वसई

प्रकार : जलदुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

उत्तर कोकणातील सर्वात महत्वाचा अन बलदंड किल्ला म्हणजे पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा जंजीरे वसई!!!! वसई समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा किल्ला तत्कालीन पोर्तुगीज राजवटींला या भागातील समुद्रावर आणि त्यातुन होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज वसाहतींचा विचार केला तर सर्वप्रथम आठवतो तो गोवा. भारत स्वतंत्र झाल्यावरही काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला पोर्तुगीज संस्कृती जोपासलेला आणि त्याचवेळेस पोर्तुगीज अंमलाखाली दबलेला गोवा. परंतु खुद्द महाराष्ट्रातील, मुंबईच्या अगदी जवळची वसईची पोर्तुगीज वसाहत त्यामानाने चटकन लक्षात येत नाही. ती आजही उपेक्षित राहिल्यासारखी वाटते. वसई आणि तिच्याजवळील माणिकपूर, पापडी, निर्मळ, रमेदी येथे पोर्तुगीजांनी बांधलेली सुरेख जुनी चर्चेस अद्यापही प्रार्थनास्थळे म्हणून वापरात आहेत. वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते. ... पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन केले आणि त्यानंतर आता वसई या नावाने हे शहर ओळखले जाते. मराठेशाहीतील काही महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार वसई राहिलेली आहे. पोर्तुगीजांपासून पुढे घडलेल्या इतिहासाचा आणि वसईच्या किल्ल्याचा थोडक्यात लेखाजोखा येथे घेतला आहे. सिंधुसागर किनाऱ्याचे प्रादेशिक विभागणीनुसार दोन भाग पडतात. उत्तर कोकण व दक्षिण कोकण. उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई याच्या संरक्षणासाठी मुंबई सभोवतालच्या परिसरात अनेक किल्ले बांधले गेले त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला. सोपारा व गोखरावा येथे पूल आहेत असे या किल्ल्याचे वर्णन केलेले आहे. वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टि हा सर्व परिसर समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे. भौगोलिकदृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्त्वाचा ठरतो. सन१४१४ मध्ये भंडारी -भेंगाळे नावाच्या सरदाराने हा गढी स्वरूप किल्ला उभारला. १५३० मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्यांच्याकडून हा किल्ला जिंकला आणि १५३४मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर याचे महत्त्व जाणून हा पुनर्बांधणीसाठी घेतला. मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची मोडतोड करून युरोपीय स्थापत्य शास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. बुरुजांचा बाणाच्या चपट्या पसरट टोकासारखा असणारा आकार हे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. अशा तऱ्हेचे बुरुज महाराष्ट्रातील फिरंगाणात फक्त वसईलाच आढळतात. वरळी किल्ल्यात त्याचे अर्धवट स्वरुप आढळते. गुजरात राज्यातील दमण येथे असलेल्या पोर्तुगीज किल्ल्यालाही वसईसारखेच बुरुज आहेत. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्य शास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली. त्यानंतर अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षित राहिला. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. गावापासून किल्ल्याच्या तटापर्यंत पोहचण्यास १५ मिनिटे लागतात. डांबरी रस्त्याने किल्ल्यात शिरताना उजवीकडे प्रवेशद्वार आहे. त्यातून आत शिरल्यावर समोरच तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. त्यावरून सर्व किल्ल्याची रचना लक्षात येते. ह्या किल्ल्याचा आकार दशभुजकोनासारखा आहे व त्याच्या आत साधारण दोन चौरस किमीचा प्रदेश येतो. गडाचा मुख्य दरवाजा दुहेरी तटाने संरक्षित करून अभेद्य केला आहे. तीन बाजूंनी समुद्र आणि दलदल तर एका बाजूला वसई गाव अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. वसईचा किल्ला बांधायला पोर्तुगिजांना एकुण दहा वर्ष लागली. किल्ला दशकोनी असुन प्रत्येक कोपऱ्यावर एक असे किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदियाम रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय. चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत. पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे. येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे. सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज. प्रत्येक बुरुजावर तोफा आणि बंदुकाबरोबर आठ सैनिक, त्यांचा एक नायक असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना बाहरी बुरुज, कल्याण बुरुज, फत्ते बुरूज, कैलास बुरुज आणि दर्या बुर्ज अशी मराठी नावे दिली. येथून नंतर बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत तीन चर्च लागतात. यातील संत जोसेफ ख्रिस्तमंदिर या मंदिराची उभारणी १५४६ ते १६०१ या काळात झाली. हे चर्चमंदिर कथेड्रेल नावाने ओळखले जाते. वसई किल्ल्यातील पोर्तुगीज राजवटीतील सर्वाधिक शिलालेख या चर्चमध्ये पाहण्यास मिळतात येथील कमानी पाहून मन थक्क होते. या चर्चच्या मनोऱ्याच्या माथ्यावर शोभेसाठी रांजणाकृती चार कळस होते आता फक्त दोनच शिल्लक आहेत. या चर्चच्या प्रवेशव्दाराच्या उजवीकडे असणाऱ्या मनोऱ्यावर जाण्यासाठी चक्रीजींना आहे. त्याच्या आता केवळ ६३ पायऱ्या शिल्लक आहेत. या जिन्याने वर चढल्यानंतर आपणास संपुर्ण वसई खाडीचे दर्शन होते. याच ध्वजस्तंभावर मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर १६ मे १७३९ रोजी आपला भगवा ध्वज फडकवला. बालेकिल्ल्याच्या जवळ गेल्यावर डावीकडे समोरच न्यायालयाची इमारत दिसते आणि पलीकडे एक हॉस्पिटल आहे. तिथून दोन कमानी असलेला टाऊन हॉल आहे. त्याच्यापुढे कारागृह आणि वज्रेश्वरी मंदिर आहे. चिमाजी आप्पा वज्रेश्वरीमार्गे वसईला येताना त्यांनी वज्रेश्वरी देवीजवळ नवस केला की मोहीम फत्ते झाल्यास मी वज्रेश्वरी देवीचे मंदिर उभारीन. सदर मंदिराची उभारणी इ.स. १७३९मध्ये करण्यात आली. या मंदिराशेजारील श्री नागेश्वर मंदिर हे पोर्तुगीज काळात उध्वस्त करण्यात आलेले मंदिर इ.स.१७३९च्या वसई विजयानंतर पुन्हा उभारण्यात आले. सदर मंदिरालगतच प्राचीन नागेश महातीर्थ तलाव दिसतो. पुढे वाटेच्या उजव्या बाजुस चिमाजी अप्पांचा पुतळा उभारला आहे. हे सर्व पाहून मागे फिरायचे आणि बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा. बालेकिल्ल्यास एकूण 3 गोलाकार बुरूज 1 चौकोनी बुरूज आहेत. बालेकिल्ल्यात दारु कोठार, सैनिकांची वस्तिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष आहेत. यातील सिनेट हाऊस या ठिकाणी महत्वाचे प्रशासकीय व लष्करी निर्णय घेतले जात. येथे एका दगडावर कोरलेला शिलालेख सुद्धा आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेरील पटांगणावर एक विहीर आहे. बालेकिल्ल्याहून समुद्राकडे जाताना वाटेत दिसणाऱ्या वीर हनुमान मंदिराची उभारणी २७ जुलै १७३९ रोजी करण्यात आली. येथील वीर हनुमानाच्या मूर्तीचे वैशिष्ट म्हणजे मूर्तीस कोरीव मिशा आहेत. येथुन समोरच दर्या दरवाजा आहे. पोर्तुगीज काळात या सागरी दरवाजाला फार महत्त्व असे. कारण सर्व पोर्तुगीज ठाणी सागरी किनाऱ्यावर असल्याने त्यांच्या जहाजामार्फत सर्व व्यापार व व्यवहार चालत असे. याशिवाय किल्ल्यात पोर्तुगीजकालीन महाविद्यालयाचा कमानीयुक्त वाडा भिंतीवरील लाल रंग,धर्मगुरूची निवासस्थाने इ.अनेक अवशेष आहेत. भुई दरवाजा या प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यानंतर आतल्या मार्गाला एक वळण लागते. संकटाच्या वेळी शत्रूला थोपवून धरण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती. या जागेत अलीकडे एक हनुमान मंदिर आहे त्याच्या दारातच एक मोठी दीपमाळ उभारण्यात आली आहे. किल्लाचा तट जरी रुंद असला व त्यावरून चालणे जारी शक्य असले तरी अलीकडे काही दगड सुटे झालेले आहेत व काटेरी झाडेझुडपे तटावर वाढलेली आहे.त्यामुळे तटावर चालताना धोका संभवतो. पोर्तुगीजकालीन सेंट सेबस्टियन बुरूजात ५५३ फुट लांबीचा भुयारी मार्ग आहे. तटावरून भुयारात हवा खेळती रहावी म्हणून झडपा आहेत या भुयारातून आरपार प्रवेश करणे अवघड आहे. कारण मध्ये फारच अंधार असून ते गाळाने भरल्यामुळे सरपटत लागते. शिवाय आत वटवाघळे व इतर विषारी प्राणी यांचाही धोका आहे. किल्ल्यात पाच ख्रिस्ती धर्मगृहे होती जी पोर्तुगिज व त्यानंतर इंग्रजांच्या काळात बांधली गेली होती. सेबास्तियन बुरुजाजवळ इन्व्होकोशन ऑफ सान्तो आन्तोनियोचे फ्रांसिस्कन चर्चचे अवशेष दिसतात. गोव्यामधे ज्याचे पार्थीव जपून ठेवले आहे तो संत झेवियर इथे येऊन गेल्याचे म्हटले जाते. संत पॉलचे गिरीजाघर व जेसुविट मोनास्टरी फ्रांसिस्कन चर्चच्या इशान्येकडे आहे. ही सन १५७८ साली बांधली गेली होती. नोसा सेनोरा दा विदाचे चर्च बालेकिल्ल्यात पाहता येते. संत जोसेफ गिरीजाघर इशान्येकडील तटाजवळ आहे. मुळात ही मशीद होती ज्याचे रुपांतर पोर्तुगिजांनी गिरीजाघरात केले. ह्याच्या समोरची मोकळी जागा बाजारासाठी वापरली जात असे. डॉमिनिकन चर्च अॅण्ड कॉन्व्हेन्ट नावाची आणखी एक वास्तू सन १५८३ मधे बांधण्यात आली होती. आज ह्या सर्व वास्तू दुरावस्थेत आहेत. वसई किल्ल्याचे एक विशेष म्हणजे मार्गाच्या उत्तरेकडील मोकळा भाग. हा भाग जाणिवपूर्वक मोकळा ठेवण्यात आला होता. किल्ला बांधताना पोर्तुगीजांना याच दिशेने हल्ला होण्याची भिती वाटत असावी. जर यदाकदाचित शत्रू आत शिरलाच तर त्याला लपायला जागा मिळून नये व संपूर्ण सैन्य गोळीबाराच्या टप्प्यात यावे यासाठी ही मोकळी जागा ठेवण्यात आली होती. मराठ्यांनी जेव्हा तटाला भगदाडे पाडून आत शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही मोकळी जागा अगदी उत्तम तऱ्हेने कामी आली असेच म्हणावे लागेल. मराठ्यांनी गडाबाहेर गालबावडी किंवा गोडबाव नावाच्या भागात तळ ठोकला होता त्या ठिकाणी आज एक सतीची शिळा दिसते. युद्धात मारल्या गेलेल्या एका सरदाराच्या स्मारक रुपात ती तिथे उभी आहे. त्याची बायको तिथे सती गेली होती. वकील राजनीच्या बंगल्यामागे बाळाजीपंत मोरेचे स्मारक बांधलेले दिसते. असे म्हटले जाते की हा इतका कडवा लढवैया होता की पोर्तुगिजांनी त्याचे डोके उडवल्यानंतरही काही वेळ हा तलवारीने वार करत राहिला. दोन तासात सर्व गड पाहून होतो. प्राचीन काळापासून व्यापारी महत्त्व असलेले सोपारा हे बंदर वसईपासून अवघ्या सहा मैलावर असल्यामुळे मध्ययुगीन काळात पोर्तुगीजांचे या भागात बस्तान बसेपर्यंत वसईला महत्त्व येऊ शकले नाही. देवगिरीच्या यादवांच्या आमदानीत वसई एका प्रांताची राजधानी होती असा संदिग्ध उल्लेख एका शिलालेखात आहे. वसईचा किल्ला हे स्थान हिंदूंचे मोठे तीर्थस्थान नागेश तीर्थ या नावाने प्रसिद्ध होते. या परिसरात श्री शंकरांची २१९ मंदिरे होती ती पोर्तुजीगांनी उध्वस्त केली. हिंदू असलेल्या भोंगळे राजांनी सर्वप्रथम येथे राज्य केले. हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता. १६व्या शतकाच्या सुरवातीला हे चित्र बदलले. गुजरातचा सुलतान महंम्मद बेगडा (१४५९-१५१३) याने मुंबई बेटाचा ताबा घेतला. १५१४ साली बार्बोसाने वसईचे वर्णन गुजरातच्या राजाचे एक उत्तम सागरी बंदर असे केले आहे. त्याच्या आमदानीत वसईचा व्यापार वाढला. वसई हे महत्त्वाचे बंदर बनल्यामुळे मसाल्याचे पदार्थ, नारळ आणि पोफळीने भरलेली गलबते मलबारच्या किनाऱ्यावरुन वसईला येऊ लागली. १६ व्या शतकात वसई आणि आजूबाजूचा प्रदेश गुजरातचा सुलतान कुतुबउद्दीन बहादुरशहाकडे होता. मुख्य राज्य गुजरातेत असल्याने त्याच्या काळातही हा प्रदेश उपेक्षितच राहिला. उलट लुटालूट, जाळपोळ, देवस्थानांना इजा पोहोचवणे वगैरे प्रकारांनी त्याने स्थानिकांना जेरीस आणले होते. याच सुमारास पोर्तुगीज दीव-दमण पासून गोव्यापर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत होते. बहादुरशहाला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसईला दोन वेळा आग लावल्याचे कळते. गावांवर हल्ले करणे, लुटालूट करणे वगैरे प्रकार पोर्तुगीज करत. देवळांवर बांधलेल्या मशीदींना तोडून तेथे चर्च उभे करण्याचा सपाटा पोर्तुगीजांनी लावला होता. जमिनीवरून मुघलांशी लढा आणि समुद्रावरून पोर्तुगीजांशी लढा यांत बहादूरशहा जेरीस आला. १५२६ साली पोर्तुगीजांनी वसईला वखार घातली. तथापि सुलतानाच्या जुलमी अधिकाऱ्यांचा आणि सागरी चाच्यांचा पोर्तुगीजांना बराच उपद्रव झाला असावा असे दिसते. या दुहेरी जाचाचा सूड उगवण्यासाठी इ.स.१५२९ मध्ये हेक्टर द सिव्हेरियाच्या अधिपत्याखाली २२ गलबतांचा ताफा उत्तरेतील समुद्रातील चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निघाला. या आरमारी ताफ्याने रात्रीच्या वेळी वसईच्या खाडीत प्रवेश करुन वसईवर हल्ला केला. तेथे अलीशाह या गुजरातच्या सुलतानाच्या सरदाराचा पराभव करुन त्याने वसई लुटली व गावात जाळपोळ केली. याची पुनरावृत्ती १५३१ साली झाली तेव्हा अशा तऱ्हेने होणाऱ्या हल्ल्यांचा आणि लुटालुटीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी व पोर्तुगीजांचा उत्तर किनाऱ्यावरील साम्राज्यविस्तार रोखण्यासाठी इ.स.१५३२ मध्ये त्यावेळचा गुजरातचा सुलतान बहाद्दुरशहा याने दीवचा सुभेदार मलिक टोकन यास वसई येथे कोट बांधण्याची आज्ञा दिली. त्यानुसार खाडीच्या आणि समुद्राच्या बाजूला तट व तटांच्या बाहेरच्या बाजूला खाऱ्या पाण्याच्या खंदकांची निर्मिती करण्यात आली. या कोटाच्या रक्षणासाठी घोडदळ व पायदळ मिळून १५००० सैन्य ठेवण्यात आले. हा वसईचा पहिला कोट होय. १५३४ मध्ये बहादूरशहाने नुनो डाकुन्हा या पोर्तुगीज गवर्नरशी तह करून वसई, साष्टी, वरळी, कुलाबा, दीव-दमण, कल्याण, ठाणे, चौल हा सर्व प्रदेश पोर्तुगीजांना देऊन टाकला. अशा रीतीने, उत्तर कोकणावर पोर्तुगीजांचा अंमल आला. याच सुमारास वसईचा किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी सुरुवात केली. तत्पूर्वी बहादूरशहाने आणि त्याच्या सुभेदाराने किनाऱ्याजवळ उभारलेली तटबंदी आणि दुर्ग अस्तित्वात होते. या काळात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अत्त्याचार केले. विहिरीत पाव किंवा गोमांस टाकून लोकांना बाटवण्याचे प्रकार केले. या छळाला कंटाळून हिंदू, मुसलमान आणि पारशी लोकांनी येथून स्थलांतर करून शहाजहानच्या मुघली राज्यात आसरा घेतला. १७२० मधील एका नोंदीनुसार वसई भागात ६०००० च्या आसपास लोकसंख्या होती आणि त्यातील बहुतांश बाटलेल्या ख्रिश्चनांची आणि युरोपीयांची होती. पोर्तुगीजांनी लाकडाचा आणि बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांचा व्यापार भरभराटीस आणला. घरांसाठी, जहाजांसाठी लागणारी उत्कृष्ट लाकडे आणि बांधकामासाठी तासलेले दगड यांची मोठी निर्यात वसईतून चाले. तत्कालीन पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेल्या नोंदीनुसार गोव्यातील अनेक चर्चच्या बांधकामांसाठी वसईतून दगड आणि दगडी खांब नेण्यात आले होते. व्यापारीदृष्ट्या हा वसईतील भरभराटीचा काळ असला तरी स्थानिक जनता अन्यायाखाली दबली जात होती. ही पोर्तुगीजांची धर्मसत्ता इतकी उन्मत्त झाली होती की पुढे तिचा त्रास पोर्तुगीज अधिकाऱ्याना आणि राजसत्तेला होऊ लागला कारण विविध कामांसाठी त्यांना स्थानिकांची गरज होती ती लोक वसई सोडून जाऊ लागल्याने मिळेनाशी झाली. अधिकाऱ्यानी याबाबत पोर्तुगीज राजसत्तेकडे केलेल्या तक्रारींच्या नोंदी मिळतात. शिवाजी महाराजांचे लक्ष या जुलमांच्या बातम्यांनी वसईकडे वेधले होते. त्यांनी वसईवर कडक चौथाई लावली होती. पुढे पेशव्यांच्या डोळ्यातही वसई आणि वसईतील अत्याचार खुपत होतेच, पण प्रत्यक्ष कारवाई होत नव्हती. शेवटी अणजूरकर नाईकांनी वसईप्रांत फिरंगीयांकडे आहे. त्याणें देवस्थानें व तीर्थे यांचा व महाराष्ट्रधर्म यांचा लोप केला. हिंदू लोक भ्रष्ट केले. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना करावी व स्वधर्मस्थापना होय ते गोष्टी करावी अशी तक्रार पहिल्या बाजीरावाकडे केली. या तक्रारीला यश येऊन वसईवर स्वारी करण्याचा बेत नक्की झाला. इ.स. १७३७ साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यर्थ गेला त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजी अप्पाच्या हातात सोपवली. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली इसवी सन १७३७ च्या गुढीपाडव्यानंतर वसईच्या मोहिमेस प्रारंभ झाला. मराठे कल्याणमार्गे उत्तर कोकणात दाखल झाले. पोर्तुगीज ठाण्याच्या कोटाचे बांधकाम त्यापूर्वी काही वर्षे करत होते. बाजीरावांनी तो कोट बांधून पुरा होण्यापूर्वीच साष्टी बेट जिंकण्याचे ठरवले. शंकराजी फडके, गंगाजी नाईक अणजूरकर यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ते काम करण्याचे योजले. गडाचा खाडीच्या तोंडावर असलेला बुरुज प्रथम उडवला गेला. त्यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर पळून गेला. मराठ्यांनी साष्टी बेट ताब्यात घेतले. नारायण जोशींनी पारसिकचे ठाणे जिंकले. बेलापूर, धारावी, कल्याणजवळील सांताक्रुझ ही ठिकाणे मराठ्यांच्या ताब्यात आली. मराठ्यांनी ठाण्यावरील हल्ला चपळाईने केला आणि वसईकडे मोर्चा वळवला. शंकराजीपंतांच्या नेतृत्वाखालील तुकडीने माणिकपुऱ्याहुन वसईचा कोट गाठला. त्यांनी अनेक लहान ठाणी जिंकली. त्यानंतर महादजी केशव, खंडो चिमणाजी, मोराजी शिंदे, बाळाजीराव, राजबाराव बुगुडकर राणे बहादूरपुऱ्यास रवाना झाले. त्यांचा वसईचा कप्तान ग्रेनेडियर याच्याशी सामना झाला. त्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या घोडदळास तुडवून बहादूपुऱ्याजवळ पहिला मोर्चा लावला. सोपारा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यामध्ये मराठ्यांना तेरा तोफा मिळाल्या. पाठोपाठ त्यांनी अर्नाळा जलदुर्ग जिंकला. मराठे त्याचा बंदोबस्त करून १ जुलै १७३७ ला पुण्यास परत आले. पुढे ती मोहीम तशीच सुरू राहिली. वसई किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना समुद्र आणि दलदल असल्याने तो किल्ला काबिज करणे अवघड होते. वसईच्या वेढ्यासाठी मराठ्यांनी दोन वर्षे कसून लढा दिला. मोहिमेत रामचंद्रपंत, अमरसिंह, शिर्के अशा दहा-पंधरा लोकांनी मोठा पराक्रम केला. पोर्तुगीजांकडे मराठ्यांच्यास तुलनेत तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रे अद्यावत असल्याने त्यांनी मराठ्यांचे मोठे नुकसान केले. पण मराठ्यांनी वेढा सैल पडू दिला नाही. अर्नाळा, वर्सोवा वगैरे किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश मराठे व्यापत गेले. यामुळे पोर्तुगीज सैन्याच्या रसदीवर परिणाम झाला. कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराने समुद्री मार्ग बंद केले असल्यानमुळे पोर्तुगीजांची रसद बंद पडून त्यांची कोंडी झाली. मराठ्यांच्या फौजेस बाहेर पडून तोंड देणे किंवा आत शांत राहणे या दोन्ही गोष्टी अवघड होऊन बसल्या. वसईच्या मोर्चात महादजी केशव, जनार्दन हरि, गणेश हरि असे लोक सामिल होते. बहुमूल्य वेळ वाया जात आहे म्हणून जोरदार हल्ला चढविण्यासाठी 'किल्ला जिंकला जात नसेल तर मला तोफेच्या तोंडी बांधून किमान माझं मस्तक तरी किल्ल्यात पडेल असे करा' हे उद्गार चिमाजी अप्पांनी या वेढ्यात काढले. चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला करायचे ठरवले. शेवटी चर खणून आणि सुरुंग लावून तटाला भगदाडे पाडून मराठे आत घुसले. मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य हरहर महादेव गर्जना करत आत घुसले. दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले. त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली. तुंबळ हातघाईची लढाई झाली. २ मे १७३९ रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली. हे करताना मराठ्यांच्या सैन्याची मोठी हानी झाली. मराठ्यांना चेव येऊन त्यांनी वसईच्या कोटावर प्रचंड हल्ला चढवला आणि पोर्तुगीज दोन-तीन हजार सैन्यानिशी मराठ्यांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी कोटातून बाहेर पडले. अनेक मराठे त्या धुमश्चक्रीत कोंडले गेले. पोर्तीगीजांची पार दाणादाण उडाली. त्यामध्ये राजबाराव बुगुडकर, वाघोनी खानविलकर, चिंतो शिवदेव, जनार्दन हरि, गणेश हरि हे सर्व लढवय्ये वीरगतीस प्राप्त झाले. दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले. ४ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांनी पराभव मान्य केला आणि १३ मे १७३९ रोजी वसईचा किल्ला मराठयांना मिळाला. तत्कालिन नोंदीनुसार त्या लढाईत मराठ्यांचे बारा हजार तर पोर्तुगीजांचे आठशे सैनिक कामी आले. या नोंदीत पोर्तुगीजांकडून लढलेल्या इतर सैन्याची नोंद नसावी. चिमाजी अप्पांनी २२ मार्च १७३९ रोजी वसईची मोहिम फत्ते करून मराठ्यांच्या‍ इतिहासात मानाचा तुरा रोवला. विजयानंतर मराठी सैन्यांने किल्यातील चर्चमधील मोठ्या घंटा उतरवून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यापैकी एक घंटा नाशिक येथील नारोशंकराच्याय मंदिरात पाहण्यास मिळते. ती नारोशंकरची घंटा' म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरी घंटा पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात आहे. वसईचा किल्ला स्वराज्यात यावा यासाठी चिमाजीअप्पानी वज्रेश्वरी देवीस नवस केला होता. मोहिम फत्ते झाल्यानंतर चिमाजी अप्पांनी वसईला वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधले. या युद्धातील तहाच्या अटींनुसार पोर्तुगीज सैन्याला वसई सोडून जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली. यात त्यांची चल मालमत्ता आणि संपत्ती सोबत घेऊन जाण्याची परवानगीही देण्यात आली. आठ दिवसांनंतर मराठ्यांनी किल्ला आणि घरादारांची लूट केली. दोनशे वर्षांहून अधिक काळ वसईवरील पोर्तुगीज अंमल अशा रीतीने संपला परंतु पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा आजही वसईत शिल्लक आहेत. मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे पोर्तुगीज बरेच नमले होते. छत्रपतींनंतर शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांना पुन्हा एकदा पोर्तुगीजांना धडा शिकवणे गरजेचे ठरले. मराठ्यांचे प्रशासन कल्याण प्रांतात इसवी सन १७१९ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून मराठ्यांचा पोर्तुगीजांशी पुन्हा संघर्ष सुरू झाला. उत्तर फिरंगाण १७३७ व १७३९ या दोन वर्षांत जवळ जवळ पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात आले. उत्तर फिरंगणात साष्टी बेट, वांद्रे, वसई, ठाणे, अंधेरीपासून वसईपर्यंतची अनेक बेटे कार्लाई, रेवदांडा, चौल, माहीम, तारापूर, चिंचणी इत्यादी परिसरांचा समावेश होतो. पुढे माधवराव पेशव्यांनी अनेक हिंदू कुटुंबांना वसईत वसण्यासाठी उद्युक्त केल्याचे सांगितले जाते. यावेळी पुण्याहून आणि कोकणातून अनेक हिंदू कुटुंबे वसईत स्थलांतरित झाली. सक्तीने किंवा फसवणूकीने बाटवलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्याचेही प्रयत्न माधवरावांनी केल्याचे दाखले मिळतात. मराठ्यांनी शर्थीने जिंकून घेतलेली वसई फार काळ त्यांच्या हाती टिकली नाही. पुढे १७८० मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यात सुरुवात केली. त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा किल्लेदार होता. सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. समुद्रमार्ग आणि भूमार्ग या दोन्ही बाजुंनी किल्ल्यावर हल्ला करायचे सिद्ध झाले. कर्नल हार्टले कल्याणवरून हल्ला करणार होता. तर गोडार्ड समुद्रमार्गाने हल्ला करणार होता. वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता. पुण्याहून मराठयांना कुमक पोहचू नये याची काळजी घेण्यात आली होती. नाना फडणिसांनी आनंदराव रास्ते यास वसईच्या आठ कि.मी. गोखरावा या गावी धाडले. २३ ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे, भवानी शिवराम यांची फौज तोफखाना घेऊन तळेगाव मार्गे वसईला निघाले. वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली. खजिना पण रिता झाला होता. लोक गावे सोडून गेले होत. गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता. २८ तारखेला तोफांची गोळीबारी सुरू झाली. मराठ्यांनी सुद्धा बुरुजावरून गोळीबारी सुरु केली. इंग्रजांनी गोखरावा व सोपार पूल उडवले. ७ डिसेंबरला किल्ल्यात दारुगोळा पडला आणि भयंकर स्फोट झाला. त्यामुळे सगळेजण घाबरून गेले. ९-१० डिसेंबरला तोफखान्याचा मारा चालू ठेवला. १० डिसेंबरला २०० मराठ्यांच्या एका तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला. १२ डिसेंबर १७८० मध्ये वसई किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि वसईवर इंग्रजांचा अंमल आला. १८०२ मध्ये यशवंतरावाने पुण्यावर हल्ला केल्यावर दुसरा बाजीराव पळून वसईला इंग्रजांना शरण गेला. वसईच्या या दुसऱ्या तहात मराठेशाही बुडाली आणि पेशवे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातले बाहुले बनले. त्यानंतर वसईला काही काळ बाजीपूर या नावानेही ओळखले जाई. किल्ल्यावर जाण्यासाठी वसई स्थानक गाठावे. येथुन वसई किल्ला ६ कि. मी.वर आहे. वसई ते किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या बसेस, टमटम रिक्षा अथवा साध्या रिक्षा उपलब्ध आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!