वेळणेश्वर
प्रकार : मध्ययुगीन शिवमंदीर
जिल्हा : रत्नागिरी
वेळणेश्वर या समुद्रकाठच्या निसर्गसंपन्न गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागरमधील पर्यटनस्थळात वेळणेश्वरचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. वेळणेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा हा परीसर नितांत रमणीय आहे. वेळणेश्वर मुंबईपासुन २९० किमी तर पुण्यापासुन ३०६ किमी अंतरावर आहे. गुहागर ते वेळणेश्वर हे अंतर साधारणपणे २० किमी आहे. चिपळूणहुन गुहागरला जाताना गुहागरआधी डावीकडे मोडका आगारमार्गे वेळणेश्वरला जाता येते. सुमारे १२०० वर्षांपूर्वीपासूनचा वेळणेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजेच या गावाचा इतिहास आहे. सभोवताली नारळ-पोफळीच्या बागा, स्वच्छ समुद्रकिनारा आणि लाटांच्या गाजेच्या आवाजाने या गावाचे वेगळेपण जाणवते. वेळणेश्वर मंदीर समुद्रकिनारी वसलेले असुन हे घाग,गोखले,गाडगिळ कुटुंबीयांचे कुलदैवत आहे. वेला म्हणजे समुद्रकिनारा आणि त्याच्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर अशी या नावाची उत्पत्ती आहे.
...
येथील गावकऱ्यांच्या माहीतीप्रमाणे १२व्या शतकात इथे वेळोबा देवाचे छोटे मंदिर होते. या मंदिराचा मुख्य गाभारा आजही १२व्या शतकातील आहे. सुमारे ४०० वर्षापूर्वी गाडगीळ नामक गृहस्थाने स्वखर्चाने आताचे मंदिर बांधले. मंदिर आवार प्रशस्त असुन त्यात २४ फुट उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर ओट्यावर चारही बाजूने एकमुख असणारा पितळी मुखवटा आणि त्यावर पाच फण्याचा पितळी नाग आहे. गाभाऱ्यात तीन फुट लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवटा ठेवून पोशाख घालतात. या शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीमागे कोनाड्यात पार्वती व गणपतीची मुर्ती आहे. गाभाऱ्याबाहेर कालीमाता, कृष्ण, महिषासुरमर्दिनी यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल रखुमाईची पाषाणमूर्ती आहे. मुख्य मंदिराला लागुनच काळभैरव, गणपती व लक्ष्मिनारायण मंदिरे आहेत. स्थानिक लोक काळभैरवाला कौल लावतानाचा सोहळा पाहण्यासारखा असतो.वेळणेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच काही हॉटेल्स आहेत याशिवाय वेळणेश्वर भक्त निवासातही रहाण्याची उत्तम सोय होऊ शकते. अशा या निसर्गरम्य ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायला हवी.
© Suresh Nimbalkar