सावते कोट
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : पालघर
उंची : 0
श्रेणी : सोपी
उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. डहाणुजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला सावते कोट हा असाच एक लहानसा कोट. सावते कोट पहाण्यासाठी डहाणु हे जवळचे रेल्वे स्थानक असुन डहाणु- सावते कोट हे अंतर ७ कि.मी.आहे. सावते येथे जाण्यासाठी डहाणु रेल्वे स्थानकातून खाजगी रिक्षांची सोय आहे. सावते गावात स्थानिकांना कोटाच्या स्थानाची माहीती नसल्याने कोटाची माहीती सोबत ठेऊनच कोटाकडे प्रस्थान करावे. डहाणु येथुन चारोटीकडे जाणाऱ्या रस्त्याने खाडीकाठा शेजारून सावते गावात प्रवेश केल्यावर सुरवातीलाच डावीकडे जैन मंदीर दिसते. येथुन सरळ रस्त्याने सावरोली-सावते ग्रामपंचायत कार्यालयाजवळ यावे. या वाटेवर आपल्याला गावात असलेली जुन्या काळातील अनेक घरे व वाडे नजरेस पडतात. यात बहुतांशी पारशी व गुजराती समाजाची वस्ती आहे. ग्रामपंचायतजवळुन उजवीकडील रस्ता गावात जातो तर डावीकडील रस्ता खाडीच्या दिशेने जातो. ओळखण्याची खुण म्हणजे खाडीकडे जाणाऱ्या वाटेवर उजव्या बाजुस एक मशीद आहे. या वाटेच्या शेवटी बाबु महादु माची यांचे घर आहे.
...
या घरापासुन खाडीच्या दिशेने साधारण २० पाऊले चालत गेल्यावर उजवीकडील खाजणाच्या दलदलीत सावते कोटाचे अवशेष लपलेले आहेत. कोटाचे अवशेष म्हणजे ८ फुट रुंद १५ फुट लांब व ५ फुट उंचीची तटबंदीची भिंत आहे. या बांधकामात ओबडधोबड दगडांचा तसेच चुन्याचा वापर केलेला आहे. आजही भरतीचे पाणी या तटबंदीपर्यंत येत असल्याने या पाण्याने तटबंदी नष्ट झालेली आहे शिवाय कोटाचे दगड खाडीकडे जाणारा रस्ता बांधण्यासाठी वापरण्यात आले आहे. तटबंदीची भिंत वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. तटबंदीची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन तटबंदी पाहण्यास ५मिनिटे पुरेशी होतात. स्थानिक बाबु महादु माची वगळता इतर कोणालाही या वास्तुची माहिती नाही.पोर्तुगीज काळात या भागात सागाचे जंगल मोठ्या प्रमाणात होते व जहाज बांधणीसाठी या लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याची येथुन निर्यात होत असे. त्यासाठी येथे मोठमोठ्या लाकडाच्या वखारी बांधण्यात आल्या. या वखारींचे अवशेष आजही खाडी काठावर पहायला मिळतात. सागाची लाकडे येथे जमा करून त्याचे ओंडके बनवले जात. हे ओंडके लहान गलबतातून डहाणु खाडीत नेऊन मोठ्या गलबतात चढवले जात. हा व्यापार खुप मोठ्या प्रमाणात चालत असल्याने सावते गाव लाकडाची बाजारपेठ म्हणुन भरभराटीस आले होते. त्यामुळे पोर्तुगीजांनी या गावाच्या तसेच व्यापाराच्या रक्षणासाठी खाडीमुखावर सावते कोटाची निर्मीती केली होती. काळाच्या ओघात हा व्यापार ठप्प झाल्याने हे गाव व सावते कोट विस्मृतीत गेले. या टेहळणीवजा कोटाचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व गलबताना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar