सुतोंडा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : औरंगाबाद

उंची : १७३० फुट

श्रेणी : मध्यम

औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळ डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत पण दौलताबाद अंतुर यासारखे प्रसिद्ध किल्ले सोडले तर इतर किल्ले तसे अपरीचीत आहे. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे काही महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे कोणी फिरकत नाही. सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला हा असाच एक तटबंदी, बुरुज,दरवाजा, पाण्याची टाकी, लेणी यासारखे अनेक वास्तुअवशेष असुनही अपरीचीत असलेला एक सुंदर किल्ला. सुतोंडा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. येथील रस्त्यांची भयानक अवस्था पहाता मुंबई-पुण्याहुन येथे जाताना चाळीसगावमार्गे जाणे हा बऱ्यापैकी पर्याय आहे. चाळीसगाव सुतोंडा हे अंतर ४८ कि.मी.असुन चाळीसगाव-नागद-बनोटी-नायगाव या मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ... औरंगाबादहुन आल्यास हे अंतर १२१ कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-कन्नड-नागद-बनोटी मार्गे नायगाव येथे येण्यास ५ तास लागतात. वाहनांची सोय केवळ बनोटीपर्यंत असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास बनोटी ते नायगाव हे ४ कि.मी.अंतर पायी कापावे लागते. गावात शिरताना शाळेसमोरील गल्लीत झाडाखाली एक अतिशय सुंदर अशी विष्णुमूर्ती पहाण्यासारखी आहे. नायगांव गावाच्या मागील बाजूस असलेला भलामोठा डोंगर पाहुन काही काळ आपण भांबावून जातो पण बारकाईने पाहिल्यास या डोंगराखाली असलेल्या लहान डोंगरावरील तटबुरुजाचे अवशेष नजरेस पडतात व तो किल्ला असल्याचे लक्षात येते. सुतोंडा किल्ला उंच अशा रक्ताईच्या मुख्य डोगरावर नसून पुढे आलेल्या डोंगररांगेच्या एका उंच टेकडीवर आहे व दक्षिणेकडे तो या डोंगराला जोडलेला आहे. गावातुन किल्ल्याकडे जाताना गावाबाहेर पत्र्याच्या निवाऱ्यात उभारलेले एक हनुमान मंदिर असुन या मंदिरात अनेक भग्न प्राचीन मूर्त्या ठेवलेल्या आहेत. किल्ल्याकडे जाणारी वाट मळलेली असुन समोरच्या टेकाडाला वळसा घालत हि वाट किल्ल्याखालील पठारावर येते. पठारावर दूरवर पसरलेले दगड व चौथरे येथे कधीकाळी मोठी वस्ती असल्याची जाणीव करून देतात. येथे वरच्या बाजुला तटबंदीत असणारा एक लहान दरवाजा दिसुन येतो. हा मार्ग खड्या चढणीचा असुन येथुन किल्ल्यावर जाता येते पण किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग असुन दुसरा सोपा मार्ग किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याच्या मुख्य दरवाजात जातो. दुसऱ्या वाटेने जाऊन या तटबंदीतील लहान दरवाजाने खाली उतरल्यास आपला संपुर्ण किल्ला फिरून होतो. दुसरी वाट किल्ल्याच्या उजवीकडून वळसा घालत किल्ला डावीकडे ठेवत वर चढत एका मानव निर्मित खिंडीत येते. हि खिंड म्हणजे किल्ल्याचा डोंगर मुख्य रक्ताईच्या डोंगरापासून वेगळा करण्यासाठी खोदलेला खंदक आहे व या खंदकातच किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. खंदकाची लांबी ६० फुट रुंदी साधारण ३० फुट असुन टेकडीकडची उंची २५ फुट तर दरवाजाकडील उंची ४० फुट आहे. दरवाजासमोर असलेल्या टेकाडावर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या असुन त्यावर एक पाण्याचे कोरडे टाके आहे. हे पाहुन आपण किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या साधारण ७ फुट उंचीच्या उत्तराभिमुख दरवाजात येतो. खंदक खोदुन निघालेला दगड दरवाजाच्या वरील बाजूस कातळावर असलेली तटबंदी बांधण्यास वापरलेला असुन या तटबंदीत आपल्याला एक शरभशिल्प व एक उखळाचा दगड दिसुन येतो. दरवाजाच्या आतील बाजूस बिजागरी व अडसराच्या खाचा कोरलेल्या पहायला मिळतात. दरवाजातून आत आल्यावर कातळात कोरलेला भूयारी मार्ग काटकोनात वळतो. येथे पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन हा मार्ग आत ४० फुट लांबवर कातळात कोरला आहे. दरवाजातून आत आल्यावर पुढे जाऊन डाव्या बाजूला वळून वर चढून गेल्यावर आपण खिंडीच्या वरच्या बाजूला येतो. पायथ्यापासुन इथवर यायला एक तास लागतो. इथुन थोडेसे वर आल्यावर किल्ल्याचा काही प्रमाणात तटबंदी शिल्लक असलेला दुसरा उध्वस्त पश्चिमाभिमुख दरवाजा लागतो. या दरवाजातून सरळ पुढे आल्यावर एक उध्वस्त झालेले लेणीवजा दोन खांब असलेले टाके दिसते. या टाक्याच्या पुढे काही अंतरावर डोंगर उतारावर एक लांबलचक मोठे कोरडे टाके पहायला मिळते. या टाक्याच्या कोपऱ्यात एक खांब कोसळलेली मोठी गुहा असुन गुहेच्या भिंतीत एक कोरीव खिडकी दिसते. गुहेच्या आतील भागात पाणी साठले आहे. या गुहेपासून डोंगर उतारावरून तसेच पुढे आल्यावर अजुन दोन कोरडी टाकी पहायला मिळतात. वाटेच्या पुढील भागात अजुन एक लेणीवजा खांबटाके असुन या टाक्याच्या आत विश्रांतीकक्ष कोरलेला आहे. या टाक्याच्या वरील भागात दोन उध्वस्त जोडटाकी पहायला मिळतात. येथुन समोरच एक मध्यभागी मोठी कमान व शेजारी दोन लहान कमानी तसेच टोकावर लहान मनोरे असे बांधकाम असलेली इदगाहसारखी वास्तु दिसते. या वास्तुच्या डाव्या बाजूस दोन कबरी असुन समोरील बाजुस २०-२२ टाक्यांचा समूह दिसुन येतो. यातील ६-७ टाकी खडकाच्या पोटात खोदलेली असुन आतुन एकमेकास जोडली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस लहान तोंडे असुन उघडयावर असलेल्या या टाक्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी हि योजना आहे. या टाकी समुहाच्या मध्यभागी दर्शनी दोन खांब असलेली अर्धवट कोरलेली लेणी असुन लेण्याच्या वरील बाजूस अजुन एक चारखांबी अर्धवट कोरलेले लेणे आहे. या दोन्ही लेण्यात पाणी साठलेले असुन लेण्यांच्या खांबावर काही प्रमाणात मुर्ती व नक्षीकाम पहायला मिळते. दुसऱ्या लेण्यापासून वर चढुन आल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर पोहोचतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १७४० फुट असुन त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर साधारण १५ एकर परिसरावर पसरलेला आहे.किल्ल्याच्या माथ्यावर आपल्याला बालेकिल्ल्याची तटबंदी आणि भुईसपाट झालेल्या वाडय़ाच्या अवशेषाबरोबर काही कोरीवकाम केलेले दगड देखील पहायला मिळतात. हे पाहुन नायगावच्या दिशेने थोडे खाली आल्यावर उजव्या हाताला वळुन आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून परत उजवीकडे वळल्यावर आपल्याला अजुन दोन पाण्याची मोठी टाकी पहायला मिळतात. यात एक लेणीवजा टाके असुन त्यात ८ खांब पहायला मिळतात. किल्ल्यावर असलेल्या तीन लेणीवजा टाक्यांची एकुण रचना पहाता हि पाण्याची टाकी मुळची लेणी अथवा कोठारे असुन त्यात पाणी पाझरल्याने कालांतराने त्यांचे रुपांतर पाण्याच्या टाक्यात झाले असावे. येथुन पुढे जाणारी पायवाट मोडलेली असल्याने परत फिरून नायगावच्या दिशेने असलेल्या तटबंदीवरून फेरी मारत इदगाहच्या खालील बाजूस यावे. किल्ल्याची या भागात असलेली तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहे. या तटबंदीत आपल्याला एकुण ४ बुरुज पहायला मिळतात. यातील नायगावाच्या दिशेने असलेल्या टोकावरील बुरुजावर आपण किल्ल्यावर येताना खालील पठारावरून पाहिलेला दरवाजा आहे. कोणत्याही प्रकारचे मिश्रण न वापरता हा ५ फुट उंचीचा दरवाजा केवळ घडीव दगड एकावर एक रचून बांधलेला आहे. या दरवाजातून १५ मिनीटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या वाटेने खाली उतरताना जोगणमाईचे घरटे किंवा जोगवा मागणारणीचे घर अशा स्थानिक नावाने ओळखले जाणारे जैन लेणे पहायला मिळते. या वाटेने अर्धा किल्ला उतरल्यावर उजव्या बाजुला तटबंदीला समांतर अशी वाट जाताना दिसते. या वाटेने ५ मिनीटे चालत गेल्यावर वरील बाजुस कातळात खोदलेली दोन लेणी पहायला मिळतात. यातील पहील्या लेण्याचे ओसरी व सभामंडप असे दोन भाग असुन ओसरीला दोन खांब कोरले आहेत. दालनाच्या ललाटबिंबावर तीर्थंकराची प्रतिमा कोरलेली आहे. या दालनात उजव्या बाजुला २.५ फूट उंच मांडीवर मूल घेतलेली अंबिका यक्षीची मुर्ती असुन वरच्या बाजूला भिंतीत महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. डाव्या बाजूच्या दालनात २ फूट उंच सर्वानुभूती या यक्षाची प्रतिमा भिंतीत कोरलेली आहे. आतील दालन चौकोनी असुन धुळीने भरलेल्या या दालनात कोणतेही कोरीव काम नाही. लेण्याच्या पुढील भागात कातळात खोदलेल्या काही पायऱ्या असुन या पायऱ्यानी वर गेल्यावर दोन खांब असलेले दुसर लेण पहायला मिळत. लेण्याबाहेर पाण्याचे टाके असुन या लेण्यात मोठया प्रमाणात गाळ भरला आहे. हे लेण पाहून मुळ पायवाटेवर आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. येथुन गावात जाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ल्यावर असलेल्या लेण्या व पाण्याची टाकी पहाता गडाची रचना प्राचीन काळात म्हणजे ४-५ व्या शतकात झाली असावी. भुयारी दरवाजाच्या वरील भागातील तटबंदीचे बांधकाम पहाता हि तटबंदी बहमनी काळात बांधली गेली असावी व सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे तुकडे झाल्यावर येथील राज्यकर्ते बनलेल्या निझामशाहीच्या ताब्यात हा किल्ला आला. बादशाहनामा ह्या ग्रंथात मोगल बादशहा शहाजहान याच्या आज्ञेवरून मोगल सरदार सिपहंदरखान याने इ.स. १६३०-३१ मध्ये मोठ्या फौजेच्या सहाय्याने सितोंडा किल्ल्यावर स्वारी केली व तेथील किल्लेदार सिद्दी जमाल याने शरणागती पत्करल्याचा उल्लेख येतो. औरंगाबाद ब्रिटीश गॅझेटमध्ये या किल्ल्याचा साईतेंडा म्हणुन उल्लेख असून तो कन्नड पासून उत्तरपूर्व दिशेला २६ मैल अंतरावर असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर औरंगजेबने काही देशमुखांना या किल्ल्यासाठी सनद दिल्याचा उल्लेखहि या गॅझेटमध्ये आला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!