शिरूर कासार

प्रकार : गढी

जिल्हा : बीड

बीड शहराच्या आसपास गढीकोटांची भटकंती करताना आपल्याला असंख्य लहानमोठ्या गढी पहायला मिळतात. यात्तील काही गढी आजही सुस्थितीत आहेत तर बहुतांशी गढी त्यांचे उरलेसुरले अवशेष कवटाळुन काळाशी झुंजत आहेत. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्याच्या ठिकाणी काळाशी झुंजत असलेली अशीच एक गढी आपल्याला पहायला मिळते. फारच थोडे अवशेष शिल्लक असलेली हि गढी काही काळाचीच सोबती आहे असे या गढीच्या बाबतीत म्हणता येईल. शिरूर कासार हे तालुक्याचे ठिकाण बीड शहरापासुन ४० कि.मी. अंतरावर असुन अहमदनगर या शहरापासुन ९० कि.मी. अंतरावर आहे. गावात हि गढी कोणालाच परिचित नसल्याने आपण गढीची विचारणा न करता नगर पंचायत कार्यालयाची चौकशी करावी. नगर पंचायत कार्यालयासमोर असलेली झुडूपानी भरलेली लहानशी टेकडी म्हणजेच शिरूर कासार गढी. एका लहानशा टेकडीवर असलेली हि गढी पूर्णपणे उध्वस्त झाली असुन या टेकडीवर गढीचे केवळ दोन मातीचे बुरुज शिल्लक आहेत. ... या संपुर्ण टेकडीवर , त्यावर असलेल्या अवशेषांवर तसेच शिल्लक मातीच्या बुरुजांवर मोठय प्रमाणात काट्याची म्हणजेच बाभळीची झाडे वाढलेली आहेत. टेकडीवरील गढीचे अवशेष पाहण्यासाठी या काट्यातुन वाट काढत टेकडीवर जावे लागते. गढीचा मुख्य दरवाजा जमिनीलगत असुन आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. हा संपुर्ण दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन उत्तराभिमुख आहे. दरवाजा साधारण १५ फुट उंच असुन या दरवाजाची कमान वगळता उर्वरित अवशेष आजही बऱ्यापैकी शिल्लक असल्याने या दरवाजाचे बांधकाम पाहुन गढीच्या भव्यतेची कल्पना करता येते. उर्वरित भागात मातीचे दोन बुरुज व वरील भगात मातीची तटबंदी व भिंत वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. मातीच्या या अवशेषांवर देखील मोठ्या प्रमाणात काटेरी झाडी उगवलेली आहे. गढीचा इतर कोणताही अवशेष शिल्लक नसल्याने २० मिनिटात आपले गढीचे दर्शन पुर्ण होते. गढीच इतिहास कोठेही माझी वाचनात आला आला नाही तसेच स्थानिक देखील या गढीच्या इतिहासाबद्दल अनभिज्ञ आहे. एका स्थानिकाने मात्र हि गढी गाडेकर पाटील यांची असल्याचे सांगितले पण त्याची गढीबाबत माहीती यापुढे सरकू शकली नाही. त्याने सांगितलेल्या गाडेकर पाटील या नावाला देखील इतर कोणी दुजोरा दिला नाही. त्यामुळे हि माहिती कितपत खरी याबाबत सांशकता आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!