वैरागड

प्रकार : भुईकोट

जिल्हा : गडचिरोली

उंची : O फुट

श्रेणी : सोपी

गडचिरोली जिल्ह्यात बहुतांशी दुर्गप्रेमीना ज्ञात असलेला एकमेव भुईकोट म्हणजे वैरागड किल्ला. किंबहुना गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यातील आपले अस्तित्व जाणवुन देणारा सर्वात सुस्थितीतील किल्ला म्हणजे वैरागड असेच या किल्ल्याचे वर्णन करता येईल. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणुन प्रसिद्धी मिळाल्याने या भागात दुर्गभटक्यांची पाउले कधी वळलीच नाहीत. या भागातील नक्षलवाद आता ओसरला असला तरी पर्यटनाची ठिकाणे फार कमी असल्याने भटक्यांची या भागात तशी वानवाच आहे. आमच्या गडचिरोली दुर्गभ्रमंतीमध्ये आम्ही या अपरिचीत दुर्गांचा मागोवा घेत त्यांचे नष्ट होत चाललेले अस्तित्व लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात वैरागड किल्ला वसलेला आहे. खोब्रागडी व सातनाला नद्यांच्या संगमावर असलेला हा किल्ला कधीकाळी गोंड वंशातील राजा विराट याची राजधानी असल्याचे स्थानिक सांगतात पण त्यास ठोस पुरावा उपलब्ध नाही. मुळात या किल्ल्याचे नाव वज्रगड असुन वैरागड हे त्याचे अपभ्रंशीत रूप असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ... वैरागड हे गाव किल्ल्याबाहेर वसलेले असुन आरमोरी या तालुक्याच्या ठिकाणाहुन १५कि.मी. तर गडचिरोली येथुन ४० कि.मी.अंतरावर आहे. किल्ल्याच्या आसपास आता वस्ती वाढत असल्याने हि संपुर्ण वस्ती पार करुनच आपण किल्ल्याच्या प्रवेश मार्गावर पोहोचतो. वैरागड किल्ला पुर्णपणे खंदकाने वेढलेला असुन या खंदकाची रुंदी ३० फुट ते ५० फुटापर्यंत आहे. किल्ल्याचा परिसर २२ एकरपेक्षा जास्त असुन किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आपण खंदकाबाहेर असलेल्या दरवाजा जवळ पोहोचतो. पुर्वाभिमुख असलेल्या या दरवाजाची काळाच्या ओघात पडझड झालेली असुन त्या शेजारील तटबंदी व दरवाजाची कमान आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. किल्ल्याबाहेरील खंदक काही ठिकाणी अर्धवट बुजला असला तरी पुर्व व उत्तरेकडील खंदक आजही पुर्णपणे शिल्लक असुन त्यात बऱ्यापैकी पाणी असते. पुर्वी येथुन किल्ल्यात प्रवेश करण्याकरता तात्पुरता लाकडी पूल असावा. दरवाजाच्या समोरील बाजुस म्हणजे खंदकाच्या आत किल्ल्याचा कोपऱ्यावर मोठ्या आकाराचा बुरुज असुन त्या बुरुजावरून या दरवाजावर व पुलावर लक्ष ठेवले जात असावे. खंदकाचा हा भाग आता मातीचा भराव टाकुन बुजवलेला असुन या वाटेने आपण बुरूजाखाली खंदकातील रेवणीवर पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा येथुन ४०० फुट आत तटबंदीच्या मध्यवर्ती भागात बांधलेला आहे. खंदकातील रेवणीवरून दरवाजाकडे जाणारी ही वाट तटबंदीवरून पुर्णपणे माऱ्याच्या टप्प्यात असुन या वाटेच्या संरक्षणासाठी या तटबंदीमध्ये चौकोनी आकाराचे दोन बुरुज बांधलेले आहेत. तटाची उंची साधारण २० ते २५ फूट आहे. या तटाच्या बांधकामात काही ठिकाणी मंदिराच्या बांधकामातील मुर्ती व कोरीव दगड पहायला मिळतात. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार देखील पुर्वाभिमुख असुन त्याच्या आतील दुसरे प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. बाहेरील दरवाजाशेजारी चौकोनी आकाराचा बुरुज असुन त्यात मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. दोन दरवाजामधील या भागात शत्रुला घेरण्यासाठी रणमंडळाची रचना असुन त्यात किल्ल्याची सदर पहायला मिळते. किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असला तरी दरवाजाजवळ केलेली थोडीफार दुरुस्ती वगळता त्यांचे इतरत्र कोठेही अस्तित्व दिसुन येत नाही. आतील दरवाजा आजही सुस्थितीत असुन त्याच्या बाहेरील कोनाड्यात श्रीगणेशाची स्थापना केलेली आहे. दरवाजा वरील चर्यांची काही प्रमाणात पडझड झालेली असुन एक बाजुचा मिनार आजही शिल्लक आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर तटाला लागुन दोन्ही बाजुस चौथरे असुन या चौथऱ्यावर दोन-दोन दालने आहेत. यातील एका चौथऱ्यावरून दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाच्या वरील भागातुन संपुर्ण किल्ल्याचे व बाहेरील प्रदेशाचे दूरपर्यंत दर्शन होते. किल्ल्याच्या आतील भागात खुप मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन त्याने किल्ल्याचा बहुतांशी भाग व्यापलेला आहे. दरवाजापासून काही अंतरावर तटाला लागुन पडझड झालेला महाल व त्याचे हवा खाण्याचे दोन मनोरे आहेत पण पायऱ्या तुटल्याने त्यावर जाता येत नाही. हे अवशेष पाहुन झाल्यावर दरवाजाच्या डावीकडुन आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. किल्ला पहायला येणारे या वाटेचा वापर करत असल्याने वाट मळलेली आहे. वाटेच्या सुरवातीस पाण्याने भरलेली अष्टकोनी आकाराची विहीर असुन या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विहिरीच्या काठावर असलेला बांधीव दगडी पाट पहाता येथुन पाणी किल्ल्यावर फिरवले जात असावे. पुढे जाताना वाटेत उघड्यावर पडलेले शिवलिंग पहायला मिळते. पुढे आल्यावर जमिनीलगत दुमजली दगडी बांधकामातील पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीतील कमानीदार सज्जे पहाता या विहिरीचा वापर पाणी व थंड हवा या दोन्हीसाठी होत असावा. वाटेच्या उजवीकडील तटबंदीत ठिकठीकाणी तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीत मोठ्या प्रमाणात अवशेष विखुरलेले आहेत पण ते नीटपणे पहाता येत नाहीत. पुढे एका वाड्याचा चौथरा असुन त्यावर देखील झाडी वाढलेली आहे. या झाडीतुन वाट काढत आपण किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. सध्या हा दरवाजा दगडांनी चिणून अर्धा बंद करण्यात आला आहे. हा दरवाजा देखील दुहेरी तटबंदीने बंदीस्त केलेला असुन त्यावर चढुन बाहेर गेले असता हि दुहेरी तटबंदी पहाता येते. येथुन पुढे आल्यावर तटावर जाण्यासाठी वाट असुन या वाटेने वर आले असता बुरुजावर शेंदूर फासलेली हनुमानाची मुर्ती आहे. येथुन पुढे असलेल्या तटाची आतील बाजुने पडझड झाली असली तरी त्यावरील चर्या मात्र आजही शिल्लक आहेत. येथुन किल्ल्याच्या पुढील तटबंदीत असलेल्या चौकोनी बुरुजाचे दर्शन होते पण झाडी वाढल्यामुळे या बुरुजावर जाता येत नाही. वाटेने सरळ पुढे आल्यावर झुडूपात लपलेली चौकोनी आकाराची विहीर असुन या विहिरीच्या काठावर पाणी वाहून नेण्यासाठी पाट आहे. या पाटाच्या टोकावर अष्टकोनी आकाराचा बुजलेला हौद आहे. विहिरी समोर झाडीत उध्वस्त शिवमंदीर असुन या मंदीराचे कोरीव अवशेष व मुर्ती झाडीत पडलेल्या आहेत. या मुर्तीची एकुण घडण व त्यावरील मुकुट पहाता हे मंदीर राष्ट्रकुट कालीन असावे. पुढे आल्यावर उजवीकडे दोन बाजुस पायऱ्या असलेला चौकोनी हौद असुन या हौदाच्या आतील भागात गोलाकार आकाराची खोल विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी तोंडावर लांब दगडी लाद्या ठेवण्यात आल्या आहेत. या विहिरीचे पाणी आजही पिण्यायोग्य आहे. येथुन पुढे किल्ल्याच्या दरवाजाकडे जाताना वाटेत चुन्याच्या घाण्याचे चाक पहायला मिळते. पुढे आपण प्रवेश केलेल्या ठिकाणी किल्ल्याच्या दरवाजात पोहोचल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. वैरागड किल्ला फिरताना हा किल्ला गोंडवाना साम्राज्यातील एक प्रमुख किल्ला असल्याचे जाणवते. मध्ययुगीन काळात विदर्भावर वेगवेगळ्या राजसत्ता प्रस्थापित झाल्या व त्यांनी येथे किल्ले बांधले. सहाव्या शतकात या भागावर राष्ट्रकूट राजांचे राज्य होते. गोंड राजवटीचा उदय इ. स. १३ व्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ३५० वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली भागात मध्ययुगीन कालखंडात साधारण २० किल्ले बांधले. १५ व्या शतकात वैरागड येथे असलेल्या हिऱ्याच्या खाणीच्या संरक्षणार्थ चंद्रपूरचा गोंडराजा बल्हाळशहाने वैरागडचा किल्ला बांधला असे मानले जाते. हिऱ्याच्या खाणीची लूट करण्यासाठी होणाऱ्या स्वाऱ्याना प्रतिबंध करण्यासाठी राजा बल्हाळशहाने हा किल्ला बांधला पण पुढे हिऱ्याच्या खाणीचे काम बंद पडले व या किल्ल्याचे महत्व कमी झाले. तर काहींच्या मते नागवंशीय माना जमातीचा राजा कुरूम प्रहोद याने वैरागड किल्ला व येथील गोरजाईचे मंदिर एकाच कालखंडात बांधले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!