वज्रगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ४२६५ फुट

श्रेणी : अत्यंत कठीण

किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असो नये. असला तर तो सुरूंग लावून गडाच्या आहारी आणावा व तेही शक्य नसल्यास ती जागा बांधोन मजबूत करावी!—रामचंद्रपंत अमात्य. आज्ञापत्रातील दुर्गशास्त्राच्या या नियमानुसार महाराष्ट्रात पुर्वीपासुनच अंकाई-टंकाई, लोहगड- विसापूर, मांगी-तुंगी यासारखे अनेक जोडकिल्ले बांधले गेले. यात मुरारबाजीच्या पराक्रमाने पावन झालेली इतिहास प्रसिद्ध दुर्गजोडी म्हणजे पुरंदर-वज्रगड. एकाच डोंगरसोंडेवर असलेले हे दोन्ही किल्ले केवळ एका खिंडीने एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्यापेक्षा उंचीने व आकाराने लहान असुन या दोघामधील खिंड भैरवखिंड म्हणुन ओळखली जाते. हे दोन्ही स्वतंत्र किल्ले असले तरी वज्रगडवर जाणारी आताची वाट मात्र पुरंदर गडावरील भैरव खिंडीतुन आहे. वज्रगड व पुरंदर हे दोन्ही किल्ले सैन्यदलाच्या ताब्यात असुन वज्रगडावर नेमबाजीचा सराव होत असल्याने सन २०१७ पासुन या गडावर जाण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. ... पुरंदर किल्ला वज्रगडपेक्षा उंच असल्याने त्यावरून वज्रगडचा माथा पहाता येतो. पुण्याहुन पुरंदर किल्ला ४५ कि.मी.अंतरावर आहे. गाडीने पुरंदर किल्ल्याच्या माचीवर येऊन मुरारबाजी देशपांडे पुतळा पार केल्यावर आपण गाडीच्या वाहनतळावर येतो. येथे गाडी उभी करून सरळ रस्त्याने पुढे आल्यावर आपण भैरवखिंडीत पोहोचतो. या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. या खिंडीच्या पूर्व बाजुस सुटावलेला डोंगर म्हणजेच किल्ले वज्रगड. माझा वज्रगडचा प्रवास केवळ इथपर्यंतच झालेला असून इथून पुढे दिलेले वर्णन हे २०१५ पुर्वी प्रकाशित झालेल्या काही पुस्तकातील वर्णन वाचून दिलेले आहे. भैरवखिंडीतुन सुरवात केल्यावर करवंदीच्या झाडीतुन मार्ग काढत अर्ध्या तासात आपण गडाच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. दरवाजाच्या अलीकडे काही पायऱ्या बांधलेल्या असून हा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या पहायला मिळतात. या दरवाजाच्या आतील बाजुस दुसरा उत्तराभिमुख लहान दरवाजा असून त्याच्या कमानीच्या मध्यभागी शिल्प कोरलेले आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपला थेट बालेकिल्ल्यातच प्रवेश होतो. येथील बुरुजावरून भैरवखिंडीतून गडावर येणारा संपुर्ण मार्ग तसेच बिनी दरवाजाने पुरंदरवर चढणारा मार्ग नजरेस पडतो. गडमाथा समुद्रसपाटीपासून ४२६० फुट उंचावर असून पुर्वपश्चिम पसरलेला आहे. दरवाजाच्या वरील भागात डाव्या बाजुस पाण्याची दोन टाकी आहेत. या भागात मोठमोठे दगड एकमेकांवर रचून ठेवल्यासारखे कातळसुळके पहायला मिळतात. बालेकिल्ल्यावरून गडाच्या खालील भागात जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. या दरवाजाने खाली उतरल्यावर कातळात कोरलेली तलावासारखी ३ मोठी टाकी आहेत. या सर्व टाक्यातील पाणी शेवाळलेले असून टाक्याच्या काठावर मारुती मंदिर व रुद्रेश्वर शिवमंदिर आहे. मारुती मंदिरातील बलभीम जागेवर असला असला तरी रुद्रेश्वर मंदिरातील शिवलिंग जागेवर नाही. रूद्रेश्वर मंदिराच्या पुर्व बाजुस असलेल्या उंचवटय़ावर वाडय़ाचे अवशेष पाहण्यास मिळतात. या सोंडेचे पुर्व बाजुस असलेले टोक चिलखती बुरुज बांधुन बंदिस्त केलेले आहे. सोंडेच्या या भागात तटबंदीतील एक मोठा बुरुज वगळता इतर कोणतेही अवशेष पहायला मिळत नाही. रुद्रेश्वर मंदिराच्या उत्तर बाजुस पाण्याची दोन टाकी आहेत. वज्रगडच्या पश्चिम दिशेस म्हणजे पुरंदरच्या बाजुस असलेल्या टोकावर दुहेरी तटबंदी बांधलेली असुन टोकावरील बुरुजाची मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे. या बुरुजावरून पुरंदर किल्ला व माचीवरील संपुर्ण प्रदेश नजरेस पडतो. गडाची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत असून या तटबंदीत पाच मोठे बुरुज आहेत. कागदपत्रातुन यातील एका बुरुजाचा नागिणीचा बुरुज म्हणुन उल्लेख येतो पण तो नेमका कोणता हे सांगता येत नाही. वज्रगडचा संबंध थेट पुराणाशी जोडला जातो. पुराणातील एका कथेनुसार गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी इंद्राने ज्या पर्वतावर तपसाधना केली तो इंद्रनील पर्वत म्हणजे आजचा पुरंदर. पुरंदर म्हणजे इंद्र व इंद्राचे शस्त्र म्हणजे वज्र यासाठी पुरंदरासमोर बांधलेल्या या गडाचे नाव वज्रगड ठेवले गेले. वज्रगडावर असलेल्या रुद्रेश्वर शिवमंदिरामुळे याला रुद्रमाळ म्हणुनही ओळखले जाते. गडाच्या पायथ्याशी असलेले प्राचीन केदारेश्वर मंदिर पहाता या याची निर्मिती यादव काळापूर्वी चालुक्य अथवा राष्ट्रकुट यांच्या काळात झाली असावी. वज्रगड हा पुरंदरचा जोडकिल्ला असल्याने याचा इतिहास पुरंदरशी निगडीत आहे. बहमनी काळात बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी पुरंदर किल्ला ताब्यात घेऊन त्याची नव्याने बांधणी केली. बहामनी सत्ता संपुष्टात आल्यावर इ.स.१४८९ साली किल्ला निजामशाहीत व त्यानंतर इ.स.१५५० मध्ये आदिलशाहीत आला. आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानास रवाना केले असता महाराजांनी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली पण गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. यावेळी गडावर महादजी निळकंठराव हे आदिलशाही किल्लेदार होते. महाराजांनी त्यांच्या घरगुती भांडणाचा फायदा घेत गडावर प्रवेश केला व गड ताब्यात घेतला. फत्तेखानाशी झालेली लढाई पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी जिंकली. शिवाजीराजांनी नेताजी पालकर यांस इ.स.१६५५ मध्ये पुरंदरचा किल्लेदार नेमले. राजगडचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत स्वराज्याचा सुरवातीचा कारभार या गडावरून सुरू झाला. १६ मे १६५७ रोजी पुरंदर किल्यावर संभाजीराजांचा जन्म झाला. इ.स.१६६५ मध्ये दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. वज्रगड ताब्यात घेतल्यावर त्यावरून पुरंदरावर सहज तोफेचा मारा करता येईल हे लक्षात आल्यावर मुघल सैन्याने वज्रगडची नाकेबंदी केली. यावेळी वज्रगडावर यशवंत बुवाजी प्रभू व त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांच्यासोबत तीनशे मावळे गडावर होते. दिलेरखानाने किल्ल्याच्या वायव्य बुरजाखाली असलेल्या कपिलधार सोंडेवरून तीन तोफा व सैन्य गडावर मारा करण्याच्या टप्प्यात आणले. वज्रगडावरील मावळ्यांचा तीव्र प्रतिकार झेलत या तोफा वर आणल्या गेल्या. अब्दुल्लाखान, फतेहलश्कर व माहेली या तीन तोफांचा मारा वज्रगडावर सुरु झाला व १३ एप्रिलला किल्ल्याचा वायव्य बुरुज ढासळला. मुघलांनी गडात प्रवेश केल्यावर आतील सैन्याने प्रतिकार केला पण मुघल संखेने जास्त असल्याने १४ एप्रिल १६६५ ला गडावर मोगली निशाण फडकले. मराठ्यांना बंदी बनवून मिर्झाराजे जयसिंहाकडे पाठवले गेले. मिर्झाराजांनी सगळ्यांना बिनशर्त सोडून दिले जेणेकरून पुरंदरच्या सैन्यानेही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गड सोडून दयावा. पण मराठे बधले नाहीत व त्याचा हा डाव वाया गेला. आद्यक्रांतीवीर उमाजी नाइक यांचे काही काळ या किल्ल्यावर वास्तव्य होते. पुरंदरच्या पराक्रमाला वज्रगडच्या पराक्रमाची झालर आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!