लासगाव
प्रकार : गढी
जिल्हा : जळगाव
उंची : 0
पाचोरा शहर मध्यवर्ती ठेऊन जळगाव जिल्ह्यातील गढीकोटांची भटकंती केल्यास कमी वेळात या भागातील अनेक गढीकोट पहाता येतात. यातील काही गढीकोट दुर्गप्रेमीना व स्थानिकांना परीचीत आहेत तर काही गढीकोट पुर्णपणे अपरीचीत असुन त्यांचा कोठेही उल्लेख आढळुन येत नाही. जळगाव जिल्ह्यातील गढीकोटांची भटकंती करताना आम्हाला पहायला मिळालेली अशीच एक अपरीचीत गढी म्हणजे लासगावची गढी. बांबरूडराणीचे या गावात एक आजोबांकडून आम्हाला या गढीची माहीती मिळाली व आम्ही लासगावात पोहोचलो. बांबरूड राणीचे या गावापासुन ४ कि.मी.अंतरावर असलेली हि गढी पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन २० कि.मी.अंतरावर आहे. या गढीची रचना एकाद्या लहान नगरकोट प्रमाणे असुन गढीच्या चार टोकास प्रत्येकी एक याप्रमाणे चार लहान बुरुज आहेत. गढीला उत्तर व दक्षिण असे दोन दरवाजे असुन हे दरवाजे, त्याची कमान व एक लाकडी दरवाजा आजही शिल्लक आहेत. तटाची उंची साधारण २० फुट असुन तटाचे खाली अर्धे बांधकाम घडीव दगडात तर वरील बांधकाम विटांनी केलेले आहे.
...
गढीचा आतील परीसर साधारण एक एकर असुन गढीच्या आतील अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. गढीतील नव्याने बांधलेली घरे तटाला लागून बांधलेली असुन या तटाचा बांधकामातील एक भिंत म्हणुन वापर करण्यात आला आहे. हे बांधकाम करताना चक्क बुरुजाचा देखील खोली म्हणुन वापर करण्यात आला आहे. या नवीन बांधकामामुळे गढीला एक प्रकारे नगरकोटचे रूप प्राप्त झाले आहे. गढीच्या आत पहाण्यासारखे काहीही नसल्याने संपुर्ण गढीला फेरी मारून अर्ध्या तासात आपले गढीदर्शन पुर्ण होते. गढीत वास्तव्यास असणाऱ्यांना गढीबाबत कोणतीही माहिती अथवा इतिहास सांगता येत नाही. मध्ययुगीन काळात या भागातील प्रशासन व्यवस्था येथील स्थानिक वतनदाराकडून सांभाळली जात असल्याने मध्यवर्ती सत्तेचा त्यात फारसा हस्तक्षेप नसे कारण सत्ता कोणाचीही असो स्थानिक वतनदार त्यांच्याशी जुळवुन घेत असत. हे वतनदार या गढीत वास्तव्यास असल्याने तेथील सुरक्षाव्यवस्था चोख असे पण या गढीत कोणतीही संरक्षणात्मक रचना दिसुन येत नाही.
© Suresh Nimbalkar