वरळी

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : मुंबई

उंची : 0

श्रेणी : सोपी

एके काळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकणातील भूप्रदेशात मुंबई या परिसराचा समावेश होत होता. हा परिसर मराठी भाषेत फिरंगाण या नावाने ओळखला जात असे. फिरंगाणातील बहुसंख्य किल्ले हे पाश्चिमात्यांनी उभारलेले आहेत. या किल्ल्यांची काही खास स्थापत्यशैली होती. फिरंगाणाचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन होते तेच साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एकाकी बुरुजांची तर काही ठिकाणी चौक्यांची योजना पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते. मुंबई परिसरात आजही ऐतिहासिक वारसा जपत चांगल्या स्थितीत काही किल्ले उभे आहेत. मुंबई परिसरातील हे किल्ले एकेकाळी पोर्तुगिजांच्या व नंतर ब्रिटीशांच्या ताब्यात होते. आज आपण भेट देणार आहोत वरळी परिसरातील वरळी किल्ल्याला. वरळी कोळीवाड्यामध्ये आदर्श नगरच्या बसस्टॉपवरुन समुद्र किनाऱ्याकडे जाणारी एक अरुंद गल्ली लागते. या गल्ल्लीतून सुमारे दहा मिनिटे चालल्यानंतर वरळीचा किल्ला लागतो. ... वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर पोर्तुगीजांनी वरळीचा किल्ला १५६१ साली बांधला. तळभागाकडे अधिकाधिक जाड होत जाणाऱ्या तटबंदीच्या भिंती, किल्ल्याच्या दक्षिणेस असलेला त्रिकोणाकृती बुरुज व या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी असलेला मनोरा ही खास पोर्तुगीज स्थापत्याची वैशिष्ट्ये या किल्ल्यामध्ये दिसून येतात. मुंबई बेटांसोबत १६६५ साली हा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मुंबईच्या बेटांवर एकूण ११ किल्ले होते. वरळीचे समुद्रात शिरलेले भूशिर, माहीमचा किल्ला व बांद्रयाचा किल्ला ही तीन ठिकाणे मिळून इंग्रजी U या अक्षरासारखा आकार तयार होतो. ह्या ठिकाणच्या नैसर्गिक अंतर्वक्र भूशिरामुळे येथील समुद्र नेहमीच शांत असतो. त्यामुळे ह्या भागात छोटे मचवे, जहाजे, पडाव यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असे. पुरातत्व खात्याने किल्ल्याची अलीकडेच डागडुजी केल्याने किल्ला सुस्थितीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी लहानसा दरवाजा असुन दरवाजाच्या माथ्यावर घंटा अडकवण्यासाठी लहानसा टॉवर बांधलेला आहे. मुंबईतल्या इतर कोणत्याही किल्ल्यावर न आढळणारा पाण्याचा स्त्रोत या किल्ल्यावर आढळतो. किल्ल्यात पाण्याची विहीर असून त्याच्या बाजूला अलिकडे बांधलेले छोटे मंदिर व व्यायामशाळा आहे. तटबंदीला लागून असलेल्या जिन्याने तटाव गेले असता बांद्रा, माहीम पर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. किल्ल्याबाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले ३ चौथरे दिसतात. १७ व्या शतकात समुद्री चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी येथे तोफा ठेवल्या होत्या. किल्ल्यावरून वरळी-बांद्रे सागरी पुल पाहता येतो. किल्ला छोटा व आटोपशिर असल्याने अर्ध्या तासात सहज पाहून होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!