सामानगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : कोल्हापुर

उंची : ३०२० फुट

श्रेणी : सोपी

कोल्हापूरच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्र सपाटीपासून २९७२ फूट उंचीवर किल्ले सामानगड उभा आहे विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा यासारख्या लढाऊ किल्ल्याच्या मध्यात हा किल्ला असल्याने इतर किल्ल्यांना पुरवली जाणारी रसद या किल्ल्यावर ठेवली जात असे. सैन्याची रसद, शस्त्रे व दारुगोळा येथे ठेवला जात असल्याने याचे नामकरण सामानगड झाल्याचे मानले जाते. शिवशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष असणारा हा किल्ला अनेक वर्ष उपेक्षित राहिला आहे. जेव्हा प्रतापराव बेहलोलखानवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले तेव्हा प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता. संकेश्वरनजीकच्या निडसोशी मठाचे संस्थापक आद्य शिवलिंगेश्वर महास्वामी यांचा जन्म या ठिकाणीच झाल्याची नोंद आहे. किल्ल्याचे असे ऐतिहासिक महत्त्व असतानाही या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तितका विकास झालेला नाही. ... सद्यस्थितीत किल्ल्यावर जाणारा रस्ता व विहिरीभोवती दगड-सिमेंटचे कठडे बांधण्याशिवाय इतर कोणतेही विकासाचे काम दिसत नाही. दुर्गवीर हि संस्था या गडाच्या संवर्धनासाठी झटत असुन त्यांनी गडावर केलेले काम अतिशय अभिमानास्पद आहे. सामानगड पहाण्यासाठी कोल्हापुर अथवा पुणे-बंगळुरू महामार्गावरील संकेश्वर येथुन जाणे सोयीचे आहे. कोल्हापुरहून गेल्यास गडहिंग्लज भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. सोबत खाजगी वाहन असल्यास थेट गडावर जाता येतो. या वाटेवर असलेला गडाचा मुख्य दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असून त्या ठिकाणी नव्याने कमान उभारण्यात आली आहे. सामानगडाचा कडा हा जांभा दगड प्रकारातील कातळ असुन बहुतांशी ठिकाणी तो तासुन काढलेला आहे. या तासलेला कड्याखाली या कातळाची त्या भागात असलेली उंची दर्शविणारे जांभ्या दगडातील स्तंभ पहायला मिळतात. किल्ल्यास १० ते १५ फुट उंचीची भक्कम तटबंदी असून टेहळणीसाठी झेंडा बुरूज, वेताळ बुरूज, शेंडा बुरूज,सोंड बुरुज असे लहान मोठे दहा बुरूज आहेत. सोबत वाहन असल्यास संपुर्ण किल्ला वाहनाने फिरता येतो व या सर्व बुरुजापर्यंत गाडी जाते. गडावर ठिकठिकाणी स्थान दर्शविणारे फलक असल्याने आपण निशाण बुरुजाकडील तटावर चढुन आपली गडफेरी सुरु करायची. इतर किल्ल्यांपेक्षा सामानगडाचे वेगळेपण म्हणजे किल्ल्यावर असलेल्या चौकोनी आकाराच्या व पायऱ्या असलेल्या प्रचंड मोठया खोल विहिरी. येथील विहिरी बाराव्या शतकातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना आहेत. गडावरील जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी व अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने न आढळणारी विहीर संकुले म्हणजे सामानगडाची खरीखुरी आभुषणे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या कातळकोरीव पायऱ्या त्यांच्या वरच्या बाजूच्या सुंदर कमानी, विहिरीतील भुयारे, पाण्याची कुंडे सारेच काही अप्रतिम आहे. तसेच जांभा दगडासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणातसुद्धा अशा विहिरी आढळत नाहीत. सामानगडावर अशा तीन विहिरी आहेत. विहिरींना बांधीव कठडा नसल्यामुळे लांबून त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. यापैकी सातकमान विहीर म्हणून ओळखली जाणारी विहीर वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमिनीत खूप खोल खोदलेल्या उभ्या आडव्या आणि परत उभ्या अशा तीन अजस्त्र तीन चरी आहेत. त्यापैकी उभ्या दोन चरीमधील अंतर सुमारे ६० फुट इतके आहे. चरींच्या प्रवेशद्वारावर सात भव्य कमानी आहेत म्हणून हिला सात कमानीची विहीर म्हणतात. विहिरीत उतरण्यासाठी पाय-या असुन पाय-यांवर सुंदर कमानी आहेत. पाय-या संपल्यावर भुयार लागते त्यापुढे पाणी लागते. यापुढे आपणास जाता येत नाही. या विहिरीभोवती प्रचंड झाडी असल्यामुळे आणि या झाडांच्या मुळांमुळे विहिरीच्या भिंतीला तडे गेलेले आहेत. गडावर जीर्णोद्धार केलेले अंबाबाई देवीचे मंदिर असुन या मंदिरापुढे झीज झालेल्या पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीत छोट्या कुंडासारखी आणखी एक चौकोनी विहीर आहे. तिसरी विहीर ' अंधार कोठडी ' या नावाने आज ओळखली जाते. येथून उजव्या बाजुने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो. चौकोनी आकाराच्या या विहिरीत उतरण्यासाठी पाय-या कोरलेल्या आहेत. मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर पहायला मिळतात. कमान बाव पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जायचे. या तटावरून जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणास दिसतात. तटाबाहेरील जागा किती प्रमाणात खोदली याची खोली प्रमाणित करण्यासाठी जागा खोदताना असे खांब सोडले जायचे. यापुढे आपणास चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडय़ा बुरूज लागतो. सोंडय़ा बुरुजासमोर मुगल टेकडी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी उभारली आहे अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये आहे. याशिवाय गडावर दोन बळद म्हणजेच जमिनीखालील कोठारे दिसुन येतात. गड पाहून झाल्यानंतर गडावरून सरळ जाणा-या डांबरी रस्त्याने १० मिनिटांत आपण मारुती मंदिराकडे पोहोचतो. या मंदिरासमोर काही अंतरावर जमीनीच्या पातळीत जांभ्या दगडात कोरलेली काही लेणी असुन त्यात एक शिवमंदिर आहे. या मंदिरात एक मोठे शिवलिंग असुन काही कमानीदार देवळ्या कोरल्या आहेत. येथुन डांबरी रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर आपणास भीमशाप्पांची समाधीकडे पोहोचतो. या ठिकाणी असलेल्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथे आपली दुर्गभ्रमंती पुर्ण होते. गड व आसपासचा परिसर पाहण्यास ३ ते ४ तास लागतात. गडाच्या पायथ्याशी असलेल्या चिंचेवाडी गावात रस्त्याशेजारी दोन भग्न तोफा पहायला मिळतात. १२ व्या शतकात राजा दुसरा भोज यांनी कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामानगड बांधला. इ.स.१६६७ मध्ये आदिलशाहीतुन हा गड स्वराज्यात दाखल झाला. इ.स. १६७६ दरम्यान हा सुभा अण्णाजी दत्तो यांच्याकडे असताना शिवरायांनी किल्ल्याची डागडुजी केली. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांनी या किल्ल्याला भेट देऊन काही काळ वास्तव्य केल्याची नोंद येते. यावेळी समर्थांनी शिवरायांच्या समक्ष पाषाण फोडून जिवंत बेडकी काढल्याची घटना याच किल्ल्यातील असल्याचे वर्णन समर्थ चरित्रात आढळते. इ.स. १६८८ मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला पण १७०१ मध्ये हा किल्ला मराठय़ांच्या ताब्यात असल्याचे दिसुन येते. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठय़ांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे आधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. करवीर संस्थानचे मंत्री दाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सामानगडाच्या गडकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले होते. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात गडाचा गडकरी मुंजाप्पा कदम शहीद झाला. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी जनरल डिलामोटे यांच्या नेतृत्वाखाली सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली. त्यानंतर सामानगडावरील मामलेदार कचेरी गडहिंग्लज येथे नेण्यात आली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!