सिताणे
प्रकार : गढी
जिल्हा : धुळे
धुळे जिल्ह्यातील गढीकोटांची भटकंती करताना आपल्याला नाणे-सिताणे या जोडनावाने ओळखलले जाणारे गावाचे नाव ऐकायला मिळते. मुळात हि दोन्ही गावे पुर्णपणे वेगवेगळी असुन या दोन्ही गावातील अंतर साधारण ३.५ कि.मी.आहे. या दोन्ही गावात असणारे साम्य म्हणजे या दोन्ही गावात असणारी गढी. यातील नाणे गावात असणारी गढी पुर्णपणे नष्ट झाली असुन सिताणे गावात असलेली गढी मात्र काही प्रमाणात तग धरून आहे. हि गढी पाहिल्यावर आपल्याला नावापुरते उरणे म्हणजे नक्की काय आते याची जाणीव होते. धुळे जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेले सिताणे हे गाव पारोळा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ४६ कि.मी.अंतरावर तर धुळे शहरापासुन ३२ कि.मी.अंतरावर आहे. गावाभोवती नगरदुर्गाचे कोणतेही अवशेष नसुन गावात गढीचे काही अवशेष मात्र आजही काही प्रमाणात तग धरून आहेत. एका लहानशा उंचवट्यावर असलेल्या या गढीला कधीकाळी चार टोकाला चार बुरुज होते पण त्यातील दोन बुरुज आता पुर्णपणे नष्ट झाले असुन उर्वरीत दोन बुरुज कमीअधिक प्रमाणात शिल्लक आहेत.
...
गढीच्या मध्यात असलेला वाडा वाटणीमुळे दोन भागात विभागला असुन अर्ध्या वाड्याची देखरेखी अभावी पडझड झाली आहे तर अर्धा वाडा आजही आपले जुनेपण राखुन आहे. वाड्याचा दर्शनी भाग घडीव दगडात बांधलेला असुन त्यावरील लाकडावर सुंदर नक्षीकाम केले आहे पण दुर्लक्षामुळे याच भागाची पडझड जास्त झाली आहे. या गढीत सध्या जाधोव कुटुंब वास्तव्यास असुन हा वाडा व गढी त्यांच्या पूर्वजांनी ३०० वर्षापुर्वी बांधल्याचे ते सांगतात. जाधोव हे मुळचे राजस्थानचे असुन त्यांच्या पुर्वजांनी सिताने गाव वसवुन येथे वास्तव्य केल्याची माहिती मिळते. याचा अर्थ हि गढी पेशवे काळात उभारली गेली असावी. गढीत असलेल्या मोकळ्या जागी नव्याने बांधलेली घरे असुन एका बुरुजावर देखील घराची उभारणी झाली आहे. गढीचे मूळ मालक सध्या मुंबईजवळ पनवेल येथे वास्तव्यास असुन त्यांच्या परवानगीने गढीतील वाडा पहाता येतो. या गढीची रचना केवळ राहण्याच्या दृष्टीने केली असल्याने त्यात कोणत्याही प्रकारची संरक्षण रचना दिसुन येत नाही. गढीचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याने १५ मिनिटात आपले गढीदर्शन पूर्ण होते.
© Suresh Nimbalkar