लोहारा
प्रकार : गढी
जिल्हा : हिंगोली
उंची : 0
श्रेणी : सोपी
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरा भुईकोट व अपवादात्मक गिरीदुर्ग वगळता फार कमी प्रमाणात किल्ले पहायला मिळतात. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने आजही सुस्थितीत आहेत. हिंगोली जिल्ह्यात आपल्याला मध्यम आकाराचे चार किल्ले पहायला मिळतात. यातील तीन किल्ले लहानशा टेकडावर बांधलेले असुन लोहारा नावाचा किल्ला सपाट भूभागावर व तो देखील अर्धवट बांधलेला आहे. या किल्ल्यात असलेले पायऱ्यांची सुंदर बारव पहाण्यासाठी या किल्ल्याला भेट द्यायलाच हवी. लोहारा खुर्द गावात असलेला हा किल्ला हिंगोली पासुन ३५ कि.मी.अंतरावर असुन औंढा नागनाथ येथुन १६ कि.मी.अंतरावर आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. स्थानिकांना हे ठिकाण परिचयाचे असल्याने शोधाशोध न करता लोहारा खुर्द गावाबाहेर हा किल्ला आपल्याला पहायला मिळतो. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण दीड एकरवर बांधलेला असुन त्याचे बांधकाम अपुर्ण राहिले असल्याने त्यात दरवाजा दिसुन येत्न नाही.
...
किल्ल्याची घडीव दगडात बांधलेली तटबंदी साधारण सात फुट उंच असुन बांधकाम सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला आहे. या तटबंदीत एकुण सात बुरुज असुन त्यातील एका बुरुजावार नव्याने बांधलेले मंदिर आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे यात असलेली गोलाकार पायर्यांची विहीर. साधारण ६० फुट खोल असलेली हि विहीर विटांनी बांधलेली असुन विहिरीच्या तळाशी दरवाजा आहे. या दरवाजात उतरण्यासाठी विहिरी शेजारी पायरीमार्ग खोदला असुन या संपुर्ण मार्गाचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूने किल्ल्याच्या बांधकामासाठी दगड काढल्याने या दिशेला खंदक तयार झाला आहे. या खंदकात आजही पाणी साठलेले असुन येथे पाणी साठवुन किल्ल्याची अतिरिक्त पाण्याची गरज भागवण्याची योजना असावी. किल्ल्याची तळातील तटबंदी बांधुन पुर्ण झाली असली तरी आता काही ठिकाणी तिची पडझड झाली आहे. तटबंदीच्या आत विहीर वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. संपुर्ण किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला अर्धवट बांधलेला असल्याने किल्ल्याचा कोणताही इतिहास स्थानिकांना माहीत नाही.
© Suresh Nimbalkar