साखरपा-पुर्ये
प्रकार : भुईकोट
जिल्हा : रत्नागिरी
उंची : 0
श्रेणी : सोपी
अलीकडे समाज माध्यमातुन साखरपा येथील पुर्ये गावाजवळ गड व काजळी नदीच्या संगमावर काही बुरुजासारखे अवशेष असल्याचे वाचनात आले होते. काही कामानिमित्त रत्नागिरी येथे जाण्याचा योग आला व या ठिकाणाला अचानक भेट देण्याची संधी मिळाली. या भेटीत मला जे दिसले,जाणवले ते मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. साखरपा गावातील गड व काजळी नदीच्या संगमावर हे अवशेष असल्याचे वाचनात आले होते पण बरीच शोधाशोध करून या ठिकाणी काहीच दिसले नाही. मुळात हे अवशेष नदी संगमावर नसुन संगम झाल्यावर नदीपात्र मोठे होऊन पुढे जाते. संगमापासुन पुढे २०० मीटरवर हे पात्र दुभंगलेले आहे. दुभंगलेल्या या पात्रामुळे येथे एक बेट(जुवे) तयार झाले आहे. या बेटाच्या सुरवातीलाच आपल्याला हे अवशेष पहायला मिळतात. हे अवशेष पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम साखरपा गाठावे लागते. साखरपा गावात प्रवेश केल्यावर लगेचच एक रस्ता उजवीकडे नदी पुलावरून पुर्ये गावात जातो.
...
या रस्त्याने थोडे पुढे आल्यावर गावात न जाता या गावातील नदीकाठी असलेल्या भवानी मंदिराकडे जावे. या मंदिराच्या खालील बाजुस नदीपात्रात असलेल्या बेटावरच हे अवशेष आहेत. अवशेष म्हणजे काही घडीव दगड येथे विखुरलेले असुन काही दगड चौथऱ्यामध्ये गुंफलेले आहे. या चौथऱ्याशेजारी पादुका कोरलेला एक समाधी दगड आहे. या वास्तुचे नदीपात्रातील स्थान व येथे असलेले अवशेष पहाता हा बुरुज आहे हे ठामपणे सांगता येत नाही. फारतर हि एखादी समाधी असू शकेल? या व्यतिरिक्त येथे कोणतेही अवशेष नाहीत. पण आपली हि फेरी व्यर्थ गेली असे म्हणता येणार नाही कारण आपण आलो तेथील अस्सल कोकणी बाजातील शिवकालीन भवानी मंदिर आवर्जून पाहावे असे आहे. मंदिरासमोर दीपमाळ असुन मंदिरात काळ्या पाषाणात घडवलेली महिषासुरमर्दिनीची अतिशय देखणी मुर्ती आहे. दशभुजा असलेल्या या मुर्तीच्या दहा हातांमध्ये दहा वेगवेगळी शस्त्रे आहेत. साखरपा भेटीत हि मुर्ती आवर्जून पहावी अशीच आहे. इतिहासात साखरपा गावात कोट असल्याचे उल्लेख येतात. १५ व्या शतकात २ रा इब्राहीम आदिलशहा याच्या काळात हा कोट बांधला गेला पण आज साखरपा गावात कोटाचे वा इतर कोणतेही ऐतिहासिक अवशेष दिसुन येत नाहीत.
© Suresh Nimbalkar