सडा किल्ला

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : बेळगाव

उंची : २६४० फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या माथ्यावर सडा किल्ला वसलेला आहे. बेळगाव सीमाप्रांतात असलेला हा किल्ला शरीराने कर्नाटक राज्यात असला तरी मनाने महाराष्ट्रात आहे असेच या किल्ल्याबाबत म्हणता येईल. बेळगाव ते सडा हे अंतर ६० कि.मी. असुन दोडामार्ग ते सडा अंतर ५१ कि.मी. आहे. सह्याद्रीच्या माथ्यावर असलेल्या लहानशा सडा गावात जाण्यासाठी बेळगावातील चोर्लाघाट येथुन १० कि.मी. कच्चा रस्ता पार करावा लागतो तर दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावातुन केवळ २ कि.मी. अंतर पार करावे लागते. सडा गावाच्या मागे असलेल्या टेकडावर चोर्लाघाट परिसरात टेहळणी करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. या भागात स्वतंत्र वतनदार म्हणुन नांदणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या प्रबळ राजसत्तेचे वर्चस्व मानणाऱ्या देसाईंनी या किल्ल्याची बांधणी केल्याचे सांगितले जाते. सडा गावात आल्यावर किल्ला पहाण्यासाठी सर्वप्रथम विठ्ठल मंदिराकडे यावे. गावात रहावयाचे असल्यास या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिराच्या मागील बाजुने एक पायऱ्याची वाट टेकडीकडे जाते. या वाटेने वर आल्यावर डाव्या बाजुस किल्ल्यावर असलेला चौसोपी वाडा पहायला मिळतो. ... दुमजली असलेल्या या वाड्याचे छप्पर पुर्णपणे नष्ट झाले असुन इतर बांधकाम मात्र आजही सुस्थितीत आहेत. या बांधकामातुन आजही वाड्याचे सौंदर्य दिसुन येते. वाड्याच्या आसपास इतर काही पडीक वास्तुंचे अवशेष असुन हे सर्व बांधकाम एका उंच चौथऱ्यावर केलेले आहे. वाड्याच्या डावीकडील वाट आपल्याला लहानशा मोकळ्या पठारावर घेऊन जाते. गावातील लोक या पठारावर होळी पेटवत असल्याने हि जागा होळीचा माळ म्हणुन ओळखली जाते पण मुळात हि तटबंदीने वेढलेली गडाची बंदीस्त माची आहे. समुद्र सपाटीपासुन २५४० फुट उंचीवर असलेला हा किल्ला ८ एकरवर पुर्व-पश्चिम पसरलेला असुन गडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले आहेत. आहे. माचीची तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली असली तरी शिल्लक आहे. या तटबंदीत माचीचा उत्तराभिमुख कमानीदार दरवाजा व पंधरा फुट उंचीचा एक बुरुज आजही शिल्लक आहेत. माचीवर आल्यावर उजव्या बाजुने खाली आल्यावर डाव्या बाजुच्या तटबंदीत या दोन वास्तु तर उजवीकडे खालील बाजुस आपण सुरवातीला आलो ते विठ्ठल मंदीर पहायला मिळते. येथुन मागे फिरून पठारावर शिरलो तिथुन डाव्या बाजुने पुढे झाडीत शिरल्यावर किल्ल्याची उध्वस्त तटबंदी लागते. येथुन पुढचा भाग म्हणजे किल्ल्याचा बालेकिल्ला असुन बालेकिल्ल्याला माचीच्या दिशेला खंदक खोदलेला आहे. खंदकाच्या उजव्या बाजुस बालेकिल्ल्याची तटबंदी व बुरुज असुन डाव्या बाजुस खंदकावर लहान तटबंदी उभारून किल्ल्याला दुहेरी सरंक्षण दिलेले आहे. तटबंदीतून आत शिरल्यावर उजव्या बाजूने पुढे गेल्यावर चिऱ्यानी बांधलेली वाट दिसते. हि वाट तटाबाहेर असलेल्या विहिरीवर जाते. विहिर पाहून मागे आल्यावर आल्या मार्गाने परत कोसळलेल्या तटबंदीच्या दगडातून वाट काढत किल्ला चढायला सुरुवात करावी. येथे वरील बाजुस किल्ल्याचा बुरुज व तटबंदीत कमानीदार खिडकी दिसते. किल्ल्याच्या आतील तटबंदीत असलेल्या या वाटेवर मोठया प्रमाणात वरील तटबंदी व दरवाजाचे दगड कोसळलेले आहेत. दरवाजातुन आत शिरल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या असुन समोरच्या भिंतीत एक लहान दरवाजा असलेले कोठार आहे. या भागात रणमंडळाची रचना केलेली असुन एकामागे एक असे तीन दरवाजे पार केल्यावरच आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याचा दरवाजा या दरवाजाच्या रेषेत वरील बाजुस बांधलेला असुन त्यात जाण्यासाठी U आकाराचे वळण घ्यावे लागते. दुसरा दरवाजा पार केल्यावर उजव्या बाजूच्या तटबंदीत आपण खालून पाहिलेली खिडकी दिसते. या खिडकीतुन खालुन वर येणारी संपुर्ण वाट नजरेस पडते. किल्ल्याचा समोर दिसणारा तिसरा दरवाजा मोठया प्रमाणात मातीत गाडलेला असुन या दरवाजातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्यात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीतुन एक वाट डावीकडे तर दुसरी वाट समोर जाते. डावीकडील वाटेने सरळ पुढे गेल्यावर आपण एका बुरुजाकडे पोहोचतो. या बुरुजावर एक तोफ असुन येथुन खालींल राजवाडा व गडाची संपुर्ण माची नजरेस पडते. बुरुजाच्या समोरील भागात मातीने भरत चाललेली विहीर असुन तटबंदीत ३-४ मोठमोठ्या कमानीदार ओवऱ्या आहेत. या बहुदा घोडयाच्या पागा असाव्यात. येथुन मागे फिरून परत दरवाजाकडे यावे व सरळ जाणाऱ्या वाटेने किल्ल्याच्या टोकाकडील तटबंदीकडे जावे. या तटबंदीला एक लहान दरवाजा असुन या दरवाजातून बाहेर गेल्यावर किल्ल्याची दुसरी तटबंदी आहे. बालेकिल्ल्याचा वरील पठारावर असलेला भाग दुहेरी तटबंदीने संरक्षित केलेला आहे. किल्ल्याच्या तटावरून सडा गाव,मांगेली गाव, तिलारी धरण, चोर्ला जंगल व दुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. किल्ल्याच्या दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. याशिवाय सडा गावात असलेली विहीर आवर्जुन पहावी अशी आहे. गावातील वस्तीत असणाऱ्या या चावीच्या आकाराच्या विहिरीची बांधणी दोन स्तरात केलेली असुन विहिरीच्या तळात असलेल्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. विहिरीच्या पहिल्या मजल्यावर कमानीदार कोनाडे बांधलेले असुन या मजल्यावर उतरण्यासाठी दोन बाजूना दरवाजे आहेत. पहिल्या मजल्यावरून संपुर्ण विहिरीला प्रदक्षिणा मारता येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!