साखरखेर्डा

प्रकार : गढी

जिल्हा : बुलढाणा

उंची : 0

श्रेणी : सोपी

बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा नावाचे अपरीचीत गाव आहे. आज हे गाव विस्मरणात गेले असले तरी इ.स.१७२४ साली इतिहासाला कलाटणी देत राज्याचा नकाशा बदलणारी एक महत्वाची घटना या गावात घडली आहे. इतिहासात हि घटना साखरखेर्ड्याची लढाई म्हणुन प्रसिध्द आहे. या लढाईमुळे मुघलांचे दक्षिणेतील वर्चस्व कायमचे संपले आणि मराठे व निजाम या दोन प्रबळ सत्ता म्हणून उदयास आल्या. साखरखेर्ड्याची लढाई हे प्रकरण अनेकदा माझ्या वाचनात आले होते पण येथे एखादी ऐतिहासिक गढी अथवा कोट असल्याचे कधीही व कोठेही वाचनात आले नव्हते. पण ज्याअर्थी इथे इतकी महत्वाची लढाई झाली म्हणजे तेथे एखादे संरक्षण ठाणे असावे हे ध्यानात घेत आम्ही सिंदखेडराजा परीसराची भटकंती करताना साखरखेर्डा गावास भेट दिली व येथे शेवटच्या घटका मोजत असलेली गढी आम्हाला पहायला मिळाली. ... साखरखेर्डा गाव सिंदखेडराजा या तालुक्याच्या ठिकाणापासुन ४७ कि.मी.अंतरावर तर मेहकर पासुन २२.कि. मी.अंतरावर आहे. गावात प्रवेश करतानाच रस्त्याशेजारी असलेल्या एका लहानश्या उंचवट्यावर या गढीचे अवशेष आपल्याला पहायला मिळतात. गढीचे अवशेष म्हणजे टोकावरील दोन बुरुज,या बुरुजामध्ये असलेली तटबंदी, दरवाजाची अर्धवट ढासळलेली कमान व या कमानी शेजारी असलेला बुरुज. चौकोनी आकाराची हि गढी साधारण दीड एकरमध्ये पसरलेली असुन सध्या या गढीचा वापर गावची हगणदारी म्हणुन होत आहे. हि हगणदारी बंद व्हावी यासाठी गढीच्या मध्यभागी नव्याने ग्रामपंचायत कार्यालय बांधले असुन लोक त्याला देखील दाद देत नसल्याने हे कार्यालय दुसरीकडे नेण्याची वेळ आली आहे. गढीच्या बांधकामातील दगड लोकांनी काढुन नेल्याने केवळ मातीच्या भिंती व तीन बुरुज शिल्लक आहेत. गावातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम करताना चौथा बुरुज भुईसपाट करण्यात आला आहे. गढीच्या पुर्वाभिमुख दरवाजाच्या कमानीचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. नाकाला रुमाल बांधुन प्रत्येक पाउल सावधगीरीने टाकत ५ मिनिटात गढीची अंतर्गत फेरी आटोपती घ्यावी लागते. गढीच्या बाहेरी बाजुने फेरी मारण्यास १५ मिनिटे पुरेसी होतात. दिल्लीतील अंदाधुंदीमुळे बादशहा फरुखसियरने दक्षिणेचा सुभेदार मीर क़मरुद्दीन म्हणजेच निजामाला उत्तरेत बोलावून १३ फेब्रुवारी १७२२ मध्ये त्याला वजीरी दिली पण निजामाला स्वतंत्र राज्याचे वेध लागल्याने त्याचे मन दिल्लीत रमत नव्हते. इ.स.१७२३ मध्ये त्याने बादशहाकडून दख्खन सुभ्यांवरती आपली नेमणूक करुन घेतली व तो औरंगाबादेस निघाला. निजाम दक्षिणेत का जातो आहे हे उघड होतं. निजाम दिल्लीतून निघताच बादशहाने आधीच हैदराबादेतील मुबारीजखान या सरदाराला दख्खनचे सुभे बहाल केले. ह्यामुळे दख्खनमध्ये जम बसविण्यासाठी निजामाला मराठ्यांची मदत हवी होती त्यासाठी त्याने मराठयांशी संधान साधले. १३ फेब्रुवारी १७२३रोजी माळव्यात बदकशा येथे निजामाची बाजीरावांशी भेट झाली. निजाम दख्खनमध्ये येतोय हे कळताच मुबारीजखानही मराठ्यांना आपल्याबाजूला वळवायचा प्रयत्न करत होता. या अंदाधुंदीचा फायदा शाहू राजांनी व बाजीरावांनी जो मराठ्यांच्या मागण्या मान्य करेल त्याच्या बरोबर जायचे ठरवले. शाहू राजांनी आपल्या सरदारांना कुठल्याही बाजूने युध्दात भाग घ्यायला सज्ज रहा अशा आशयाची पत्रे पाठवली. अखेर १८ मे १७२४ मधे माळव्यातील नालछा येथे बाजीराव आणि निजाम यांची परत भेट झाली. निजामाने मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्याने बाजीरावांनी त्याला १० हजार सैन्याची मदत करत स्वत: बाजीराव या लढाईत सामील झाले. ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर १७२४ असे दोन दिवस मीर क़मरुद्दीन म्हणजेच निजाम उल मुल्क व मुघल सरदार मुबारीझखान यांच्यात चाललेल्या या लढाईत निजामाचा विजय झाला. या लढाईत बाजीरावांच्या पराक्रमावर खुश होऊन निजामाने त्यांना अनेक मौल्यवान वस्तु, हत्ती, सप्तहजारी मनसब देऊ केली. येथे मिळालेल्या विजयाचे प्रतिक म्हणुन निजामाने साखरखेर्डा गावाचे नाव बदलुन फत्तेखेर्डा ठेवले पण हे नाव फारसे रुळले नाही व साखरखेर्डा हे नाव कायम राहिले. निजामाने मुबारीजखानाचे डोके चांदीच्या तबकात घालून बादशहाला पाठवले व आपला दख्खन सुभ्यावरचा हक्क मान्य करून घेतला. या लढाईमुळे विजापूर, हैदराबाद,वऱ्हाड, औरंगाबाद, बिदर, व खानदेश असे सहा सुभे निजामाच्या ताब्यात आले व या सहा सुभ्यांचे रुपांतर हैद्राबादच्या निजामशाहीत झाले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!