साखरगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सातारा
उंची : २८३० फुट
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील अनेक डोंगरांना गड हि संज्ञा लोकांकडुन दिली गेली आहे. मुळात गड म्हणजे किल्ला अथवा डोंगरावर लष्करी ठाणे असलेले ठिकाण पण असे न घडता काही ठिकाणांना सरसकट गड म्हणुनच संबोधले जाते. यात खासकरून देवतांची मंदीरे असलेली ठिकाणे येतात. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात किन्हई गावाजवळ साखरगड हे अंबाबाई देवीचे प्रसिद्ध देवस्थान आहे. दुर्गप्रेमींनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हा कोणत्याही प्रकारचा गड अथवा किल्ला नसुन पंतप्रतिनिधींच्या काळात बांधलेले अंबाबाई/यमाई देवीचे मंदीर असलेले ठिकाण आहे. आपल्या भक्तासाठी आई यमाई औंधातून येउन किन्हईच्या साखरगडावर विराजमान झाल्याची कथा या मंदिराबाबत सांगीतली जाते. मंदिर एका उंच टेकडीवर तटबंदीच्या आत बांधलेले असुन हा डोंगर पुर्वीपासून साखरगड नावाने ओळखला जातो. कोरेगाव या तालुक्याच्या ठिकाणापासुन साखरगड हे अंतर १४ कि.मी.असुन खाजगी वाहनाने थेट मंदीर असलेल्या टेकडीच्या पठारावर जाता येते. पठारावरून मंदिर साधारण ५०फुट उंचावर असुन मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत.
...
या शिवाय डोंगराच्या पायथ्याहून मंदीरात येण्यासाठी जुना पायरीमार्ग आहे. या वाटेने गड चढण्यास अर्धा तास पुरेसा होतो. मंदिराच्या दरवाजाची बांधणी एखाद्या किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे दोन बुरुजात केलेली असुन दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना आहे. या शिवाय मंदीराच्या मागील बाजुस दुसरा लहान दरवाजा आहे. संपुर्ण मंदीर दगडी बांधणीतील असुन मंदीराचे गर्भगृह व दगडी सभामंडप असे दोन भाग आहेत. या सभामंडपाच्या दर्शनी भागात अनेक शिल्प कोरलेली आहे. दगडी सभामंडपाच्या बाहेरील बाजुस लाकडी खांबावर तोललेला दुसरा सभामंडप आहे. मंदिराच्या आवारात तीन सुंदर दिपमाळ आहेत. यातील एक दिपमाळ आवर्जुन पहावी इतकी सुंदर आहे. मंदीराच्या आवारात पाण्याची कोणतीही सोय दिसुन येत नाही. या भागातील हा उंच डोंगर असल्याने येथुन कल्याणगड, जरंडेश्वर, वर्धनगड इथपर्यंतचा परिसर नजरेस पडतो. पठारावरून मंदीर पाहुन परत जाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
टीप – हे केवळ देवीचे मंदीर असलेले ठिकाण असुन याला किल्ला म्हणुन संबोधणे योग्य नाही.
© Suresh Nimbalkar