श्रीवर्धन

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : २६६० फुट

श्रेणी : मध्यम

गिरीमित्रांनी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे राजमाची हा एकच किल्ला असुन या किल्ल्याच्या माचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. या किल्ल्याचा पसारा प्रचंड असुन अवशेष देखील मोठया प्रमाणात आहेत. निसर्गसुंदर अशा या किल्ल्याला भेट दिल्यावर आपल्या भटकंतीला पुर्ण न्याय मिळावा यासाठी या दुर्गाचे वर्णन करताना एका दुर्गाचे तीन भागात विभाजन केलेले आहे. पहिला भाग माचीचा जो राजमाची म्हणुन संबोधला आहे. दुसरा भाग म्हणजे श्रीवर्धन बालेकिल्ला आणि तिसरा भाग म्हणजे मनरंजन. या तिघांपैकी बालेकिल्ला श्रीवर्धन याची ओळख आपण येथे करून घेणार आहोत. सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो. ... या उल्हास नदीच्या उगमाच्या प्रदेशात मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. सातवाहन काळापासून प्राचीन घाटमार्गावर असलेला हा किल्ला प्रचंड वनांनी आणि निसर्गरम्य हिरवाईने वेढलेला आहे. इथला निसर्ग मनाला एक प्रकारची भुरळ घालतो. राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २८०० फुट आहे. श्रीवर्धन किल्ल्यास आपण दोन मार्गाने भेट देऊ शकतो. पहिला मार्ग म्हणजे कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने अथवा रिक्षाने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट खडतर आहे. या वाटेने उधेवाडीत पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात. दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे उधेवाडी गावात यावे. ही वाट एकदंर १५ कि.मी ची आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास ५ तास लागतात. पुणे-मुंबई महामार्गाने लोणावळयाहुन खोपोलीला जाताना खंडाळ्याच्या घाटात राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी दोन शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरोबाचा डोंगर म्हणतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखल पट्टी आहे यावर भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे. श्रीवर्धन मनरंजनपेक्षा उंच असुन या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. यावर जाण्यासाठी खडकातच पायऱ्यांचा मार्ग खोदलेला आहे. साधारण अर्ध्या तासात आपण श्रीवर्धन किल्ल्याच्या पश्चिम दरवाज्यात पोहचतो. दुरवर डाव्याबाजूला म्हणजेच पश्चिमेकड़े किल्ल्याचा एक बुरुज दिसतो. मध्ये तटबंदी पडली असल्याने इकडूनच थेट तेथे जाता येते मात्र प्रवेशदाराची रचना आणि दुर्गबांधणी बघण्यासाठी मुख्य दरवाज्यातुन जावे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिले आहे "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पाडोन दरवाजे बांधावे." या शास्त्राप्रमाणेच पुढे बुरुज देउन त्यामागे किल्ल्याचा दरवाजा लपवला आहे. गोमुखी पद्धतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन्ही बाजूंची देवडी थक्क करून सोडते. एकुण बांधकाम १ मजली आहे. आतल्या बांधकामाची उंची आणि लाकडाचे वासे घालायच्या जागांवरुन ते लगेच समजुन येते. वळणावळणाच्या मार्गावरील प्रशस्त आकाराची, रेखीव खांबांवर उभी असलेली ही देवडी पूर्वी बहुमजली होती. पण आता तिचे छत पूर्ण कोसळले आहे. किमान तिच्या उभ्या भिंती आणि खांब ढासळण्या-पडण्यापूर्वी तरी वाचवायला हवेत. उजव्या बाजुच्या पडक्या देवडीच्या पहिल्या मजल्यावरुन थेट तटबंदीवर जायला छोटासा दरवाजा आहे. किल्ल्याची भक्कम तटबंदी लांबूनही लक्षात येईल अशी आहे. या दरवाजातून गडावर पुढे जावे तो डाव्या हाताला खडकात खोदलेली काही टाकी दिसतात. या टाक्यांच्या कडेलाच एक लोहस्तंभ पडलेला आहे. अंदाजे ८ फूट लांबीच्या या लोहस्तंभाचे नेमके प्रयोजन मात्र कळत नाही. रायगडावर देखील असाच एक स्तंभ हत्ती तलावाच्या बाजुला आहे. गडांवरील या अशा वस्तूंचे योग्य जतन आणि संशोधन व्हायला हवे. या टाकीजवळून निघालेली ही वाट पुढे एका गुंफेजवळ जाते. या मूळच्या शैलगृहांची मध्ययुगात धान्याची कोठारे झाली. या शैलगृहाच्या दरवाजांवर गणेशपट्टी आणि कमळे कोरलेली आहेत. छोटेसे प्रवेशद्वार असलेली ही गुहा आतून मात्र प्रचंड मोठी आहे. हयात ३ मुख्य भाग आहेत. मध्ये एक आणि उजवीकड़े डावीकड़े अशी एक-एक. किल्ल्यावरील धान्याचा, शस्त्रांचा आणि इतर सामूग्रीचा साठा येथेच साठवला जात असणार. ही वाट पुढे श्रीवर्धनच्या शिखराकडे निघते. वाटेत आणखी काही उद्ध्वस्त घरांचे अवशेष, बुजलेल्या टाक्या, विष्णूचे एक छताविना छोटेसे मंदिर आणि गडाची सदर लागते. या साऱ्यांतून मार्ग काढत आपण गडाच्या सर्वोच्च अशा ढालकाठीच्या वा टेहळणीच्या बुरुजावर येतो. या बुरुजावर आता नव्याने ध्वजस्तंभ उभारला आहे. या बुरुजावरून संपुर्ण राजमाची परिसर आणि मनरंजन किल्ला न्याहाळता येतो. समोरच ढाक बहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोटयाचा तलाव हा सर्व परिसर दिसतो. श्रीवर्धनची उत्तर बाजू या बालेकिल्ल्याची जणू एखादी माची आहे. या माचीच्या बुरुजांना दुहेरी तट घालून संरक्षित केले आहे. या दोन तटा दरम्यान ये-जा करण्यासाठी भुयारी जिनेही जागोजागी ठेवले आहेत. अशा बुरुजांना चिलखती बुरुज म्हटले जाते. येथे जाताना वाटेवर पाण्याचे एक तळे आहे व त्याच्या शेजारी नुकतीच पाण्यातून बाहेर काढलेली एक सहा फुट लांबीची तोफ आहे. याशिवाय तटावर दोन ठिकाणी अजून दोन तोफा दिसून येतात. इथून वरपर्यंत चढते बांधकाम आहे. सगळीकडे तटबंदीमध्ये जंग्या बांधलेल्या असुन पावसाने वाहुन येणाऱ्या मातीने त्या तसेच फांजी बुजून गेली आहे. गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. श्रीवर्धन गडाची उतरत्या डोंगरावरची वेडीवाकड़ी तटबंदी मनरंजन वरुन फारच सुंदर दिसते. या किल्ल्याला फार ज्वलंत नसला तरी प्रदीर्घ असा इतिहास आहे. कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटमार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसा बोरघाट, त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी एक किल्ले राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक विचार केल्यास आपल्या असे दिसुन येते की राजमाचीच्या एका बाजूस पवनमावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे एक लष्करी प्रमुख ठाणं असावे. किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. याला 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात. ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. हा काळ बहुधा सातवाहनांचा म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई या सा-या राजवटी पाहिल्या असून किल्ल्याच्या जडणघडणीत या सा-यांचे हात लागले असल्याचे गडावर पहायला मिळते. राजमाची किल्ल्यास कोंकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारीनंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज असेपर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. आलमगिरीची वावटळ सहय़ाद्रीत अवतरताच इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाच्या सेनापतीने राजमाचीच्या किल्लेदारास वश करून हा गड जिंकला पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रेना हा किल्ला दिला. . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला. त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. किल्ला पाहण्यासाठी किमान दोन दिवस वेळ काढणे गरजेचे आहे. किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उधेवाडी गावात राहण्या-खाण्याची उत्तम सोय होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!