा ,,घोसाळगड सोबत सुरगड देखील स्वराज्यात सामील झाला. महाराजांनी नव्याने वसवलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत सुरगडचे नाव येते. राजाराम महाराजांच्या काळात शंकराजी नारायण सचिव यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला पण नंतर तो पुन्हा सिद्दीच्या ताब्यात गेला. इ.स. १७३३ मध्ये सिद्धी व पेशवे यांच्यातील तहानुसार सुरगड किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. त्याकाळात गडावर असलेल्या कैद्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत. गडावर असलेल्या पर्शियन व मराठी शिलालेखावरून सिद्दीच्या काळात या गडावर काही बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम सूर्याजी याने केले असुन या काळात तुकोजी हैबतराव गडाचे हवालदार होते. इ.स. १८१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर याने हा किल्ला जिंकुन घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!