शेगाव
प्रकार : भुईकोट
जिल्हा : चंद्रपुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
विदर्भाच्या काही भागावर गोंड राजसत्तेने जवळपास ६०० वर्ष राज्य केले. या काळात त्यांनी काही किल्ल्यंची पुनर्बांधणी केली तर काही किल्ले नव्याने बांधले. नागपुर,चंद्रपुर या भागातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. यातील काही किल्ले आजही त्यांच्या राजसत्तेच्या खुणा सांभाळत ठामपणे उभे आहेत तर काही किल्ले काळाच्या ओघात नष्ट होऊन एखाद दुसरा अवशेष बाळगुन आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथील किल्ला त्यापैकीच एक. वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक हे ठिकाण तालुक्याच्या ठिकाणाहुन १७ कि.मी.अंतरावर आहे. किल्ला जवळपास नष्ट झाला असुन काही ठराविक लोकांनाच या किल्ल्याबद्दल माहीती आहे. त्यामुळे चौकशी करताच या किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. किल्ल्याची तटबंदी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन बुरुजांचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. येथील झोपड्याखाली व गटाराच्या बांधकामात असलेले दगड पहाता हा किल्ला घडीव दगडात बांधला होता हे लक्षात येते. लहानशा उंचवट्यावर असलेल्या या किल्ल्याचा परीसर साधारण २० गुंठे असुन आता तेथे घरे बांधली जात आहेत.
...
या घराशेजारी असलेल्या झाडीतच किल्ल्याच्या दरवाजाची चौकट कशीबशी तग धरून आहे. या चौकटी शेजारी किल्ल्याचे घडीव दगड विखुरलेले आहेत. येथील स्थानिक सुरवातीला येथे काहीच नाही म्हणुन सांगतात पण पिच्छा पुरवल्यास हि चौकट दाखवतात. किल्ल्याचा माथा गावातील सर्वात उंच भाग असल्याने येथुन संपुर्ण गाव नजरेस पडते. किल्ला पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. जिथे किल्ला दाखवण्यास टाळाटाळ तिथे इतिहासाबद्दल विचारणा नकोच. स्थानिकात इतिहासाची पुर्णपणे बोंब असल्याने किल्ल्याचा इतिहास अपरिचित आहे.
© Suresh Nimbalkar