लासुर
प्रकार : गढी
जिल्हा : जळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
लासूर हे जळगाव जिल्हातील चोपडें तालुक्यांतील गांव हे चोपडयापासून १४ कि.मी. अंतरावर तर अमंळनेर पासुन ३४ कि.मी. अंतरावर आहे. जळगाव जिल्हा ग्याझेटमध्ये नोंद असलेला हा किल्ला आज पुर्णपणे नष्ट झाला असुन या किल्ल्याच्या आत असलेल्या काही वास्तुंचे केवळ अवशेष आज पहायला मिळतात. काळाच्या ओघात हे अवशेष नष्ट होण्यापुर्वीच या जागेला भेट दयायला हवी. लासुर किल्ल्याचे अवशेष म्हणजे ठोके यांचा उध्वस्त वाडा, एक पायऱ्या असलेला चौकोनी खोल बांधीव तलाव व त्याच्या काठावरील मशीद इतकेच शिल्लक आहे. तलावाच्या एका बाजुला असलेली मोकळी जागा म्हणजे ठोके यांची बाग असल्याचे स्थानिक सांगतात. चार वर्षापुर्वी या जागेला भेट दिली असता एक गजलक्ष्मी शिल्प या तलावाच्या काठावर होते पण आज ते देखील जागेवर नाही. तलाव व मशीद हे अवशेष बस स्थानकाच्या मागील बाजुस असुन वाड्याचे अवशेष बस स्थानकाच्या समोरील गल्लीत आहेत.
...
काही वर्षापुर्वी तीन मजली अवशेष असणारा हा वाडा आज केवळ एक मजली उरला आहे. ग्याझेटमधील नोंदीनुसार लासुर किल्ल्याचा इतिहास हा १९ व्या शतकाच्या सुरवातीपासूनच सुरु होतो. या काळात खानदेशात असलेले लासूर व आसपासचा प्रदेश ठोके घराण्यांच्या ताब्यात होता. मराठयांचा या भागातील वावर वाढल्यावर गुलझारखान ठोके याने लासुर किल्ला बांधला व अरब सैनिकांची शिबंदी ठेविली. या भाडोत्री सैन्याला त्यांचा पगार वेळेवर न मिळाल्याने त्यांनी ठोके यांच्याविरुद्ध बंड पुकारुन गुलजारखान ठोके व त्याचा मोठा मुलगा अलियावर खान यांना मारण्याचा बेत केला. गुलजारखान यांचा दुसरा मुलगा अलीफखान या अरबांच्या तावडीतुन निसटुन यावल येथे सूर्याजीराव निंबाळकराच्या आश्रयास गेला. निंबाळकर यांच्याकडून काही सैन्य घेऊन अलीफखान लासूरला परतला आणि अरब सैन्याची बाकी देण्याच्या निमित्ताने किल्ल्यात शिरला व सर्व अरबी सैन्य कापून काढले. किल्ला ताब्यात आल्यावर मराठे किल्ल्याचा ताबा सोडण्यास तयार होईनात तेव्हा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या अलीफखानने भिल्लांच्या मदतीने किल्ल्यावर हल्ला केला पण त्यात तो पराभूत झाला. शेवटी १०००० रूपये निंबाळकरांना देण्याच्या अटीवर किल्ला देण्याचे निंबाळकरांनी मान्य केले. इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्सने हे पैसे ठोके यांना आगाऊ रक्कम म्हणुन दिले आणि ब्रिटिश सैन्याने किल्ल्यावर कब्जा केला. नंतरच्या काळात इंग्रजांनी हा किल्ला पाडून टाकला. यानंतर लागलेल्या आगीत ठोके यांच्या वाड्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
© Suresh Nimbalkar