सागरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : १३४० फुट

श्रेणी : मध्यम

मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून अलिबागची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिताना आरमाराची मुहुर्तमेढ रोवली तर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने मराठ्यांच्या आरमाराचा कळस रचला गेला. कान्होजी आंग्रेंनी केवळ कोकण किनारपट्टीचे रक्षणच केले नाही तर इंग्रज व पोर्तुगिजांची अनेक आक्रमणे परतवुन लावताना त्यांना मराठा आरमाराच्या सामर्थ्याची व पराक्रमाची चुणूक दाखवली. पराक्रमी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करणारा अलीबागजवळ असलेला असाच एक किल्ला म्हणजे खेडदुर्ग उर्फ सागरगड. अलीबागपासुन केवळ ८ कि.मी.अंतरावर असलेल्या या गडाने आंग्रे घराण्याचा केवळ चढता आलेखच पाहिला नाही तर आंग्रे वंशजांचे दुखद मृत्युही अनुभवले आहेत. केवळ नावात सागर असलेला हा किल्ला प्रत्यक्ष समुद्रापासुन १० कि.मी.अंतरावर असुन खंडाळे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ... गेटवे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने बोटीने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ९२ कि.मी. अंतरावर आहे. मुंबईहून अलिबागला जाताना कार्लेखिंड ओलांडल्यावर अलिबागच्या अलिकडे ५ किमी अंतरावर खंडाळे गाव लागते. या गावाच्या फाट्यावरून एक लहानसा पण पक्का रस्ता पवेळे गावात जातो. या गावाच्या पुर्व बाजुस आडवा पसरलेला डोंगर असुन या डोंगरामागे सागरगड लपलेला आहे. गावातुन एक कच्चा रस्ता सागरगडाच्या पायथ्याशी असलेल्या पठारावरील वाडीपर्यंत गेला आहे. पण सध्या या रस्त्याची फारच दुर्दशा झालेली असुन पावसाळा वगळता खाजगी वाहनाने या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पावसाळ्यात मात्र गाडी या गावातच ठेवावी लागते. या रस्त्याची सुधारणा झाल्यास गाडी थेट किल्ल्याखालील पठारावर जाईल व चालण्याचे एक तासाचे अंतर कमी होईल. पवळे गावातुन या डोंगराच्या पायथ्याशी जाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. या कच्च्या रस्त्याने चालत आपण किल्ल्याखालील पठारावर जाऊ शकतो किंवा या डोंगराच्या पायथ्याशी आल्यावर एका वळणावर मळलेली पायवाट या डोंगरावर जाताना दिसते. पठारावरील घळीत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात गावकऱ्यांची ये-जा असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. या वाटेने थोडे पुढे आल्यावर एक ओढा पार करून बांधीव पायऱ्याची वाट डोंगरावरील सिध्देश्वर मंदिरात जाते. या वाटेने जाताना पावसाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्याचे सुंदर दर्शन होते. पायथ्यापासुन अर्ध्या तासात आपण सिध्देश्वर मंदिरात पोहोचतो. कोकणी पद्धतीने बांधलेल्या या कौलारू मंदिराच्या आवारात काही विरगळ व कोरीव मुर्ती पहायला मिळतात. मंदिराचा परीसर अतिशय रमणीय असुन या परीसरात एक आश्रम व पाण्याची विहीर आहे. या आश्रमात आपली चहापाण्याची सोय होते. या मंदिराकडून खाली उतरणारा पाण्याचा प्रवाह म्हणजेच धोधाणे धबधबा आहे. मंदिराच्या अलीकडे डाव्या बाजुने पठारावरील वाडीत जाण्यासाठी वाट असुन या वाटेने अर्ध्या तासात आपण वाडीत व तेथुन पाउण तासात गडासमोर पोहोचतो. सागरवाडीतुन किल्ल्याकडे जाणारी वाट नीट समजुन घ्यावी तसेच वाटेतील दिशादर्शक बाण पहात जावे कारण या वाटेवर काही ठिकाणी ढोरवाटा असल्याने चुकण्याचा संभव आहे. गडावर जाताना वाटेत एक लहान बांधीव टाके व समाधीशिळा पहायला मिळते. पठाराच्या पुर्व टोकास आल्यावर पहिल्यांदा सागरगड व त्याच्या टोकाशी असलेल्या वांदरलिंगी सुळक्याचे दर्शन घडते. किल्ल्याचा डोंगर व सागरवाडीचे पठार एका निमुळत्या सोंडेने एकमेकांशी जोडलेले आहेत. येथुन किल्ल्यात जाण्यासाठी दोन वाटा असुन उजवीकडील वाट दरीकाठाने तटबंदीतुन किल्ल्यावर जाते तर डावीकडील वाट किल्ल्याच्या दरवाजातुन गडावर प्रवेश करते. सोंडेच्या टोकावरचा किल्ल्याचा उत्तराभिमुख मुख्य दरवाजा दोन बुरुजात बांधलेला आहे. आज हा दरवाजा पुर्णपणे ढासळलेला असून त्याशेजारील दोन्ही बुरुज मात्र शिल्लक आहेत. दरवाजासमोरील वाटेचा भाग दोन्ही बाजुस दगडांनी बांधुन काढलेला असुन दरवाजासमोर असलेल्या उंचवट्यावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असुन ८-१० बुरुजांच्या आधारे बांधलेला बालेकिल्ला त्यातील झाडीमुळे टोकावरील भाग वगळता फारसा फिरता येत नाही. दरवाजातुन आत शिरल्यावर आतील बाजुस असलेल्या बुरुजाचे व तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. आतील फरसबंद वाट जांभ्या दगडात बांधलेली असुन आसपास मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. या वाटेने थोडे पुडे आल्यावर एक लहान पायवाट डावीकडे झाडीत शिरताना दिसते. या लहान वाटेने र्थोडे पुढे आल्यावर आपण मोकळ्या जागेत दरीच्या काठावर येतो. या ठिकाणी गडाची दरवाजाच्या दिशेने असलेली तटबंदी पहायला मिळते. येथुन थोडे पुढे आल्यावर समोरच बालेकिल्ल्याची घडीव दगडात बांधलेली साधारण १० फुट उंच तटबंदी व त्यात असलेले दोन बुरुज पहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या काठाने तसेच पुढे आल्यावर या तटबंदीत असलेले अजून दोन बुरुज व त्याला लागून असलेला लहान कोरडा तलाव पहायला मिळतो. येथे जवळच बालेकिल्ल्याचा उध्वस्त दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या या तटाबुरुजावर मोठया प्रमाणात जंगल वाढलेले आहे. किल्ल्याचा हा भाग पाहुन पुन्हा बांधीव पायवाटेवर यावे व उजव्या बाजुच्या तटबंदीच्या काठाने आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. या तटबंदीत जाणवणारी महत्वाची गोष्ट म्हणजे तटबंदीचा खालील १०-१२ फुट उंचीचा भाग घडीव दगडात बांधलेला असुन त्यावर ५-६ फुट उंच रचीव दगडांची तटबंदी आहे. या तटबंदीत आपल्याला दरवाजासारखी ४ फुट उंच कमान पहायला मिळते. तटबंदीच्या या भागात दोन बुरुज असुन बाहेरील बाजुस साचपाण्याचा तलाव व मोकळे मैदान आहे. यातील दोन बुरुजांवर तोफांचा मारा करण्यासाठी झरोके आहेत. मुख्य दरवाजाने न आल्यास आपण याच तटबंदीतुन गडावर प्रवेश करतो. येथुन तटबंदीच्या काठाने पुढे जाताना काही उध्वस्त चौथरे पहायला मिळतात. पुढे दरीच्या काठावर घडीव दगडात बांधलेली पाण्याची तीन चौकोनी टाके असुन यातील पहील्या टाक्यात पाणी पडण्याच्या ठिकाणी विचित्र प्राण्याचे मुख कोरलेले आहे. पहिल्या दोन टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नसुन तिसऱ्या टाक्यात मात्र पाण्याचा जिवंत झरा असुन यातील पाणी गोमुखातून वर्षभर या टाक्यात पडत असते. या पाण्याची चव अतिशय सुंदर आहे. या टाक्याच्या डाव्या बाजुस असलेल्या उंचवट्यावर महादेवाचे मंदिर असुन मंदिरात शिवलिंग-नंदी तसेच गणपती व देवीची मुर्ती आहे. या मंदिरात ५-६ जणाची व बाहेरील मंडपात ५ जणांची रहाण्याची सोय होईल. मंदिराकडून समोर पहिले असता गडाचे दोन भागात पसरलेले प्रशस्त पठार दिसते. दर्शन घेऊन उजव्या बाजुने तटबंदीकडून आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करायची. या संपुर्ण पठारावरील तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. सतीचा माळ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गडाच्या उजवीकडील पठारावर एक समाधी चौथरा, इंग्रजांनी बांधलेल्या बंगल्याचे अवशेष व त्याजवळ एक कातळकोरीव कोरडे टाके तसेच काही घरांचे चौथरे नजरेस पडतात. सपाटीवर असलेले हे सर्व अवशेष सहजपणे दिसुन येतात. या दोन पठारांच्या मध्यावर तटबंदीच्या काठाला एका वास्तुचे जोते पहायला मिळते. वानरटोक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गडाच्या डावीकडील पठाराच्या टोकावरून समोरच वांदरलिंगी नावाचा सुळका पहायला मिळतो. या टोकावरून मागे फिरल्यावर दुसऱ्या बाजुने आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने जाताना मंदिराच्या उजवीकडे असलेल्या बालेकिल्ल्याच्या उंचवट्यावर भगवा ध्वज फडकताना दिसतो. पठारावरून पुढे जाताना तटबंदीच्या काठावर असलेले काही वास्तुचौथरे व त्यापुढे कोरडा पडलेला एक मोठा साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. तलावाच्या पुढील भागातील तटबंदी चांगलीच रुंद असुन त्यातील फांजीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या तटबंदीत असलेला गडाचा दुसरा दरवाजा आज पुर्णपणे ढासळलेला आहे. पोयनाडहून वाघोडे, नागझरी तसेच वडवली गावातून गडावर येणारी वाट याच दरवाजातुन वर येते पण या वाटा फारशा वापरात नाहीत. येथुन झाडीतुन वाट काढत थोडे पुढे गेल्यावर दारुगोळा कोठाराची इमारत पहायला मिळते. हि इमारत पाहुन मागे वळुन आधी पाहिलेल्या बालेकिल्ल्यावरील झेंड्याचा दिशेने निघावे. १० मिनिटात आपण कोसळलेल्या तटबंदीतुन बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. हा झेंडा बालेकिल्ल्याच्या बुरुजावर उभारलेला असुन येथे छत्राखाली शिवाजी महाराजांची मुर्ती स्थापन केलेली आहे. येथे किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची १३४८ फुट असुन ४० एकरवर हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या बुरुजावर मध्यम आकाराच्या चार फुटक्या तोफा पहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या आत या तटबंदीला लागुन एक चौबुर्जी कोट असुन या कोटात दोन दरवाजे असलेला चौसोपी वाडा आहे. या वाडयाच्या आतील बाजुस एक अर्धवट बुजलेली विहीर आहे. कोटाला लागुनच सदरेचे अवशेष पहायला मिळतात. गडावरून अलिबाग थळचा समुद्रकिनारा, धरमतरची- चौलची खाडी,खांदेरी-उंदेरी, कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड किल्ले इतका दूरवरचा प्रदेश सहज न्याहाळता येतो. संपुर्ण गडफेरी करण्यास तीन तास पुरेसे होतात. गडावरील मंदिराशिवाय सिध्देश्वर मंदिर किंवा सागरगड माचीवरील शाळेत देखील रहाण्याची सोय होईल. चौल-धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बहामनी अथवा निजामशाहीच्या काळात बांधला गेला असावा. खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती होईपर्यंत या भागातील किनारपट्टीवर सागरगडाचेच वर्चस्व होते. या किल्ल्याचा कागदोपत्री सर्वप्रथम उल्लेख निजामशाहीकाळात येतो. इ.स.१५२४ मध्ये पोर्तुगीज कप्तान सोज याने चौल भागात वखार बांधण्यास परवानगी मागितली असता या भागात फत्तेखान हा अंमलदार तर हैदरखान हा खेडदुर्गचा किल्लेदार होता. निजामशाहीच्या अस्तानंतर इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला चौल प्रांत ताब्यात घेताना खेडदुर्ग दोरोजी यांनी जिंकून घेतला. नंतरच्या काळात महाराजांनी इंग्रज व सिद्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी या किल्ल्याच्या परीसरात खेसगड, मांडवेगड हे गढीवजा किल्ले तर खांदेरी हा जलदुर्ग बांधला. इ.स.१६६५ मधील पुरंदरच्या तहात महाराजांनी मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यात या किल्ल्याचा सामावेश होता. इ.स. १६७० ते १६७२ दरम्यान हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला व खेडदुर्गचे सागरगड नामकरण झाले. १८ ऑक्टोबर १६७९ मधील खांदेरी युद्धात इंग्रज कप्तान फ्रान्सिस मौलीव्हेअर व इतर २५ सैनिकांना सागरगडचा बंदीवास नशीबी आला. संभाजीराजांच्या अटकेनंतर सागरगडचा किल्लेदार मानकोजी सुर्यवंशी प्रबळगडाच्या आश्रयास गेल्याने सिद्दीने सागरगडचा ताबा घेतला. इ.स.१६९५ साली कान्होजी आंग्रे यांनी सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला. छत्रपती शाहु व ताराराणी यांच्या गादीवारसाच्या भांडणात सुरवातीस कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजुस असताना मुंबई ते सावंतवाडीपर्यंतचा किनारी प्रदेश, राजमाचीचा किल्ला व कल्याण भिवंडी परगणा त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी कान्होजी आंग्रेना शाहू महाराजांच्या पक्षात आणल्यावर त्यांना दिलेल्या १३ किल्ल्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. याच दरम्यान सिद्दीसात याने रेवस बंदराकडून सागरगडवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कामार्ले तर्फ श्रीगांव येथें झालेल्या लढाईत मानाजीकडून सिद्दीसात मारला गेला. यानंतर आंग्रे कुटुंबात गृहकलह सुरु झाला. मानाजी व येसाजी आंग्रे यांच्या भांडणात पोर्तुगीजांनी मानाजीला सहाय्य केल्याने येसाजीचा पराभव झाला व सागरगड त्याच्या ताब्यात आला. मानाजी आंग्रे याने येसाजी आंग्रे याचा सागरगडावरून कडेलोट केला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजीकडून जिंकून घेतला. पुढे येसाजी आंग्रेचा मुलगा जयसिंह आंग्रे याने इ.स. १८०७ मध्ये रामजी आंग्रेचाही सागरगडावरून कडेलोट केला. आंग्रे कुळाच्या भाऊबंदकीत हा किल्ला रक्ताने न्हाऊन निघाला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला निसर्ग व हवामान आवडल्याने जनरल फूलर व लेसटोक रीड या इंग्रज अधिकाऱ्यांनी येथे बंगले बांधले होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!