सज्जनगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : ३२१५ फुट

श्रेणी : सोपी

सहयाद्रीची उपरांग असलेल्या शंभूमहादेव या या डोंगर रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात असलेला हा दुर्ग समुद्रसपाटीपासून साधारण ३००० फूट उंचावर आहे. शंखाकृती आकाराचा हा किल्ला साधारण ५ एकरवर पसरलेला असुन समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. परळी हे पायथ्याचे गाव. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावाजवळ केदारेश्वर व विरुपाक्ष हि दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. परळी गावातुन गडावर जाण्यासाठी साधारण २०० पायऱ्या आहेत. परळी गावातुन गडावर जाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. सातारा-परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ की.मी.वर गजवाडी गाव असुन येथुन खाजगी वहानाने थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत जाता येते. ... येथून गडावर जाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. या वाटेवर कल्याण स्वामीचे मंदिर असुन पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामीनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपण्याआधी एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर कातळात खोलवर खोदलेली एक घळ लागते. रामघळ नावाने ओळखली जाणारी हि घळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर जाताना लागणारा पहिला दरवाजा छत्रपती शिवाजीमहाराज दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दुसरा दरवाजा पुर्वाभिमुख असून तो समर्थद्वार म्हणुन ओळखला जातो. हे दोन्ही दरवाजे आजही रात्री दहा नंतर बंद केले जातात. दुसऱ्या दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजुस तटाला लागुन पर्शियन भाषेतील एक शिलालेख कोरलेला आहे. त्याचा मराठी अर्थ खालील प्रमाणे : ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे. हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे. तू विंवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात. परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाजाचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले. गडावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम डावीकडील भाग पाहुन घ्यावा. येथे समोरच असलेले तळे घोडाळे तळे म्हणुन ओळखले जाते. या तळ्याच्या मागील बाजुस घुमट असलेली इमारत असुन समोरील बाजुस समर्थांनी स्थापन केलेले आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवीची मुर्ती समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. या मंदिरासमोर ढालकाठीची जागा असुन तेथे काही शिल्प ठेवलेली आहेत. येथुन आल्यावाटेने पुन्हा दरवाजाजवळ यावे व सरळ पुढे चालत जावे. या वाटेवर उपहारगृह, श्री समर्थ कार्यालय व धर्मशाळा आहे. धर्मशाळेसमोर सोनाळे तळे असुन या तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटीका असुन तिच्या काठावर काही भग्न मुर्ती व विरगळ ठेवलेल्या आहेत. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणाऱ्या वाटेने आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहचतो. वाटेत पेठेतील मारुतीचे मंदिर आणि श्रीधर कुटी नावाचा आश्रम असुन उजवीकडे श्रीरामाचे मंदिर, समर्थाचा मठ आणि शेजघर आहे. गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदीर. या ठिकाणी समर्थ रामदासांचे वास्तव्य होते. शके १६०३ माघ नवमी (सन १६८२ ) समर्थांनी समाधी घेतली. समर्थनिर्वाणानंतर संभाजीराजांच्या सांगण्यावरुन समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. श्रीराम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीतेच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधीस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई यांचे वृंदावन आहे. जीर्णोध्दार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. गुप्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे त्यात एक लांबच लांब धारदार तलवार आहे. शिवाजी महाराजांनी समर्थांना या वस्तू भेटीदाखल दिल्या होत्या. माघ वदय प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमीचा उत्सव साजरा करतात. राममंदीर व मठाच्या मधील दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात. गडाच्या पश्चिमे टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्य़ाचा मारुती असे म्हणतात. मंदिराजवळच एक तलाव आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे येथून सभोवतालचा परिसर फारच सुंदर दिसतो. गडाच्या उत्तरेस वाटेवर गायमारुती व कल्याण स्वामी मंदिर आहे. संपुर्ण गड फिरण्यास दोन तास पुरेसे होतात. गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालयतर्फे खोल्या उपलब्ध होतात. प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य असल्याने या किल्ल्याला 'अश्वलायनगड' नाव मिळाले. या शब्दाचा अपभ्रंश होऊन काही काळ गडाला अस्वलगड नाव प्रचलित झाले. या किल्ल्याची उभारणी ११ व्या शतकात शिलाहार राजा भोज याने केली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावाच्या नावाने हा किल्ला परळीचा किल्ला म्हणुन ओळखला जात असे. चौथा बहमनी सुलतान महंमदशहा (१३५८ - १३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख येतो. पुढे बहमनी राज्याचे तुकडे पडल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात आला. इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २ एप्रिल इ.स.१६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्यानंतर परळीचा किल्ला सज्जनगड म्हणुन ओळखला जाऊ लागला. आयुष्याच्या अखेरपर्यंत समर्थ रामदास स्वामी याच गडावर रहात होते. राज्याभिषेकानंतर इ.स. १६७९ पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. ३ नोव्हेंबर १६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३ डिसेंबर १६७८ रोजी संभाजी महाराज सज्ज्नगडावरून निघुन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तीचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी व रामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला. ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २-६-१६८२ रोजी सज्जनगडाचा हवालदार जिजोजी काटकर ह्याला पत्र लिहिले की. “श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती, ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्यलोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात, तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून कळोन आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काय व उद्धव गोसावी यांसी कटकट करावया गरज काये या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे अधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा करणे. वेदमूर्ती बिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे. तो होईलया उपरी घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे. या पत्राप्रमाणे राहाटी करणे.” या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्ज्नगडास वेढा घातला. ६ जून १७०० मध्ये सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ‘नौरससातारा’ म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!