सरसगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : १२५० फुट

श्रेणी : मध्यम

सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावानी ओळखला जाणारा हा गिरीदुर्ग रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे पाली या गावाच्या पूर्वेस आहे. सरसगडाच्या भौगोलिक रचनेमुळे याचा उपयोग कोकण प्रदेशावर आणि त्यातल्या सवाष्णी घाटावर देखरेखीसाठी होत असावा. सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पाली हे गाव अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीसाठी प्रसिध्द आहे. पालीमधील गणपती हा बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो. अष्टविनायकांची यात्रा करणारे भावीक दर्शनासाठी नेहेमीच पालीला येतात. भाविकांची संख्या जरी मोठी असली तरी त्यातील अनेकांना सरसगडाची पुसटशीही ओळख नसते. सह्याद्रीचा घाटमाथा आणि मुंबई-पणजी महामार्ग याच्यामधे पाली गाव आहे. आजूबाजूच्या महत्त्वांच्या गावांशी गाडीमार्गाने पाली जोडलेले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खोपोली येथून पालीला जाता येते. ... तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे येथूनही पालीला येता येते. पाली गावाला लगूनच असलेला सरसगड त्याच्या कातळमाथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे समुद्र सपाटीपासून ४४४ मीटर उंचीच्या सरसगडावर जाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंनी मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते. तर गणपती मंदिराजवळून म्हणजे देउळवाडय़ाकडुन जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे. एका वाटेने चढून दुसऱ्या वाटेने उतरणे ही सोयीचे आहे. देउळवाडा वाटेने चढाईला सुरवात केल्यावर डावीकडे पाली गावाचा परिसर पहायला मिळतो तर उजवीकडे असलेले कावडीचा डोंगर हे तीन सुळके आपले लक्ष वेधून घेतात. गडावर जाण्यासाठी आजमात्र ‘दिंडी’ दरवाजाची ही एकच वाट वापरात आहे. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. या पाय-या चढण्यापूर्वी डाव्या बाजूला एक भुयार दिसतं. हे भुयार प्रबळगडाच्या भुयाराशी साधर्म्य दाखवत. या भुयारावरून या गडाची निर्मिती हजारो वर्षापूर्वी झाल्याचा अंदाज लावता येतो. ही पायवाट सरसगडाला असलेले एका घळीतून वर जाते. या वाटेवर कातळात केलेल्या पायऱ्या आहेत. या ९६ पायऱ्या चांगल्या गुढगाभर उंचीच्या असुन चढाईचा चांगलाच कस काढणाऱ्या आहेत. या पायऱ्यामुळे आपण धापा टाकीतच वर मुख्य दरवाजावर पोहोचतो. या दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायऱ्यावर चढाव्यात म्हनजे तटबंदी दिसते. दरवाज्यतून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्यचा हौद लागतो. पुढे एक भुयारी मार्ग लागतो. सध्या हा मार्ग मातीने पुर्णपणे भरून गेल्याने अस्तित्वात नाही. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. जर आपण उजवीकडे गेलो तर १५ पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पायथा लागतो. बालेकिल्ल्याचा पायथा समोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे बारामाही पाणी असते. हौदाच्या डाव्या बाजूस एक थडगे आहे. त्याच्या जवळूनच पुन्हा पाण्याची तळी आहेत. जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते. हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे, शस्त्रागरे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो. बालेकिल्ल्याच्या वाटोळ्या सुळक्याभोवती आपल्याला चक्कर मारता येते. आपण बालेकिल्ल्याकडे निघाल्यावर त्याच्या तळाला अनेक ठिकाणी कोरुन काढलेला भाग दिसतो. या कोरलेल्या भागात पाण्याची टाकी, गुहा, काही कोठ्या आहेत तसेच तालीम आहे. महाभारतकालात या गुहांमधे पांडवानी केला होता अशा काही कथा या गुहाबाबत सांगितल्या जातात. जेव्हा एखादया किल्ल्याचा संबध असा पुराणातील कथाशी जोडला जातो तेवा समजावे कि ही वास्तु प्राचीन आहे. या गुहांबरोबर दोन-तीन पाण्याची टाकी सुद्धा आढळतात. काही टाक्यांमध्ये निरखून पहिले असता आत मध्ये खांब असल्याचे जाणवतात. एक गुहा अतिशय मोठी असून तिचे प्रयोजन नक्की काय असावे असा प्रश्न पडतो. या गुहेचे आतून तीन भाग पाडले आहेत. या बाजूने अजून थोडे पुढे गेल्यावर गडाची उत्तरेची बाजू येते. येथे एक चोर दरवाजा असून तो अर्धवट बुजलेल्या अवस्थेत आहे. येथेच एक अस्पष्ट शिलालेख दिसतो. उनपावसाचा मारा खाऊन झिजलेल्या या शिलालेखावरची “जयम” एवढीच अक्षरे जाणवू शकतात. नक्की कोणत्या काळातील हा शिलालेख असावा याची कल्पना मात्र येत नाही. थोडे बाजूलाच गडाचा उत्तर दरवाजा आहे. अखंड कातळात खोदलेल्या या दरवाज्याच्या कमानीवर त्रिशूळ कोरलेले दिसते. गडावर येण्याची दुसरी वाट या दरवाज्याने येते. दरवाज्यासमोरच एका मोठ्या जोत्याचे अवशेष असून येथे पूर्वी सदरेची इमारत असावी. या जोत्याशेजारून डावीकडे जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. तर उजवीकडे जाणारी वाट बुरुजावर घेऊन जाते. डाव्या वाटेने वर गेल्यावर एक टाके लागते. या टाक्याशेजारून माथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. माथ्याचा विस्तार फार नसून आकाराने चिंचोळा आहे. माथ्यावर एक शाहपीराचे थडगे आहे. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो. पूर्वेला गेल्यास एक भलामोठा तलाव दिसतो. टेहळणीसाठी दोन बुरूज आहेत. या तलावाशेजारीच केदारेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची सध्याची अवस्था फारशी चांगली नसली तरी मंदिराचे गतवैभव आसपास पडलेल्या कोरीव दगडावरून जाणवते. महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविकांची गर्दी असते. माथ्यावरून सभोवतालचा प्रदेश फारच सुंदर दिसतो. हवा स्वच्छ असल्यास पूर्वेला सुधागड, तेलबैला, घनगड, कोरीगड तर पश्चिमेला अंबा नदीच्या खोऱ्यातील पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, जांभूळपाडा असा मोठा परिसर दिसतो. पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन ३-४ तासांत किल्ला फिरून होतो. गडावर तसे पाहिले तर राहण्याची व्यवस्थित सोय नाही मात्र ७ ते ८ जणांना दिंडी दरवाज्यासमोर असणाऱ्या देवड्यांमध्ये अथवा धान्यकोठारे, कैदखाना येथे रहाता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करणे योग्य आहे. गडावर पाण्याची भरपूर टाकी आहेत पण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी शहापीराच्या उजव्या बाजूस असणारा हौद पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. शिवाजीच्या मृत्यूनंतर हा भाग रामचंद्रपंत अमात्याकडे होता. ह्या भागातील आकरा किल्ल्यांची जबाबदारी शंकरजी नारायणकडे दिली गेली होती. सरसगड त्यातील एक होता. नंतर हा किल्ला भोर संस्थानाकडे गेला. सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरुन आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!