वल्लभगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : बेळगाव

उंची : २६२५ फुट

श्रेणी : सोपी

बेळगाव आणि महाराष्ट्राचे अतूट नाते आहे. स्वराज्यात असणारा हा प्रांत भाषावार प्रांतरचना करताना मात्र कर्नाटक राज्याला जोडला गेला. बेळगाव जिल्ह्यातील बहुतांशी किल्ले हे भुईकोट अथवा गढी प्रकारातील असुन एखादा दुसरा अपवाद वगळता उंच गिरीदुर्ग फारच कमी आहेत. गिरीदुर्ग म्हणता येतील असे किल्ले लहानशा उंचवट्यावर अथवा टेकडीवर आहेत. हुक्केरी तालुक्याच्या पश्चिमेला व संकेश्वर शहराच्या वायव्येला अशाच एका लहानशा डोंगरावर असलेला किल्ला म्हणजे वल्लभगड !!! कोल्हापूर-बेळगाव महामार्गावर संकेश्वरच्या ३ कि.मी अलीकडे वल्लभगड नावाचा एक फाटा आहे. या फाट्यावरून वल्लभगडाचे दर्शन होते. महामार्गापासून डावीकडे वळल्यावर आपण थेट वल्लभगड गावातच पोहोचतो. गडाच्या पायथ्यापासुन किल्यापर्यंतचे अंतर १ कि.मी. असून हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे १८५० फुट उंचीवर आहे. किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ ५ एकर असुन लांबी १२०० फुट तर रुंदी ३०० फुट आहे. ... गड फारसा उंच नसल्याने वल्लभगड गावातून पंधरा मिनिटांत गडावर जाता येते. गडाच्या बुरुजाशेजारी गावदेवी मरगुबाईचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोर दिपमाळ आहे. खाजगी वाहनाने आपण थेट या मंदिरापर्यंत येऊ शकतो. मंदिराच्या मागून पायवाटेने चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कमान व दरवाजा उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वार छोटे असुन गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे प्रशस्त मंदिर असुन गडाच्या पूर्व तटावर महादेवाचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराच्या खाली सिध्देश्वर स्वामींच्या पादुका स्थापित केलेली मोठी गुहा आहे. या गुहेत जाण्यासाठी गडाची तटबंदी उतरून खाली यावे लागते. या गुहेत एक लहानसे भुयार आहे. गडाच्या मध्यभागी चौकोनी आकाराची चाळीस फूट खोलीची जांभ्या दगडात खोदलेली खोल विहिर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी मारुती मंदिराच्या मागून भुयारी वाट आहे. वीस -पंचवीस पायऱ्या उतरल्यानंतर एक कमान लागते. पायऱ्याचा मार्ग अत्यंत भव्य आहे. या पायऱ्याने आणखी पुढे गेल्यावर मोठी विहिर लागते. याच विहिरीचे पाणी पुर्वी गडावर राहणारे लोक पिण्यासाठी वापरत असत. गडाची बरीच तटबंदी उध्वस्त झालेली आहे. गडाच्या उत्तरेला तटबंदीच्या आत एक सुटा बुरुज असून तो गडावरील अंतर्भागात लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला आहे. फांजीवरून फेरी मारताना आपल्याला तटबंदीत दोन शौचकुप पहायला मिळतात. याशिवाय गडावर नव्यानेच उजेडात आलेले कातळात कोरलेले एक पाण्याचे टाके पहायला मिळते. गड लहान व आटोपशीर असल्याने गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. मुंबईच्या दुर्गवीर संस्थेने स्थानिक लोकांच्या सहभागातून गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून गडाच्या मूळ वैभवाला धक्का न लावता त्यांनी गडाला नवीन रूप प्राप्त करून दिले आहे. दुर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या स्थानिक मावळ्यांनी येथे केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. वल्लभगड हा प्राचीन गडांपैकी एक आहे. कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच वल्लभगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या गडाच्या किल्लेदाराचा उल्लेख सापडत नसला तरी या गडावर ७५ शिलेदार होते व त्यांचे वंशज वल्लभगडावर आजवर रहात आहेत. सन १६८८ मध्ये वल्लभगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ मध्ये हा गड पुन्हा मराठयांकडे आला. यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १४ मे १७५३ रोजी करवीरकर छत्रपती संभाजी राजांनी सदाशिवराव भाऊ पेशवे यांना वल्लभगड, भीमगड, पारगड व कलानिधीगड हे किल्ले व आसपासचा परिसर जहागीर म्हणुन दिले. त्यांनतर तो वंटमुरीकर देसाई यांच्या ताब्यात गेला. पुढे मराठ्यांच्या काळात तो सातारकरांकडे आल्यावर सन १७७६ मध्ये सातारकर शाहू महाराजांनी या किल्याची पुनर्बांधणी केली. यानंतर पुन्हा तो कोल्हापूरकरांच्या ताब्यात गेला. त्यानंतर पटवर्धनांच्या ताब्यात जाऊन सन १७९६ मध्ये परत कोल्हापूरकरांच्याकडे आला. ज्यावेळी कोल्हापूरचे काही तालुके इंग्रजांच्या ताब्यात आले त्यावेळी सन १८४४ रोजी वल्लभगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!