शेंदुर्णी

प्रकार : नगरकोट

जिल्हा : जळगाव

जळगाव जिल्ह्यातील भटकंती करताना सर्वात जास्त गढी आपल्याला पाचोरा तालुका व त्याच्या आसपास पहायला मिळतात. पाचोरा जवळ असलेला दुसरा तालुका म्हणजे जामनेर. या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात आपल्याला पडझड झालेली एक गढी अवशेष रुपात पहायला मिळते. शेंदुर्णी हे गाव पाचोरा येथुन २५ कि.मी.अंतरावर तर जामनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन २८ कि.मी. अंतरावर आहे. इ.स.१६०१ मध्ये खानदेश सुभ्यात असलेल्या ३२ परगण्यात शेंदुर्णी हा देखील एक महत्वाचा परगणा होता. शेंदुर्णी हे खानदेशातील परगण्याचे ठिकाण असल्याने गावाला कोट असणे साहजिकच होते. संपुर्ण गावाभोवती असलेल्या या कोटातुन गावात प्रवेश करण्यासाठी एकुण चार दरवाजे तसेच गावाच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर गढी बांधलेली होती. कोटाची तटबंदी व त्यातील दरवाजे आज पुर्णपणे नष्ट झाले असुन केवळ पहुर गावाच्या दिशेने असलेला पहुर दरवाजा हा एकमेव दरवाजा शिल्लक आहे. शेंदुर्णी गावाचे सारे जुने वैभव आता इतिहासजमा झाले आहे. शेंदुर्णी गावाच्या मध्यभागी एका उंचवट्यावर असलेली गढी दीक्षितांची गढी म्हणुन ओळखली जाते. हि गढी देखील आता अवशेष रुपात शिल्लक आहे अजून किती दिवस हे अवशेष शिल्लक राहतील याची शाश्वती नाही. ... गढीची उंची साधारण ३०-३५ फुट असुन गढीत जाणारा ३५-४० पायऱ्यांचा मार्ग हा घडीव दगडात बांधलेला आहे. या मार्गाच्या सुरवातीस विटांचे दोन गोलाकार बुरुज बांधले आहेत. गढीची उंची दोन टप्प्यात विभागली असुन मुख्य गढी सर्वात उंच भागात आहे. पायऱ्यांच्या वरील भागात अजून एक लहान बुरुज बांधुन तेथुन या पायरी मार्गावर व आसपास नजर ठेवण्याची सोय करण्यत आली आहे. या बुरुजावर चर्या बांधलेल्या असुन तोफ ठेवण्याची सोय केलेली आहे. गढीच्या माथ्यावर असलेला जुना वाडा पुर्णपणे पडझड झाला असुन त्याचे मोजकेच अवशेष शिल्लक आहेत. या वाड्याच्या मध्यावर नव्याने बांधलेले एक घर आहे. गढीच्या एक बाजुस उत्खनन करून तेथील माती भरणीकरता इतरत्र नेण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे. संपुर्ण गढी पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. जळगाव मधील बहुतांशी गढ्यांचा इतिहास ज्ञात नसला तरी या गढीचा इतिहास मात्र काही प्रमाणात परीचीत आहे. शेंदुर्णी येथील खोलेश्वर मंदिरात असलेल्या शिलालेखानुसार इतिहासकार वि. का .राजवाडे यांच्या मते सिंघण यादवांचा (११३२-११६९ ) सेनापती खोलेश्वर वा त्याचा पुत्र यांनी या मंदिराची निर्मिती केली असावी. शेंदुर्णी हे गाव देवगिरी जवळ असल्याने सेनापती खोलेश्वर याला जहागिरीत मिळाले असावे. शेंदुर्णी हा शब्द सेन्द्रकपर्णी नावाचा अपभ्रंश असुन कन्नड तालुक्यात नेवापुरजवळ असलेले सेन्द्र गाव हे सेन्द्रकाचे गाव असावे.हे सेन्द्रक राजे इ.स. ४०० ते इ.स.८०० या काळात आढळतात. त्यानंतर हे गाव राष्ट्रकुटांच्या व सिंघण यादवांच्या काळात खोलेश्वरच्या ताब्यात आले असावे. पेशवा दुसरा बाजीराव याच्या काळात हे गाव त्यांचे उपाध्याय पाटणकर दिक्षित यांना जहागीर होते. दुसरा बाजीराव व इंग्रज यांच्या अशेरीगडावरील लढाईनंतर झालेल्या तहात दुसरा बाजीराव पेशवा याने सर जोन माल्कम याच्याकडे रदबदली करून हे गाव दिक्षित घराण्यास देवविले व येथील कारभार त्यांच्याकडे सोपवला. त्याकाळी या जहागिरीत ३२ गावांचा कारभार अंतर्भुत होता. या शिवाय गावात असलेल्या त्रिविक्रम मंदिरातील विठ्ठलाची मुर्ती आवर्जुन पहावी अशीच आहे. शेंदुर्णी गावाची भटकंती करण्यास एक तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!