वर्धनगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : ३४६० फुट

श्रेणी : सोपी

सह्याद्रीच्या महादेव डोंगररांगेतील वर भांडलीकुंडल डोंगरावर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे. खटाव तालुक्यात असलेला हा किल्ला सातारा शहरापासुन ३० कि.मी.अंतरावर तर खटाव या तालुक्याच्या ठिकाणाहुन १३ कि.मी.अंतरावर आहे. कोरेगाव-पुसेगाव या हमरस्त्यावरच वर्धनगड नावाचे गाव असुन गावामागे असलेल्या डोंगरावरच वर्धनगड उभा आहे. गावात प्रवेश करताना चौकातच दोन तोफा पहायला मिळतात. आजही किल्ल्याची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत असुन गावातुन सहजपणे नजरेस पडते. वर्धनगड गावातील एका पडक्या वाड्यापासुन किल्ल्यावर जाण्यासाठी प्रशस्त वाट आहे. गडावरील वर्धनीमातेच्या देवळात भाविकांची सतत वर्दळ असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. या चढणीला काही बांधीव पायऱ्या आहेत. या वाटेने दहा मिनिटांत आपण भैरवाच्या ठाण्याजवळ पोहोचतो. गडाची चढण अत्यंत सोपी असुन ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचवते. ... या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो. गडाचा हा दरवाजा पुर्वाभिमुख असुन दोन बुरुजामध्ये लपवलेला आहे. गडाच्या माचीवर बऱ्यापैकी सपाटी असुन मध्यभागी एक टेकाड उंचावलेले आहे. या माचीवर असलेली तटबंदी आजही चांगल्या स्थितीत असुन या तटावरून संपुर्ण माचीला फेरी मारता येते. दरवाजाच्या डावीकडे असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ उभारलेला असुन त्यावर भगवा झेंडा रोवलेला आहे. या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तीन बुरुज सोडुन चौथ्या बुरुजात तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे. माचीच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर जाण्यासाठी दरवाजा समोर दगडी पायऱ्या बांधल्या आहेत. या टेकाडावर जातांना डाव्या बाजुस एका लहानशा घुमटीत हनुमानाची मुर्ती असुन पुढे लहानसे शिवमंदिर आहे. मंदिरात दोन शिवलिंग असुन दोन इतर मुर्ती आहेत. या मंदिराशेजारी असलेल्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असुन गडावर हेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. दरवाजापासुन टेकाडावर असणाऱ्या वर्धनीमातेच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. टेकाडावर असणारे मंदिर हे गडदेवता वर्धनीमातेचे असुन या मंदिराचा अलीकडील काळात जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असुन या मंदिरात ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते. पण यासाठी गडावर लवकर पोहोचणे आवश्यक आहे कारण संध्याकाळी गडावर कोणी नसल्यास पुजारी मंदीराला टाळे लावतो. मंदिराच्या मागील बाजुने एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरतांना काही घरांचे अवशेष व कातळात कोरलेली पाण्याची जोडटाकी पहायला मिळतात. मंदिराकडून कल्याणगड उर्फ नांदगिरी, महिमानगड, संतोषगड असा बराच मोठा प्रदेश नजरेस पडतो. संपूर्ण गड फिरण्यास एक तास पुरतो. अफजलखानाच्या वधानंतर छ्त्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधल्याचे मानले जाते. १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १६६१ या काळात शिवाजी महाराज गडावर मुक्कामाला होते. कोल्हापुर प्रांतातील किल्ले ताब्यात घेतल्यावर औरंगजेबाने आपले लक्ष्य साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. ८ जून १७०१ला फतेउल्लाखान याने खटावचे ठाणे जिंकले. या भागात पडणारा कमी पाउस व चंदन-वंदन, नांदगिरी हे नजरेसमोर ठेवत मोगलांनी खटाव येथे छावणी केली. यानंतर मोगलांची फौज खटावच्या छावणीत जमा होऊ लागली होती. आज न उदया हि टोळधाड वर्धनगडावर धडकणार हे लक्षात घेऊन वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोकांना किल्ल्यात वा इतरत्र पाठवले. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलण्यासाठी ९ जून १७०१ रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला वकील फतेउल्लाखानाकडे पाठवला. त्याने किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो किल्ला मोगलांना किल्ला देण्यास तयार असल्याची बतावणी केली. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केले. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पहात राहिला पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला नाही. मराठ्यांचा हा डाव लक्षात आल्यावर १३ जून १७०१ रोजी फतेउल्लाखानाने किल्ल्यावर हल्ला चढवला. यात अनेक मराठे मारले गेले तर काही जखमी झाले. मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून चाळीस लोंकाना कैद केले. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. १९ जून १७०१ला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी औरंगजेबचा सामान खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य, चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरका इतके सामान जप्त केले. औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून सादिकगड ठेवले. पण औरंगजेबाची पाठ फिरताच सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोरसिंगला कैद करत गडाचे नाव परत वर्धनगड केले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. इ.स. १७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!