वावी
प्रकार : गढी
जिल्हा : नाशिक
उंची : 0
श्रेणी : सोपी
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांच्या वंशजाविषयी तसेच पुर्वजांबद्दल जाणुन घेण्याबाबत सर्वसामान्याच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी रक्ताचे नातेसंबध असणाऱ्या त्यांच्या वंशजाची तसेच पुर्वजांची अशीच एक गढी आपल्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वावी या गावात पहायला मिळते. काळाच्या ओघात या गढीची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन आजमितीला काही नाममात्र अवशेष शिल्लक आहेत. वावी गढीस भेट देण्यासाठी मुंबईकरांनी सिन्नर हे तालुक्याचे ठिकाण गाठावे तर पुणेकरांनी संगमनेर गाठावे. वावी हे गाव घोटी-शिर्डी महामार्गावर वसलेले असुन सिन्नर-वावी हे अंतर २७ कि.मी. तर संगमनेर- वावी हे अंतर ३५ कि.मी.आहे. गावात प्रवेश केल्यावर राजे भोसले यांची गढी विचारल्यास आपण सहजपणे या गढी जवळ पोहोचतो. गढीकडे जाताना इतिहासाशी ओळख दर्शविणारे काही वाडे पहायला मिळतात.गढी म्हणजे काहीतरी वेगळे पहायला मिळेल या आशेने आपण गढी जवळ पोहोचतो पण आपला पुर्णपणे भ्रमनिरास होतो. सद्यस्थितीत या गढीचा काहीसा उंचवटा शिल्लक असुन या उंचवट्याच्या दोन बाजुस पडझड झालेले दोन बुरुज शिल्लक आहेत. यातील एका बुरुजावर अर्धवट ढासळलेला नक्षीदार मनोरा पहायला मिळतो पण या मनोऱ्यावर जाण्याचा मार्ग मात्र नष्ट झाला आहे. मनोरा असलेल्या बुरुजाखाली एक भुमिगत कोठार असुन या कोठारात जाण्यासाठी बुरुजा शेजारील भिंतीत लहान दरवाजा आहे. बुरुजाचे व भिंतीचे तळातील बांधकाम हे घडीव दगडात केलेले असुन त्यावरील बांधकाम मात्र चपट्या विटांनी केलेले आहे. गढीचे आजचे एकंदरीत स्वरूप पहाता कधीकाळी हि गढी परकोटाच्या आत असावी व गढीचा एकुण परीसर एक एकरपेक्षा जास्त असावा.
...
या परकोटाची शिल्लक असलेली जुजबी तटबंदी आजही पहायला मिळते. गढीच्या पश्चिम भागात बुरुजाजवळ घडीव दगडात बांधलेला जुन्या वाड्याचा चौथरा आजही शिल्लक असुन त्यावरील झीज झालेली फुलांची नक्षी त्या वाड्याची प्राचीनता दर्शविते. गढीच्या शिल्लक असलेल्या उध्वस्त भागात नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसुन येतात. गढीचा इतर कोणताही भाग पहाण्यासाठी शिल्लक नसल्याने १५ मिनीटात आपली गढीची फेरी पुर्ण होते. याशिवाय गावात पहाण्यासाठी वैजेश्वराचे प्राचीन मंदिर असुन या मंदीराची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. या मंदिराच्या आवारात एक प्राचीन पुष्करणी पहायला मिळते. या सर्व वास्तु पहाण्यास एक तास पुरेसा होतो. शहाजी राजांचे आजोबा बाबाजी भोसले यांना वेरूळ,वावी,बनसेन्द्रे, बेरडी, हिंगणी, जिंती, मुंगी पैठण असे आठ गावांचे वतन होते. बाबाजी भोसले यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्या मूळ वतनाचा सांभाळ त्यांचे पुत्र विठोजी राजे आणि त्यांचे आठ पुत्र करत होते. श्रीमंत विठोजी राजे यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांना वावी गावाचे वतन होते. देवगिरीच्या किल्ल्यावर झालेल्या खंडांगळे हत्ती प्रकरणात श्रीमंत संभाजी भोसले हे वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्यानंतर वावी गावाचे वतन विठोजी राजे यांचे दुसरे पुत्र खेळोजी राजे यांना देण्यात आले. शहाजीराजे यांच्या काळात खेळोजी राजे हे पराक्रमी सरदार होते. इ.स.१६२९ च्या सुमारास शहाजी राजे यांनी निजामशाही सोडली त्यावेळी खेळोजी राजे त्यांच्या सोबत मुघलांना मिळाले. यावेळी मुघल बादशाह शहाजहानने खेळोजी भोसले यांना पंचहजारी मनसबदारी बहाल केली. इ.स. १६३३ मध्ये मुघलांनी दौलताबादच्या किल्ल्याला वेढा घातला असता खेळोजी राजे मुघलांची साथ सोडून विजापूरच्या आदिलशाहीत सामील झाले. आदिलशाही कडून त्यांनी मुघलांचा प्रतिकार केला. खेळोजी राजेंच्या पत्नी पर्वणी निमित्त गोदावरी नदीवर स्नानासाठी गेल्या असता मुघल सरदार महाबतखान याने त्यांना कैद केले व खेळोजी राजेंकडे चार लाख खंडणी मागितली. पत्नीची अब्रू व घराण्याच्या इभ्रतीसाठी खेळोजी राजेंनी चार लाख रुपये महाबतखानाला देऊन आपल्या पत्नीची सुटका केली.नंतरच्या काळात मुघल व आदिलशाह यांच्या तह झाल्याने खेळोजी राजेंनी आदिलशाही सोडली व ते आपल्या मूळ वतनावर म्हणजे वेरूळ गावी जाऊन राहिले. यानंतर इ.स.१६३९ मधील नोव्हेंबर महिन्यातील मुघल सरदार मलिक हुसेन याने खेळोजी राजेंवर केलेल्या हल्ल्यात ते धारातीर्थी पडले. खेळोजी राजेंच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र जिवाजी राजे त्यांच्या वतनी आले. त्यानंतर सातारचे छत्रपती रामराजे महाराज यांनी त्रिंबकजी भोसले वावीकर यांचे थोरले चिरंजीव विठोजी राजे यांना दत्तक घेण्याचे ठरले. १५ सप्टेंबर १७७७ रोजी हे दत्तकविधान झाले. दत्तकविधान झाल्यावर त्यांनी शाहू हे नाव धारण केले. हेच ते छत्रपती शाहू महाराज (धाकटे). त्यांचा जन्म साधारणतः १७६२ मध्ये वावी येथे झाला. इ.स.१७७८ मध्ये राज्याभिषेक होऊन वावीकर विठोजी राजे स्वराज्याचे छत्रपती झाले. दत्तकविधानानंतर त्यांचे वडील श्रीमंत त्रिंबकजी राजेभोसले आणि लहान बंधू श्रीमंत चतुरसिंह राजे भोसले हे साताऱ्यात राहू लागले. श्रीमंत चतुरसिंह राजे यांचा जन्म साधारणतः १७७० मधील असावा. छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांची सर्व भिस्त चतुरसिंह राजे यांच्यावर होती. छत्रपतींचा कोंडमारा बघून चतुरसिंह राजे अस्वस्थ झाले. छत्रपतींची बाजु भक्कम करण्यासाठी चतुरसिंह राजे यांनी अनेक मराठा सरदारांच्या भेटी घेतल्या पण त्यांना त्यात फारसे यश आले नाही. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांचे ४ मे १८०८ ला सातारा येथे देहावसान झाले. वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी मराठ्यांच्या छत्रपतींचे निधन झाले. छत्रपती शाहू (धाकटे) यांच्यानंतर श्रीमंत प्रतापसिंह महाराज छत्रपती झाले. मे १८११ मध्ये दुसरा बाजीराव पेशवे याने त्रिंबकजी डेंगळे यांच्याकरवी श्रीमंत चतुरसिंग राजे यांना कैद करून रायगडावर रवाना करण्यात आले(मे १८११). त्यानंतर कांगोरी किल्ल्यात बंदिवासात असताना चतुरसिंह भोसले वावीकर यांनी १५ एप्रिल १८१८ रोजी अखेरचा श्वास घेतला.
© Suresh Nimbalkar