लोणीभापकर
प्रकार : गढी
जिल्हा : पुणे
उंची : 0
श्रेणी : सोपी
मराठेशाहीच्या उत्तरकाळात बऱ्याच सरदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोटवजा गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट गढी हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व स्वसंरक्षण यासाठी होत होता. या भुईकोटाचा फारसा वापर न झाल्याने व लवकरच इंग्रज सत्ता भारतावर आल्याने या कोटांवर फारसा इतिहासा घडला नाही. खाजगी मालकीचे हे भुईकोट व गढ्या आज मोठया प्रमाणात उध्वस्त झाले असुन इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक उध्वस्त गढी म्हणजे पेशव्यांचे सरदार भापकर यांची लोणीभापकर गढी. लोणीगाव पेशव्यांचे सरदार सोनजी रखोजी भापकर यांना इनाम होते. या गढीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. काही काळाची सोबती असलेली हि गढी अंतिम श्वास घेण्यापुर्वी लवकरात लवकर भेट दयायला हवी.
...
लोणीभापकर गढी बारामती तालुक्यात मोरगाव –बारामती रोडवर असुन बारामती लोणीभापकर हे अंतर ३० कि.मी. तर पुणे लोणीभापकर हे अंतर ७५ कि.मी. आहे. बारामतीहुन पुण्याकडे जाताना लोणीभापकर गावाच्या बाहेर पडल्यावर एका ओढयाच्या काठी हि भुईकोटवजा गढी अतिशय दुर्लक्षित अस्वस्थेत दिसुन येते. गढीची तटबंदी व बुरुजाचे अवशेष झाडीझुडपात झाकून गेले आहेत. रस्त्यावरूनच गढीचे चार उध्वस्त बुरुज व तटबंदी दिसुन येते. गढीशेजारी असलेल्या ओढयाचे पाणी भिंत घालुन अडवुन एका लहान नाळीवाटे गढीत फिरवले असुन आत कृत्रीम तलाव निर्माण करून पाण्याची सोय केली आहे. यामुळे गढीला देखील एका बाजुने खंदकाचे सरंक्षण लाभले आहे. आयताकृती आकाराची हि गढी पुर्वपश्चिम ३ एकर परिसरात पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार मध्यावर प्रत्येकी एक असे तीन व दरवाजा शेजारी दोन असे एकुण नऊ बुरुज आहेत. गढीच्या तटबंदीतील उत्तराभिमुख दरवाजातून आत आल्यावर समोरील बाजूस आतील वाड्याचे प्रवेशद्वार दिसते तर डाव्या बाजुला तलावात उतरणाऱ्या भुमिगत पायऱ्यांची कमान दिसते. या पायऱ्यांनी खाली उतरल्यावर पायऱ्यांच्या टोकाला दुसरी कमान असुन येथुन संपुर्ण तलाव व त्याशेजारील गढीची तटबंदी पहायला मिळते. या तलावातील पाणी थेट वाड्यात खेचुन घेण्याची सोय केली आहे. गढीत आजही भापकरांचे वंशज रहात असुन आतील वाडा सोडुन इतर सर्व वस्तु पुर्णपणे भुईसपाट झाल्या आहेत. गढीची तटबंदी आजही शिल्लक असली तरी कमकुवत झाल्याने फांजीवर जाणे धोकादायक आहे. गढीच्या आवारात दोन चुन्याच्या घाण्याची दगडी चाके व इतर काही दगडी वस्तु पहायला मिळतात. वाडयाच्या आतील भिंतीवरील कोनाडे व लाकडावरील कोरीवकाम आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहेत. गढीच्या दक्षिण बाजुच्या तटबंदीतुन बाहेर जाण्यासाठी असलेला लहान दरवाजा सध्या बंद केलेला आहे. गढीच्या आत तलावाच्या विरुध्द दिशेला एक तळघर असुन त्याचा खाजगी वापर असल्याने आत जाता येत नाही. याशिवाय कोटात एकही अवशेष दिसुन येत नाही. आटोपशीर असा हा भुईकोट पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेसी होतात.
© Suresh Nimbalkar