सरतोडी कोट

प्रकार : भुईकोट

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

सरतोडी हे सफाळे विभागातील वैतरणा खाडीच्या बेचक्यात वसलेले एक छोटेसे गाव. या गावात असणारा सरतोडी कोट लोकांच्या पुर्णपणे विस्मृतीत गेल्याने नष्ट करण्यात आला आहे. सरतोडी कोट सफाळे रेल्वेस्थानका पासून २ कि.मी. वर तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून १८ कि.मी.वर आहे. सफाळे स्थानकातुन सरतोडी गावात जाण्यासाठी खासगी रिक्षाची सोय आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वरई फाटय़ाने येताना सफाळे स्थानकाआधी सरतोडी फाटा लागतो. या कोटाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे. ५० फुट उंचीच्या लहानशा झाडीभरल्या टेकडीवर सरतोडी कोट वसलेला असुन हा कोट स्थानिकांना किल्ला म्हणुन माहित नाही. सरतोडी गावातील फडकेवाडी भागात असणारा हा कोट फडके यांची खाजगी मालमत्ता असल्याने कोट पहाण्यास त्यांची परवानगी घ्यावी. ... टेकडीच्या खालील भागात फळबाग बनविण्यात आली आहे. टेकडीवर चढताच कोटाचे अवशेष नजरेस पडतात. कोटाच्या सर्व भिंतीवर झाडांनी आपले साम्राज्य पसरवले आहे. या विभागातील इतर पोर्तुगीज वास्तुंशी तुलनात्मकदृष्टया विचार करता सरतोडी कोटाचे बरेचसे अवशेष शिल्लक आहेत. कोटाचा आकार चौकोनी असुन इमारतीची तीन बाजुची पंधरा फुट उंचीची उतार असणारी भिंत,भिंतीतील तीन अर्धवर्तुळाकार खिडक्या व एक चौथरा शिल्लक आहे. भिंतींवर झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे भिंतींमध्ये खोलवर रुतत चालली आहेत. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड,चिकटमाती, चुना यांचा वापर केला गेलेला दिसतो. उपलब्ध अवशेष व कोटाचे आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीज काळात निवास, कार्यालय व टेहळणीचे ठाणे म्हणुन केला गेला असावा. कोटाच्या दक्षिण भागात टेकडीच्या पायथ्याशी एक खोदीव पावसाळी साचपाण्याचा तलाव दिसतो. या ठिकाणी खोद्काम करून येथील दगड कोटाच्या बांधकामात वापरले गेले. कोट छोटेखानी असून पंधरा मिनिटात पाहून होतो. सदर माहिती मी मार्च २०१४ मध्ये या कोटावर गेलो असतानाची आहे. २२ मे २०१७ रोजी या कोटाला पुनर्भेट दिली असता बळाचा वापर करुन या कोटाचे अवशेष जमीनदोस्त केल्याचे दिसुन आले. आज जरी कोट अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान आणि खाडीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते. ह्या भागातील इतर किल्ल्यांबरोबरच हा किल्लाही पोर्तुगिजांनी बांधला. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारण १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३९ च्या या वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!