विरशिरगाव

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : ५० फुट

श्रेणी : सोपी

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. विरारजवळ जीवधन किल्ला व मांडवी कोट यामध्ये असलेला वीर शिरगाव कोट हा असाच एक लहानसा कोट. वीर शिरगाव कोट विरार रेल्वे स्थानकापासुन ७ कि.मी. अंतरावर असुन खाजगी रिक्षाने कोटापर्यंत जाता येते. वीर शिरगाव कोट स्थानिकांना देखील पुर्णपणे अपरिचित असल्याने पुर्ण माहिती घेऊनच कोटावर जावे. विरारहुन मुंबई-अहमदाबाद मार्गाकडे जाताना RTO कार्यालयाजवळ वीर शिरगावकडे जाणारा फाटा आहे. या फाट्याने साधारण २ कि.मी. आत गेल्यावर उजव्या बाजुच्या टेकडीवर झाडाझुडुपांनी वेढलेली वीर शिरगाव कोटाची वास्तु पहायला मिळते. पोर्तुगीजांनी बांधलेल्या या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. ३० x ३० फुट आकाराची हि दुमजली इमारत आज पुर्णपणे ढासळलेली असुन केवळ भिंती तग धरून आहेत. ... या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा तसेच बांधकाम सांधण्यासाठी चिकणमाती व चुन्याचा वापर केलेला आहे. इमारतीच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी खोबण्या दिसुन येतात. इमारतीच्या वरील बांधकामात बंदुकीचा मारा करण्यासाठी काही ठिकाणी जंग्या दिसुन येतात. या वास्तुचे स्थान व एकुण बांधकाम पहाता हि वास्तु म्हणजे टेहळणीचे ठिकाण असावे. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!