वारुगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : ३१६० फुट

श्रेणी : सोपी

सातारा जिल्ह्यातील सीताबाई डोंगरात उगम पावणारी माणगंगा नदी आपल्या काठावरील १५० कि.मी.चा प्रदेश सुपीक करत पंढरपुर जवळ सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. माणगंगा नदीकाठी असलेला हा प्रदेश माणदेश म्हणुन ओळखला जातो. या माणदेशात फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून पुर्व-पश्चिम गेलेली सह्याद्रीची उपरांग महादेव डोंगररांग म्हणुन ओळखली जाते. माण तालुक्यातील या महादेव डोंगररांगेत माणगंगेच्या उगमाशी असलेल्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी वारुगडची निर्मिती केली गेली. किल्ला जरी माण तालुक्यात असला तरी वारुगडला भेट देण्यासाठी आपल्याला फलटण गाठावे लागते. पुणे वारुगड हे अंतर सासवड –लोणंद-फलटणमार्गे १४० कि.मी. असुन फलटणपासुन दहिवडी मार्गाने वारुगड हे अंतर ३५ कि.मी.आहे. वारुगडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असुन घोडेवाडी किंवा वारुगड हि वस्ती गडाच्या माचीवरच असल्याने खाजगी वाहनाने अथवा एस.टी ने आपण थेट गडाच्या माचीवरच पोहोचतो. ... वारुगडची समुद्रसपाटीपासून उंची ३०८० फुट असुन पायथ्यापासुन हि उंची ८६० फुट आहे. माचीचा साधारण ५५ एकरवर पसरलेला परीसर पहाता गडाला एकापेक्षा अधिक दरवाजे असावेत असे वाटते पण सध्या गडाच्या उत्तरेला एकच दरवाजा अस्तित्वात असुन हा दरवाजा फलटण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. डांबरी रस्त्याने माचीवर प्रवेश केल्यावर समोरच वारुगडचा बालेकिल्ला व माचीचा परीसर नजरेस पडतो. किल्ल्याच्या माचीचा भाग तटबंदीने वेढलेला असुन माचीवरील तटबंदी आजही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. गडाचा बालेकिल्ला दोन टप्प्यात विभागलेला असुन माथ्याचा सर्वोच्च भाग अतिशय चिंचोळा आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूस ढासळलेले शिवमंदीर असुन या मंदिराचा दगडी बांधकाम असलेला दरवाजा आजही शिल्लक आहे. मंदिराच्या पुढील भागात दगडी बंधारा घालुन पाणी अडविलेले मोठे तळे आहे. रस्त्याच्या डावीकडे असलेली पायवाट थेट बालेकिल्ल्याकडे जाते पण तेथे न जाता सर्वप्रथम माची फिरून घ्यावी. डांबरी रस्त्याने काही अंतर पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याचे खांब टाके आहे. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या असुन आतील बाजुस एक भुयार दिसुन येते. हे भुयार गडाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या टाक्याच्या भुयारास जोडले आहे असे सांगितले जाते. टाक्याच्या पुढील बाजूस असलेल्या वडाच्या झाडाखाली दगडावर कोरलेले भलेमोठे शिवलिंग दिसुन येते. येथे टाक्याच्या उजव्या बाजुला म्हणजे तलावाच्या पुढील बाजूस असलेल्या माचीवर काही समाधी चौथरे असुन एक दगडी बांधकामातील घुमटीवजा मंदिर आहे. माचीचा हा पुर्ण भाग तटबंदीने वेढलेला असुन दोन ठिकाणी टोकावरील भागात दुहेरी तटबंदी आहे. माचीवरील वस्तीच्या खालील बाजुला जुन्या घरांचे अवशेष दिसुन येतात. हे सर्व पाहुन झाल्यावर जिर्णोद्धार केलेल्या भैरवनाथाच्या मंदिराकडे यावे. अतिशय सुंदरतेने रंगविलेल्या या मंदिराच्या समोरील भागात ३ विरगळ असुन एक दगडी दिवा पहायला मिळतो. या मंदिरात व मंदिरामागील धर्मशाळेत रहाण्याची सोय होऊ शकते तसेच आगाऊ सांगितल्यास जेवणाची सोय होते. मंदिराबाहेर पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. मंदीर पाहुन किल्ल्याला वळसा घालत पुढे आल्यावर एका किल्लेदाराचा समाधी चौथरा दिसतो. समाधीच्या पुढे काही अंतरावर डोंगरउतारावर किल्ल्याचा गोमुखी बांधणीचा उत्तराभिमुख महादरवाजा आहे. दोन बुरुजांच्या आतील बाजूस बांधलेल्या या दरवाजाची कमान कोसळली असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. फलटणच्या दिशेस असल्याने हा दरवाजा फलटण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. पायथ्याच्या गिरवी जाधववाडी मार्गे चालत आल्यास या दरवाजातून माचीत प्रवेश होतो. या भागातील तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. दरवाजा पाहुन मुख्य वाटेने सरळ पुढे आल्यावर पाण्याचे एक भलेमोठे खांबटाके पहायला मिळते. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या असुन या टाक्याचा वरील भाग नव्याने बांधुन काढला आहे. टाक्याच्या तळात दोन टाकी असुन आतील बाजुस भुयारे दिसुन येतात. आपण पलीकडे पाहिलेल्या टाक्यातील भुयार याच टाक्यात येते. टाक्यासमोर तांदळा असलेले एक लहान मंदिर आहे. मंदिराकडून बालेकिल्ल्याकडे पहिले असता बालेकिल्ल्याच्या तटबंदीपासून खाली माचीपर्यंत डोंगर उतारावर बांधलेली उध्वस्त तटबंदी दिसते. या तटबंदीमुळे डोंगरउताराचे दोन भाग झालेले आहेत. या उध्वस्त भिंतीवरून एक रूळलेली पायवाट बालेकिल्ल्यावर जाते. बालेकिल्ल्याच्या खालील भागात काही प्रमाणात असलेली सपाटी तटाबुरुजांनी बंदीस्त केली आहे. यातील तटबुरुज शिल्लक असले तरी दरवाजा मात्र नष्ट झाला आहे. या भागात गडाचे सहा बुरुज पहायला मिळतात. येथुन सरळ वर जाणाऱ्या वाटेने पाच मिनिटांत आपण बालेकिल्ल्याच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. बालेकिल्ल्याची तटबंदी बुरुज व दरवाजा आजही शिल्लक असुन दरवाजा वरील कमान मात्र ढासळली आहे. दरवाजासमोर बालेकिल्ल्याचा उंच बुरुज असुन त्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हि गडावरील ढालकाठीची म्हणजेच झेंडा फडकवण्याची जागा असावी. बालेकिल्ल्यावर दगडात बांधलेली एक इमारत असुन समोरच दगडी बांधकामातील चुन्याचा गिलावा केलेले पाण्याचे टाके व एक विहीर आहे. विहिरीत मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने आतील भाग दिसत नाही. बालेकिल्ल्याच्या तटबंदीत पाच बुरुज असुन तटबंदीत एक शौचकुप पहायला मिळते. याशिवाय एका ठिकाणी मोठ्या आकारचे दगडी 'जाते पहायला मिळते. माथ्यावरून संपुर्ण माची तसेच फलटण,सीताबाईचा डोंगर आणि महादेव डोंगररांगेतील शिखर शिंगणापूर मंदिर इतका विस्तीर्ण प्रदेश नजरेस पडतो. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला व माची फिरण्यास दोन तास लागतात. वारुगड शिवरायांनी बांधला असे सांगितले जात असले तरी गडाच्या माचीवर असलेली पाण्याची दोन टाकी हा गड पुर्वीपासुन अस्तित्वात असल्याची जाणीव करून देतात. पुरंदर तहानंतर मोगलांच्या वतीने आदिलशाही मुलुखातील वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. कदाचित त्यानंतर आग्र्याहुन परत आल्यावर विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना आळा घालण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली असावी. या काळात किल्ल्याचा किल्लेदार प्रभु जातीचा होता. २०० पहारेकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती. संभाजी महाराजांच्या काळात हा गड मराठ्यांच्या ताब्यात असता बहादूरखान व मुल्तफतखान यांची माणदेश मोहिमेवर नेमणुक झाली. वारुगड किल्ला ताब्यात घेताना नागोजी माने हा सरदार मोगलांना सामील झाला व त्याची नेमणुक शेखनिजामाच्या फौजेत करण्यात आली. २९ सप्टेंबर १६८८ ला औरंगजेबच्या फौजांनी हा गड ताब्यात घेतला. त्याबाबत मुल्तफतखान औरंगजेबला कळवतो. खटावहून निघालो व तेथून आठ कोसावर संभाजीच्या मुलुखात पोहचलो. नारोगडच्या (वारुगड) पायथ्याशी असलेला संभाजीचा प्रदेश उध्वस्त केला असता किल्लेदार चालून आला. १८१८ मध्ये विठ्ठलपंत फडणीस याने २०० लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावाकडून हा किल्ला ताब्यात घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!