लिंगाणा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : २६६० फुट

श्रेणी : अत्यंत कठीण

लिंगाणा सुळका सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते व कधीतरी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची तो मनी इच्छा बाळगुन असतो. गिर्यारोहण हा दुर्ग भटक्याचा मुळ पोत नसला तरी रायगडच्या माथ्यावरून काळ नदीच्या खोऱ्यांतील लिंगाणा किल्ल्याचा सुळका त्याला सतत साद घालत रहातो व लिंगाणा किल्ला पहाण्यासाठी गिर्यारोहणाची जोखीम त्याला पार पाडावीच लागते. लिंगाणा किल्ला पहाताना त्याबरोबर लिंगाणा सुळका देखील सर होऊन जातो. चढाईसाठी असणारे मुलभुत नियम वापरले तर शरीराने व मनाने तंदुरुस्त असणारी कोणतीही व्यक्ती लिंगाण्यावर चढाई करू शकते असे माझे मत आहे. २४ डिसेंबर १९७८ पर्यंत अजेय मानला गेलेला हा सुळका संतोष गुजर, तु.वि.जाधव, हिरा पंडीत,अनिल पटवर्धन, विवेक गोऱ्हे यांच्या १४ जणांच्या चमुने २५ डिसेंबर १९७८ रोजी दुपारी बारा वाजता सर केला व त्यानंतर अनेक गिर्यारोहकांचे पाय या शिखर माथ्याला लागले. ... पहिल्यांदा लिंगाण्यावर चढाई करणारा निष्णात गिर्यारोहक संतोष गुजर याचा ३० डिसेंबर १९७९ रोजी लिंगाण्यावर एकाकी चढाई करून उतरताना अपघाती मृत्यु झाला, त्याला भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण लिंगाणा किल्ला व सुळक्याची भटकंती सुरु करूया. सध्या लिंगाणा किल्ला सर करण्यासाठी दोन वाटा प्रामुख्याने वापरात आहेत. यातील पहिली वाट तळ कोकणातील पाने गावातुन लिंगणमाचीवर येथे व तेथुन गडावर चढते तर दुसरी वाट घाटमाथ्यावरील मोहरी गावातुन बोराट्याच्या नाळीतुन खाली उतरते व रायलिंग पठार व लिंगाणा दरम्यान असलेल्या खिंडीत येते. या दोन्ही वाटांनी गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे तसेच गिर्यारोहणाचे साहित्य सोबत असणे अत्यावश्यक आहे. फक्त सुळका चढायचा असल्यास एक दिवस व संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी अजून एक दिवस किल्ल्यावरील गुहेत मुक्काम करण्याची तयारी असायला हवी. तळकोकणातुन किल्ल्यावर जाताना पाने गावात जाण्यासाठी महाड-बिरवाडी-मांगरून-वाळणकोंड-पाने असा गाडीमार्ग असुन एक तासाच्या चढणीनंतर आपण लिंगाणा माचीवर पोहोचते. लिंगाणा माचीवरून सुळक्याखाली असलेल्या गडाच्या अवशेषांपर्यंत जाण्यासाठी १ तास व सुळका सर करायचा असल्यास सुळक्याला वळसा मारून सुळका व रायलिंग पठार यामधील खिंडीत जाण्यासाठी अजून एक तास लागतो. पायथ्यापासुन सुळक्याच्या या टप्प्यापर्यंत येण्यासाठी साधारण तीन ते साडेतीन तास लागतात. घाटमाथ्यावरील मोहरी गावातुन गडावर जाण्यासाठी पुणे– नसरापूर-मार्गासनी-विंझर-वेल्हे-वारोतीफाटा असा गाडीमार्ग असुन वारोतीफाटा पार केल्यावर एक छोटा घाट चढून आपण खिंडीत पोचतो. खिंडीपासून पुढील रस्ता कच्चा मातीचा असल्याने मोहरी गावात जाण्यासाठी जीपसारखे वाहन असल्यास उत्तम अन्यथा येथे गाडी लावून चालत तासाभरात आपण मोहरीस पोह्चतो. मोहरी गावाची पदयात्रा करताना रायलिंग पठाराआडुन डोकावणारा लिंगाणा सुळका व त्यामागील रायगड किल्ला आपले लक्ष वेधुन घेतो. मोहरी गावाच्या थोडे अलीकडे डोंगर उतारावर सिंगापुर गाव वसले आहे. ह्या गावातुन सिंगापुर नाळीने कोकणातील दापोली गावात उतरणाऱ्या वाटेने देखील लिंगाणा माचीवर जाता येते. मोहरी गाव म्हणजे १०-१२ घरांची लहानशी वस्ती. गावातुन बाहेर पडताना खडकात खोदलेली एक मोठी विहीर असुन या विहिरीकडूनच रायलिंग पठारावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. येथुन लिंगाणा सुळक्याच्या अर्ध्या उंचीवर जाईपर्यंत पाण्याची कुठेही सोय नसल्याने या विहिरीवरूनच पुरेसे पाणी भरून घ्यावे. मोहरी गाव ते रायलिंग पठार हे अंतर साधारण ३ कि.मी असुन मोहरी गावातुन बाहेर पडल्यावर पठार-जंगल –पठार अशी पायपीट करत साधारण तासाभरात आपण रायलिंग पठारावर पोहचतो. कोकणात उतरणारी बोराट्याची नाळ रायलिंग पठारावरुन सुरु होते व रायलिंग डोंगराला वळसा घालुन रायलिंग पठार व लिंगाणा ह्यांमधील लहान खिंडीत खाली उतरत जाते. रायलिंग पठाराच्या टोकाला जाताना थोडसे अलीकडे डाव्या बाजुला बोराट्याच्या नाळीत उतरत जाणारी लहानशी पायवाट आहे. या वाटेने खाली उतरण्याआधी थोडेसे पुढे रायलिंग पठाराच्या टोकावर जाऊन लिंगाण्याचे दर्शन घ्यायचे व तेथुन मागे फिरून या वाटेने बोराट्याची नाळ उतरण्यास सुरवात करायची. या वाटेने सांभाळून खाली उतरल्यावर पुढे कड्यात ठोकलेल्या खिळ्याला दोर बांधुन या दोराच्या आधारे २० फुटाचा टप्पा कड्याला चिटकुन पार करावा लागतो. तेथुन १५ मिनिटाची पायपीट करून आपण खाली रायलिंग पठार व लिंगाणा यामधील लहान खिंडीत पोहोचतो. मोहरी गावातुन या खिंडीपर्यंत येण्यास साधारण २ तास लागतात व येथुनच खऱ्या अर्थाने लिंगाण्याची चढाईला सुरवात होते. तळकोकणातुन लिंगाणाच्या चढाईत साधारणत: ९ टप्पे असुन आपण मोहरी गावातुन आल्यास पाने गाव ते लिंगणमाची व लिंगणमाची ते रायलिंग खिंड हे दोन टप्पे चढावे लागत नाही. रायलिंग खिंडीतून सुळक्यावर जाण्यासाठी एकुण ७ टप्पे असुन यातील चार टप्पे कठीण श्रेणीचे तर उर्वरित तीन टप्पे साधारण श्रेणीचे आहेत. यातील पहिले दोन टप्पे चढाईच्या दृष्टीने सोपे असुन पहिला टप्पा म्हणजे घसरणाऱ्या मुरमाड वाटेवरील ५० फुट उंचीचा उभा चढ व १५ फुटाचा कातळटप्पा आहे पण डावीकडे दिसणारी २००० फुट खोल दरीने काही काळाकरता का होईना पण नजरभय येते पण समोर दिसणारा रायलिंगचा कडा तितकेच आपले साहस वाढवतो. पहिले दोन टप्पे पार करून वर आल्यावर उजवीकडे कड्याला लागुन जाणारी वाट दिसते. हि वाट आपण असलेल्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य भागात जाणारी वाट असुन संपुर्ण सुळक्याला वळसा मारत हि वाट जाते. सुळका फिरून आल्यावर आपल्याला किल्ल्यावर जायचे असल्यास वा किल्ल्यावरील गुहेत रहायचे आपल्याकडील ओझे येथेच ठेवावे व जरुरीपुरते खाण्यापिण्याचे सामान घेऊन पुढील वाटचाल सुरु करावी. हा तिसरा टप्पा पार करून आल्यावर आपल्याला समोरच अर्धवट बुजलेली व पडझड झालेली एक गुहा पहायला मिळते. या गुहेच्या उजवीकडे १०-१५ फुटांवर कडयाच्या काठावर कातळात कोरलेली एक गुहा असुन या गुहेत प्रसंगी १०-१२ जण सहजपणे राहू शकतात. येथे कोरलेल्या गुहा या पहारेकऱ्यासाठी कोरलेल्या असुन त्याचा उपयोग बोराड्याची नाळ व सिंगापुर नाळ येथुन खाली उतरणाऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा. गुहेच्या डावीकडुन कड्यालगत १५-२० फुटावर सुळक्यावर जाणारा मार्ग असुन या वाटेने वर न जाता सरळ पुढे चालत गेल्यावर ३०-४० फुटांवर कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी पहायला मिळतात. यातील एक लहान टाके अर्धवट कोरलेले तर दुसरे टाके कातळात खोलवर कोरलेले असुन तिसरे टाके खांबटाके आहे. या टाक्यांच्या पुढे ८०-९० फुटांवर कातळात चार फुट आत अर्धवट कोरलेली एक गुहा आहे. मुळ किल्ल्याचा भाग हा इथपर्यंतच असुन येथुन वरील भाग म्हणजे केवळ सुळका आहे व येथुनच अवघड चढाईला सुरवात होते. खिंडीपासुन गुहेपर्यंतची उंची साधारण ५०० फुट असुन येथुन सुळक्याचा माथा साधारण ४०० फुट उंचावर आहे. केवळ किल्ला पहायचा असल्यास या तीन टप्प्यातच आपली चढाई संपते व उर्वरित चार टप्पे हे सुळक्याच्या चढाईतील आहे. खिंडीतून इथवर येण्यास एक तास लागतो तर येथुन सुळक्यावर जाण्यासाठी एक तास लागतो. येथुन वरील संपुर्ण चढ हा दोरीच्या सहाय्यानेच चढावा लागतो. या चढाईत एकुण चार कातळटप्पे असुन पहिला ५० फुटाचा कातळटप्पा दोन भागात विभागला आहे तर तिसऱ्या व चवथ्या टप्प्यात माथ्याकडे जाताना काही ठिकाणी वाट इतकी निमुळती आहे कि एकावेळी एकच माणूस कसाबसा चालु शकेल. खिंडीतून माथ्यावर येण्यास ३ तास तर मोहरी गावातुन ५ तास लागतात. सुळक्याच्या माथ्याची उंची समुद्रसपाटीपासुन २९६९ फुट असुन माथ्यावर भगवा ध्वज रोवलेला आहे. माथ्यावर १५-२० माणसे जेमतेम उभी राहू शकतील इतपत जागा आहे. माथ्यावरून रायलिंग पठार, पुर्वेला राजगड, तोरणा उर्फ प्रचंडगड तर पश्चिमेला दुर्गेश्वर रायगडाचे अप्रतिम दर्शन होते. खाली वाहणारे काळ नदीचे पात्र, पाने, वाळणकोंडी, वाघेरी हि गावे अगदी चित्रातील असल्यागत दिसतात. माथा पाहुन खाली उतरताना सुरवातीचे दोन टप्पे आपण आधाराने उतरतो तर उर्वरीत दोन टप्पे आपण दोरीला लटकुन (Rapeling करत ) खाली उतरतो. हे दोन टप्पे उतरुन आपण सुरवातीस पाहीलेल्या गुहेकडे येतो. जवळील पाणी संपले असल्यास पुन्हा एकदा इथुन पाणी भरून घ्यावे व वाटचालीस सुरवात करावी. येथुन मोठया गुहेत असलेल्या खिळ्यांना दोर बांधुन पुढील दोन टप्पे पुन्हा एकदा दोरीला लटकुनच (Rapeling करत) आपण खाली उतरतो. हे दोन टप्पे उतरुन आपण सुरवातीस सामान ठेवलेल्या किल्ल्याच्या वाटेवर येतो. येथुन सुळक्याला वळसा मारत पाने गावाच्या दिशेने किल्ल्याच्या मुख्य भागाकडे जाणारी वाट असुन हि वाट म्हणजे उभ्या कडयावर दोन पाय कसे-बसे टेकवता येतील इतपत जागा आहे. काही ठिकाणी इतपत जागाही नसल्याने त्या ठिकाणी लोखंडी दोर बांधला आहे. दोन ठिकाणी अक्षरशः या दोराला लटकत कडा पार करावा लागतो. वाटेवरून खाली पाहिल्यावर डोळे फिरल्याशिवाय रहात नाही. वाकुन.रांगत,कड्याला चिटकून शरीराचे वेगवेगळे आकार करत हि वाट पार करावी लागते. पाय निसटला तर सांगणे न लागे! सुळक्याच्या वळणावर आपल्याला चार-पाच बांधीव पायऱ्या दिसतात. येथुन वर कातळाकडे पहिले असता तेथे कातळात ठोकलेले खिळे व लोखंडी दोर पहायला मिळतो. येथुन सुळक्याखाली असलेल्या किल्ल्याच्या लहान माचीवर जाण्यासाठी वाट असुन किल्ल्याचे बहुतांशी अवशेष या माचीवरच आहेत. आपण येथवर येईपर्यंत सुर्यास्ताची वेळ जवळ असल्याने आपण आधी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचुन हा भाग दुसऱ्या दिवशी पहाण्याचे नियोजन करावे. येथुन पुढे जाणारी वाट बऱ्यापैकी असुन या वाटेवर आपल्याला कातळात कोरलेले पाण्याचे मोठे टाके पहायला मिळते. टाक्यातील पाणी स्वच्छ असुन चव सुंदर आहे. या टाक्याजवळ दगडात कोरलेले एक शिवलिंग आहे. या टाक्याकडून पुढे निघाल्यावर कातळात कोरलेले अजून एक कोरडे टाके पहायला मिळते. या टाक्याकडून पुढे जाणारी वाट नष्ट झाली असुन या टाक्यात उतरुन कड्याला चिटकत पुढे आल्यावर आपण एका प्रशस्त गुहेच्या आवारात पोहोचतो. खिंडीच्या दिशेने असलेल्या पायवाटेने सुरवात केल्यापासुन गुहेपर्यंत येण्यास १ तास लागतो. गुहेचे खोदकाम जमिनीच्या खालील पातळीत केलेले असुन या गुहेत ३० ते ४० माणसे सहज राहु शकतात. गुहेच्या शेजारी गिर्यारोहक कै.संतोष परशुराम गुजर याचा लिंगाणा सुळका उतरताना झालेल्या अपघाती मृत्युची स्मरणशिळा लावलेली आहे. पाने गावातुन गडावर येताना लिंगाणा माचीवरून आपण याच गुहेजवळ येतो. आपला मुक्काम याच गुहेत असुन जवळच असणारे टाक्यातील थंडगार पाणी, समोर दिसणारा रायगड व उबदार गुहा यामुळे या गुहेतील मुक्काम आनंददायी ठरतो. सकाळपासुन झालेली दगदग व आता झालेली पोटपुजा यामुळे आपण केव्हा निद्रादेवीच्या आहारी जातो ते कळत देखील नाही. सकाळी भटकंतीची सुरवात करताना आपले पाठीवरील ओझे या गुहेतच ठेवावे व काल येताना पाहिलेल्या पायऱ्यांच्या दिशेने प्रस्थान करावे. गडाच्या उत्तरेस असलेल्या या पायऱ्या खालील बाजूने वर येताना दिसतात म्हणजेच लिंगाणा माचीतुन गडावर येणारी हि मुळ वाट असावी जी काळाच्या ओघात नष्ट झाली असावी. येथे कातळावर असलेल्या पायऱ्या तुटल्याने लोखंडी दोर लावलेला आहे. गिर्यारोहण तंत्राचा वापर करत २० फुट उंचीचा हा कातळटप्पा चढुन आल्यावर वाटेतच गडाच्या माचीवरील दरवाजाची तुटलेली व अर्धवट गाडलेली चौकट व त्याशेजारी बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात. येथुन ३०-४० फुट उंच घसरड्या वाटेने वर चढुन आल्यावर डावीकडे एका बुरुजाचे व त्यावर एका चौकीचे अवशेष पहायला मिळतात. लिंगाण्याची माची समुद्रसपाटीपासुन २०३२ फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर साधारण २ एकरवर पसरलेली आहे. माचीवर मोठया प्रमाणात अवशेष विखुरलेले आहेत. वाटेच्या सुरवातीस लिंगाणा सुळक्याच्या पोटात कोरलेल्या दोन गुहा असुन यातील पहिल्या गुहेस कातळात कोरलेला एक दरवाजा व चार खिडक्या आहेत. कैदखाना किंवा किल्ल्याची सदर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या गुहेबाहेर एक दगडी पाटा पहायला मिळतो. या गुहेशेजारी अजून एक गुहा कोरलेली असुन हि गुहा धान्यकोठार म्हणुन ओळखली जाते. या गुहेच्या आतील बाजुस भिंतीला लागुन कठडा कोरलेला आहे. गुहेच्या पुढील भागात कडयाच्या काठाला लागुन लहान मोठे वास्तुंचे चौथरे आहेत. या वास्तुमध्ये मातीने बुजलेले पाण्याचे एक लहान बांधीव टाके आहे. हे अवशेष पाहुन पुढे आल्यावर डावीकडे लिंगाण्याच्या सुळक्याच्या पोटात पाण्याचे एक टाके कोरलेले आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. रायगडच्या दिशेने निमुळते होत गेलेल्या माचीच्या या टोकावर एका रेषेत बांधलेले ४-५ वास्तुंचे अवशेष आहेत. पेशवेकाळात हे ठिकाण जीभीचा पहारा म्हणुन ओळखले जात असे. या भागात लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे देव (गडदेवता) श्रीजननी व सोमजाई यांची मंदीरे होती असे वाचनात येते पण आता त्यांचे नेमके स्थान स्पष्ट होत नाही. या देवता सध्या गडाखाली लिंगाणा माचीवर स्थापन करण्यात आल्या आहेत. माचीच्या या भागात तटबंदी तसेच एका बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात. या माचीवर असलेल्या अवशेषांचे हणमंत बुरुज,पहाऱ्याचा बुरुज, सरकारवाडा, प्रवेशद्वार असे उल्लेख कागदपत्रात येतात पण आज मात्र त्याची स्थाननिश्चिती करता येत नाही. माची पाहुन गुहेत परतल्यावर आपले लिंगाणा दर्शन पुर्ण होते. गुहेतून निघाल्यापासून माची पाहुन परत येण्यास साधारण दीड तास लागतो. इथुन घसाऱ्याच्या वाटेने खाली लिंगाणा माचीवर उतरुन पाने गाव गाठता येते किंवा आल्या वाटेने मागे फिरत सुळक्याखाली येऊन पुन्हा एक टप्पा दोरीला लटकुन (Rapeling करत) आपण खाली खिंडीत उतरतो. येथुन पुन्हा बोराड्याची नाळ चढुन दोन ते अडीच तासाच्या चालीनंतर आपण मोहरी गावात पोहोचतो. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर रायगड बरोबर लिंगाणा किल्ला देखील महाराजांच्या ताब्यात आला. पुरंदरच्या तहाने २३ किल्ले मुगलांना दिल्यावर महाराजांकडे उरलेल्या उर्वरीत १२ किल्ल्यांमध्ये लिंगाणा सामील होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी मानगड, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची साखळी तयार केली. सह्याद्रीच्या डोंगररांगांवरील राजगड, तोरणा या किल्ल्यांकडुन बोराट्याची नाळ,सिंगापुर नाळ, बोचेघळ अशा अनेक घाटवाटा खाली कोकणात रायगडच्या दिशेने उतरतात या वाटांवर नजर ठेवण्यासाठी प्रामुख्याने लिंगाणा किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली असावी. लिंगाणा किल्ल्याची निर्मिती ही राजधानीचा उपदुर्ग म्हणूनच झाली असली तरी गडावरील गुहा व खांबटाकी त्याच्या प्राचीनतेची साक्ष देतात. शिवलिंगाच्या आकाराचा म्हणुन लिंगाणा या नावाने ओळखला हा किल्ला रायगडच्या घेऱ्यामध्ये असल्याने रायगडाच्या दुरुस्तीबरोबर लिंगाण्याचीही दुरुस्ती केल्याचे उल्लेख कागदपत्रात आढळतात. रायगडच्या पहाऱ्यात लिंगाण्याचे पहारे व तेथे लागणारे साहित्य यांचे वर्णन येते. रायगड राजगृह व लिंगाणा हे कारागृह म्हणुन ओळखले जात असले तरी शिवकाळात लिंगाण्याचे कारागृह म्हणुन कोणतेच उल्लेख येत नाहीत. लिंगाण्याचे कारागृह म्हणुन सतत उल्लेख येतात ते पेशवेकाळातच. या काळात रायगडचे देखील कारागृह म्हणुन उल्लेख येतात. छत्रपती शाहु महाराजांचे वारस रामराजा यांनी दिलेल्या ३० ऑगस्ट १७७२च्या आदेशानुसार पोतनिंसाकडून रायगड माधवराव पेशव्यांच्या मृत्युनंतर इ.स. १७७३ साली पेशव्याकडे आला त्यावेळी लिंगाण्यावर २ तोफा,२ जंबुरे हे युद्ध साहित्य तर १२ खंडी भात व १९ खंडी नागली धान्यसाठा असल्याचे उल्लेख येतात. यावेळी पेशव्यांनी संभाजी दौंड,चिमणाजी गोविंद व खंडोजी शेळके यांना लिंगाण्याची जबाबदारी देत १५० रुपये पगारावर देवजी गोपाळ यांना लिंगाण्याचे सबनीस नेमले तर धोंडो नारायण मोने यांना कारकून नेमले. पुढे झाले. इ.स.१७७३-७४ साली संताजी नागोजी शेलार गडाचे सरनौबत होते. त्यांच्या काळात लिंगाण्याच्या माचीवरील कोठी दुरुस्त करण्यास ३० रुपये खर्च झाला तसेच पावसामुळे कोसळलेला दरवाजाजवळील टप्प्याचा बुरुज व पहाऱ्याचा बुरुज यांची दुरुस्ती करून दरवाजास नवी लाकडी दारे बसवली. पावसाळ्यात या दरवाजांना साधारण २ किलो म्हणजे १ रुपये किमतीचे मेण लावले जाई. इ.स.१७७४ मध्ये लिंगाण्यावर एक नवीन बुरुज बांधला गेला. इ.स.१७७५ मध्ये लिंगाण्याचा कडा कोसळुन वाटेवर प्रचंड मोठा दगड आला. बिगारी व पाथरवट यांच्या मदतीने दगड फोडुन वाट मोकळी केली तसेच हौदाजवळील बुरुजाचे काम पुर्ण केले. इ.स.१७७७ साली लिंगाण्यावर राजबंदीसाठी नवी कोठडी, धान्याचे कोठार,दरवाजाखाली पहाऱ्याची जागा,वाटेची दुरुस्ती यासारखी अनेक कामे करण्यात आली. इ.स.१७८० साली मोडकळीस आलेली किल्ल्याची सदर नव्याने बांधली त्यासाठी १२ रुपये खर्च आला. इ.स.१७७९ व १७८१ साली लिंगाणा शाकारणीचा खर्च पावणे दोन रुपये होता. लिंगाण्यावर जननीचे देवालय,सदर, सरकारवाडा,हवालदाराचे घर, हणमंत बुरुज,जीभीचा पहारा,निगडीचा पहारा या सात ठिकाणी शाकारणी केली जात असे. इ.स.१७८५ साली किल्याच्या माचीवर नव्याने कोठी बांधताना ३२ रुपये खर्च आला. इ.स.१७८६ साली कोसळलेला हनुमंत बुरुज नव्याने बांधण्यात आला. इ.स.१७८६ सालापर्यंत लिंगाण्याची सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार या वास्तूंची देखभाल केली जात असल्याचे उल्लेख आढळतात. लिंगाण्याच्या (गडदेवता) गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई या देवतांना नवरात्राच्या उत्सवात बकरे बळी देण्याची प्रथा होती व यासाठी रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. यावेळी देवीस (प्रत्येकी) १ रुपयाचे पातळ व चोळी सरकारतर्फे अर्पण केली जाई. कोळी भगत कडु याच्याकडे या देवतांचे भगतपण होते. लिंगाण्यावर काही उपद्रव झाल्यास वाळणकोंड येथील देवाची यात्रा केली जाई. इ.स.१७८४ मध्ये लिंगाण्यावर उपद्रव झाल्याने वाळणकोंड येथील देवाची यात्रा केली गेली. या यात्रेत नारळ,शेंदुर,पंचखाने व देवास पानसुपारी यासाठी आठ आणे सरकारी खर्च आला. लिंगाण्यावर पांजीसाठी दर तिसऱ्या वर्षी बकरे बळी देत. यात एक बकरा श्रीजननी व सोमजाई या देवतांसाठी तर एक गडाच्या दरवाजासाठी असे. इ.स.१७८७-८८ मध्ये तेथे टोणगा बळी दिल्याचे उल्लेख येतो. लिंगाण्यावर दसरा व चंद्रदर्शन प्रसंगी पानसुपारी वाटण्याची पद्धत होती तसेच चंद्रदर्शनाच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला तोफ डागली जाई. पावसाळ्यापुर्वी गडावरील इमारतींची शाकारणी करण्यापुर्वी गडावर शाकारजत्रा केली जाई व त्याचा खर्च सरकारातून केला जाई. या सर्व खर्चाचे कागद पेशवे दफ्तरात आढळतात. लिंगाण्यावरील शिबंदीत १७७५-७६साली ६१ माणसे,१७८०-८१साली ७३ माणसे, १७८१-८२साली ५१ माणसे,१७८३-८४ साली ४२ माणसे तर १८०८-०९ साली फक्त ६ माणसे होती. इ.स.१७८१-८२ साली ५१ माणसाना पगारासाठी एकुण २८३३ रुपये व इतर खर्च ३५ रुपये झाला तर इ.स.१७८३-८४ साली ४२ माणसाना पगारासाठी एकुण २०४२ रुपये खर्च झाला. राजकीय कैदी, राजद्रोह, मनुष्यवध या गुन्ह्यातील कैद्यांना लिंगाण्याच्या गुहेत ठेवल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आढळतात. इ.स.१७७५ ते इ.स. १७९५ दरम्यान गोपाळशेठ सोनार (१७७५-१७७६),गणेशभट परांजपे (१७७९-१७८१), मानसिंग खलाटे (१७८३-१७८५),मोरोजी नाईक संकपाळ (१७८५),मेस्तरजमा फरसिसिण(१७९२),ठकी कोंढरकरीण (१७९५-९६),आनंदराव रामचंद्र अभ्यंकर(१७९८) या मान्यवरांना लिंगाण्याची कैद नशिबी आली. इ.स.१७८०-८१ मध्ये येसाजी नाईक चांदळेकर किल्लेदार व गणोजी नाईक हे सरनौबत तर महादजी निळाजी व रामजी नारायण हे सबनीस होते. इ.स.१७८६-८७ साली रंभाजी दौंड किल्लेदार झाले पण कामात चूक झाल्याने त्यांना कैद करून बाळकृष्ण पांडुरंग यांची नेमणूक करण्यात आली. हि नेमणूक इ.स.१७९५ पर्यंत कायम होती. त्यांच्या मृत्युनंतर इ.स.१७९५ साली हबाजीराव राणे किल्लेदार झाले. . इ.स.१८०८-०९ साली दौलतराव कुंजीर लिंगाण्याचे किल्लेदार होते. इ.स.१७९५-९६ साली लिंगाण्याचा वार्षिक खर्च ३४२०/- रुपये तर इ.स.१८१३-१४ मध्ये ३१५०/- रुपये होता. ९ मे १८१८ रोजी रायगडच्या पाडावानंतर कर्नल प्रौर्थरच्या नेतृत्वाखाली लिंगाणा किल्ला जिंकण्यात आला व रायगडाच्या खोऱ्यात विश्रांती घेऊन इंग्रजांचे सैन्य २३ मे १८१८ रोजी पालीकडील मार्गास लागले. लिंगाणा मोहीम करताना काही महत्वाच्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. १)प्रस्तरारोहणाचे तंत्र व अनुभव तसेच गिर्यारोहणाची तांत्रीक माहिती व अनुभव असलेला माणुस सोबत असल्याशिवाय लिंगाण्यावर जाऊ नये. २)चढताना व उतरताना छोटे मोठे दगड दोर घासल्याने निसटुन खाली अंगावर येतात त्यामुळे हेल्मेट आवश्यक. ३)प्रस्तरारोहण व दोरीने उतरताना लागणारे सर्व सामान जवळ बाळगणे अत्यावश्यक आहे. ४)लिंगाणा चढाईसाठी मोहरी गावातुन शक्यतो अंधारात निघून पहाटे सुरुवात करावी त्यामुळे भर उन्हात चढाई करावी लागत नाही. ४)पाने गावातुन गडावर जात असल्यास शक्य झाल्यास पाने गावातील बबन काशीराम कडु यांना सोबत वाटाड्या म्हणुन घेऊन जावे. टीप- सदर मोहीम WILD TROOPS या गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातुन सुदेश नांगरे,सिद्धेश गोताड व हर्ष हंडोरे यांच्या सहकार्याने पार पडली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!