सिंहगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ४३१४ फुट

श्रेणी : सोपी

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा राज्यातील एक महत्वाचा किल्ला अशी सिंहगड किल्ल्याची ओळख आहे. किल्ला ताब्यात घेताना सुभेदार तानाजी मालसुरे यांना आलेले वीरमरण हा महत्वाचा प्रसंग या किल्ल्यावर घडल्याने मराठी माणसाच्या मनात सिंहगड किल्ल्याचे एक वेगळेच स्थान आहे. त्यामुळे शिवप्रेमी व दुर्गप्रेमी या किल्ल्याला सतत भेट देत असतात आता मात्र या किल्ल्याला पर्यटनाच्या नावाखाली ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. गाडी थेट किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जात असल्याने सुट्टीचे दिवस व पावसाळा या काळात सिंहगड पर्यटकांनी ओसंडुन वाहतो. आपल्याला किल्ला व्यवस्थित पहायचा असल्यास शक्यतो हा काळ टाळूनच गडभ्रमंतीचे नियोजन करावे. किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे दरवाजा व कल्याण दरवाजा असे दोन प्रवेशमार्ग असुन खाजगी वहाने डोणजेमार्गे थेट पुणे दरवाजापर्यंत जात असल्याने सर्वच पर्यटक व बहुतांशी दुर्गप्रेमी याच वाटेचा वापर करतात. आपल्याला एका दिवसात संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास पुणे दरवाजाने गडावर प्रवेश करणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. वनखात्याच्या नवीन नियमानुसार खाजगी वहाने आता सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी ठेवुन तेथुन विजेवर चालणाऱ्या बसने पुणे दरवाजापर्यंत जाता येते. गडावर होणारी गाड्यांची गर्दी व अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने हि उपाययोजना केलेली आहे. ... पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात डोणजे गावाच्या हद्दीत हा किल्ला असुन पुणे ते सिंहगड माथा हे अंतर २७ कि.मी. आहे. स्वारगेट बस स्थानकातुन सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली आतकरवाडी येथे जाण्यासाठी दर तासाला ५० क्रमांकाची बस आहे. आतकरवाडीतुन किल्ल्यावर चालत जाण्यास साधारण दोन तास लागतात. खाजगी वहानाने आल्यास पुणे -आनंदनगर-वडगांव– खडकवासला - सिंहगड माथा असा गाडीमार्ग आहे. पुण्याच्या नैर्ऋत्येला सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील काही उपरांगा पसरलेल्या असुन यातील भुलेश्वर नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगररांगेवर पुरंदर व सिंहगड किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याच्या घेऱ्यात एकुण आठ गावे असल्याने पुर्वी हा प्रदेश आठगाव घेरा म्हणुन ओळखला जात असे. किल्ला नांदता असताना किल्ल्याच्या वाटेवर कल्याण मेट,कळकी मेट,अमरी मेट व सडकेचे मेट अशी चार मेटे होती. वाहनतळावर आल्यावर आपल्याला समोरच नजरेस पडतो तो खांदकडा व त्याच्या काठावर असलेली गडाची तटबंदी. येथुन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजुच्या कड्यात बुजत चाललेल्या दोन गुहा पहायला मिळतात. यातील एका गुहेत पाणी असुन हे ठिकाण सुरुंगाचे पाणी म्हणुन ओळखले जाते. पुणे दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करताना आपल्याला एका मागे एक असे तीन दरवाजे पार करावे लागतात. किल्ल्याचा पहिला दरवाजा दरीच्या काठावर दोन बुरुजात बांधलेला असुन या दरवाजावर झीज झालेली दोन शरभशिल्प पहायला मिळतात. या दरवाजातुन २०-२५ पायऱ्या चढुन गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या अलीकडे डाव्या बाजुच्या कड्यात पाण्याचे कोरीव टाके असुन या टाक्यातील पाणी वापरात नसल्याने शेवाळलेले आहे. येथुन मागे वळुन पाहिले असता डोंगर उतारावर पहिल्या दरवाजापर्यंत बांधत नेलेली किल्ल्याची तटबंदी असुन या तटबंदीत एक लहान दरवाजा दिसुन येतो. हा खांदकड्याचा भाग मुख्य किल्ल्यापासुन काहीसा वेगळा असुन तो स्वतंत्र तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. मुख्य किल्ल्यात जाण्यापुर्वी या लहान दरवाजाने आत शिरून खांद्कड्याचा हा भाग प्रथम पाहुन घ्यावा. खांद्कड्याचा हा भाग फारसा मोठा नसुन त्यावर बांधकामासाठी दगड काढल्याने निर्माण झालेली पाण्याची दोन मोठी कोरडी टाकी वगळता इतर कोणतेही अवशेष नाही. पण सुरक्षिततेच्या दृष्टीने हा संपुर्ण भाग तटबुरुजांनी बंदिस्त करण्यात आला आहे. खांद्कड्याच्या वरील बाजुस मुख्य किल्ल्याची एक सोंड आलेली असुन या भागावर लक्ष ठेवण्यासाठी सोंडेच्या टोकाशी मोठा बुरुज बांधुन बंदीस्त करण्यात आली आहे. उतारावर बांधत नेलेल्या या तटबंदीच्या वरील बाजुस अजुन एक लहान दरवाजा असुन त्यातुन कड्याच्या वरील भागात जाता येते. खांदकडा पाहुन झाल्यावर मागे फिरून दुसऱ्या दरवाजाने आत शिरावे. हा दरवाजा देखील दोन बुरुजात बांधलेला असुन त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती झाल्याने त्यावर कोणतीच शिल्प दिसुन येत नाहीत. दरवाजाच्या आतील बाजुस दरवाजावर तसेच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. येथुन थोड्याच अंतरावर पुन्हा दोन बुरुजात बांधलेला किल्ल्याचा तिसरा दरवाजा असुन त्यावर कोरलेले पानाचे तोरण व कमळाची नक्षी पहाता हा प्राचीन काळात बांधलेला हा गडाचा मूळ दरवाजा असावा. किल्ल्याचे तीनही दरवाजे एका बाजुस कडा तर दुसऱ्या बाजुस दरी अशा ठिकाणी बांधलेले आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या खोल्या असुन या दरवाजाने आत शिरल्यावर आपला गडात प्रवेश होतो. आत आल्यावर उजव्या बाजुस उतारावर तटबंदीशेजारी पुर्णपणे दगडात बांधलेली एक वास्तु पहायला मिळते. हि वास्तु म्हणजे दारूगोळा कोठार असुन आजही सुस्थितीत आहे. ११ सप्टेंबर १७५१ रोजी या कोठारावर वीज पडून मोठा स्फोट झाला होता. त्यावेळी येथे असलेले फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली होती. या कोठाराच्या व आसपासच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी नंतर ८७०० रुपये खर्च आला होता. ब्रिटिशांच्य काळात त्यांनी या इमारतीचे काही काळ चर्चमध्ये रुपांतर केले होते. कोठाराशेजारी तटातून पाणी वाहुन नेणारी नाळी असुन या नाळीत मंदिराचे कोरीव अवशेष दिसुन येतात. कोठार पाहुन मुळ वाटेवर येउन आपली पुढील गडफेरी सुरु करावी. वाटेच्या पुढील भागात डाव्या बाजुस घोड्याच्या पागा असे लिहिलेला फलक आहे. मुळात या पागा नसुन अर्धवट कोरलेले प्राचीन लेणे आहे. नंतरच्या काळात या जागेचा घोडे बांधण्यासाठी उपयोग केल्याने त्याला हे नाव पडले असावे. या लेण्यात खांब तसेच व्हरांडा कोरलेला असुन अर्धवट कोरल्याने पाणी जमा झालेली आठ पाण्याची टाकी पहायला मिळतात. लेण्याच्या बाहेरील भागात छप्पराला आधार देणारे खांब उभे करण्यासाठी खळगे कोरलेले आहेत. या लेण्याच्या अलीकडील भागात पाण्याचे एक टाके असुन पुढील भागात अर्धवट कोरलेली अजुन तीन लहान लेणी आहेत ज्यात पाणी जमा झाल्याने त्याचे टाक्यात रुपांतर झाले आहे. किल्ला पुर्णपणे पहायचा असल्यास सर्वप्रथम तटबंदीच्या काठावरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारावी व त्यानंतर मधील भागात असलेल्या वास्तु पहाव्यात. लेण्याकडून खांद्कड्याच्या दिशेने निघाल्यावर दूरदर्शन मनोऱ्याशेजारून आपण टोकावरील प्रशस्त बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाची बरीच पडझड झालेली असुन तो संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. या बुरुजावरून संपुर्ण खांदकडा परीसर व त्याखालील वाहनतळ नजरेस पडतो. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे आल्यावर उजव्या बाजुस किल्लेदाराचा वाडा असुन या वाड्याचा मागील दरवाजा नजरेस पडतो. या वाड्याची चारही बाजूची तटबंदी व त्यातील दोन कमानी आजही शिल्लक असुन या वाड्याशेजारी दोन घुमटी व दोन्ही घुमटीत हनुमानाची मुर्ती पहायला मिळते. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे आल्यावर दूरवर असलेल्या कल्याण दरवाजाचे दर्शन होते. येथुन पुढे आल्यावर डाव्या बाजुस कातळात कोरलेले पाण्याचे एक मोठे टाके असुन त्यापुढे उतारावर खडकात कोरलेली अजुन दोन टाकी आहेत. यातील मोठे टाके रामटाके म्हणुन ओळखले जाते. तटबंदीवरून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर उजवीकडे एक खांब टाके पहायला मिळते. खांब टाके पाहुन तटावर न जाता उजवीकडे आल्यास आपण गडावरील प्रसिद्ध अशा देवटाक्याजवळ पोहोचतो. या टाक्याच्या अलीकडे लहानशी घुमटी असुन त्यात पायाखाली पनवती असलेले मारुती शिल्प आहे. देवटाक्याचा उपयोग पुर्वी व आजही पिण्याच्या पाण्यासाठी होतो. हे पाणी वर्षभर उपलब्ध असते. देवटाक्यातील पाण्याची चव अप्रतिम असुन हे पाणी आपला सर्व थकवा दूर करते. देवटाके पाहुन झाल्यावर तटबंदीकडे लक्ष ठेवत कल्याण दरवाजाकडे निघावे.या वाटेवर कातळात कोरलेली पाण्याची दोन भुमिगत टाकी असुन त्यातील एका टाक्याजवळ दगडी ढोणी पडलेली आहे. येथुन तटबंदीकडे पाहिले असता त्यात पाणी वाहुन नेण्याकरिता बांधलेली नाळी दिसते. या नाळीची रचना दरवाजा प्रमाणे केली असुन तिचे बांधकाम खाली उतरून आवर्जुन पहावे असे आहे. येथुन तटावरून सरळ चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम भागात असलेल्या कल्याण उर्फ कोकण दरवाजाच्या बुरुजावर पोहोचतो. किल्ल्यावर प्रवेश करण्याचा हा दुसरा अधिकृत मार्ग आहे. कोंढणपूरमार्गे आल्यास आपला या दरवाजाने गडावर प्रवेश होतो. कल्याण/कोकण दरवाजा म्हणजे दोन दरवाजांची मालिका असुन हे दोन्ही दरवाजे दोन बुरुजांमध्ये बांधलेले आहेत. पहिल्या दरवाजातुन दुसऱ्या दरवाजात जाण्यासाठी २०-२५ पायऱ्यांचा उभा चढ असुन हा संपुर्ण भाग तटबंदीने बंदिस्त करून त्यात रणमंडळाची रचना केलेली आहे. पहिल्या दरवाजाच्या दर्शनी कमानीवर दोन कमलपुष्प असुन त्यावर असलेली तोरणमाळ भग्न झालेली आहे. दरवाजाच्या आतील तटबंदीमध्ये पहारेकऱ्यासाठी देवडी आहे. या दरवाजाच्या कमानीवर त्याचे बांधकाम अथवा दुरुस्ती नानासाहेब पेशवे यांच्या काळात झाल्याचे दर्शविणारा शिलालेख आहे. या शिलालेखात श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान अशी अक्षरे कोरलेली आहेत. दरवाजा शेजारील एका बुरुजावर वराह तर दुसऱ्या बुरुजावर हत्तीवर बसलेल्या माहुताचे उठावदार शिल्प कोरलेले आहे. या दरवाजाच्या आतील तटबंदीत सैनिकांची राहण्याची सोय केलेली आहे. या दरवाजाने आत आल्यावर सरळ जाणारी पायऱ्याची वाट आपल्याला किल्ल्यात नेते तर डावीकडील तटावरील वाट पुढील बुरुजावर नेते. आपण तटबंदीच्या काठाने फेरी मारत असल्याने तटावरील याच वाटेने पुढे जावे. किल्ल्याच्या या टोकाखाली एक डोंगरसोंड आल्याने बुरुज बांधुन हे टोक बंदिस्त करण्यात आले आहे. कल्याण दरवाजाच्या वाटेवर लक्ष ठेवणारा हा बुरूज टेहळणी बुरुज म्हणुन ओळखला जातो. बुरुजावरील शिबंदीला पाणीपुरवठा करण्यासाठी या बुरुजाच्या वरील बाजुस उतारावर पाण्याचे टाके कोरलेले आहे. या टाक्या शेजारून वर चढणारी वाट एका लहानशा टेकडावर जाते. या टेकडावर उदेभान राठोडच्या समाधीचा लहानसा चौथरा असुन झुडूपात लपलेले काही वास्तु अवशेष आहेत. टेकडाच्या पुढील बाजूने खाली उतरणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या झुंजार बुरुजावर आणुन सोडते. डोंगरसोंडेचा हा भाग पुढील डोंगर रांगेपासून वेगळा करण्यासाठी तासून त्याच्या टोकावर हा बुरुज बांधलेला आहे. या बुरुजाखाली असलेल्या सोंडेवर एका मोठ्या वास्तुचे व घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. सोंडेवरील हे मेट कळकी मेट म्हणुन ओळखले जाते. बुरुजावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या मातील गाडल्या गेल्या असुन त्यात अर्धवट गाडलेले शौचकुप पहायला मिळते. या बुरूजाजवळ कोरडे पडलेले पाण्याचे उथळ टाके आहे. येथुन पुढे आल्यावर किल्ल्याबाहेर जाण्यासाठी चोरवाट असुन या वाटेने खाली उतरल्यास हि वाट झुंजार बुरुजाखालील कळकी मेटावर जाते. पुढे तटबंदीबाहेर बांधलेला अजुन एक प्रशस्त बुरुज पहायला मिळतो. येथुन पुढे असणारा तटबंदीचा भाग म्हणजे डोणगिरी कडा पण आता हा भाग तानाजी कडा म्हणुन ओळखला जातो. या ठिकाणाहूनच ५०० मावळ्यांसह तानाजी मालुसरे गडावर चढले होते. या वाटेवरील पुढील बुरुज कलावंतीण बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजाच्या अलीकडे खाली उतरण्यासाठी चोरवाट असुन हि वाट पुर्वी तटाखाली असलेल्या अमरी मेटावर जाण्यासाठी वापरली जात असे. आता केवळ स्थानिकच या वाटेने खाली उतरतात. येथुन पुढे जाताना शेवाळाने भरलेला लहानसा तलाव असुन त्यापुढे एक बंगला पार केल्यावर तटबंदी शेजारी दरीच्या काठावर कातळात कोरलेली पाण्याची पाच भुमिगत टाकी आहेत. तटबंदी काठाने तसेच पुढे आल्यावर आपण कड्यालगत असलेल्या छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीजवळ पोहोचतो. समाधीच्या मागील बाजुस पाण्याचे मोठे टाके असुन त्याशेजारी वाड्याचा चौथरा व घराचे अवशेष आहेत. घडीव दगडात बांधलेले हे वास्तुचे जोते पहाता येथे कुण्या बड्या असामीचा वाडा असावा असे वाटते. समाधीच्या पुढील भागात देखील पाण्याची दोन मोठी टाकी पहायला मिळतात. राजस्थानी शैलीतील समाधी छत्रीसारखी हि वास्तु असुन या वास्तुच्या आतील बाजुस समाधी चौथरा आहे. या चौथऱ्याच्या मागील बाजुस गंडभेरुंड शिल्प असुन समाधी मंदिर उघडे असल्यास ते पहाता येते. मोगली फौजेशी ११ वर्षे झुंज देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० साली सिंहगडावर निधन झाले. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा पुत्र कोल्हापुर छत्रपती दुसरा याने इ.स.१७३१ मध्ये हि वास्तु बांधली. समाधीच्या वरील बाजुस वाटेवर एका लहानशा घुमटीत दास मारुतीची मुर्ती आहे. समाधी पाहुन बांधीव पायवाटेने आपण लोकमान्य टिळकांच्या बंगल्याजवळ पोहोचतो. बंगल्याच्या दर्शनी भागात आपल्यला लोकमान्य टिळकांचा पुतळा तसेच दोन तोफा पहायला मिळतात. इ.स.१८९० साली रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून हा बंगला लोकमान्य टिळक यांनी खरेदी केला. उन्हाळ्यात व सवड मिळाली कि ते येथे रहाण्यास येत असत. १९१५ साली लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची येथेच भेट झाली होती. बंगल्याशेजारी पडझड झालेल्या दुसरा बंगला असुन या बंगल्याच्या आवारात अजुन दोन तोफा आहेत. येथुन तटबंदीजवळ आले असता आपण सुरवातीस पाहीलेल्या दारूकोठारा समोरील बुरुजावर पोहोचतो. पायथ्याच्या कोंढणपुर-कल्याण गावादरम्यान असलेल्या मोरदरी गावात सापडलेली हि तोफ किल्ल्यावर आणुन या बुरुजावर एका गाड्यावर मांडलेली आहे. तोफेची लांबी साधारण ६ फुट असुन तोफेच्या मागील बाजुस गुमाभ हि मराठी अक्षरे व २४८ हे इंग्रजी अंक कोरलेले आहेत. या बुरुजाच्या पायऱ्यांनी खाली उतरल्यावर कोठाराकडे न जाता उजवीकडे वळावे. या वाटेवर पाण्याची जवळपास २०-२२ टाकी असुन त्यात चावीच्या आकाराची विहीर,खांबटाके, बांधीव टाके,भुमिगत टाके,कोरीव हौद असे निरनिराळे प्रकार आहेत. देखरेख नसल्याने यातील एकही टाक्याचे पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्याजवळच शेवटच्या घटका मोजत असलेले नृसिंहाचे उध्वस्त मंदिर आहे. येथुन पुढे आल्यावर तटावरची फेरी पुर्ण करून आपण घोडयाच्या पागा येथे पोहोचतो. येथे वाटेच्या दुसऱ्या बाजुस दगड काढल्याने निर्माण झालेले कोरडे टाके दिसते. आता बांधीव पायवाटेने आपली पुढील गडफेरी सुरु करावी. वाटेच्या डावीकडे लहानसे गणेश मंदिर असुन या मंदीरात गणपतीची तसेच हनुमानाची मुर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजुस पाण्याची दोन टाकी असुन यात एक खांबटाके आहे. गणपती मंदिरामुळे हे टाके गणेश टाके म्हणुन ओळखले जाते. पुढे उजव्या बाजुस समाधीचे काही दगड पडलेले असुन डाव्या बाजुस किल्लेदाराच्या वाड्याचा मुख्य दरवाजा आहे. वाटेच्या पुढील भागात डावीकडे चौथऱ्यावर तोफ मांडलेली आहे. येथे समोरच सुभेदार तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ आहे. या समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करण्यात आला असुन मूळ समाधी कायम ठेवुन त्यावर नव्याने मेघडंबरी बांधलेली आहे. या समाधीशेजारी एका चौथऱ्यावर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा धातूचा अर्धपुतळा बसवलेला आहे. समाधीच्या आसपास तीन विरगळ मांडलेल्या आहेत. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी येथे झालेल्या लढाईत सुभेदार तानाजी यांना वीरमरण आले. दरवर्षी माघ नवमीस येथे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. समाधी स्थळाच्या अलीकडे वर टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला कोंढणेश्वर मंदीराकडे घेऊन जातात. गडावरील हे प्राचीन स्थान असुन गर्भगृहाच्या झीज झालेल्या द्वारशाखा त्याची साक्ष देतात. मंदिराच्या आत शिवलिंग व गणेश मुर्ती असुन बाहेरील आवारात नंदी व दिपमाळ पहायला मिळते. मंदिराच्या मागील बाजुस असलेला उंचवटा हे गडावरील सर्वात उंच ठिकाण असुन येथे गडमाथा समुद्रसपाटीपासून ४३१४ फूट उंचावर आहे. या ठिकाणावरून जवळपास ७० एकरवर पसरलेला संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. वातावरण स्वच्छ असल्यास या ठिकाणावरून राजगड, तोरणा, पुरंदर, लोहगड, विसापूर, तुंग,तिकोना हे किल्ले नजरेस पडतात. कोंढणेश्वर मंदिर पाहुन खाली उतरल्यावर समाधीकडून पुढे जाणारी वाट आपल्याला अमृतेश्वर भैरव मंदीराजवळ घेऊन जाते. मंदिराभोवती प्राकाराची भिंत असुन या भिंतीतील दरवाजा आजही शिल्लक आहे. प्राकाराच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर जिर्णोद्धार केलेले भैरवाचे दक्षिणाभिमुख मंदिर आहे. या मंदीरात भैरव भवानीची मुर्ती असुन भैरवाच्या हाती नरमुंड आहे. भैरवाच्या मुकुटावर व दंडावर नागबंध असुन पायाशी नरमुंडाचे रक्त चाटणारा श्वान आहे. प्राकाराच्या दरवाजा समोर एक चौथरा असुन हा समाधी चौथरा कि नंदीमंडप याचा बोध होत नाही. मंदिराच्या पुढील भागात उजवीकडे हत्ती तलाव नावाचा मोठा बांधीव तलाव असुन त्यापुढे काही अंतरावर दुसरा खोदीव तलाव आहे. येथुन खाली उतरणारी वाट देवटाक्याकडे तर पठारावरून सरळ जाणारी वाट झुंजार बुरुजाच्या दिशेने जाते. या वाटेने थोडे पुढे आल्यावर डावीकडे शेंदूर फासलेले काही दगड पडलेले असुन या ठिकाणी कधीकाळी लक्ष्मी मंदिर होते. पठारावरील वाटेने थोडे पुढे आल्यावर डावीकडे उघडयावर कोरलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एक टाके चांगलेच मोठे तर दुसरे टाके मध्यम आकाराचे आहे. येथुन पुढील भाग आपण आधीच पहिला असल्याने मागे फिरून उलट वाटेने ( आलो त्या वाटेने नाही) आपल्या परतीच्या प्रवासास सुरवात करावी. गडाच्या आतील भागातुन जाणाऱ्या या वाटेवर आपल्याला अजुन दोन तलाव पहायला मिळतात. वाटेच्या पुढील भागात एका बांधीव चौथऱ्यावर लहानशी घुमटी असुन या घुमटीत सतीशिळा ( बांगड्या घातलेला हात) ठेवलेली आहे. या चौथऱ्याला लागुन घोड्यावर बसलेल्या वीराचे शिल्प ठेवलेले आहे. पर्यटक या अजाणतेणे या जागेस तानाजीचा हात म्हणुन संबोधतात. येथुन पुढे आल्यावर हि पायवाट दरवाजाकडे जाणाऱ्या मुख्य पायवाटेला मिळते. पुणे दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला डोळसपणे फिरण्यासाठी ५-६ तास लागतात. गडावर सद्यस्थितीत ६ तोफा आहेत. गडाला एकुण ३७ बुरुज असुन पाण्याची लहानमोठी ५० पेक्षा जास्त टाकी आहेत. सिंहगड किल्ल्याची नेमकी बांधणी कोणत्या काळात झाली हे ठामपणे सांगता येत नसले तरी कौंडीण्य ऋषींच्या नावावरून गडाला प्राप्त झालेले कौंडिण्यदुर्ग/कोंढाणा नाव व गडावरील कौंडिण्यश्वराचे प्राचीन देवालय पहाता याची निर्मीती प्राचीन काळात म्हणजे २००० वर्षापुर्वीच झाली असावी हे नक्की. गडावर घोड्याच्या पागा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या लेणी व असंख्य खांबटाकी याची साक्ष देतात. या किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख येतो तो चौदाव्या शतकात महम्मद तुघलकच्या काळात. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने दक्षिणेवर स्वारी केली तेव्हा इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. स. १३५०) महंमद तुघलकाने इ.स.१३२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या महादेव कोळी राजाच्या ताब्यात होता. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी महम्मद तुघलकास किल्ल्याला आठ महिने वेढा घालावा लागला. बहमनी काळात या किल्ल्याचे उल्लेख येत नसल्याने हा किल्ला बहुदा महादेव कोळी सामंताकडे असावा. बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर इ.स.१४८२ साली हा किल्ला निजामशाही संस्थापक मलिक अहमद यांच्या ताब्यात आला. इ.स. १५५३ मध्ये बुऱ्हाण निजामशहाच्या ताब्यात असलेल्या ५८ किल्ल्यांच्या यादीत कोंधाण्याचे नाव येते. इ.स. १५५४ मध्ये बुऱ्हाण निजामशहाच एक बंडखोर सरदार नसीर उल मुल्क कोंढाण्यावर कैदेत होता व किल्ल्यातुन पळ काढल्यावर तो मारला गेला. इ.स. १६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सिद्दी अन्वर किल्लेदार असताना मुघल व आदिलशाह यांच्या संयुक्त फौजांनी कोंढाणा जिंकला व गडावरचा खजीना ताब्यात घेतला. यावेळेस झालेल्या लढाईत कान्होजी बाजी शिळीमकर मारले गेले. शहाजीराजे माहुलीच्या वेढ्यात अडकले असता या वेढ्यास जाणारी रसद निजामशाही सरदार मुधाजी मायदे याने डोणजे खिंडीत लुटली यावेळी एक लाखाहुन अधिक किमतीचा ऐवज त्याच्या हाती आला. इ.स.१६३६ साली कोंढाणा शहाजीराजांच्या जहागिरीत असल्याने त्यांचे कुटुंब काही काळ गडावर वास्तव्यास होते. आदिलशाहीत (१६३६-१६४७) दादोजी कोंडदेव मलठणकर हे आदिलशहाकडून या प्रांताचे सुभेदार असल्याने कोंढाणा किल्ला त्यांच्या अख्तत्यारीत होता पण प्रत्यक्षात किल्ल्यावर सिद्दी अंबर वहाब हा किल्लेदार होता. इ. स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आदिलशहाने शिरवळचा ठाणेदार मिया रहीम महंमद याची कोंडाणा किल्ला व सुभ्यावर नेमणुक केली पण तो गडावर पोहोचण्याआधीच शिवाजी राजांच्या वतीने बापूजी मुद्दल नऱ्हेकर (देशपांडे) यांनी किल्लेदाराला वश करून गड ताब्यात घेतला. इ.स.१६४९ मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाला परत दिला. १३ ऑगस्ट १६५७ रोजी कोंढाणा परत स्वराज्यात सामील झाला व महाराजांनी गडाचे सिंहगड असे नामकरण केले. इतिहासकार श्री.ग. ह. खरे यांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रात १६६३ पुर्वी किल्ल्याचे नामकरण सिंहगड झाल्याचे दिसुन येते. ३ एप्रिल १६६३ च्या एका पत्रात गडावर फितवा म्हणजेच फितूरी झाली होती त्याची पहाणी करण्यासाठी गेलेल्या लोकांमध्ये तानाजी मालुसरे हे नाव आपल्याला दिसते. त्या पत्राचा मजकुर असा,” मसरूल हजरती, राजमान्य राजश्री श्रीमंत मोरोपंत पेशवे व राजश्री नीळसोंडे व मुजुमदार व तरी साहेदी कोकणात नामदार खानावरी जाण्याचा तह केला होता ऐसे याशी हाली किल्ले सिंहगडावरून समाचार आला आहे. की गडावर काही फितवा झाला आहे, याबद्दल तूर्त कोकणात जाण्याचा तह राहिला तरी तुम्ही लष्करी लोकानीशी व खास किली हासमानिशी कागद देखताच स्वार होऊन किल्ले सिंहगडास जाणे आणि किल्यावरच होशीयार खबरदार असणे फितवा कोण कोण लोकी केला होता हे खबर घेऊन हुजूर लिहून पाठविणे. मशरुल तानाजी नाईक व कोंढाजी नाईक व कमळोजी नाईक, दरेकर व उमाजी नाईक व गोंडाजी पांढरा हे ही बरोबरी घेऊन सिंहगडास जाऊन सिंहगडी अलोग अंगानी बहुत खबरदार असणे. जे लोक किल्ल्यावरी भेदात असतील ते ही आपल्या बरोबरीत लोक अलंगीत ठेवणे रवाणा चंद्र चार रमजान सण सल्ला सकेन परवाना हुजूर “ हे पत्र आहे २ एप्रिल १६६३ रोजी लिहीलेलं. याचा अर्थ १६६३ साली म्हणजे सिंहगडाच्या युद्धाच्या किमान ७ वर्षे आधी तरी कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड झाले होते. इ.स.१६६३ साली पुण्यातील लाल महालात मुक्कामास असलेला औरंगजेबचा मामा शाहिस्तेखान याच्यावर हल्ला करून परतताना शिवाजी महाराजांनी सिंहगडचा आश्रय घेतला. नोव्हेंबर १६६३ मध्ये मुघल सरदार जसवंतसिंह राठोड याने किल्ल्याला वेढा घातला पण मराठ्यांच्या सततच्या हल्ल्याने त्रस्त होऊन त्याने १४ एप्रिल १६६४ रोजी त्याने वेढा उठवला. ३० मे १६६४ रोजी महाराज स्वतः गडावर पहाणीसाठी आले. १ मे १६६५ रोजी दाउदखान या मुघल सरदाराने शिवापूरकडून किल्ल्यावर हल्ला चढवला. १४ जून १६६५ रोजी शिवाजीराजे आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यातील पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना देण्यात आल्यावर त्यांनी उदेभान राठोड या कडव्या राजपुताची तेथे किल्लेदार म्हणुन नेमणुक केली. २१ सप्टेम्बर १६६५ रोजी मिर्झाराजे जयसिंग गडावर मुक्कामास आले. आग्ऱ्याहून सुटून आल्यावर महाराजांनी काही काळ शांततेत घालवला व नंतर पुरंदरच्या तहात गमावलेले किल्ले परत घेण्यास सुरवात केली. यावेळी सिंहगड घेण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी उचलली. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री झालेल्या या युद्धात सुभेदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. १६७० साली झालेले सिंहगडचे युद्ध व तानाजी मालुसरे यांची सिंहगडाची शौर्यगाथा मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. संभाजी महाराजांच्या काळात मोरो भास्कर हे किल्ल्याचे कारखानीस होते. औरंगझेब २७ वर्ष मराठ्यांच्या विरोधात दक्षिणेत लढत असताना सिंहगडवर ८ वेळा मोगल-मराठे सत्तापालट झाल्याचे दिसुन येते. १६८४ साली मराठ्यांच्या ताब्यातील सिंहगड मोगलांनी जिंकला पण लगेचच म्हणजे १६८६ साली मराठ्यांनी तो पुन्हा जिंकून घेतला. १२ जुलै १६८९ रोजी संताजी घोरपडे यांनी वढू येथील औरंगजेबच्या छावणीवर हल्ला करून सिंहगडवर यशस्वी माघार घेतली. यावेळेस सिधोजी प्रतापराव गुजर किल्ल्याचे हवालदार होते. पण लवकरच किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६९२ मध्ये शंकराजी नारायण यांच्या सैन्यास गड घेण्यात अपयश आले. १ जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या मराठावीरांनी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. यासंबंधी इ. स. १६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव याने राजश्री काकाजी नारायण देशाधिकारी प्रांत मावळ, तालुके लोहगड यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. साताऱ्यावरील मोगलांच्या स्वारी दरम्यान छत्रपती राजारामांनी सिंहगडावर आश्रय घेतला पण ३ मार्च १७०० रोजी त्यांचे किल्ल्यावर निधन झाले. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी म्हणजे २७ डिसेंबर १७०२ रोजी औरंगजेबच्या सैन्याने गडाला वेढा घातला. गडावर तोफा डागण्यासाठी तर्बियतखान या मुघल सरदाराने धमधमे बांधण्यास सुरवात केली पण पुणे प्रांताचे सुभेदार बाळाजी विश्वनाथ भट व सेनापती धनाजी जाधव यांच्या सैन्याने त्यांच्या छावणीवर छापे घालुन त्यांना हैराण केले. या किल्ल्याबाबत साफी मुस्तैदखान लिहितो, किल्ला इतका अजेय आहे कि तो अल्लातालानेच मिळवुन द्यावा एरवी तो जिंकणे शक्य नाही. यावेळी गडाची जबाबदारी त्र्यंबक शिवदेव व सिधोजी जाधव यांच्यावर होती. त्यांनी दाद न दिल्याने शेवटी सोमाजी विश्वनाथ पुरंदरे यांच्या मदतीने राजकारण करून म्हणजे ५०००० रुपये लाच देऊन १४ एप्रिल १७०३ मध्ये औरंगजेबने सिंहगड ताब्यात घेतला व त्याचे नाव बक्षिदाबक्ष म्हणजे दैवी देणगी ठेवले. १८ एप्रिल रोजी औरंगजेब स्वतः पालखीत बसुन गड पहाण्यासाठी आला. औरंगजेब महाराष्ट्रातून वाकिणखेड्याला (गुलबर्गा ) वेढा घालण्यासाठी निघाल्यावर मराठ्यांनी एप्रिल १७०५ मध्ये सिंहगड जिंकून घेतला. यावेळी त्र्यंबक शिवदेव व रामजी फाटक यांनी गडावर हल्ला करून किल्लेदार देवीसिंह यांस कैद केले पण गड फार काळ मराठ्यांच्या ताब्यात राहिला नाही. इ.स. १७०६ मध्ये मुघल सरदार जुल्फिकारखान याने सिंहगड पुन्हा घेतला पण पुढील वर्षी म्हणजे १७०७ मध्ये मराठ्यांनी तो पुन्हा जिंकून घेतला. या युद्धात पंताजी शिवदेव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २७ वर्षात सिंहगडाची आठ वेळेला सत्तापालट झाली. यावरून मोगल आणि मराठे या किल्ल्यासाठी किती निकराने लढत होते याची कल्पना येते. पुढे छत्रपतींच्या सत्ता संघर्षात शंकराजी नारायण शाहु पक्षाला मिळाले व १७५० पर्यंत गड सचिवांच्या ताब्यात राहिला. यानंतर पेशव्यांनी तुंग-तिकोना किल्ले व शिरवळ प्रांत सचिवांना देऊन सिंहगड किल्ल्याचा ताबा घेतला. पेशवेकाळात संकटाच्या वेळी पेशव्यांचा खजिना व घरातील स्त्रियांना सुरक्षित ठेवण्यासाठी सिंहगड किल्ल्याचा वापर केला जात असे. ५ नोव्हेंबर १८१७ साली खडकीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाल्यावर ब्रिगेडीयर स्मिथच्या तुकडीतील कप्तान टर्नर याने सिंहगडावर हल्ला केला पण त्याला माघार घ्यावी लागली. येरवडा लढाई नंतर इंग्रजांनी पुणे घेतल्यावर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी आपला खजिना व मौल्यवान सामान सिंहगडावर हलविले. १८१८ मध्ये साताऱ्याहून ब्रिटिश फौजा सिंहगड परिसरात पोहचल्या आणि तहाच्या वाटाघाटी चालू झाल्या. २ मार्च १८१८ रोजी इंग्रज अधिकारी प्रिटझ्लर याने मोर्चे लावुन किल्ल्यावर ३६७८ तोफगोळे डागले व शिबंदीचा पाडाव करून सिंहगड किल्ला ताब्यात घेतला. यावेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा ५० लाखांचा खजिना मिळाला. पुढे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!