शिवना
प्रकार : नगरकोट/गढी
जिल्हा : संभाजीनगर
औरंगाबाद जिल्ह्यतील सिल्लोड तालुक्यात असलेले शिवणा गाव तसे फारसे कोणाला परीचीत नाही आणि परीचीत असण्याचे तसे कारणही नाही. माझी या गावाशी ओळख झाली ती येथे असलेल्या नगरकोटामुळे. आणि हा नगरकोट पहाताना मला लक्षात आले कि या गावाला केवळ नगरकोटच नाही तर त्यासोबत भुईकोट अथवा सराई देखील आहे. दुर्गप्रेमीना पुर्णपणे अपरिचीत असलेल्या या कोटाची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. शिवणा गाव छत्रपती संभाजी नगरपासून १२६ कि.मी. अंतरावर असुन सिल्लोड या तालुक्याच्या ठिकाणाहुन ३० कि.मी. अंतरावर आहे. शिवणा गावाला कधी काळी नगरकोट असुन या नगरकोटचे दरवाजे आजही शिल्लक असल्याचे वाचनात आल्याने अजंठा लेणी येथे जाताना मी हे दरवाजे पहाण्यासाठी गेलो. शिवणा गाव मध्ययुगीन कालापासून अस्तित्वात असुन गावाचा विकास झाल्याने गावाची मूळ वस्ती मुख्य रस्त्यापासुन थोडी आत आहे. शिवाई देवीचे मंदीर विचारले असता पाच मिनिटात आपण गावाजवळ पोहोचतो.
...
शिवाई देवीच्या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार झाल असुन त्याचे मूळ स्वरूप पुर्णपणे बदललेले आहे. या मंदिराच्या आवारात एक जुनी विहीर असुन त्यासमोरचं शिवणा नगरकोटाचा मुख्य दरवाजा आहे. दरवाजा शेजारील तटबंदी नष्ट झाली असुन त्याजागी आता घरे उभी राहिली आहेत. दरवाजाच्या वरील बाजुस बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. या रस्त्याने १० मिनिटे सरळ चालत गेल्यावर आपण विरुद्ध बाजुस असलेल्या कोटाच्या दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडतो. हा दरवाजा वाढत्या वस्तीने गिळंकृत केला असुन त्याची केवळ चौकट शिल्लक आहे. हा दरवाजा म्हणजे गावातुन गावाबाहेर असलेल्या कोटात जाण्याचा मार्ग असावा. या दरवाजाने बाहेर पडुन डावीकडे गेले असता कोटाची २० फुट उंच तटबंदी नजरेस पडते. हि तटबंदी फोडून त्यातुन येण्याजाण्याचा मार्ग बनवला आहे. उजवीकडे वळले असता तेथे देखील अशीच तटबंदी व त्यातुन काढलेला रस्ता आहे. डावीकडे असलेली तटबंदी चांगलीच लांबलचक असुन त्यात दोन बुरुजात बांधलेला भव्य दरवाजा आहे. या दरवाजाची वरील बाजु नष्ट झाली असली तरी शिल्लक अवशेषातून त्याची भव्यता लक्षात येते. या वास्तुची तटबंदी,त्यातील चार बुरुज व दरवाजा वगळता आतील अवशेष पुर्णपणे नष्ट झाल्याने हा भुईकोट कि सराई याचा बोध होत नाही. तटबंदी बाहेर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने धडपणे फिरता येत नाही पण दरवाजाजवळ दोन व कोपऱ्यात एक असे तटातील तीन बुरुज पहाता येतात. याशिवाय वाटेवर एक भग्न बुरुज व दुसऱ्या बाजुस या कोटाची उर्वरीत तटबंदी पहाता येते. हे संपुर्ण बांधकाम मोठमोठ्या ओबडधोबड दगडांनी बांधले असुन बांधकाम सांधण्यासाठी चुन्याचा वापर करण्यात आला आहे. हि वास्तु नगरकोटापासुन पुर्णपणे स्वतंत्र असुन हा कोट अथवा सराई असावी असे वाटते. किल्ला व नगरकोट पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. आता थोडे शिवणा गावाच्या इतिहासाकडे वळूया. ग्याझेटीयरमध्ये शिवणा येथे किल्ला असुन या किल्ल्यात खराब झालेले पाण्याचे टाके असल्याची नोंद येते. मुघल राजवटीत म्हणजे औरंगजेबच्या काळात शिवणा हे गाव घैसुद्दिन खान बहादुर यांना जहागीर म्हणुन होते. त्यांनीच या कोटाची बांधणी केली असावी. खानदेशातून मराठवाड्यात प्रवेश केल्यावर जालना-बुलढाणा येथे जाताना शिवणा गाव या मार्गावरील महत्वाचे ठिकाण होते. त्यामुळे या मार्गाचे रक्षण करण्यासाठी येथे गढीवजा किल्ला अथवा व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी सराई बांधण्यात आली असावी. स्थानिकांना या जागेचा काहीही इतिहास ठाऊक नसला तरी या जागेला ते पूर्वापार किल्ला म्हणुनच ओळखतात व या किल्ल्याला चार टोकाला चार बुरुज असल्याचे सांगतात.
© Suresh Nimbalkar