वेहेळे कोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते कल्याण या सागरी मार्गावर असलेल्या उल्हास खाडीच्या काठावर त्यांनी बांधलेले अनेक लहान-लहान कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. भिवंडी-कल्याण या दोन किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात डोंबिवली जवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला वेहेळे हा असाच एक लहानसा कोट. कोट लहानसा असला तरी त्याचे स्थान पहाता सामरिकदृष्ट्या तो महत्वाचा दुवा असावा. ठाणे-नाशिक महामार्गावर असलेल्या माणकोली फाटा येथुन हा किल्ला ३ कि.मी. अंतरावर असुन खाजगी रिक्षाने वेहेळे गावात वा गावाबाहेरील स्मशानापर्यंत जाता येते. आता या कोटात काफ्रोबा या देवतेची स्थापना झाली असल्याने गावात कोटाची चौकशी करताना काफ्रोबा मंदिर म्हणुन चौकशी करावी. वेहेळे गावाबाहेरील स्मशानाकडून एक कच्चा रस्ता डावीकडे खाजणातुन उल्हास खाडीच्या दिशेने जातो. या कच्च्या रस्त्याने साधारण अर्धा कि.मी.चालत गेल्यावर डाव्या बाजुस झाडाझुडुपांनी वेढलेला वेहेळे कोट नजरेस पडतो. ... या ठिकाणी खाडीवर वेहेळे बंदर असुन या बंदरावरून डोंबिवली-वेहेळे अशी फेरीबोट चालते. पोर्तुगीजांनी बांधलेल्या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. साधारण ३०x २० फुट आकाराचा हा दुमजली कोट असुन याचा वरील भाग आज पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. या कोटाच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा व चिखलमाती याचा वापर केलेला असुन भिंतींना आतील बाजुने चुन्याचा गिलावा केलेला आहे. कोटाच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी खोबण्या दिसुन येतात. सद्यस्थितीत १५ फुट उंचीच्या या वास्तुची मूळ उंची २० ते २५ फुट असावी.या वास्तुचे स्थान व बांधकाम पहाता हि वास्तु टेहळणीचे महत्वाचे ठिकाण असावे. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि जहाजाच्या संरक्षणासाठी होत असावा.कोटात देवता स्थापन झाल्याने त्याची पुढील दुर्दशा थांबली आहे. कोट अतिशय लहान असल्याने पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात. पोर्तुगालशी जलमार्गाने थेट संबंध ठेवता यावा यासाठी त्यांनी बहुतांशी कोट समुद्रकिनाऱ्यावरच बांधले. वसई ते कल्याण दरम्यान असलेले उल्हास खाडीवरील हे कोट खाडीच्या काठाने बांधलेले आहेत. कोटाच्या जवळच उल्हास खाडीचे पात्र असुन खाडीच्या दुसऱ्या बाजूस असलेले डोंबिवली शहर नजरेस पडते. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमे दरम्यान हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!