सांगोला

प्रकार : नगरकोट

जिल्हा : सोलापुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

सोलापूरपासुन ८२ कि.मी व पंढरपूरपासुन ३१कि.मी.अंतरावर वर सांगोला हे तालुक्याचे ठिकाण वसले आहे. मध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक आहे. मध्ययुगीन कालखंडात सांगोला हे भरभराटीला आलेले शहर होते व त्याची ख्याती सोन्याचे सांगोला अशी होती. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यात शहराचे अतोनात नुकसान झाले व किल्ला पुर्णपणे बेचिराख झाला. आज किल्ला प्रत्यक्षात अस्तित्वात नसुन केवळ वास्तूंच्या आधारे किल्ल्याची स्थाननिश्चिती करावी लागते. जुन्या कागदपत्रातील वर्णनानुसार सांगोला शहराभोवती असणारी तटबंदी म्हणजेच नगरकोट व शहराच्या मध्यभागी असणाऱ्या छोट्याशा टेकडीवर असणारी तटबंदी म्हणजेच बालेकिल्ला अशी याची रचना होती. ... वाढत जाणाऱ्या सांगोला शहरामुळे नगरकोट व त्याच्या खाणाखुणा पुर्णपणे नामशेष झाल्या असुन मध्ययुगीन कालखंडाशी नाते सांगणारी केवळ एक पायऱ्या, कमान व ओवरी असणारी बारव मोरया गल्लीत दिसुन येते तसेच शिवाजी चौकासमोर असणाऱ्या मंडईत वेशीच्या दरवाजाशेजारी तटबंदीची भिंत काही प्रमाणात दिसते. नगरकोटच्या इतक्याच खाणाखुणा असुन त्याही शोधाव्या लागतात. त्यामानाने बालेकिल्ल्याचे अवशेष थोडेफार दिसुन येतात. शिवाजी चौकातून समोरील उंचवट्यावर जाताना उजव्या बाजुला शेवटची घटका मोजत असणारा किल्ल्याच्या तटबंदीतील एकमेव अवशेष असणारा सहा फुट उंचीचा ढासळलेला बुरूज नजरेस पडतो. या बुरुजाच्या पुढे काही अंतरावर सहा फुट उंचीच्या चौथऱ्यावर उभारलेली जुनी दगडी मस्जिद दिसुन येते. या चौथऱ्याखालील भागात दोन ओवऱ्या असुन एक कोठारवजा खोली दिसुन येते. हा भाग मस्जिदच्या ताब्यात असल्याने आत जाता येत नाही. या चौथऱ्यासमोरच चुना मळण्याचे दगडी चाक दिसुन येते पण घाणा दिसत नाही. काळाच्या ओघात तो नष्ट झाला असावा. याच्या पुढील भागात ब्रिटीशकालीन कोर्टाची इमारत असुन या इमारतीच्या मागील बाजुस किल्ल्याची गडदेवता म्हणजेच क्षेत्रपाल म्हसोबाचे देऊळ आहे. देवळाकडून वाटेने सरळ गेल्यावर उजव्या बाजुला बालेकिल्ल्यास पाणीपुरवठा करणारी पायऱ्यांची चौकोनी बारव आहे. या बारवमध्ये उतरणाऱ्या पायऱ्यांच्या शेवटी एक कमान असलेला दरवाजा आहे. विहिरीच्या खालील बाजुला उजवीकडे नरसिंहाचे छोटेसे घुमटीवजा लाल रंगात रंगविलेले मंदिर आहे. बालेकिल्ल्याचे आजमितीस इतकेच अवशेष शिल्लक असुन नगरकोटचे व बालेकिल्ल्याचे सर्व अवशेष पहाण्यास एक तास पुरेसा होतो. सांगोला किल्ला आदिलशाही काळात (१४८९–१६८६) बांधला गेला असून गडावरील मशीद त्याच काळात बांधली गेली आहे. तत्कालीन कागदपत्रानुसार सांगोला एक भरभराटीचे शहर असुन त्याची ख्याती सोन्याचे सांगोला अशी होती. इ.स.१६८६ मध्ये आदिलशाही नष्ट केल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला व १७०७मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंमहाराज यांच्या अखत्यारीत हे शहर आले. छत्रपती शाहूंनी केलेल्या सनदेनुसार राज्याचा कारभार पेशवे बाळाजी बाजीराव यांच्याकडे आला. त्यानंतर १७५० मध्ये महाराणी ताराबाईंच्या यमाजी शिवदेव नावाच्या सेवकाने सांगोल्याचा किल्ला हस्तगत करून बाळाजीं पेशवे यांच्याविरूद्घ बंड पुकारले पण सदाशिवराव भाऊनी हे बंड उखडुन सांगोल्यावर पुन्हा पेशव्यांची सत्ता स्थापन केली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत (१७९५–१८१८) होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते पुर्णपणे उद्ध्वस्त केले. पेशवाईच्या अस्तानंतर सांगोला इंग्रजी अंमलाखाली आले व सांगोला येथे संपुर्ण महाराष्ट्रातील दुसरी नगरपालिका स्थापन झाली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!