शिरगाव

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्राला साडेसातशे कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. कधीकाळी या किनारपट्टीवर ८४ बंदरे अस्तित्वात होती. यातील पूर्वीचे शुर्पारक व वाच्छाईपूर म्हणजे आताचे सोपारा व वसई ही जागतिक दर्जाची व्यापारी बंदरे होती. या बंदरातून बोटींनी सा-या जगभर व्यापार चाले. या व्यापारी मालाच्या संरक्षणासाठी, टेहळणीसाठी, जकातीसाठी व आरमारी संरक्षणासाठी तसेच येथील जनतेच्या संरक्षणासाठी सातवाहन काळापासुन वेगवेगळ्या राजवटीत भुईकोट व पाणकोट किल्ल्यांची निर्मिती केली गेली. या बंदरांचे महत्त्व ओळखून पोतृगीजांनी येथली सारी किनारपट्टी व पाणकोट तसेच भुईकोट आपल्या ताब्यात घेतले. यातील पोतृगिजांनी बांधलेला असाच एक भुईकोट पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे पेशवे व मराठय़ांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही ठामपणे उभा आहे. पालघर स्टेशन ते शिरगाव हे अंतर सात कि.मी. असुन गावात मुख्य रस्त्याला लागूनच शिरगावचा किल्ला आहे. ... किल्ल्याच्या तीनही बाजुस कोळी बांधवांची वस्ती असुन पश्चिम बाजुला अरबी समुद्र पसरला आहे. पुर्वी समुद्राचे पाणी या किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत येत असावे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन एका गोलाकार बुरुजाच्या आधारे बांधलेल्या या दरवाजाची बांधणी पोर्तुगीज धाटणीची आहे. बुरुजाच्या वरील बाजुस टेहळणीसाठी मनोरा बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस काटकोनात दुसरा दरवाजा बांधलेला असुन मधील चौकात पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. कधीकाळी या चौकाच्या वरील भागात अजुन दोन मजले असल्याचे दिसून येते. दोन्ही दरवाजावरील दुसऱ्या मजल्यांवर दालने निर्माण करून सहा खिडक्या ठेवलेल्या आहेत. पहिल्या दरवाजाने आत शिरल्यावर काटकोनातील दुसरा दरवाजा पार करून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दुसऱ्या दरवाजाने आत शिरल्यावर उजवीकडील भिंतीच्या तळाशी काही झीज झालेली शिल्प दिसतात. यातील एका दगडावर १७१४ हे साल कोरलेले दिसते. किल्ल्याच्या पुनर्रबांधणीत हे जुने दगड किल्ल्याच्या भिंतीच्या पायात गेले असावेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुस पाण्यासाठी बांधलेला एक मोठा हौद असुन जवळच एक कोठार आहे. किल्ल्याचा आतील परिसर बहुतांशी मोकळा असुन बहुतांशी वास्तु या तटबंदीजवळ वा तटबंदीखाली बांधलेल्या आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजुस एका वास्तुचे अवशेष असुन तटावर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने बुरुजावर गेल्यावर एक तोफ पहायला मिळते. किल्ल्याचा परिसर साधारण एक एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकूण पाच बुरूज आहेत. यातील चार टोकाला अष्टकोनी बुरुज असून पाचवा दरवाजाजवळ असलेला बुरुज अर्धगोलाकार आहे. किल्ल्याचा तट व बुरूज आजही चांगल्या अवस्थेत असुन त्याची उंची तीस-बत्तीस फूट तर रुंदी आठ-दहा फूट आहे. या तटावर चढण्या-उतरण्यासाठी दगडी जिने बांधले आहेत. किल्ल्याच्या बुरुजांवर असलेल्या मनोऱ्यामुळे किल्ल्याला राजवाडय़ाचे स्वरूप आलेले आहे. मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजुस असलेल्या जिन्यावरुन दरवाजा समोरील बुरुजावर जाता येते. या बुरुजाच्यावर टेहळणी मनोरा आहे. एका वेळी एक माणूस जाऊ शकेल अशा वर्तुळाकार जिन्याने दोन मजली मनोर्यारत जाता येते. या मनोर्याततून प्रवेशद्वार व आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. या मनोर्याुतुन बाहेर पडुन तटावरून दरवाजाकडील बुरुजावरच्या मनोर्यादत जाता येते. किल्ल्याच्या पश्चिम व उत्तर तटात बरीच दालने पाहण्यास मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीत एक लहान दरवाजा पहायला मिळतो. त्याच्या उजव्या बाजूस तटबंदीत दुमजली खोल्या असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आतुन जिना आहे. या दरवाजाच्या उजव्या बाजूस धान्य कोठाराचे अवशेष आहेत. याशिवाय इतर मराठा किल्ल्यांवर सहसा न आढळणारे टेहळणीचे मनोरे हे या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे. किल्ल्याच्या फांजीवरुन किल्ल्याची प्रदक्षिणा करताना दुरवर पसरलेल्या अथांग सागराचे तसेच उत्तरेस सातपाटी बंदराचे दर्शन होते. शिरगाव किल्ला पहाताना एक परिपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान मिळते. संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. शिरगाव किल्ल्याची उभारणी पोर्तुगीजांनी केली असल्याने त्याचा बहुतांशी इतिहास त्यांच्याशीच संबंधीत आहे. पोर्तुगीजांचा अंमल येथे सुरू होताच त्यांनी येथे प्रचंड हैदोस घातला. हिंदुंचा छळ,अत्याचार, गुलामगिरी, धर्मपरिवर्तन याला ऊत आला. पोर्तुगीजांवर दहशत बसविण्यासाठी संभाजीराजांनी या भागातील इतर किल्ल्यांवर हल्ले केले असता या किल्ल्यावर देखील हल्ला चढवला पण किल्ला ताब्यात घेता आला नाही. पेशवेकाळात पुण्यात पेशव्यांच्या कानी पोर्तुगीजांच्या या अत्याचाराची माहिती जात होती. शेवटी या प्रकरणाचा कायमचा निकाल लावण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी चिमाजी आप्पा यांना प्रचंड सैन्य सामग्रीसह पोर्तुगीजांचे पारिपत्य करण्यासाठी वसईला पाठवले. चिमाजी आप्पांनी दोन वर्षाच्या मोहिमेत नुसती वसईच मुक्त केली नाही तर पोर्तुगीजांच्या वसईला वेढा घालून तलासरीपासून ते वर्सोवा-मढपर्यंतचा मुलुख जिंकून उत्तर कोकणातुन पोर्तुगीजांचे समुळ उच्चाटन केले. पोर्तुगीजांच्या ताब्यातील या शिरगाव किल्ल्यावर चिमाजी आप्पांनी १७ नोव्हेंबर १७३७ला मल्हारराव हरिदास यांना किल्ला ताब्यात घेण्यासाठी पाठवले. एक, दोन दिवस नाही तर डिसेंबर संपत आला तरी शिरगावचा किल्ला फत्ते होत नव्हता. शेवटी मराठय़ांनी २८ डिसेंबरला १७३७ ला शिरगावचा वेढा उठवला. पण लगेचच नव्या दमाने मराठय़ांनी सन १७३९च्या सुरुवातीला जानेवारीमध्ये शिरगावचा वेढा आवळला. २२ जानेवारी १७३९ला पोर्तुगीजांनी मराठय़ांसमोर शरणागती पत्करून शिरगावचा किल्ला मराठय़ांच्या हवाली केला. या युद्धात पराजय होऊन हाती लागलेल्या पोर्तुगीजाना मराठय़ांनी कैद करून बंदिवान केले. या मोहिमेमुळे शिरगावसह संपूर्ण उत्तर कोकण सन १७३९ मध्ये मराठय़ांच्या ताब्यात आले. १७७२ मध्ये शिरगाव किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आली. पेशवाईच्या अस्तानंतर इतर गडांप्रमाणे १८१८ मध्ये हा शिरगावचा भुईकोट न लढताच इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!