विरगाव
प्रकार : गढी
जिल्हा : अहमदनगर
उंची : 0
अहमदनगर जिल्ह्यात अलंग,मदन,कुलंग,हरीश्चंद्रगड यासारख्या बलदंड दुर्गासोबत काही गावात लहानमोठ्या गढी देखील पहायला मिळतात. गढी मालकांच्या तसेच स्थानिकांच्या अनास्थेमुळे या गढ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन काही गढी भूईसपाट झाल्या आहेत . अशीच एक शेवटच्या घटका मोजत असलेली गढी आपल्याला अकोले तालुक्यात विरगाव येथे पहायला मिळते. अकोले हे तालुक्याचे गाव ते विरगाव हे अंतर ११ कि.मी.असुन घोटी-अकोले-विरगाव हे अंतर ४३ कि.मी आहे. थोरातांची गढी म्हणुन ओळखली जाणारी हि गढी गावाच्या सुरवातीलाच असुन गाव फारसे मोठे नसल्याने आपण सहजपणे या गढी जवळ पोहोचतो. एका लहानशा उंचवट्यावर बांधलेली हि चौकोनी आकाराची गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेले असुन पुर्णपणे उध्वस्त झालेली आहे. गढीच्या पश्चिम बाजूची तटबंदी वगळता उर्वरीत तटबंदी पुर्णपणे ढासळलेली आहे. या तटबंदीत चार टोकाला चार व दरवाजा शेजारी एक असे एकुण पाच बुरुज पहायला मिळतात. गढीची केवळ पश्चिम बाजूची तटबंदी आज शिल्लक या तटबंदीत गढीचा पुर्वाभिमुख मुख्य दरवाजा आहे.
...
घडीव दगडात बांधलेला हा दरवाजा आजही सुस्थितीत असुन दरवाजाचे लाकडी दार देखील शिल्लक आहे. दरवाजाशेजारी मातीचा बुरुज असुन टोकावर दुसरा बुरुज आहे. तटबंदीचे तळातील दगड काढल्याने आता केवळ मातीची भिंत उभी आहे. या दगडमातीचा उपयोग स्थानिक आपली घरे बांधण्यासाठी करत असल्याने हे शिल्लक अवशेष देखील काही काळाचे सोबती आहे. दरवाजाच्या दगडी कमानीवर गणपती व वरील भागात दोन शरभ कोरलेले असुन हा संपुर्ण भाग मोठ्या प्रमाणात कोरीव कामाने सजवलेला आहे. दरवाजाच्या वरील मजल्याचे काम विटांनी केलेले असुन त्यात नक्षीदार कोनाडे बांधलेले आहेत. दरवाजाने आत शिरताच दरवाजाच्या दोन्ही बाजुस वरील भागात तसेच बुरुजावर जाण्यासाठी भिंतीत पायरीमार्ग आहे. या पायऱ्यांनी दरवाजावर गेले असता संपुर्ण गढीचा परीसर नजरेस पडतो. गढीच्या आत आज एकही वास्तु शिल्लक नसुन सपाट मैदान झाले असल्याने व शिल्लक असलेल्या तटावर जाणे धोकादायक असल्याने आपली गढीची फेरी येथे दरवाजातच पुर्ण होते. गढीचा हा भाग पहाण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. थोरातांची गढी या व्यतीरिक्त स्थानिकांना गढीची इतर कोणतीही माहिती नसल्याने गढीचा इतिहास देखील थोरात या नावावरच संपतो. सध्या थोरात यांचे वंशज पुण्याला स्थायिक असल्याचे कळले पण त्याचा संपर्क मिळाला नाही.
© Suresh Nimbalkar