वेताळवाडीगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : औरंगाबाद

उंची : २०३० फुट

श्रेणी : मध्यम

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील अनेक लहान-मोठय़ा डोंगरमाथ्यांना विविध राजसत्तांच्या कालखंडात गड-किल्ल्यांचे साज चढले. यापैकीच एक किल्ला म्हणजे वेताळवाडी उर्फ वसईचा किल्ला. किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शिल्लक असल्याने अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला गडप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. वेताळगडाबरोबर जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाता येतात. औरंगाबाद -अजिंठा- जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर-चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी असुन सोयगावातुन सहा आसनी रिक्षाने वेताळवाडी गडाच्या दरवाजापर्यंत जाता येते. वेताळवाडी गावाजवळ येताच समोरच्या डोंगरावरचे तटबुरूजांचे अवशेष आणि गडावरच्या वास्तू स्पष्ट दिसू लागतात. गडाच्या डोंगराला वळसा घालून हळद्या घाटानं किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी जाता येते. ... वेताळवाडी किल्ल्याचे इथून एक सुरेख दर्शन घडते. डोंगर उताराला बांधलेली लांबलचक तटबंदी आणि बुरुज, समोर दोन बलदंड बुरुजात दडविलेला दरवाजा आणि उजवीकडे वर चढत जाणारी भक्कम तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. गडाच्या दरवाजाशेजारी दोन मोठे बुरुज असुन या दोन बुरूजामागे नक्षीदार सज्जा असणारे त्यांच्यापेक्षा उंच व मोठे बुरुज आहे. वेताळवाडी किल्ल्याच्या दरवाजाची रचना थोडी वेगळी आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाबाहेर बुरुजांच्या पुढे जिभी बांधण्यात आली आहे. जिभी म्हणजे मुख्य दरवाजापुढे उभारलेली एक भिंत. जेणेकरून शत्रुचा हल्ला झाल्यास थेट दरवाजावर हल्ला करता येऊ नये अशी रचना. या दोन बुरुजामधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख दरवाजाकडे जाते. डावीकडच्या बुरुजाच्या तळात एक लहान दरवाजासारखे बंद बांधकाम दिसते पण त्याचा उपयोग लक्षात येत नाही. हा दरवाजा जंजाळा किल्ल्याच्या दिशेने असल्याने जंजाळा दरवाजा म्हणुन ओळखला जातो. साधारण २० फुट उंचीच्या या दरवाजावर दोन्ही बाजूस शरभ कोरलेले असुन आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी प्रशस्त देवड्या आहेत. दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला दरवाजाच्या बुरुजावर जाण्यासाठी पाय-या आहेत. बुरुजाच्या वरील बाजुस आत उतरणारा एक लहान जिना असुन हा जिना आपल्याला बुरुजातील कोठारात घेऊन जातो. दरवाजावर उभे राहिल्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी,गडाखालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. हा दरवाजा पार करून आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्याची संपुर्ण माची अंदाजे २०-२५ फूट उंच तटबंदीने संरक्षित केली आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी प्रत्येक तट-बुरुजात जंग्या ठेवलेल्या आहेत. इथून वरील बाजुस वेताळवाडी किल्ल्याचा बालेकिल्ला व त्याची तटबंदी दिसते. दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक प्रचंड मोठे खांबटाकं आहे. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन गडाला फेरी मारण्यासाठी उजवीकडे वळायचं. ह्या वाटेच्या सुरुवातीलाच उजवीकडे बुरुजात एक छोटा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या पाय-या उतरून खालच्या भागात गेल्यवर किल्ल्याच्या बुरुजामध्ये हवामहल सारखी सुंदर खोली बांधून काढलेली दिसते. गडाबाहेरून नक्षीदार सज्जा दिसणारा बुरुज हाच बुरुज आहे. अतिशय कल्पक अशी ही रचना दुर्ग निर्मात्याच्या रसिकपणाची दाद देते. उजवीकडे वर तिरपी चढत गेलेली तटबंदी आणि शेवटाला एक बुरुज व त्यावर असलेले झाड नजरेस पडते. तटबंदीतील पूर्व टोकाचा हा बुरुज तटबंदीपासुन थोडासा सुटावलेला आहे. या बुरुजावर जाण्यासाठी आठ-दहा पायऱ्या आहेत. इथून अजिंठा डोंगररंग व डावीकडच्या डोंगररांगेत रुद्रेश्वर लेणी दिसुन येतात. या बुरुजावरून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर दहा मिनिटात बालेकिल्ल्याच्या बुरुजाला वळसा घालून आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ला दक्षिणोत्तर लंबवर्तुळाकार पसरलेला असुन येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे. बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ सुंदर नक्षीकाम व छ्ताला झरोका असणारी हमामखान्याची घुमटाकार वास्तू आहे. हा हमामखाना भिंतीतील खापरी नळ्यावरून लक्षात येतो. मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले रांजणटाके (बळद) पहायला मिळतात. इथे झाडीझुडुपातून वाट काढत आपण समोरच्या एका इमारतीपाशी पोहोचतो. हि इमारत म्हणजे गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. या इमारतीसमोर एका भग्न वाड्याचे अवशेष आहेत. पुढे गेल्यावर नमाजगीर नावाची सुंदर नक्षीकामाने व कमानीने सजलेली इमारत (मस्जिद) आहे. त्याच्या भिंतीवरचे निजामाचे चिन्ह आपल्याला गतकाळातील निजामशाहीच्या वर्चस्वाची जाणीव करून देते. नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर असुन समोर एक प्रचंड मोठा बांधीव हिरव्या पाण्याने भरलेला तलाव आहे. सध्या किल्ल्यावरचा हा एकमेव पाण्याचा स्त्रोत असला तरी यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. पुढे पश्चिमेकडे किल्ल्याची निमुळती होत जाणारी माची असून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील या उत्तर टोकावर बारदरी उर्फ हवामहल नावाची सुंदर बांधकाम केलेली २ कमान असलेली इमारत आहे. राजघराण्यातील स्त्रियांना वारा खाण्यासाठी खास तयार केली गेलेली ही वास्तू आहे. ह्या वास्तूच्या आत कोणतही बांधकाम नाही. या इमारतीकडे जाताना डाव्या बाजूला सदरेची एक इमारत आहे. बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याच्या भक्कम बुरुज असणारा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाण्यासाठी बारदरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे लागते. खाली उतरून सपाटीवर आल्यानंतर समोर तटबंदीच्या चर्या दिसतात. येथे एक बुजलेले टाके असुन त्याच्या बाजूला ७ फुट लांबीची तोफ पडली आहे. इथे समोरच उजव्या बाजूच्या तटबंदीतील पाय-या उतरल्यावर वेताळवाडी किल्ल्याचा चोर दरवाजा लागतो. दरवाजातून आत गेल्यावर वरील बाजुस बुरुज असून खाली बांधीव खंदक आहे. चोर दरवाजा बघून किल्ल्याच्या वेताळवाडी दरवाजाकडे निघावे. दोन दरवाजांच्या समूहातील पहिला दरवाजा साध्या बांधणीचा आहे. त्याच्याच पुढे मुख्य वेताळवाडी दरवाजाला जाणारी वाट असून हा पश्चिमाभिमुख दरवाजा दोन्ही बाजूंनी अजस्त्र तट व बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. दोन दरवाजाच्या मधील भागात देवड्या आहेत. दरवाजाच्या पाय-या उतरून बाहेर पडुन पाहिल्यावर दरवाजाची भव्यता दिसुन येते. आजही उत्तम स्थितीत असलेल्या या दरवाजाच्या संरक्षक बुरुजावर शरभशिल्प कोरलेली आहेत. येथे आपली गड फेरी पूर्ण होते. येथून अर्ध्या तासात आपण वेताळवाडी गावात पोहोचतो. आल्यावाटेने परत जाताना किल्ल्याच्या माचीवर वेताळवाडी गावाच्या दिशेला चर्या असणारी तटबंदी आणि काही भग्नावशेष दिसुन येतात. वेताळवाडी किल्ल्यावरून वेताळवाडी धरण व मागे प्रचंड विस्ताराचा वैशागड उर्फ जंजाळयाचा किल्ला दिसतो. संपुर्ण गड फिरण्यास साधारण दोन तास लागतात. कागदपत्रांमध्ये वेताळवाडी किल्ल्याचा उल्लेख "बैतुलवाडी" असा येतो. वेताळवाडी गावच्या लोकांना वेताळवाडी किल्ल्याच्या नावातला "वेताळ" हा शब्द आवडत नसल्याने ते ह्या किल्ल्याला वाडीचा किल्ला म्हणुन संबोधतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!