व्यारा
प्रकार : भुईकोट
जिल्हा : तापी
उंची : 0
श्रेणी : सोपी
सुरत किल्ला व त्याच्या परीसरात असणाऱ्या इतर किल्ल्यांची भटकंती करताना सुरत पासुन सर्वात जवळ असलेला मराठमोळा किल्ला म्हणजे व्यारा किल्ला. व्यारा हा तापी जिल्ह्यातील तालुका असुन या तालुक्याच्या शहरातच व्यारा किल्ला मध्यभागी उभा आहे. किल्ल्याला वेगळे असे नाव नसुन व्यारा शहरात हा किल्ला गायकवाडांचा किल्ला म्हणुन ओळखला जातो. व्यारा किल्ल्यास भेट देण्यासाठी मुंबई-पुणे येथुन सर्वप्रथम सुरत गाठावे. सुरत-व्यारा हे अंतर ६५ कि.मी. असुन सुरत बस स्थानकातून व्यारा येथे जाण्यासाठी भरपुर बसेस आहेत. व्यारा बस स्थानकापासुन किल्ला १ कि.मी. अंतरावर असुन चालत जाण्यासाठी १० मिनीटे पुरेशी होतात. व्यारा शहराच्या मध्यभागी एका लहानशा टेकडीवर असलेला हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन त्यांनी त्याची निगा राखल्याने आजही सुस्थितीत आहे. किल्ल्याचा परिसर साधारण पाउण एकरवर पसरलेला असुन तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत.
...
यातील पाच बुरुज गोलाकार तर दोन बुरुज चौकोनी आकाराचे आहेत. पुर्वाभिमुख असलेला किल्ल्याचा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला असुन दक्षिण दिशेला तटबंदीत दुसरा लहान दरवाजा आहे. या दोन्ही दरवाजाची लाकडी दारे आजही सुस्थितीत असुन मुख्य दरवाजाला दुसरा लहान दिंडी दरवाजा आहे. या दोन्ही दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. तटबंदी व बुरूजाचा खालील भाग ओबडधोबड दगडांनी चुन्यात बांधलेला असुन वरील भाग विटांनी बांधलेला आहे. खालील दगडी भाग हा गोलाकार असुन विटांनी बांधलेला वरील भाग मात्र अष्टकोनी आहे. किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत असल्याने संपुर्ण तटावरून फेरी मारता येते. तटाखालून फेरी मारताना तटबंदीच्या आत असलेली काही दालने पहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर गोलाकार आकाराचा तीन मजली बुरुज असुन या बुरुजात वर जाण्यासाठी गोलाकार दगडी जिना आहे. या बुरुजात प्रत्येक मजल्यावर रहाण्यासाठी दालने आहेत. या बुरुजावरून संपुर्ण व्यारा शहर नजरेस पडते. मध्ययुगीन काळातील किल्ल्याचे बांधकाम व त्यातील वास्तु पहायच्या असल्यास व्यारा किल्ला हे उत्तम उदाहरण आहे. पेशवेकाळात बडोदा शहर व त्याच्या आसपासचा प्रांत यावर मराठयांचा अमंल होता. त्यासाठी पिलाजी गायकवाड यांची येथे नेमणूक होती. व्यारा शहरावर १७२१ ते १९४९ पर्यंत बडोद्याच्या गायकवाडांनी राज्य केले. इ.स. १७३०-३५ या काळात व्यारा किल्ल्याची बांधणी करण्यात आली. त्यानंतर ब्रिटीश काळात बडोदा हे एक संस्थान म्हणुन उदयास आले. भारत स्वतंत्र झाल्यावर १० जून १९४८ रोजी हा भाग भारतीय संघराज्यात सामील झाला.
© Suresh Nimbalkar