सुमारगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रत्नागिरी
उंची : ३०१० फुट
श्रेणी : कठीण
अलंग –मदन- कुलंग या दुर्गत्रयीप्रमाणे भटकंतीसाठी प्रसिद्ध असलेली अजुन एक दुर्गत्रयी म्हणजे महिपतगड-सुमारगड-रसाळगड. एकाच डोंगररांगेवर उभे राहुन एकमेकांशी जवळीक साधणारे हे दुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण २५ कि.मी. अंतरावर आहेत. यातील सुमारगड हा महिपतगड आणि रसाळगड ह्या दोन गडाच्या मध्ये डोंगर सोंडेवर वसलेला असुन किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झाला आहे. केवळ नावात सुमार असलेला सुमारगड प्रत्यक्षात मात्र थरारक व कठीण असुन इतर दोन दुर्गांची भटकंती सहजतेने करता येते मात्र सुमारगडची भटकंती करताना दमछाक होते. अनेकांनी सुमारगड किल्ला नावाप्रमाणेच सुमार असल्याचे लिहिले आहे पण ते योग्य नाही. वर असलेले दाट गवत व कारवीच्या झाडीमुळे नीटपणे करता न आलेली भटकंती हे त्याचे कारण असावे पण आकाराने लहान असूनही या गडावर पाण्याची टाकी,गुहा,बुरुज, कोठार,चौथरे यासारख्या अवशेषांची लयलूट आहे. वडगाव,मालदे, रसाळवाडी जैतापुर हि सुमारगडच्या घेऱ्यातील गावे असुन मालदे व वाडी जैतापुर येथुन गडावर जाण्यासाठी वाट आहे. मालदे गावातून गुरखिंड मार्गे पायवाटेने गडावर जाण्यासाठी ४ तास लागतात तर रसाळगडवाडी मार्गे म्हारखिंड-गुरखिंड असा प्रवास करत सुमारगडवर पोहोचण्यास सहा तास लागतात.
...
त्यामानाने वाडीबेलदार मार्गे सुमारगडावर जाणे जास्त सोयीचे असुन येथुन गडावर जाण्यास अडीच तास लागतात पण त्यासाठी जीपसारखे वाहन सोबत असायला हवे. सुमारगड ज्या डोंगरावर वसलेला आहे त्या डोंगराची एक सोंड वाडी बेलदारच्या दिशेने उतरलेली आहे. वाडी जैतापुर ते वाडी-बेलदारपर्यंत कच्चा रस्ता झाल्यामुळे जीपसारख्या वाहनाने सुमारगड असलेल्या डोंगराची सोंड जेथे रस्त्याला भिडली आहे तिथपर्यंत सहजतेने जाता येते अन्यथा ५ कि.मी. चढ असलेला हा रस्ता पायगाडीने पार करण्यास दीड तास लागतात. या वाटेने जास्त चढाई करावी लागत नसल्याने हि वाट कमी श्रमाची व जास्त सोयीस्कर आहे पण त्यासाठी वाहन मात्र सोबत असायला हवे अन्यथा मालदे वाडीतुन जाणे योग्य आहे. या खिंडीत सुमारगड दिशा दर्शविणारा फलक लावलेला असुन बेलदार वाडी येथुन अर्ध्या तासावर आहे. बेलदार वाडी हि दहा-बारा घरांची लहानशी वस्ती असुन येथे चहापाण्याची तसेच जेवणाची चांगली सोय होते. वाडीत मुक्काम करावयाचा असल्यास मारुतीचे मंदिर आहे. अनुभवी दुर्गमित्राना येथुन जाण्यासाठी वाटाड्याची गरज नाही मात्र नवखे असल्यास वाडी बेलदार येथुन वाटाड्या सोबत घेणे सर्वोत्तम. खिंडीतुन सुमारगडच्या दिशेने चालण्यास सुरवात केल्यावर दोन चढाव पार करून साधारण पाऊण तासात आपण राया धनगराच्या झापाजवळ पोहोचतो.गोनीदांच्या कथेतुन झळकणारा राजगडचा बाबुदा, राजमाचीचा बुधा त्याचप्रमाणे सुमारगडचा हा राया धनगर. वय वर्ष ७५ असलेला हा जंगलचा तरुण राजा गेली कित्येक वर्ष या जंगलात त्याच्या गुरांसोबत एकटाच येथील झोपडीत रहातो.अनेक दुर्गमित्रांच्या लेखणीतुन डोकावणाऱ्या रायाला या जंगलभागाची खडानखडा माहिती आहे. वेळ असल्यास राया आपल्या सोबत गडावर देखील येतात अन्यथा चार पाउले सोबत चालुन पथदर्शकाचे काम करतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता रायाने दिलेल्या ताकाचा आवर्जुन स्वाद घ्यावा व आपली पुढील वाटचाल सुरु करावी. येथुन पुढे जाणारी वाट दाट जंगलातील असुन या वाटेने जाताना वाटेचा निट मागोवा घेत ढोरवाटा टाळाव्या कारण राया धनगराची जनावरे येथे चरायला येत असल्याने अनेक वाटा पडलेल्या आहेत. या वाटेने डाव्या बाजूने तब्बल तीन डोंगरांना वळसा मारत व शेवटच्या डोंगरावर तिरके चढत तासाभरात आपण गुरखिंडीत पोहोचतो. गुरखिंड हि पाण्याच्या प्रवाहाने व जनावरांच्या पायसरीने तयार झालेली लहानशी खिंड असुन खिंडीतून खाली उतरत जाणारी वाट मालदेवाडी व रसाळगडकडे जाते तर डावीकडील चढणीवर कारवीच्या झाडीत असलेली पायवाट आपल्याला सुमारगडकडे नेते. उभ्या चढावर असलेली हि लहानशी पायवाट चढत आपण सुमारगडासमोर असलेल्या डोंगर धारेवर पोहोचतो. सुमारगड आणि त्याच्या अलीकडचा डोंगर एका निमुळत्या डोंगरधारेने एकमेकांशी जोडले गेले आहेत. येथुन सुमारगडाचे पुर्व टोक व त्यावरील बुरुजाचे सुंदर दर्शन होते. पुढील वाटचाल अतिशय सावधगिरीने करत आपण या टोकाच्या कड्याला भिडतो. येथे कड्याच्या डाव्या बाजूने कातळ कोरून गडाच्या दरवाजाकडे जाण्यासाठी वाट बनविलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याकडील अवजड सामान येथे उतरून ठेवावे व पुढील वाटचाल करावी. जवळ रोप असल्यास कड्याचा हा भाग व्यवस्थित पार करता येईल. जेमतेम एक फुट रुंद असलेली हि पायवाट कातळाला बिलगुनच पुढे जाते. एका ठिकाणी हि वाट वितभर असुन कातळाला पाठ-पोट घासतच पुढे सरकावे लागते. याठिकाणी आधारासाठी एक खिळा ठोकलेला आहे. वाटेच्या सुरवातीस जमीनीत उतरत जाणारे एक भुयार असुन त्याच्या तोंडाशी माती साठल्याने आत शिरता येत नाही. या भुयारापुढे काही अंतरावर ४ x ४ फुट आकाराचे तोंड असलेली दुसरी गुहा असुन या गुहेत पाणी जमा झाल्याने आत शिरता आले नाही. पुढे काही अंतरावर या गुहेप्रमाणे तिसरी गुहा असुन या गुहेच्या आतील भागात पायऱ्याप्रमाणे उतार कोरलेला असुन आत शिरल्यावर हि उजवीकडे वळते. या ठिकाणी कातळात कोरलेले कोठार आहे. आधी पाहीलेल्या पण पाण्यामुळे आत शिरू न शकलेल्या गुहेची रचना देखील अशीच असावी. हि गुहा पाहुन आपण गडावर जाण्यासाठी नव्याने लावलेल्या शिडीजवळ पोहोचतो. या शिडीखाली गडावर जाण्याचा मुळ बांधीव पायरीमार्ग असुन आज त्यातील केवळ ५-६ पायऱ्या शिल्लक आहेत. येथुन गडावर जाणारी वाट नष्ट झाल्याने बा रायगड परिवार व क्षेत्र सुमारगड संवर्धन समिती यांच्या संयुक्त प्रयत्नाने २०१६ साली हि शिडी लावण्यात आली आहे. उगवतीच्या कड्यावरील वारसाच्या झाडाच्या मुळीस धरून येंगावं लागतं" असं दुर्गमहर्षी गो.नि.दांडेकर यांनी सुमारगडावरील चढाईचं केलेलं वर्णन याच ठिकाणाचे आहे. आता मुळीऐवजी शिडीला धरून जाव लागत इतकाच बदल झालाय. शिडीने वर न चढता कड्याला बिलगुन सरळ पुढे गेल्यावर आधी पाहीलेल्या गुहेप्रमाणे चौथी गुहा पहायला मिळते. या गुहेपुढे काही अंतरावर कड्याच्या पोटात कोरलेले पाण्याचे टाके आहे. हे पाहुन मागे फिरावे व शिडीवरून गड चढण्यास सुरवात करावी. शिडी चढुन वर आल्यावर डाव्या बाजुस पहारेकऱ्यासाठी कातळात कोरलेली गुहा पहायला मिळते. या गुहेत एक सतीशिळा ठेवलेली आहे. या गुहेपुढे काही अंतरावर लेणीवजा दुसरी गुहा असुन या गुहेत शिवलिंग कोरलेले आहे. गुहेच्या वरील भागात घडीव दगडात बांधलेली गडाची तटबंदी असुन कोपऱ्यावर बुरुज पहायला मिळतो. वाटेचा हा टप्पा दरीकाठावर असुन मुरमाड असल्याने सांभाळूनच पार करावा. थोडे पुढे आल्यावर वाट डावीकडे वळते तर उजव्या बाजुस दाट कारवीची झाडी आहे. या कारवीच्या झाडीत जमिनीच्या पोटात कातळात कोरलेले पाण्याचे भुमिगत टाके असुन या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. या टाक्याच्या वरील बाजुस बालेकिल्ल्याच्या टेकाडाच्या पोटात खोदलेली मोठी गुहा असुन या गुहेत दोन बांधीव कोठार आहेत. सध्या या गुहेत मोठ्या प्रमाणात माती जमा झालेली आहे. गुहा पाहुन वाटेवर यावे व आपली पुढील गडफेरी सुरु करावी. वाटेच्या पुढील भागात उजवीकडे कातळात कोरलेली तीन मोठी टाकी आहेत. यातील दोन टाक्यात पाणी असुन एक टाके कोरडे ठणठणीत आहे. या टाक्याचा दगड गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आला असावा. टाक्याच्या पुढील भागात म्हणजे बालेकिल्ल्याच्या दिशेने कातळात कोरलेले खांबटाके असुन यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्याच्या डावीकडे एक गुहा असुन या गुहेत शिवलिंग,नंदी तसेच दगडी चौरंग असुन त्यावर देवीचे चार मुखवटे कोरलेले आहेत. या गुहेत जेवण करण्यासाठी भांडी ठेवलेली असुन गडसंवर्धन करण्याची हत्यारे आहेत. टाक्याच्या काठावर गवतात हरवलेला चौथरा असुन या चौथऱ्यावर गुहेतील चौरंगाप्रमाणे दगडी चौरंग असुन भैरवाची मूर्ती आहे. येथुन पुढे निघाल्यावर वाटेवर काही वास्तु अवशेष असुन एक लहान चौकोनी तोंड असलेले पाण्याचे भुमिगत टाके आहे. हे घरातील बळद असुन आता त्यात पाणी जमा झाले आहे. वाटेच्या उजवीकडे खुप मोठा चुन्याचा ढीग असुन त्याशेजारी एका भुयाराचे तोंड आहे पण त्यात सध्या पाणी जमा झालेले आहे. येथुन पायवाटेने गडाच्या टेकडीवर जाताना एका मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच कातळात कोरलेली चौकोनी खांब असलेली गुहा पहायला मिळते. या गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या कोरल्या आहेत. गडमाथ्यावर घडीव दगडात बांधलेला भलामोठा चौथरा असुन त्यावर भगवा झेंडा रोवलेला आहे. गडमाथ्यावरून जगबुडी नदीचे खोरे, महाबळेश्वरची डोंगररांग,हातलोट घाट, चकदेव, परबत हा परीसर तसेच प्रतापगड, मधु-मकरंदगड, वासोटा, रसाळगड,महिपतगड हे किल्ले नजरेस पडतात. संपुर्ण गडाचा परिसर साधारण चार एकरवर पसरलेला असुन गडमाथा समुद्रसपाटीपासुन ३०१० फुट उंचीवर आहे. गडमाथ्यावर आल्यावर आपले सुमारगड दर्शन पुर्ण होते. शिडीपासून गड फिरण्यास साधारण एक तास लागतो.गडावरील टाक्या व इतर अवशेष पहाता हा किल्ला प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असल्याचे दिसुन येते. इ.स.१६६१-६१ दरम्यान महिपतगड-रसाळगड सोबत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला असावा. सातारच्या शाहु महाराजांच्या दफ्तरातील गडकिल्ल्यांच्या यादीत सुमारगडचा उल्लेख सुमेरुगड असा आढळतो. इ.स.१७७० नंतर पेशव्यांनी कैदखाना म्हणुन या किल्ल्याचा वापर केला. इ.स. १८६२ साली ब्रिटीशांनी केलेल्या पहाणीत गडावर १६ तोफा असल्याची नोंद मिळते आता मात्र एकही तोफ दिसुन येत नाही.
© Suresh Nimbalkar