लळिंग
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : धुळे
उंची : १८६५ फुट
श्रेणी : मध्यम
नाशिक-आग्रा महामार्गावर पुर्वीच्या बागलाण व खानदेशाच्या सीमारेषेवर भामेर नंतर खानदेशातील सर्वात उंच असा लळिंग किल्ला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुंदर किल्ल्यांपैकी एक असणारा हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात खानदेशाची राजधानी होता. धुळे शहरापासुन केवळ ८ कि.मी अंतरावरील लळिंग गावात दुर्ग अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला महामार्गालगत असल्याने अर्ध्या दिवसात सहजपणे पाहुन होतो. माची व बालेकिल्ला अशा दोन भागात असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून १८०० फुट उंचीवर तर पायथ्यापासुन साधारण ६०० फुट उंचीवर असुन गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. लळिंग गावातुन किल्ल्याकडे जाताना वाटेत काळ्या पाषाणात बांधलेले प्राचीन शिवमंदिर पहायला मिळते. मंदीराच्या शिल्लक भिंती, त्यावरील कोनाडे व दरवाजावरील नक्षीकाम आजही मंदिराचे वैभव दाखवते. मंदिरामागे पाण्याची टाकी असुन या टाकी जवळुन गडावर जाणारी वाट आहे.
...
गडावर पाण्याची सोय नसल्याने पुरेसा पाणीसाठा जवळ ठेवावा. स्थानिकांची गडावर ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट मळलेली असुन गडावर जाण्याचा वाटेवर दिशा दर्शक खुणा केलेल्या आहेत. खालुन बघताना गडाचा उजवीकडचा पांढरा विशाल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. येथून किल्ला व तटबंदी उजवीकडे ठेवत आपली गड चढाई सुरु करायची. वाटेत अनेक खुरटी झाडे असली तरी सावली मात्र नाही. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने तुटलेल्या दगडी पाय-या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर समोरच एक थडगे व टाके दिसते. या ठिकानी पायवाटेच्या दोन्ही बाजूस असलेले दगडाचे ढिगारे पहाता या ठिकाणी गडाचा पहिला दरवाजा असण्याची शक्यता आहे. येथुन डावीकडील वाट बालेकिल्ल्याकडे जाते तर उजवीकडील वाट किल्ल्याच्या माचीवर जाते. डावीकडून पुढे गेल्यावर वाटेत गडाचे प्राचीनत्व सिद्ध करणाऱ्या चार-पाच कातळात कोरलेल्या गुहा दिसून येतात. साठवणीसाठी अथवा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. येथून डाव्या बाजूचा रस्ता तटबंदीच्या बाहेर जातो तर उजवा रस्ता तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. गुंहा मागे टाकुन आपण किल्ल्याच्या पडझड झालेल्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. दरवाजाच्या उजव्या बाजूला भिंतीवर एक व्यालशिल्प कोरलेले पहायला मिळते. हे शिल्प विविध कालखंडात हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही स्थापत्यावर कोरलेले दिसून येते. समोरच गडाची सदर असून आजमितीस या वास्तूची केवळ भिंत व ओवऱ्या शिल्लक आहेत. येथून वर आल्यावर उजवीकडे गडाची तटबंदी व बुरुज त्याच्या माथ्यावर तोफेचा गोल कट्टा पाहायला मिळतो. या तोफेच्या माऱ्यात गडाखालील उत्तर बाजुच्या खालचा सर्व टप्पा येतो. या बुरुजावरून खाली पाहिल्यास एक बांधीव पण सध्या कोरडा पडलेला तलाव व त्याच्या काठावर असलेली घुमटाकार वास्तू आपले लक्ष वेधून घेते. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत आपल्याला दिसते ती याच ठिकाणी नजरेस पडते. मुस्लीम स्थापत्यशैलीतील हे बांधकाम विटांचा व चुन्याचा वापर करून केलेले आहे. बाहेरून भव्य वाटणाऱ्या या वास्तूची आतील बाजू पडलेली असल्याने तिचा अंदाज येत नाही. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. येथुन मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते तसेच वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही दिसतो. या बुरुजापलीकडे गडाच्या सुंदरतेत भर घालणाऱ्या पाच-सहा चर्या पाहून पुन्हा दरवाजापाशी येउन डाव्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. वाटेत कातळात तयार केलेली पाण्याची तीन टाकी असुन त्यात उन्हाळ्यात देखील पाणी असते. या पाण्याला कुबट वास येत असला तरी पिण्यासाठी हेच पाणी वापरले जाते परंतु हे पाणी पिण्यायोग्य वाटत नाही. येथून पुढे बालेकिल्ल्याचे पठार असुन या पठारावर काही घरांचे चौथरे पहायला मिळतात. या पठारावर अजुन काही कातळात कोरलेली पाण्याची टाकी पहायला मिळतात. पठाराच्या चहूबाजुंला असलेली तटबंदी फांजीपर्यंत मातीत गाडली गेली असून या तटबंदीवरील चर्या आजही सुस्थितीत आहेत. काही ठिकाणी तटबंदीवर कमानी उभारलेल्या दिसतात. कमानींच्या या पाकळय़ांमधून दक्षिण-पश्चिमेकडील पिसोळगड, कंक्राळा, डेरमाळ, गाळणा असे अनेक किल्ले नजरेस पडतात. किल्ल्याच्या कातळ माथ्यावर जेथे गरज आहे तेथेच तट बांधण्यात आला असून उभा कडा असलेल्या ठिकाणी तटबंदी दिसत नाही. पठारावर असलेल्या टेकाडाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या असुन त्यात पाण्याची टाकी कोरलेली आहेत. टेकाडाच्या वरील भागात एक चुनेगच्ची बांधकाम असलेली इमारत असुन हे बहुदा दारुगोळा कोठार असावे. या कोठाराच्या मागील बाजुस पाण्याचा मोठा खंदक असुन त्यात कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी आहेत. या पाण्याच्या टाक्यांना लागून एक काळ्या दगडातील बांधीव चौकोनी कुंड आहे. समोरच ललितामातेचे एक लहानसे मंदिर आहे. किल्ल्यावर राहण्याची वेळ आल्यास या मंदिरात रहाता येईल. परंतु यात केवळ दोन जण राहू शकतात. मंदिरासमोर काही चौथरे असुन त्यात एक मोठा वाडय़ाचा चौथरा आहे. तटबंदीच्या काठाने गेल्यावर आपण लळिंग किल्ल्याच्या पश्चिमेकडील चोर दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा त्यात घेऊन जाणारा भुयारी पायरीमार्गव त्याच्या आसपासची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. या दरवाजाने खाली उतरणारी वाट गडाच्या माचीवर घेऊन जाते. या दरवाजाने खाली उतरताना कातळात खोदलेले पाण्याचे टाके लागते. येथून थोडे खाली उतरल्यावर वाट उजवीकडे वळते. वाटेतच देवीचे एक पडके मंदिर आहे. मंदिराच्या समोरुन जाणारी ही वाट सरळ माचीवर जाते. या माचीवर पाण्याचा एक भला मोठा खोदीव बांधीव तलाव असुन त्याच्या काठावर एक घुमटवजा मनोरा आहे. अष्टकोनी हा तलाव साधाच पण त्याच्या एका कोनावर उभारलेल्या मनोऱ्याने त्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. मनोऱ्याच्या समोरील बाजूस पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्याच्या वरील बाजुस एक कबर उघडयावर असुन दोन कबरी असलेला ढासळलेला दर्गा आहे. किल्ल्याच्या माचीला काही ठिकाणी तटबंदी आहे. या भागातुन बालेकिल्ल्याच्या तटबंदी बुरुजांचे व त्यावरील महिरपी व चर्याचे सुंदर दर्शन होते. माचीवर फेरफटका मारुन आपण तलावाला उजवीकडे ठेवून पुढे वर चढत जायचे. ही वाट पुन्हा आपल्याला उध्वस्त प्रवेशव्दाराच्या जवळ घेऊन जाते. येथे आपली दोन तासाची लळिंग माथ्याची गडफेरी पूर्ण होते. सर्व परिसर पाहून आल्या मार्गाने परत लळिंग गावात उतरावे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक राजघराण्यांमध्ये खानदेशातील फारूकी घराणे एक मोठे राजघराणे. या घराण्याने खानदेशावर तब्बल दोनशे वर्षे राज्य केले. इ.स.१३७० मध्ये मलिक याने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली. इ.स.१३७० ते १३९९ या कालखंडात फारुखी घराण्यातील राजा मलिक याच्याकडे लळिंगचा ताबा होता. इ.स.१३९९ मध्ये मलिकच्या मृत्युनंतर त्याचा मोठा मुलगा नसीरखान याच्या ताब्यात लळिंगचा परिसर आला व हा भाग फारुकी राजवटीचे सत्ताकेंद्र बनला. नसीरखानने या किल्याला राजधानीचा दर्जा दिला व लळिंग ही खानदेशाची राजधानी झाली. मलिकनें आपल्या मोठया मुलास थाळनेर ऐवजीं हा किल्ला दिला यातच या गडाचे महत्व अधोरेखित होते. इ.स.१४०० मध्ये नसीरखानने असिरगड जिंकून तेथे बु-हाणपूर नावाचे शहर वसवले व त्याला राजधानी घोषीत केले. पुढे १४३५ मध्ये बहमनी सुलतान व नसीरखान यांच्यात लढाई होऊन त्यात नसीरखानचा पाडाव झाला. बहमनी सुलतानाने बुऱ्हाणपूर जाळून खाक केल्याने नसीरखानने परत लळिंग किल्ल्याचा आसरा घेतला पण बहमनी सरदार मलिक-उल-तुजार याच्या सैन्याने त्याचा पाठलाग करत लळिंग परिसर गाठला. त्या वेळी नसीरखान स्वत: गडाखाली उतरून २००० घोडदळ व असंख्य पायदळाच्या मदतीने बहमनी सैन्यावर तुटून पडला. लळिंगच्या पायथ्याला मोठी लढाई झाली पण त्यात नसीरखानाचा पराभव होऊन त्याला लळिंग किल्ल्यावर परतावे लागले. या युद्धात बहामनी सरदाराला ७० हत्ती व प्रचंड संपत्ती मिळाली. त्यामुळे लळिंग किल्ला घेण्याच्या फंदात न पडता ही लूट घेऊन तो बिदरला निघून गेला. हा पराभव नसीरखानाच्या जिव्हारी लागला व आजारी पडून १७ सप्टेंबर १४३७ रोजी लळिंग किल्ल्यावर मरण पावला. इ.स. १६०१ मध्ये फारुखी घराण्याचे राज्य संपवून मुघलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. मुघल साम्राज्याचा विस्तार बागलाण व खानदेशात झाल्यावर लळिंग हे त्यांचे मुख्य लष्करी केंद्र बनले. इ.स.१६३२ मध्ये मालेगावजवळील गाळणा किल्ला लळिंगच्या किल्लेदाराच्या शिष्टाईने मुघल अधिपत्याखाली आला. १६३२ मध्ये लळिंगचा मोगल किल्लेदार मीर कासिम हा होता. लळिंग जवळील गाळणा गड त्यावेळी निजामशाहीत होता आणि तेथील किल्लेदार महमुदखान याने गड शहाजीराजेंच्या ताब्यात देण्याचे ठरविले होते. ही बातमी खानदेशचा सुभेदार खानजमान याला लागल्यावर खानाने लळिंगचा किल्लेदार मीर कासिमला लिहिले कि महमुदखानाला बादशाही नोकरीत येण्यासाठी प्रवृत्त करा आणि किल्ला शहाजीच्या हातात जाऊ देऊ नका. मीर कासिमने हे महत्त्वाचे काम बजावून गाळणा किल्ला मोगलाईत सामील केला. सन १७५२ मध्ये मराठय़ांनी भालकीच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यावर लळिंग मराठी साम्राज्यात सामील झाला. पेशव्यांनी गड मल्हारराव होळकरांच्या ताब्यात दिला व त्यांच्या अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालु लागला. इ.स.१८१८ मध्ये मराठी सैन्याचा इंग्रजांकडून पराभव झाल्याने लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar