विलासगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सांगली

उंची : २६८० फुट

श्रेणी : सोपी

मुंबई बंगळुर महामार्गावर कराड-कोल्हापूर दरम्यान कराडनंतर पूर्वेकडे विलासगड नावाचा एक दुर्लक्षित किल्ला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा हा किल्ला ऐतिहासीक कागदपत्रामध्ये विलासगड म्हणुन नोंदला गेला असला तरी या डोंगरावर असलेल्या मल्लिकार्जुन या लेणीमंदिरामुळे हा गड या भागात मल्लिकार्जुनगड म्हणुनच ओळखला जातो. हा किल्ला नेमका कोणी बांधला हे माहीत नसले तरी डोंगरावरील प्राचीन लेणी पहाता या डोंगरावर फार पुर्वीपासुनच वावर असावा हे नक्की पण याचा किल्ला म्हणुन वापर केव्हा सुरु झाला यावर प्रश्नचिन्ह आहे. इ.स.१७१७ च्या सुमारास काही कागदपत्रात या डोंगराचा किल्ला म्हणुन उल्लेख येतो. मल्लिकार्जुन गडावर जाण्यासाठी येडेनिपाणी हे गडाच्या पायथ्याचे गाव कराड व कोल्हापुर या दोन्ही शहरापासून ४० कि.मी. अंतरावर असुन गावातुन एक कच्चा रस्ता या गडाच्या डोंगराच्या पायथ्याशी जातो. ... रस्ता जेथे संपतो तेथुन गडावर जाण्यासाठी नव्याने सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्यांनी गडावर जाताना काही ठिकाणी खडकात कोरलेल्या गडाच्या मूळ पायऱ्या पहायला मिळतात. साधारण दहा मिनिटात किल्ल्याचा अर्धा डोंगर चढुन आल्यावर पायऱ्याच्या डावीकडे काही अंतरावर एक घुमटी पहायला मिळते. या घुमटीकडे जाताना वाटेत खडकात खोदलेले एक मोठे व खोल खांबटाके पहायला मिळते. या टाक्यात उतरण्यासाठी खडकात पायऱ्या कोरलेल्या आहेत. या टाक्यातील पाणी पंपाने मंदिरात नेले असुन मंदिरात व पिण्यासाठी हे पाणी वापरले जाते. टाक्याच्या पुढील भागात असलेल्या घुमटीत एक नागशिल्प व शिवलिंग पहायला मिळते. हे पाहुन मुळ वाटेवर येत साधारण १५ मिनिटात आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात पोहोचतो. मंदिराचे आवार दगडी तटबंदीने बंदीस्त केलेले असुन त्यात दगडी कमान असलेला दरवाजा बांधलेला आहे. या तटबंदीत एक गोमुख असुन त्यावर झीज झालेला देवनागरी भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. मंदिराच्या तटबंदीबाहेरच उजवीकडे काही अंतरावर दोन कमानीदार ओवऱ्या आहेत. तटबंदीच्या दरवाजातुन आत शिरल्यावर डाव्या बाजुस पत्र्याचा निवारा उभारला असुन त्यात डोंगराला लागुन मंदीराची धर्मशाळा आहे तर उजव्या बाजुस दोन दगडी दीपमाळा व त्यांमध्ये घडीव दगडात बांधलेले तुळशी वृंदावन आहे. दीपमाळेच्या पुढील भागात तटावर बांधलेला नगारखाना असुन या नगारखान्यात जाण्यासाठी तटाला लागुन पायऱ्या बांधलेल्या आहेत. नगारखान्याखाली असलेल्या खोलीत मान वळलेला दगडी नंदी आहे. येथुन आत असलेल्या मुख्य लेण्यात जाण्यासाठी वाट असुन सध्या ती बंद करण्यात आली आहे. तटबंदी मधील मुख्य दरवाजासमोरच दगडात बांधलेले लहान मंदीर असुन त्यातील कोनाड्यात काळभैरवाची मुर्ती आहे. या मंदिराशेजारी असलेल्या चौथऱ्यावर दगडी सभामंडप उभारला असुन आतील भिंतीत दरवाजाची चौकोनी दगडी कमान आहे. हे खडकात अर्धवट कोरलेले एक लेणे असुन या लेण्याचा दर्शनी भाग पुर्णपणे दगडात बांधुन त्यासमोरच तीन दगडी कमानी बांधुन हे लेणे सजवले आहे. बाहेरील बाजूने हे लेणे न वाटता पुर्णपणे दगडी बांधकाम असलेले कोठार वाटते. सध्या या लेण्याचा वापर मंदिरात असलेल्या पुजाऱ्याकडुन केला जातो. या लेण्याला लागुनच मल्लिकार्जुनाचे मंदिर असलेले लेणे आहे. या मंदिराचा दर्शनी सभामंडप दगडात बांधलेला असुन हा सभामंडप सहा घडीव दगडात कोरलेल्या खांबावर तोललेला आहे. मंदिराचा आतील भाग म्हणजे चार कोरीव खांबावर तोललेले एक मोठे लेणे असुन या लेण्यात तीन विहार आहेत. लेण्यात आल्यावर उजवीकडील शिवलिंग असलेला विहार म्हणजे मल्लिकार्जुन तर समोर शिवलिंग असलेला विहार सोरटी सोमनाथ म्हणुन ओळखला जातो. सोमनाथ मंदीराशेजारी असलेल्या तिसऱ्या विहारात कार्तिकस्वामीची मुर्ती स्थापन केलेली आहे. यातील मल्लिकार्जुन शिवलिंगासमोर असलेला नंदी समोर असलेल्या नगारखान्याच्या तळघरात पहायला मिळतो. मुख्य लेण्याच्या खांबाला तसेच भिंतीला लागुन सतीशिळा,गणपती,नागशिल्प,शिवलिंग व काही जैन साधुमुर्ती पहायला मिळतात. या संपुर्ण मंदीर परिसराचे बांधकाम अतिशय सुंदर असुन त्यावर फासलेल्या तैलरंगामुळे त्याचे मुळ सौंदर्य लोप पावले आहे. मंदिराचा परीसर पाहुन झाल्यावर गडमाथ्याच्या दिशेने वाटचाल सुरु करावी. मंदीर समुहाच्या डावीकडुन गडावर जाणारी वाट असुन वाटेच्या सुरवातीला चुना मळण्याचा घाणा व त्याचे मातीत अर्धे गाडलेले दगडी चाक दिसते. घाण्याच्या पुढील बाजुस खडकात अर्धवट कोरलेले पाण्याचे कोरडे टाके असुन घाण्यापुढे माथ्यावर जाण्यासाठी खडकात काही पायऱ्या कोरल्या आहेत. या वाटेने १० मिनिटात आपण गडाच्या माथ्यावरील उध्वस्त दरवाजात पोहोचतो. गडाचा दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झाला असुन त्याचा केवळ चौथरा जाणवण्याइतपत शिल्लक आहे. गडमाथ्यावर दगडी बांधकामातील अतिशय जीर्ण अवस्थेतील मोडकळीस आलेले एक लहान मंदीर आहे. विटांचा घुमट असलेले हे मंदीर विठ्ठ्ल रखुमाइचे व श्रीकृष्णाचे असुन यातील मुर्ती शेजारी पत्र्याचा निवारा बांधुन त्यात ठेवलेल्या आहेत. मंदिरासमोर त्याच्या सभामंडपाचा चौथरा असुन या चौथऱ्याखाली मंदिराचे तळघर आहे. तळघरातील भिंतीत कोनाडे असुन आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत पण त्याची एकुण अवस्था पहाता आत उतरणे धोकादायक आहे. मंदिराच्या पुढील भागात दोन समाधी व एक दर्गा असुन यातील एका समाधीखाली असलेल्या तळघरात अजुन एक समाधी पहायला मिळते. या समाध्यांसमोर हजरत चांद बुखारी बाबा यांचा दर्गा असुन हा दर्गा सात पिढ्यांपासून जाधव घराण्याच्या ताब्यात आहे. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख याच जाधव घराण्यातील असुन त्यांचे चौथे भाऊ नवनाथ जाधव (देशमुख) वय ८० वर्षे येथे वास्तव्यास असतात. त्यांना भेटून त्यांच्या पहाडी आवाजातील पोवाडा ऐकण्याचे व त्यांच्यासोबत गड फिरण्याचे भाग्य आम्हाला लाभले. दर्ग्याच्या पुढील भागात घडीव दगडात बांधलेली सुस्थितीत असलेली पण छप्पर उडालेली एक जुनी वास्तु पहायला मिळते. साधारण १५ X १२ फुट आकाराच्या या वास्तुला दोन बाजुना कमानीयुक्त दरवाजे असुन या वास्तुतील जोती पहाता हि गडाची सदर आहे. गडाचे गडपण दर्शविणारी ही एकमेव वास्तू आज गडावर उभी आहे. या वास्तुच्या पुढे काही अंतरावर खडकात खोदलेला एक लहान पण खोल तलाव पहायला मिळतो. तलावापासुन पुढे चालत गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या टोकावर पोहोचतो. या टोकावरून खाली दिसणारे सपाट पठार घोडेतळ म्हणुन ओळखले जाते. गडमाथ्यावर दोन लहान घरे असुन काही वेळेस जाधव कुटुंब येथे वास्तव्यास असते. गडमाथा फिरताना मंदिराच्या मागील बाजुस एका उध्वस्त वाड्याचे तसेच तटबंदीचे काही अवशेष नजरेस पडतात. गडमाथ्यावर कोठेही उभे राहिल्यास दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. या गडाचा वापर केवळ टेहळणी करता होत असावा. गडावरून दक्षिणेला वारणा नदी, नैऋत्येला जोतिबा-पन्हाळा तर उत्तरेला मच्छिंद्रगड व आगाशिवाचा डोंगर दिसतो. गडमाथा फिरून परत मल्लिकार्जुन मंदिराजवळ आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. पायथ्यापासुन विलासगडाची संपूर्ण गडफेरी करत व परत पायथ्याशी येण्यास ३ तास पुरेसे होतात. मराठयांच्या ताब्यात हा गड कधी आला याची नोंद नसली तरी अफझलखान वधानंतर मराठा फौजांनी आदिलशाही प्रदेशात मिरजपर्यंत मारलेल्या मुसंडीत हा गड स्वराज्यात दाखल झाला असावा. इ.स.१७१७-१८ मधील मुघलांनी छत्रपती शाहु यांना दिलेले सुभे व किल्ल्यांच्या यादीत विलासगडाचे नाव येते. करवीर दफ्तरातील १८ ऑगस्ट १७९८ च्या पत्रानुसार करवीरकर महाराजांचा मुक्काम बत्तीस शिराळे येथे असता मल्लिकार्जुन डोंगरावर किल्ला बांधण्यास मुहुर्त केल्याचे वाचनात येते. याचा अर्थ ओस पडलेल्या या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्याचे ठरले असावे पण याच्यावर बांधकामे झाल्याचे मात्र जाणवत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!