शेंबळपिंपरी

प्रकार : गढी

जिल्हा : यवतमाळ

उंची : 0

श्रेणी : सोपी

यवतमाळ जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना कायर, दुर्ग, कळंब, शेंबळपिंपरी यासारखे लहानमोठे गढीकोट पहायला मिळतात पण या गढीकोटांचा उल्लेख मात्र कोठेच दिसुन येत नाही. यातील कायर, दुर्ग, कळंब हे जरी किल्ले असले तरी शेंबळपिंपरी येथे असलेली वास्तु मात्र गढी आहे. स्थानिकांना हि गढी दाजीसाहेब देशमुख यांची गढी म्हणुन परीचीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात असलेली हि गढी पुसद या तालुक्याच्या ठिकाणापासुन ३० कि.मी.अंतरावर तर हिंगोली शहरापासुन ४० कि.मी.अंतरावर आहे. हिंगोली येथुन कळमनुरी मार्गे शेंबळपिंपरी येथे जाणे जास्त सोयीचे आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता खाजगी वाहन वापरणे जास्त सोयीचे ठरते. शेंबळपिंपरी गावाच्या मध्यभागी हि गढी असुन गढीच्या चारही बाजुला वस्तीने घेरलेले असल्याने अगदी जवळ जाईपर्यंत हि गढी आपल्याला दिसत नाही. गढीची तटबंदी साधारण २५ फुट उंच असुन खालील १० फुटाचा भाग दगडांनी तर वरील भाग पांढऱ्या चिकणमातीत बांधलेला आहे. संपुर्ण गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत पाच बुरुज आहेत. गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात तर कमानीचे बांधकाम विटांनी केलेले आहे. ... दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन या लाकडी दारात दिंडी दरवाजा पहायला मिळतो. गढीचा दुसरा दरवाजा पुर्वाभिमुख असुन तो काटकोनात वळण देऊन अशा खुबीने बांधला आहे कि समोरून नजरेस पडत नाही. या दरवाजाने आत शिरल्यावर आपला गढीत प्रवेश होतो. येथे दरवाजा शेजारी उजवीकडे उंच चौथरा असुन कधीकाळी हे ठिकाण म्हणजे गढीची सदर (कार्यालयीन जागा ) असावी. येथुन पुढे आल्यावर एका रांगेत दगडी बांधकामातील सहा कमानी दिसुन येतात. या कमानी म्हणजे घोड्याच्या पागा असाव्यात. या पागेच्या समोरच असलेल्या बुरुजावर एक थडगे पहायला मिळते. या बुरुजाच्या अलीकडे जमिनीखाली एक तळघर असुन त्याच्या माथ्यावरील दगड ढासळल्याने आतील बाजु नजरेस पडते. पागेशेजारून गढीतील वाड्याचे प्रवेशद्वार असुन त्याचा दर्शनी भाग पुर्णपणे कोसळलेला आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण वाड्याच्या पहिल्या चौकात येतो. येथुन पुढील भागात खुप मोठ्या प्रमाणात काटेरी झाडी वाढलेली असल्याने आत शिरता येत नाही. गढीच्या अंतर्गत भागात फिरताना पावसाचे पाणी गढीबाहेर जाण्याच्या जागा, जमिनीखालील कोठारे तसेच धान्य साठविण्याची बळद पहायला मिळतात. काटेरी झाडीमुळे गढी पुर्णपणे फिरता न आल्याने गढीच्या अंतर्गत भागात पाण्याची सोय होती कि नाही हे पहाता आले नाही. गढीच्या बाहेरून फिरताना प्रसंगी गढीबाहेर पडण्यासाठी असलेल्या एका लहान दरवाजाची कमान पहायला मिळते. याशिवाय गढीच्या दक्षिणपुर्व बाजुस तटबंदीला लागुन दगडी बांधणीतील चौकोनी आकाराची मोठी बारव असुन गढीतुन या विहिरीत उतरण्याची सोय आहे. याशिवाय गढीतुन रहाटाच्या सहाय्याने या विहिरीचे पाणी काढण्याची सोय असावी. गढी उंचावर असल्याने येथुन संपुर्ण गाव व आसपासचा परीसर नजरेस पडतो. संपुर्ण गढी फिरण्यासाठी पाउण तास पुरेसा होतो. गढीचे मालक व देशमुखांचे वंशज हे गढीबाहेर समोरच वास्तव्यास असुन त्यांचे मुळ आडनाव राणे असे आहे. याशिवाय या देशमुखांच्या दगड धानोरा व कळमनुरी अशा दोन्ही ठिकाणी गढ्या आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!