संवत्सर

प्रकार : गढी/ नगरकोट

जिल्हा : अहमदनगर

उंची : 0

अहमदनगर जिल्ह्यात अलंग, मदन,कुलंग, हरीश्चंद्रगड यासारख्या दुर्गासोबत काही गावात लहानमोठ्या गढी देखील आहेत पण फारच कमी लोकांना या गढ्यांची माहीती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती करताना मला ३० पेक्षा जास्त गढी व नगरदुर्ग पहायला मिळाले. या गढी व नगरदुर्ग काळाच्या ओघात नामशेष होत चालल्याने त्यांची माहीती संकलित करून ती मी आपल्या दुर्गभरारी संकेतस्थळावर गढी या विभागात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव रेल्वे स्थानकापासून गोदावरी नदीकाठी संवत्सर नावाचे लहानसे गाव आहे. साईबाबांच्या शिर्डी शहरापासुन हे गाव साधारण १६ कि.मी.अंतरावर आहे. संवत्सर गावात सहजपणे जाता यावे यासाठी मी या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख केलेला आहे. गावात प्रवेश करताना घडीव दगडात बांधलेली काही जुनी थडगी पहायला मिळतात. कधीकाळी गावाबाहेर असलेली हि दफनभूमी वाढत्या लोकवस्तीने आता गावात सामावली आहेत. संवत्सर गाव कधीकाळी कोटाच्या आत वसलेले असावे. वाढत्या लोकवस्तीने या कोटाच्या तटबंदीचा घास घेतला असला तरी कोटाचे प्रवेशद्वार आज देखील शिल्लक आहे. या दरवाजाच्या चौकटीवरील भागात दगडी कमळे कोरलेली असुन वरील भागात असलेला मजला आज पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. ... दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन त्यात लहान दिंडी दरवाजा पहायला मिळतो. गावात गोदावरी नदीकाठी शिंदे देशमुख यांची गढी असुन गढी अथवा किल्ला अशी विचारणा केल्यास आपण सहजपणे या गढीजवळ पोहोचतो. आयताकृती आकाराची हि गढी साधारण १० गुंठे परिसरावर पसरलेली गढीच्या मागील बाजुस असलेल्या दोन कोपऱ्यावर दोन बुरुज आहेत. संपुर्ण गढीची तटबंदी व बुरुज घडीव दगडात बांधलेली असुन या तटबंदीत असलेल्या दगडी जाली आजही शिल्लक आहेत. पश्चिमाभिमुख असलेला गढीचा दरवाजा व त्यातील लाकडी दारे आजही चांगल्या स्थितीत असुन दरवाजाच्या दगडी कमानीवर तसेच वरील बाजुस कमळाची नक्षी कोरलेली पहायला मिळते. गढीच्या आतील वास्तुंची पुर्णपणे पडझड झाली असुन शिल्लक असलेल्या दोन लहान घरात गढीची काळजी घेणारी दोन कुटुंबे रहातात. गढीतील देवघराच्या ठिकाणी २००० साली लहान घुमटी उभारण्यात आली आहे. गढीच्या मागील भागात बाहेर जाण्यासाठी लहान उत्तराभिमुख दरवाजा आहे. मागील बाजुस असलेल्या बुरुजात सामान साठविण्याचे कोठार असुन त्यातुन बुरुजाच्या वरील भागात जाण्यासाठी मार्ग आहे. कधीकाळी गढीच्या आत तीन मजली वाडा असल्याच्या खाणाखुणा दिसुन येतात पण आज मात्र त्याचा छप्पर नसलेला केवळ तळमजला शिल्लक आहे. गढीत काटेरी झुडपे वाढल्याने सावधगिरीने फिरावे लागते. गढी मालकांच्या अनास्थेमुळे या गढीची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. संपुर्ण गढी पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. शिंदे देशमुखांची गढी या व्यतीरिक्त स्थानिकांना व आत रहाणाऱ्या लोकांना गढीची इतर कोणतीही माहिती नसल्याने गढीचा इतिहास देखील थोडक्यात आटोपतो. शिंदे यांचे वंशज सध्या पुणे व अहमदनगर येथे स्थायिक झाले आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!